Monday 29 October 2012

Onion पोहे


पोहे म्हटलं कि कसं तोंडाला पाणी सुटत...गरम गरम पोहे आणि चहा....
अरेच्या कांदे पोहे, आधीच्या काळात रीतच होती, मुलगी पाहायला आले कि पाहुण्यांना कांदे पोहे दिलेच पाहिजेत. मग तो पोह्यांचा ट्रे, मुलगी घेऊन येईल...सगळ्यांना देईल, मुलाकडे देताना लाजून चूरर होईलं, आणि मधोमध बसून, मान खाली घालून सगळ्यांच्या प्रश्नांना सामोरी जाईल, गाणी गाऊन दाखवावी लागतील, चालून दाखवाव लागेल,....हे सार कशासाठी? मुलगी कशी गाते? आवाज कसा आहे? नीट चालते का? आणि बरंच काही तपासलं  जायचं.

पण, आता कांद्याचे Onion पोहे झाले आहेत....ते कसं काय? विचारात पडलात?? 
अनघा, आताच्या काळातली स्वतःच्या पायावर उभी असलेली एक सामान्य युवती. इंजिनियर बनून, चांगल्या कंपनीत नोकरीला होती. लग्नाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या अनघाच्या घरातल्यांना तिच्या लग्नाचा घोर लागला होता...अनघा ऑफिस संपून बराच वेळ निघून गेला होता पण ती घरी जाण्याच्या मूड मध्ये दिसत नव्हती. आज तसं तिला तिच्या ग्रुपला भेटायला जायचं होत, सारखे फोन येत होते पण, ती उचलतच नव्हती, शेवटी वैतागून तिने उचलला, सगळ्यांचा ओरडा सुरु झाला होता तसं ती नाईलाजास्तव उठली....ग्रुप मध्ये तसं कोणाच लग्न नव्हत झाल...सारे बेचलरस...सगळ्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या...अचानक तिने गोप्यस्फोट केला कि ती प्रोजेक्टसाठी अमेरिकेला जातेय...सगळ्यांचा जोरात ओरडा सुरु झाला...सगळे एकदम धमाल मूड मध्ये होते.
अचानक, थोड्यावेळाने तिने ग्लास फोडला, आणि ती जोरजोरात रडू लागली....कोणालाच समजेना काय झाल अचानक?
डोळे पुसून अनघाने मोठ्ठा श्वास घेतला आणि ती बोलू लागली....
" मी अनघा, वय २५, एका मोठ्या कंपनीत काम करतेय, दिसायला सुंदर, रंग गोरा, उंची ५ फूट ६ इंच, कोणतच व्यसन नाही, ना काही अफेयरस, जेवण सुद्धा छान बनवते, पगार सुद्धा छान आहे, मोठ्यांचा आदर, लहानांना प्रेम करणं हेच मला लहानपनापासून शिकवलं आहे, आणि मी तशीच आहे, ना मी कोणाला कधी दुखावलं ना मारलं....माझी चूक आहे तरी काय?? कि मी एक मुलगी आहे? खेळण आहे का मी सगळ्यांच्या हातातलं...?? इतकी शिकून सावरून, माझ लग्न होत नाहीय? का? मी हुंडा देणार नाही म्हणाले म्हणून...माझ्या आईच मी पण एकुलत एक पाखरू आहे, मला पण भावना आहेत, मला नाही घ्यायचा विकत नवरा. तिला बरचं काही बोलायचं होत पण, ती अचानक गप्प झाली."

अशा अनेक अनघा आपल्या आजूबाजूला आहेत. काही, सहन करत आहेत तर काही....

अनघा नंतर भेटूया मोनिकाला, आधुनिक विचारांची तरुणी, आई वडील सुद्धा तितकेच आधुनिक आहेत, इंटरनेट या नव्या मार्गाने त्याचं वर संशोधन सुरु आहे. प्रत्येक पोर्टलवर तिचा प्रोफाईल अपलोड आहे. अधून मधून तिच डेटिंग पण चालूच असत...आणि त्यात काही गैर आहे असं मला तरी वाटत नाही. पण, रोज नवीन मुलांसोबत बोलून तिचं मानसिक संतुलन बिघडलं होत. अपेक्षा आणि वास्तव यातला फरक तिला करता येईना. याच रुपांतर चिडचिड करने, रात्री मध्यरात्री मद्यधुंद होऊन मित्र-मैत्रिणीच्या घरी थांबण,...नकार पचला नाही कि पबला जाण...योग्य काय आणि अयोग्य काय हे समजण्याची तिची क्षमता कुठेतरी हरवून गेली होती.

योग्य आणि अयोग्य यामध्ये जास्ती फरक असतोच कुठे? तो तर आपणच ठरवतो, प्रत्येक जण आपापले ठरवतात काय योग्य आणि काय अयोग्य.

आजकाल मी पण ठरवतेय कि मी कोणता मार्ग घेऊ?
मनामध्ये कधी कधी विचार येतात आणि ते पंख लाऊन उडून देखील जातात पण, मी त्यांच्या मागे धावत नाही, कारण ते पुन्हा माझ्याच ओंजळीत येऊन विसावणार हे मला माहित असत, म्हणून मी ठरवलंय, मी मध्य साधणार दोन काळांचा मध्य आणि तो आहे Onion पोहे.

बघा विचार करा मित्रहो, तुम्हाला कोणते पोहे खायचे आहेत? आणि बनवणाऱ्या माझ्या मैत्रिणीना, कोणते पोहे बनवणार आहात तुम्ही?

तुमची प्रिया सातपुते.


Wednesday 24 October 2012

!! दसरा !!



आज आपण दसरा साजरा करत आहोत, आजच्या या दिवशी आपण रावणाला जाळतो, अन्यायाचा नायनाट व्हावा म्हणून देवीला साकड घालतो...सगळी कडे भारत देशात हे नऊ दिवस प्रचंड जल्लोष असतो, दांडिया, गरबा, देवी पूजा, काली माता पूजा, दुर्गा पूजा, अश्या बऱ्याच गोष्टी आपण करत असतो. ज्या स्त्रीरूपी देवीची आपण पूजा करतो, जिला आपण साकड घालतो, सुखी ठेव, पैसा दे, मुलगा दे, आणि मुलगी नको???

एका स्त्रीशक्ती कडेच आपण मुलगी नको म्हणतो....का??? ही मानसिकता आहे कि दुसर काही याचं विश्लेषण मला इथे करायचं नाही, आजपर्यंत बऱ्याच लोकांनी पुढाकार घेऊन स्त्रियांचं आयुष्य बदलवण्यात हातभार लावले आहेत. पण, एक स्त्री म्हणून मी किंवा स्वतः तुम्ही किती हातभार लावलेत? किंवा एक पुरुष म्हणून तुम्ही एका स्त्रीला किती रूपांमध्ये पूजनीय ठरवता आणि मानता? एक मुलगा म्हणून? एक पती म्हणून? आणि एक पिता म्हणून? कि एक खूनी म्हणून???

भारतीय संस्कृती पितृसत्ताक आहे, म्हणून, आजच्या काळात स्त्री अर्भक त्यांच्या नजरेतून काय आहे? हे तितकंच महत्वाच आहे. जरी स्त्री २२ व्या शतकाकडे धावत असली तरीही अजूनही तिला बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात. मग त्यात ती स्वतःच्याच बाळाची खूनी देखील होऊ शकते...ज्या विरोध करतात त्या एकतर कुटुंबाच्या किंवा समाजाच्या बळी ठरतात तर काही विद्रोही. 

अजन्म्या कळीला आपण उमलूच देत नाही, का? रोज सकाळी जेव्हा मी वर्तमानपत्र हातात घेते, तेव्हा मनात एक भीती असते, आज कोणत्या आईने आपल्या नवजात मुलीला मारून टाकल? आज कुठे नवजात अर्भकाचा मृतदेह सापडेल? अश्या, एक नाही हजारो वेगवेगळे प्रकार आहेत...आजही जेव्हा बाई प्रसूत होते, तेव्हा आसपासला ज्या कोणी स्त्रिया असतात त्याच पहिला प्रश्न करतात, "काय आहे?" मुलगा म्हंटल रे म्हंटल कि सगळीकडे एकच जल्लोष सुरु होतो, आणि मुलगी म्हंटल कि सगळ्यांची तोंडे काळी का होतात?

ज्या देवीला आपण मनोभावे पूजत आहोत तिही एक स्त्रीच आहे, स्त्रीच स्त्रीत्वाचा अपमान करतेय....मग अश्या या स्त्रियांना देवी शिक्षा का देत नाही? हा प्रश्न मला लहानपणापासून पडत आला आहे, पण आता मला त्याच उत्तर सुद्धा गवसलं आहे.
ज्या घरात स्त्रीत्वाचा अपमान होतो तिथे लक्ष्मी नांदेल तरी कशी, तिची अवकृपा होणारच.
म्हणूनच म्हंटल जात, "जगी जीवनाचे सार घ्यावे जानुनी सत्वर , जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर".

आज दसरा आहे...."देवीला एकच साकड घालेन या कळ्यांना बागडू दे, जगू दे, आणि सर्वाना चांगली बुद्धी दे."

प्रिया सातपुते

Friday 19 October 2012

"सेकण्ड इंनिंग" भाग-३




रमेश खिडकीच्या कट्ट्यावर बसून एकटक आपल्या बायको कडे पाहत होता, मुग्धा त्याची बायको. परपुरुषाला तिच्या कुशीत झोपलेलं पाहून त्याला काय वाटत असेल हे समजण खूपच अवघड होत, त्याच्या चेहऱ्यावर फक्त झळकत होता तो अभिमान...आपल्या प्रिय बायकोसाठी, मुग्धासाठी...
रमेशला आज मुग्धाच एक वेगळच रूप पाहयला मिळाल होत. तिला एक छान मुलगी, बहिण, बायको, सून, वाहिनी, मैत्रीण या रुपात त्याने नेहमीच वावरताना पाहिलं होत पण, आज ती आईच्या भूमिकेत पाहून त्याला भरून आलं होत. विक्रमने इतक झिडकारून देखील ती तटस्थपणे उभी राहिली, त्याला सामोरी गेली, भूतकाळात त्याने केलेला अपमान तिने एका क्षणात पुसून टाकला, आपल्या बालमित्राला आपली गरज आहे आणि त्याच्यासाठी ती महत्वाच्या साऱ्या मिटींग्स सोडून इथे आली होती. शेवटी म्हणतात ते काही काही खोट नाही, स्त्रीही पहिल्यांदा नेहमी आईच असते.....

मुग्धाने रमेशच्या मदतीने घराची साफसफाई केली, देवासमोर दिवा लावला..किचेन मध्ये सार काही अस्ताव्यस्त पडलं होत, रमेशनी तिला थांबवलं..."नको, मी बाहेर जाऊन काही घेऊन येतो खायला, हे उद्या सकाळी पाहू". मुग्धाने होकारार्थी मान हलवली. रमेश निघून जाऊन जास्ती वेळ झाला नव्हता तोच विक्रम उठून तिच्या समोर उभा होता. त्याच्या तोंडातून शब्दचं निघत नव्हते. मुग्धाने त्याच्या कडे पाहिलं...एक भयाण शांतता पसरली होती.

शांततेत विरजण घालायचं काम फोनने केलं, मुग्धाला हॉस्पिटलमधून फोन होता....ती बोलत होती, बोलतात बोलता ती किचेन मधून खिडकी जवळ आली, तसा विक्रमपण, लहान मुलासारखा तिच्या पाठीमागे येऊन उभा राहिला. फोन संपताच, मुग्धाच्या कानावर शब्द पडला "मुरु", मुग्धाच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होत, याच नावाने विक्रम मुग्धाला बोलवायचा.

विक्रम- मुरु!! माफ कर मला, मी नेहमी प्रेमाची आंधळी पट्टी बांधून राहिलो, माझा समोर चुकीच्या गोष्टी घडतं राहिल्या पण, मी नेहमी गप्प राहिलो, बायकोच्या प्रेमापोटी सगळ्यांना दुखवलं मी, आई-बाबांना, तुला, काका-काकूंना, मित्रांना. मला स्वतःचीच लाज वाटते आहे, ज्या आईने मला इतका मोठा केला, माझे सारे हट्ट पुरवले मी तिलाच दूर लोटलं, मी माझ्या आईलाच खोटारडी ठरवलं...(हुंदका आवरत तो पुढे बोलू लागला) बाबा, ज्यांनी माझ्याकरता स्वतःच्या इच्छया मारल्या, त्यांना मी काही नको ते बोललो. मुरु तुला तर मी कधी ओळखूच शकलो नाही ग! काही तोंडात येईल ते मी बोललो, तरी सुद्धा तू तेव्हाही मला एक शब्द नाही बोललीस...मी केलेला पाणउतारा विसरून तू माझ्यासाठी इथे आलीस..मला अजूनही तू काहीच बोलली नाहीस..मला आता सहन नाही होणार हे मुरु, प्लीज...
( बोलता बोलता मुग्धाच्या पायांजवळ कोसळून पडला.)
तरीही मुग्धाने पाठीमागे वळून पहिले नाही......

प्रिया सातपुते

Monday 15 October 2012

काही मनातलं

अजूनही वाटत मी लहानच आहे,
माणसांना ओळखायला मी शिकलेच नाही,
आडवाटेला एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली विसावून,
विचार करतेय, मी याच्यासारखी शांत का नाही?
अजूनही लहानपण सोडवत नाही,
जणू काही मला मोठ्ठं व्हायचंच नाही,
कितीही वादळे येवोत, हे झाड कसं ताठपणे उभे आहे,
मलाही कधी असच व्हायचं आहे,
भावनाशून्य? कठोर ? 
छे!! कठोर पण, प्रेमळ....
अगदी लहान मुलांसारख,
कितीही मारा, फटकारा,
ते परत येऊन गळ्यात पडतील आणि सार काही विसरतील...

प्रिया 

????



चंद्रगनिक रोज तुझ्या कला बदलतात,

रोज नवे प्रश्नचिन्हे तयार होतात,

कधी संपणार हा अनंताचा प्रवास,

कित्येक वर्ष चालत आहे,

ना थकता, ना थांबता,

एकाच आशेवर,

कुठेतरी हक्काचं घर मिळेल....




प्रिया

विवंचना

कधी कधी वाटत, 
पाऊले भरकटत तर नाहीत ना,
प्रेम करू कि नको, 
या विवंचनेत अडकून,
दूर निघून तर नाही जाणार ना ???


प्रिया 

Monday 1 October 2012

"सेकण्ड इंनिंग" भाग-२



लहान मुलं जसं, आईच्या कुशीत शांतपणे झोपी जात, तसाच, विक्रम शांतपणे झोपी गेला होता...मुग्धा त्याच्या रडून रडून सुजलेल्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिली. तिच्या डोळ्यातला अश्रू टपकन विक्रमच्या गालावर टपकला, आणि तो झोपेतच पुटपुटला, "स्मिता, का केलंस असं तू ? " मुग्धाने हलकेच तिच्या ओढणीने तो थेंब टिपला...रमेश, मुग्धाच्या खांद्यावर हात ठेवत तिला दिलासा देत होता. सगळीकडे एक भयाण शांतता पसरली होती.
एखाद्या कॅनवासवर हा प्रसंग रंगवला जाऊ शकतो इतकी त्याची तीव्रता अधिक होती....

मुग्धाच्या डोळ्यासमोर संपूर्ण भूतकाळ ठाण मांडून बसला होता, तो तिला डिवचत होता...तिच्याच असंख्य प्रतिकृती तिथे त्या भयाण खोलीत उभ्या राहून तिला ओरडून सांगत होत्या, तुझ्यामुळे झालाय हे सार!!...तेच दुसरी टाहो फोडून रडत होती!!...तिसरी तुझ्या त्या दिवशीचे श्राप फळले बोलून जोरजोरात राक्षसी सारखी हसत होती!!...चौथी शांत होती, तुझी यात काही चूक नाही!!....पाचवी..................अश्या असंख्य प्रतिमा तिला छळत होत्या. तिने डोळे घटत बंद करून घेतले.
सारा भूतकाळ...उभा ठाकला होता......

मुग्धा आणि विक्रम बालपणीचे जिगरी दोस्त,...दोघांनी एकाच महिन्यात, एकाच दिवशी जन्म घेऊन त्यावर शिक्कामोर्तब केलं होत. दोघांच्या शाळा एक, घर पण आमने सामने. छोट्यात छोटी गोष्ट एकमेकांना सांगणे आणि मोठ्यात मोठ्ठा भांडण ह्याच दोघांच असायचं. पण, कॉलेजला त्यांचा ग्रुपला फाटे फुटले...त्याला इंजिनियर बनायचं होत आणि मुग्धाला डॉक्टर. दोघे बनलेही  आपापल्या क्षेत्रात माहीर. पण, या दोस्तीला तडा गेला जेव्हा स्मिता नावाच्या पात्राची एन्ट्री झाली. टिपिकल मराठी नाटकांमध्ये जशी खलनायिका येते तशीच स्मिता आली आणि तिने दोघांच्यामध्ये कधीही ना संपणारी दरी निर्माण केली. गैरसमज नात्यांना कायमच संपवून टाकतात हेच खर....

विक्रम पूर्णपणे एकटा होता, का? स्मिताने त्याला सगळ्यांपासून दूर नेल होत, अगदी जन्म दिलेल्या आई वडिलांपासून सुद्धा. मनुष्याला आपल्या कर्माची फळे इथेच भोगून जावी लागतात, तसचं काही स्मितासोबत झाल. विक्रमला त्याच्या घरच्यांपासून तोडलं, प्रियजनांपासून दूर केलं, मुग्धाच्या चारित्र्यावर शिंथोडे उडवले, स्वतःच्या पोटातल्या अजन्म्या जीवाला मारून टाकल, विक्रम ज्याने तिच्यासाठी सार काही केलं, त्यालाच तिने फसवलं...आणि पितळ उघड पडल्यावर तिने आत्महत्याचा डाव रचला पण, पण तो फोल ठरला, तिच्या प्रियकरानेच तिचा गळा दाबून जीव घोटला. पण, या सर्वात विक्रम पूर्ण झुरला होता, त्याला तोंड दाखवायला जागा राहिली नव्हती...त्याच मन त्याला खात राहिलं आणि आता तो स्वतःच्या जीवावर असा उठला होता.

मुग्धाने मनाशीच निश्चय केला, आणि ती रमेशला बोलली, "मी विक्रमला असं हरू नाही देणार...त्याला जगावं लागेल, स्वतःसाठी, काका-काकूंसाठी, आपल्यासाठी, मी त्याला असा संपू नाही देणार." हुंदका आवरत ती बोलत होती, रमेश अवाक होऊन पाहतच राहिला...मुग्धाच निरपेक्ष प्रेम.....................

प्रिया सातपुते 





शब्द



किती दूर लोटू या शब्दांना ? तरीही डोळ्यासमोर नाचत राहतील, कानांमध्ये गुणगुणत राहतील, मनामध्ये सलत राहतील...

तेच तर आहेत फक्त मला समजून घेणारे, आणि त्यांनाच दूर लोटून कुठे जाऊ मी ?

सार जग सोडून जाईल पण हे मात्र नेहमी साथ देतील.

सप्तपदी घेऊन एक नात जन्माला येत पण या शब्दांनी तर कधीच कोणती आस धरली नाही.

ते फक्त माझ्या हृदयात येऊन काहूर माजवतात, कशी मी दूर लोटू या शब्दांना ?

किती पराकोटीचे प्रयत्न करू कि ते होतील थोडेशे दूर, श्वास घेतील स्वातंत्र्याचा.
पण, हि प्रिया पुन्हा हरवली तर ? मग, शब्दच शोधून घेऊन येतील या  प्रियाला.

प्रिया