Friday 21 December 2012

मी सुरक्षित आहे???



आज मला समजत नाही आहे, कि एक स्त्री म्हणून मी या देशात किती सुरक्षित आहे??
आई-बाबांच्या पंखांत लहानाची मोठी झाले, थोडस जग पाहण्याच्या लालसेपोटी मी घराबाहेर पडले, ज्या जगाला मी सुंदर समजलं, ते खरच खूप सुंदर होत...कि माझा भ्रम होता हेच मला कळत नाही. 

रोज वर्तमानपत्रात येत, स्त्रियांवरचे अत्याचार...त्याच विश्लेषण होत, प्रत्येक ठिकाणी एकचं  चर्चा असते...घरगुती अत्याचार, बलात्कार, लैंगिक छळ, अश्या बातम्यांनी पूर्ण वर्तमानपत्र खचाखच भरून गेलेलं असत.

स्त्री हि निसर्गाची सर्वात अप्रतिम निर्मिती आहे. ती कधी आई बनून मायेची पाखर घालते, तर पत्नी बनून आयुष्याच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ करते, बहिण बनून खोड्या काढते, आणि छोटीशी गुलाबाची कळी बनून संसाराची वेल बहरून आणते. पण, माणसांमधली वैश्यभावना इतक्या खालच्या पातळीला पोहचली आहे कि ते या कळ्यांनापण कुसकुरुन टाकत आहेत. हे आधीपासून होत आल आहे, फरक हा आहे कि आता मिडिया या सगळ्या बाबींना प्रकाशझोतात आणत आहे. पण, फक्त हेच करून काही होणार आहे का??

या सगळ्या गोष्टीना आळा बसलाच पाहिजे, या निर्घुण माणसांना जगण्याचा काहीच अधिकार नाही.
ती फक्त २३ वर्षाची होती, आणि तिच्यावर हल्ला करून बलात्कार केला गेला, हा शब्द इथे लिहितानाच मला इतका त्रास होत आहे, तिच्यावर ते बेतल, तेही महान भारत देशात, जिथे मोठ मोठ्या पार्टी भारताच्या संस्कृतीचा टेंभा मिरवत आहेत. आता ती कधी सामान्य आयुष्य जगु  शकेल? बलात्कार हा शरीराचा जितका होतो तितकाच मनाचा, तिच मन कधी सावरेल? पण, ज्यांनी हे कृत्य केल, त्यांना तर मस्त काळा मुकुट घालून पोलिसांनी आणलं, अश्या नराधमांना इतक्या मानाने कस मिरवलं  जाऊ शकत? सोडून द्या त्यांचे काळे मुकुट आणि सोडा ती आंधळी तराजू पकडणारी मूर्ती, जनताच करू दे निवाडा.
हि २३ची होती, एक ३ वर्षाची, ज्या कळीला अजून जग काय आहे हेच माहित नाही त्यांना सुद्धा हे नराधम सोडत नाहीत मग कायदा काय कामाचा? फक्त फाशी देऊन काही होत नाही, यांना तर शिवकालीन शिक्षा द्यायला हव्यात,...आणि त्याचं थेट प्रेक्षपण व्हाव, जेणेकरून आयुष्यात कधीच अशी हिम्मत होणार नाही कोणाचीच.

प्रिया सातपुते 

Thursday 20 December 2012

या मनाला कराव तरी काय?






एकेकदा वाटत हे मन किती अजब आहे, कितीकाही सामावलं  आहे यात, आज आता या क्षणाला ते सुखी असतं  आणि पुढच्या काही क्षणात ते हतबल असत...

या मनाला कराव तरी काय?
शांत रहाव तर ते समुद्रात धाव घेत,
समुद्राजवळ उभं राहा तर ते आकाशात झेपावत,
आकाशात जाव तर ते इकडे तिकडे भटकत राहत.

या मनाला कराव तरी काय?
कधी काय टोचेल अन टपकन अश्रू ओघळेल,
तर कधी कड्यावरून पडून पण स्मितहास्य करेल,
बंदिस्त शरीरातून बाहेर येण्याची केविलावणी धडपड नेहमीच करेल,
आणि चितेवर जळणाऱ्या देहाला पाहून टाहो फोडेल.

या मनाला कराव तरी काय?
काय दडलंय यात,
कधी काळ्या तर कधी पांढऱ्या रंगात लपून राहत,
तर कधी लाल रंगाने नाहून निघत,
हळूच चोर पावलांनी आकाशात क्षिताजापर जात,
आणि रंगीबेरंगी इंद्रधनूसारखं साऱ्यांना सुखावत.

या मनाला कराव तरी काय?
माराव ?
ओरडाव?
लाथाडाव?
कि कुरवाळाव??


प्रिया सातपुते....



Thursday 6 December 2012

आई



आई फक्त तुझ्यासाठी......

आताच मी फेसबूकवर एक छानशी "आई" नावाची कविता वाचली आणि विस्मृतीच्या आड लपलेली काही पाने नकळत फुंकर देऊन उघडी झाली. 
मी पहिली मध्ये असेन माझी आई मला तिच्या आईजवळ ठेऊन बाबांना मदत करायला जायची, अर्थात त्यावेळी एकंदरीत परिस्थिती इतकी सोप्पी नव्हती, पण, लहान असल्यामुळे मी या आई नावाच्या पात्राला  कधी समजूच शकले नाही. तशी ती वेळीही  नव्हती समजून घेण्याची. पण, शाळेतल्या एका कवितेतल्या आईसारखी माझी आई कधीच शाळा सुटल्यावर यायची नाही, ना दारात उभी राहून वाट पहायची की घरी  गेल्या मला कुशीत घेईल. त्यावेळी मी आईचा खूप मार देखील खाल्ला...पण, एक फुलपाखरू जसं  बोटांवर त्याच्या मऊ  स्पर्शाचे रंग ठेऊन उडून जात, अगदी तसं मला देखील कळून चुकल होत कि आई तर हे सार माझ्याकरताच करत आहे. 
शाळेत निबंध लिहायचा होता, "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी"....हा निबंध लिहताना आपसूकच माझं  मन मी त्यात ओतल होत म्हणूनच तो निबंध अजूनही माझ्या स्मरणात आहे. माझ्या आईला मी जाणलं होत म्हणूनच त्या निबंधाला खूप वाहवाही पण भेटली.

आई हा शब्दच जादूमय आहे, "आ" म्हणजे "आत्मा" आणि "ई" म्हणजे "ईश्वर", यांच्या संयोगातूनच आई बनते. आई खरीखुरी जादुगारच असते, नऊ महिने ती आपल्याला उदरात जपते, आणि हीच जगातली सगळ्यात मोठी जादू आहे...ती एका पिटुकल्या जीवाला बोलायला, चालायला शिकवते. ती तिच्या संस्कारांच्या शिकवणीतून शिवबा ला छत्रपती बनवते तर कधी आपल्या दुबळ्या बाळाला जगण्याच बळ देते. 
या आईच्या प्रेमाखातर देव-देवी सुद्धा मनुष्य रूपाने जन्मास आल्याच्या पुराणातल्या गोष्टी आपण ऐकतच आलोय. 
आई बद्दल जितकं लिहू तितकं कमीच आहे, म्हणूनच बोलतात, "आईवर निबंध लिहायला समुद्राची शाई  आणि आकाशाचा कागद सुद्धा अपुरा पडेल."

अजूनही मी आईच पूर्ण मन कधीच समजू शकणार नाही, पण, मी रोज प्रयत्न करतेय तिला समजून घेण्याचा. आई मला ऐकवत असतेच की "तुला नाही कळणार आता, आई हो एकदा मग कळेल आई म्हणजे काय असते." सो ट्रू !! 

प्रिया सापुते