Sunday 29 December 2013

माझं पहिलं गाण…


सागरा किनारी
साजना पुकारी
कशी लागली ओढ ही
वेड्या जिवाला… ।।१।।

आसमंत हा खुला
बोलावतो मला
तुझ्या बाहुपाशात
विरघुळू दे मला…।।२।। सागरा किनारी साजना पुकारी…

भिरभिरणारे क्षण
स्तब्ध होऊ देत
ओजंळीत माझ्या
विसावू देत…।।३।। सागरा किनारी साजना पुकारी…

प्रिया सातपुते





सहाओळी!


प्रेमात पडता पडता,
सारच विसरून गेलेय मी,
फक्त तुलाच विसरू नाही शकले मी,
प्रेमात पडून,
सारच गमावून बसलेय मी,
फक्त तुलाच मिळवलंय मी… :)

प्रिया सातपुते


Saturday 28 December 2013

एक अंतिम पत्र

हाती वेळ नसणाऱ्या एका वेड्या मैत्रिणीच पत्र…

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

माझ्या वेड्या मित्रा,

आयुष्यात चेहरा पाहून प्रेम करणारे खूप असतात, आयुष्यात रंग, रूप, पैसा, दर्जा पाहून प्रेम करणारे ही खूप असतात. मन, विचार पाहून प्रेम करणारे फारच थोडे असतात. आयुष्यात या तारेवरून जाताना कोणत्या तारेवरती पाय पडेल हे सांगण मात्र खूप कठीण होत एकेकांना! प्रत्येक वळणावर एक नवीन कसरत, एक नवीन तार असतेच. 

आयुष्यात अचानक भेटले मी तुला आणि का कोणास ठाऊक, तुझे विचार मला तुझाकडे खेचत होते कि माझे मन? कधी वाटलं ही नव्हत कि कोणी माझ्यावर प्रेम करेल पण, ते तू केलस आणि बोलूनही स्पष्टपणे गेलास. 
नेहमीच तुझ्या प्रश्नांना टाळतच राहीले, पण, तू मात्र विचारायचं सोडलं नाहीस. नाही म्हटल्यावरही तुझ्या प्रश्नांची सरबत्ती सुरूच होती. प्रथम आपण मित्र होतो हे मी कधीच विसरले नाही, तू मात्र मित्रापेक्षा जास्त बनण्याच्या प्रयत्नात होतास. जणू तू हार न मानण्याची शपथच घेतली होतीस. माझ्या प्रत्येक संकटात धावून येणारा तू माझा मित्र, मित्रच राहशील ही कल्पना तुला इतकी का दुखावते? 

तुझ्यासारखा साथीदार मिळण हे भाग्यचं आहे पण, ते माझ्या नशिबी नाही. तुला सांगूही शकत नाही. काही गोष्टी न कळलेल्याच बऱ्या! तुझ्यासोबत जगायला खूप आवडेल मला पण, वेळ फार कमी आहे रे!
वेळ ही जणू माझ्यासाठी काळच आहे. 

तुला हे पत्र मिळेल तेव्हा कदाचित मी नसेनही पण, तू दुखी होऊ नकोसं, आयुष्य थोडीच थांबत कोणासाठी! 
भेटू लवकरच, आता निघायला हवं. काळजी घे. 

तुझी आणि फक्त तुझी 
वेडी मैत्रीण… 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रिया सातपुते

शायरी

कहते कहते हुए रुकना तो
तुम्हारी आदत बन गई है,
क्लासरूम में  मुझे देखना तो
तुम्हारी जरुरत बन गई है।

प्रिया सातपुते 

शायरी

बिखरी हुई यादो की तरह
तुम सीने में दफन हो,
सवारी हुई यादो की तरह
तुम दिल में जिंदा हो।

प्रिया सातपुते 

कबुतर



पंख फुगवलेल्या कबुतरास
बघून मी माझं पेन उघडलं
मान डोलावत त्यान माझं कुतूहल पाहिलं
डोळे मिचकावत छातीत फुगार घालून
ते ताठ उभं राहिलं
ओल्या झालेल्या पंखांना डुलवत
पावसाला चिडवून नाक मुरडत राहिलं
पिसात चोच खुपसून
जोडीदाराला भुलवत राहिलं
लाल रंगाच्या डोळ्यात
प्रणयाची लाट येताच
पंख पसरून आकाशात
जोडीदारामागे  भिरकावलं…

प्रिया सातपुते


Tuesday 24 December 2013

प्रियांश...१६

बऱ्याच दिवसांपासून मी लिहण टाळत होते, एकंदरीत एखादा विषय मनात घोळत राहतो अन त्याला मांडायला मन तयार होतंच असं नाही, एकेकदा वाटलं जे वाटत आहे ते लिहून टाकून मोकळ होऊया, पण का कोणास ठाऊक मनात एक अढ येत होती, फायनली त्या मनाला आज मोकळ्या हवेत श्वास घेताना जाणवलं कि, प्रत्येकाला त्याला हवं तसं जगण्याचा हक्क आहे! ती व्यक्ती कशीही का असेना, काळी-गोरी, कोणत्याही जाती धर्माची अथवा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहणारी असो, मग ते समलैंगिक असो वा नसो! जगण्याचा हक्कं प्रत्येकाला आहेचं. 
काही लोकांना वाटत, "समलैंगिक" हा रोग आहे, तर काहीना ही नैतिकतेच्या बाहेरची गोष्ट वाटत आहे. तर काहींना असं काही अस्तित्वात असतं हेचं माहित नाहीय…आपण चार माणसांसोबत चार भिंतीच्या घरात राहतो, त्या चार भिंतीच्या पलीकडे समाज नावाच्या भल्यामोठ्या नियमावलीत जगतो, हे चूक, हे बरोबर हा पाढा आपण लहानपणापासूनच घोकत आलोय आणि तोच पाढा काहीजण आयुष्यभर घोकत राहतात. मग, जर तो पाढा चुकीचा का असेना तो घोकतच लहानाचे मोठे होतो, माणसाला माणूस म्हणून जगण्याच स्वातंत्र्य न देता त्याला घुसमटून टाकतो अन मारून देखील. जसं, एखाद्या चिमणीला मनुष्याने हात लावला म्हणून बाकीच्या चिमण्या तिला टोचून टोचून मारतात अगदी तसचं! 

समलैंगिक असण हे नैतिकतेच्या बाहेर आहे असं म्हणून त्यांचा स्वच्छंदीपणे जगण्याचा अधिकार काढून घेण हि कोणती नैतिकता आहे?  प्रत्येक मनुष्यामध्ये स्त्री आणि पुरुष ही दोन्ही तत्वे आढळतात. या तत्वांवर कोणाचीच पकड नसते, निसर्गतःच गुणधर्म बदलतात. याचा अर्थ असा धरला जावू नये कि हे धर्माच्या विरोधात आहे. हिंदू धर्मात भगवान "अय्यप्पाचा जन्म हरी-हरा अर्थात विष्णू-शिव मुळे झाला होता. हे विसरून चालणार नाही, अर्थात हिंदू धर्मात समलैंगिकतेला गुन्हा ठरवण्यात आलेलं नाही. एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक निवडीच्या आधारावर त्यांना हिणवण, भेदभाव करण हे सर्वस्वी चूक आहे. 
समलैंगिक हा रोग नाही ना स्वैराचार! याच्यावर बऱ्याच मानसोपचार तज्ञांचे लेखं नजरेखालून गेले, मनात मात्र फक्त एकच विचार आला. समलैंगिक असण म्हणजे फक्त आणि फक्त शारीरिक सुखाशी जोडून भागणार नाही, हे त्याच्या पलीकडचे गणित आहे. रडणाऱ्या मुलाला दहा जणांनी गप्प करायचा प्रयत्न केला तरीही ते मुलं आईच्या हातात जाताच गप्पं होत. कारण, प्रेम! तसचं काही प्रत्येक माणसाच आहे, ज्याच्या सोबत सुरक्षित, प्रेम आणि जिव्हाळा मिळतो तिथेच माणूस चालला जातो. काहींना अपशब्दांनी हिणवलं जात, काहींसोबत वाईट भूतकाळ असतो, तर काहींना आकर्षण. मनाला जिथे विसावा मिळतो, ज्याच्यासोबत मिळतो तिथे ते स्थिरावत. 



प्रिया सातपुते 

Thursday 12 December 2013

प्रियांश...१५

जगण कसं असावं? बेभान, स्वच्छंदी पक्ष्यासारख, वाटेल तेव्हा भरारी घ्यायची, मनात आलं कि बागडायचं, या क्षणात भरभरून जगून घ्यायचं… समोरच्याला चांगलं वाटेल म्हणून मनाला मुरड घालत जगतच आले अन जेव्हा स्वतःला चांगलं वाटेल असं जगायला शिकले तेव्हा नाके मुरडणारे कमी नव्हते…प्रत्येक माणसाच्या मनाला आवडेल असं आपण वागू शकत नाही…म्हणून आपण आपला विचार करावा…बाजूचा काय बोलतोय? पाठीमागून किती गाणी गात आहेत? हे सार दुय्यम आहे…स्वतःच्या मनाला, विचारांना जे पटेल तिथे दामटून बसावं अन आपल्या आयुष्याचा आपणच राजा वा राणी व्हावं… 

प्रिया सातपुते 

Sunday 1 December 2013

प्रियांश...१४


शाळेचा ड्रेस का घालतात? हा प्रश्न मी लहान असताना खूपदा विचारला, त्यामागे शिस्तप्रियता हे एक कारण होतच पण, श्रीमंत घरची मुले रोज एक नवा ड्रेस घालून येतील आणि जी मध्यमवर्गीय मुले आहेत त्यांना वाटत राहील कि आमच्याकडे का अशे ड्रेस  नाहीत, कोणत्याही मुलाने, कोणालाच हिणवू नये म्हणून काढण्यात आलेला हा तोडगा! पण, शाळा हे विसरून गेल्या कि मुलांच्या वाढदिवसाच्या नावाखाली आई वडील श्रीमंतीचं जे स्तोम शाळांमध्ये मांडतात ते कितपत योग्य आहे? चॉकलेट पर्यंत ठिक पण, पेस्ट्री, महागातले गिफ्ट्स देण कितपत योग्य आहे? लहान मुलं मातीचा गोळाच असतो, आपण त्याच्यासमोर जे बोलू, वागू तशेच ते घडतात. मागच्या आठवड्यात मैत्रिणीच्या भाच्याच्या बर्थडेला गेले होते, तिथे एका पाच वर्षाच्या मुलाचे कानावर पडलेले शब्द इथे मला सांगायचे आहेत, "मला रिटर्न गिफ्ट दिलं नाहीसं तू, शी तू किती घाणेरडा आहेस, रिटर्न गिफ्ट द्यायचं असतं, माझ्या आईने सांगितलं आहे, बघ मी दोन दोन दिले आणि तू एक पण नाही." समोर उभ्या असलेल्या त्या आईचा चेहरा झपकन खाली पडला आणि त्या चिमुकल्याचा पण. त्या मुलाच्या आईच्या पुढ्यातच मी म्हणाले,"इतका छान केक, आयस्क्रीम खाल्ल तू, हो ना? त्याने तुला बर्थडेला प्रेमाने बोलवलं ना? प्रेमच नाही का सगळ्यात मोठ्ठं गिफ्ट तुझ्यासाठी? किती प्रेम करतो बघ तो तुझ्यावर! प्रेमच सगळ्यात मोठ्ठं गिफ्ट असतं! चल, सॉरी बोला शेक हंड करा!" किती सोप्पं असतं या चिमुकल्यांना समजावण पण, या मोठ्या लोकांना कधी कळणार प्रेमाची भाषा? 
शाळेतलं स्तोम शाळाच बंद करू शकतात, प्लिज तुमच्या घरी कोणी लहान मुले असतील तर अश्या स्तोमाला बळी पडून लहान मुलांमध्ये भेदभावाला खतपाणी घालू नका. उलटा प्रिन्सिपलना सांगून हे सगळ बंद करायला सांगा. आपल्या मुलांना प्रेमाचं गिफ्ट द्यायला शिकवा ना कि भेदभावाच!

प्रिया सातपुते 

Monday 25 November 2013

खंर प्रेम कसं ओळखाल ?

जो तुमच्यावर जीव ओवाळून टाकतोय, जो तुमच्यासाठी जगाशी लढेल, जो घरच्यांच्या विरोधात तुम्हांला साथ देईल…आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे, तुमच्या नाकातून वाहणारा तुमचा शेंबूड जो साफ करेल ती व्यक्ती खऱ्या अर्थाने तुमच्यावर खंर प्रेम करते. ईई… काय करताय? लहान असताना जेव्हा तुम्हाला साधं बोलता देखील येत नव्हत, तेव्हा तुमचं वाहणार नाक साफ करणारी आई अन तुमचे बाबा तर कधी तोंड वेडवाकड करत नव्हते…हेच ते निरपेक्ष खंर प्रेम!
Love you Mumma Papa! 

प्रिया सातपुते

उखाणा!

रात्र ओशाळली
झोपेच्या मोहात
अन मी जागीच राहीले
*टिंब टिंब* च्या मोहात…

प्रिया सातपुते


चारोळी

वारा सैरभैर झाला
प्रेमात आकंठ बुडाला
विरहात थैमान मांडून गेला
अन प्रेमभंगात कडकडून रडला…

प्रिया सातपुते 

कोण म्हणतंय...


कोण म्हणतंय
प्रेमात पडलेलेच
कविता करतात
मी तर म्हणते
नेहमी स्वतःच्या
प्रेमात असणारेच
कविता जगतात…

प्रिया सातपुते

Saturday 23 November 2013

आत्तुवास…

भाचीला छळताना
आठवतो माझाच भूतकाळ
अन दुसऱ्या क्षणात
गळून पडतो माझा आत्तुवास…

प्रिया सातपुते

चारोळी


संपलेल्या अध्यायाच
पान पुन्हा चाळायच नसतं
अन पाठ फिरवलेल्या माणसाकडे
डोळे लाऊन बसायचं नसत…

प्रिया सातपुते

किल्ली!


मी कोण?
तू कोण?
सगळेच एक गूढ आहे
अन गूढाची किल्ली
माझ्याचं हाती आहे!

प्रिया सातपुते

Monday 18 November 2013

आज बऱ्याच दिवसांनी मनाला फोन लावला…


आज बऱ्याच दिवसांनी मनाला फोन लावला…

मन- हेल्लो!
मी- हाई…
मन- ओह तू…हाय
मी- मग काय? माझ्याशिवाय दुसंर कोण फोन लावणार तुला?
मन- ह्म्म्म! तसं तुला वाटत…
मी- बर बाबा सॉरी!
मन- ह्म्म्म!
मी- बस ना आता, माझ्या मना कसा आहेस तू?
मन- मी एकदम झक्कास, तू बोलं तू बरी आहेस ना?
मी- हो, मी सुपर झक्कास आहे…
मन- पक्का ना??
मी- हो रे! तुला काय वाटलं फक्त रडायलाच तुझी आठवण काढते का मी?
मन- नाही ग, पण…
मी- पण, काय हा?
मन- आता भांडणार आहेस का माझ्याशी तू?
मी- नाही रे…
मन- मग, बोल काय सुरुय तुझ्या मनात?
मी- तू न अगदी मनकवडा आहेसं बघ!
मन- माहितेय मला…आता बोलशील का?
मी- हो रे, पण तू का इतकी घाई करतोयस!
मन- अग! मी मूवी पाहता पाहता आलोय तुझ्यासाठी
मी- मग ठेव ती बाजूला
मन- ठेवली।
मी- ऐक ना
मन- सांग ना
मी- मला ना असं वाटतंय कि आज मी मुक्त झालेय…
मन- मुक्त? कशातून प्रिया?
मी- स्वतःच्याच भावनांतून, स्वतःच्या चक्रातून, स्वतःच्या विचारातून
मन- असं का वाटतंय तुला ?
मी- वाटेत आलेला सागर पार करून पुढे निघून गेल्या सारखं वाटतंय, सगळ्याच्या पलिकडे…प्रत्येक गोष्टीपासून अलिप्त झाल्यासारखं वाटतंय, जिथे कोणीच मला दुखवणार नाही, ना कोणीच मला स्पर्शू शकणार ना पाहू शकणार…
मन- वाह! हे तर छानच झालं ना, ना आईने ओरडल्यावर तू मुळूमुळू रडशील, ना बाबांनी फोन कट केला म्हणून डाफरशील, ना तू मैत्रिणींच्या अडचणीत त्यांना मदत करशील, ना तू तुझ्या फुलपाखराला पाहशील…
मी- खरंच किती शांती असेलं ना?
मन- वेडाबाई जागी हो, हा तर आयुष्यातला पहिला चिमुकला तलाव पार केलास तू, ज्याला तू सागर समजत आहेस, ते तर डबकच आहे असं म्हणेन मी…आता कुठे नव्या मार्गावर पहिलं पाऊल पडलंय तुझं…असं समज आज खऱ्या अर्थाने तुझा गृहप्रवेश झालाय नव्या आयुष्यात…
मी- ह्म्म्म
मन- अलिप्त का नाही वाटणार तो मनुष्याचा स्थायीभाव आहे, एखाद्या नव्या ठिकाणी गेल्यावर मिक्स अप व्हायला थोडा वेळ लागतोच बेटा…भावना तर क्षणाक्षणाला बदलत असतात, स्वतचे चक्रव्यूह असं जे काही तू बोलते आहेसं तेच तर तुझे विचारच आहेत ना? आता मला फोन लाऊन सुद्धा तू विचारातूनच तर बोलतेयस ना? मी आणि तू अलिप्त होऊ शकतो का कधी? तुला माहितेय ना मनुष्य देहाचा तुझा अंतिम श्वास सुद्धा आपल्याला वेगळा करू शकत नाही!
मी- बाप रे! किती बोलतोयस तू? तू तर चक्क प्रवचनच दिलं आज मला…
मन- ह्म्म्म…
मी- मला वाटायचं फक्त मीच प्रवचन देऊ शकते, तू तर सॉलिड निघालास! 
मन- आवडलं ना पण? तिलांजली मिळाली ना तुझ्या विचारांना?
मी- हो ना…अर्थात त्यात तर तू एक्स्पर्ट आहेस!
मन- ते तर मी आहेचं…
(दोघेही खूप हसतो)
मी- अरे तुला मूवी पहायची आहे ना?
मन- अरे हो, विसरलोच मी!
मी- बर ठिक आहे, मी पळते झोपायला, तीन वाजत आलेत आता, पप्पा आले तर माझी खैर नाही, तुझं आपलं बर आहे इनविझीबल!
मन- (हसून) ओके! जा पळ…गुड नाईट!
मी- गुड नाईट! एन्जॉय द मूवी…
मन- ओके मेडेम!
मी- आणि हो…आज जरा वर्ड टूरच स्वप्न दाखवं!
मन- हो राणीसाहेब! जशी तुमची आज्ञा…
मी- (हसून) बाय…भेटू पुन्हा!
मन- बाय…लवकरच!

स्वत:च्याच मनाशी बोलून स्वर्ग ठेंगणा होतोय.

प्रिया सातपुते

Friday 15 November 2013

प्रियांश…१३


प्रेमात कोरडा राहिलेला माणूस, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम शोधत राहतो…ते जर मिळालं तर समोरच्या व्यक्तीसारखी नशीबवान व्यक्ती कोणी असूच शकत नाही…प्रेमाच्या सागरात महापूर येतील आणि समोरचा माणूस एकतर गुदमरुण मरेल किंवा त्याच्या हाताला पकडून किनारा गाठेल… अशे हे प्रेमात कोरडे राहिलेले महाभाग कधी कधी चुकीच्या मार्गांना भरकटून खूप दूर चालले जातात तर काही प्रेमाच्या मृगजळात अडकून गतप्राण होतात किंवा अश्वथामा सारखे अंत येऊ पर्यंत भटकत राहतात…फरक तो इतकाच अश्वथामा भटकतोय मोक्षासाठी तर तो भटकतोय प्रेमात पडण्यासाठी… 

प्रिया सातपुते 

Thursday 14 November 2013

प्रियांश... १२


कधी कधी आपण खूप चिडतो, ओरडतो, समोर जे कोणी उभे असेल त्याला यथेच्छ बडबड बडबडतो…अन पुढच्या क्षणाला त्याचं व्यक्तीच्या गळ्यात पडून रडरड रडतो सुद्धा…सगळीच माणसे अशी नसतात ती मनात गोष्टींचा किल्ला बांधतात आणि कालांतराने त्याचं किल्ल्याचा ढाली सारखा उपयोग करून समोरच्याला पायाशी लोळवण घ्यायला लावतात…कशासाठी हे सार? काय साध्य होणार त्यांना रात्रीची गाढ झोपेची जागा मनातली अस्थिरता घेणार…दुसऱ्याच्या वाईटावर टपलेल्या लोकांना बहुदा विसर पडत असावा नियतीच्या चक्रात प्रत्येक गोष्ट त्याला परत मिळणार असते…खड्याला खड्डा अन रक्ताला… 
Be wise, Choose wise!

प्रिया सातपुते 

Wednesday 13 November 2013

बालदिनाच्या इंटूकल्या, पिंटूकल्या, मिंटूकल्या शुभेच्छ्या!!


रोज सकाळी लवकर उठायचं
थंडी वाजतेय म्हणून
बाबांच्या कुशीत शिरायचं
दोन मिनिट, दोन मिनिट करत
तासभर झोपायचं
आईच्या धप्पाट्याने
डोळे चोळत चोळत अंघोळीला जायचं
नाश्ता करताना
टेबलावर डुलक्या काढायच्या
हिवाळ्यातल्या सकाळच्या
शाळेला तोंड वाकड करून जायचं
प्रार्थनेला उशीर झाला कि
ग्राउंडभर पळायचं
धाप्पा टाकत
हजेरीला सामोर जायचं
गणिताच्या तासाला
डोळे तिष्टत बसायचं
सरांना चुकवून
डोळे उघडे ठेवून
डुलक्या काढायच
पाच तासानंतर
पोटभरून सुट्टीला खायचं
इंग्रजीच्या तासाला
मिटक्या मारत
इंग्लिश विंग्लिश बोलायचं
पिटीच्या तासाला
फुलपाखरासारखं बागडायचं
शेवटच्या तासाला आतुर व्हायचं
बेल कधी वाजेल
अन कधी घर गाठेन
अस व्हायचं
घर गाठताच
पोटभर खाऊ अन पोटभर अभ्यास करून
खेळायला जायचं
कधी सिंड्रेला पार्लरचे
दरवाजे ठोठवायचे
तर कधी वॉंचमनला
जाऊन हैराण करायचं
तकतुम्बाला घरी पाठवायचं
विष अमृताला प्राशन करायचं
लपंडावात इवल्या इवल्या
माझा डाव वाचावं
म्हणून जोरजोरात ओरडायचं
आयांच्या आवाज सुरु झाले
कि घर गाठायचं
चिऊचा घास भरवून घेत
आईच्या मिठ्ठीत स्वर्गानुभव घ्यायचा
अन झोपतांना बाबांच्या कुशीत
रोज एक नवी गोष्ट ऐकून
सुखाच्या दुनियेत रममाण होऊन
सोन्याच्या बेडवर झोपून जायचं
असं होत ते धम्माल बालपण….

प्रिया सातपुते

प्रियांश... ११


काल संध्याकाळी मी बाहेर चालले होते, गाडीचा दरवाजा उघडून आत बसणार तोच माझं लक्ष एका तान्हुल्या बाळाकडे गेले, आमच्या दुसऱ्या पार्किंग मध्ये पालथ पडून माझाकडे ते एकटक पाहत होत…अंधार पडला होता, त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हत…गुबगुबीत सहा सात महिन्याची ती मुलगी होती…आधीच जमाना ठिक नाही आणि ती चिमुकली एकटीच माझं मन मला जाऊ देईना…मी आजूबाजूला पाहिलं, कोणीच दिसतं नव्हत, वॉचमन पण दिसत नव्हते, लहान मुले दिसली, त्यात एका मुलीला बोलावून मी विचारलं,"हे बाळ कोणाचं आहे?" आमचं आहे असं उत्तरं ऐकून मला थोडं बर वाटलं, तिला ओरडून मी म्हंटले,"आपल्या छोट्या बहिणीला इथे टाकून काय करतेस तू? कोणी उचलून नेलं म्हणजे?" तोच तिच्या आईचा आवाज कुठून आला काय माहित,…ती त्या बाळाला घेऊन खेळायला गेली. थोड्या वेळाकरता मी त्या बाळाला मनातून पुसायचा प्रयत्न केला…पण मन थाऱ्यावर नव्हत…घरी आल्यावर आधी मी ते बाळ दिसतंय का पाहिलं, कुठेच दिसलं नाही…बायका आई बनायला तरसतात आणि इथे…मनात प्रश्नांचं काहूर घेऊन मी घरी आले…आई अन दादाशी बोलले मग कळाल कि या बाळाच सार कुटुंब आमच्या पार्किंग मधेच राहतात, त्यांना राहायला घर नाही…एकेकाळी चार पाच दुकानांचे मालक होते…मुलाने दारू अन जुगारात सगळ उधळलं…रहायला घर नाही, तीन मुली आहेत…मुलग्याच्या हव्यासापोटी दोन मुलीनानंतर सुद्धा समाधान झालं नाही अन पदरात पुन्हा हि चिमुकली…काय खायला घालणार? काय शिक्षण देणार हे त्यांना? अजूनही ती मोठी मुलगी खालीच पार्किंग मध्ये खेळताना दिसते…तिला तरी काय समजतय…माझ्या भाचीला एकटी साध खाली पाठवत नाही मी…ती खेळायला जरी गेली तरी सुद्धा लक्ष असतं…काय अधिकार आहे अश्या माणसांना मुलांना जन्माला घालायचा? ना त्यांना त्यांची काळजी आहे ना त्यांना फिकीर आहे कि त्यांची मुले अशीच पडली आहेत…भटकी कुत्रे कमी नाहीत, मोठ्या माणसांवर तुटून पडणारे…एक मिनिट सुद्धा पुरून जाईल त्यांना त्या तान्हुलीचे लचके तोडायला, ना ती प्रतिकार करेल, ना ती पळेल…पालकत्व  स्विकारण किती मोठी जबाबदारी आहे…बोट पकडून त्या चिमुकल्या पावलांना पाहिलं पाऊल टाकायला शिकवण्यात किती मोठा आनंद सामावला आहे तितकीच जबाबदारी…ज्यांना ती जमत नाही त्यांनी कशाला जन्माला घालून आयुष्य खराब करायचं या परयांच? 

प्रिया सातपुते 

Sunday 10 November 2013

प्रियांश... १०


मला एकं समजत नाही, लग्न काय फक्त भारतातच होतात का? सगळ्या जगभर होतातच ना? कुंडली जुळवूनच लग्न करणार म्हणून काही महाभाग प्रेमात समोरच्या व्यक्तीला चुना लावतात…कुंडल्या पाहून सुद्धा लोकांचे घटस्फोट होतातच ना!…बाहेरच्या देशात घटस्फोट जास्तीत होतात म्हणून तिथे टिकलेली लग्न सुद्धा आहेतच कि…कुंडल्या जुळवून लग्न करून नंतर कोर्टाच्या पायऱ्या चढणारे सुद्धा कमी नाहीत…मने न जुळवता लग्न टिकतील कशी? कुंडलीच्या स्तोमामुळे प्रत्येक मंदिराच्या झाडाजवळ आता ज्योतिषांची गर्दी वाढली आहे, पोपटांचे हाल बघवत नाहीत, बिचाऱ्याला काट्या मारून मारून पिंजऱ्यातून बाहेर काढलं जात…ज्योतिष हे एक प्राचीन शास्त्र आहे…कुंडल्या जुळत नाहीत म्हणून आपल्या योग्य जोडीदाराला हातचा घालवून बसू नका…प्रार्थनेत खूप ताकत असते, जस्ट प्रे! त्या अज्ञात शक्तीवर विश्वास ठेवा आणि योग्य निर्णय घ्या! एक पोपट आणि कुंडली तुमचं आयुष्य बनवू शकत नाहीत…

प्रिया सातपुते 

प्रियांश...९


आज पुन्हा जात नावाच्या जखमेची खपली निघाली अन रक्ताची चिळकांडी उडाली. जोपर्यंत या देशात माणसाला माणूस म्हणून वागवलं नाही जाणार ही जखम कधीच भरणार नाही…भूतकाळात रमणारी मी नाहीच पण, नजरेखालून जातीच्या नावाने होणारे किळसवाणे प्रकार जेव्हा नजरेसमोर येतात तेव्हा मन भरकटत भळभळून वाहणाऱ्या त्या बालिश मनाजवळ येऊन पोहचत, अपमानाच्या रक्तात चिंब ओथंबलेलं माझं सात वर्षांचं मन…जिथे ना जात माहित होती ना धर्म! 
आई बाबांना मदतीला दुकानांत जायची, मग अभ्यास कसा होणार? एकटीला घरात कसं सोडणार म्हणून शाळेजवळच एका बाईंकडे मला पाठवण्यात आलं…देवाने फार लवकरच गोष्टी समजायचा आशीर्वाद दिला होता कि शाप हे अजूनही माहित नाही. मला त्यांच्या बाहेरच्या खोलीत शिकवलं जायचं, एकदा माझा अभ्यास संपवून मी गपचूप बसले होते, आतून बाईंचा आवाज आला, आत ये आणि दाखव अभ्यास…दुसऱ्याच्या घरात आतपर्यंत घुसण्याची माझी सवय नव्हती, पुन्हा एकदा आवाज आल्यामुळे मी आत गेले, दचकत मी पुढे जात होते तोच त्यांच्यातला चातुर्वर्ण्य जागा झाला असावा…नको नको थांब तिथेचं आत येऊ नकोसं म्हणत त्यांनी मला दरडावल! अभ्यास दाखवून मी माघारी परतले तोच आवाज कानी पडले, बाई आणि त्यांची मुलगी बोलत होत्या, " आत आली असती ती आता, पुन्हा नको बोलवूस, सार माजघर पवित्र करावं लागलं असतं." त्या रात्री मी माझ्या आई बाबांना प्रश्नांनी भंडावून सोडलं होत, पवित्र म्हणजे काय? गोमूत्र का मारतात? तसं का बोलल्या त्या? त्यांनी मात्र कलाने घेत मस्त पैकी सगळ्या प्रश्नांना गुंडाळून ठेवलं. 
खूप छान होत्या त्या बाई, काहीच तक्रार नाही त्यांच्याबद्दल! फक्त एकचं विचारूस वाटत त्यांना, त्या तर शिक्षिका होत्या ना, तरी सुद्धा त्यांनी अश्या गोष्टींना प्रोहोसान का दिलं? माझ्यातल्या सात वर्षाच्या मुलीला न पाहता त्या इतक्या कर्मठ का झाल्या? 
शिक्षकच अशे वागतील तर समाज कसा घडेल? 

प्रिया सातपुते 

Saturday 9 November 2013

प्रियांश...८


इतिहासातील काळा दिवस म्हणून याचं दिवसाची नोंद असेल…कोणताही समाज मग तो जगाच्या पाठीवरचा कोणताही देशातला असू दे… स्त्रिचा अवमान करून श्रेष्ठ ठरूच शकत नाही…याचं दिवशी कुरुक्षेत्राचा दिशेने पहिलं भक्कम पाऊल पडले…जुगारात स्वतः  ला हरलेल्या युद्धीष्ठीराने पांचालीला पणाला लावले…पाच योद्धे नवरे असूनही ते लाचार दासांप्रमाणे मान खाली घालून गपचूप बसले होते…आपल्या मोठ्या भावाच्या चुकीच्या गोष्टीना तिथेच न थांबवता, भातृप्रेमात अंध झालेल्या अर्जुनाला शांत बसवलंच कसं?…शंभर हत्तीचं बळ दंडात असूनही नपुंसकासारखा तो भीम गारद कसा झाला? सत्य आणि धर्माचा पक्का युद्धीष्ठीराचा न्याय बुद्धी तर्क आपल्याच बायकोच्या वस्त्र्हरणात विलीन का झाला?…रणांगणात शत्रूंना चितमुंडी गारद करणाऱ्या त्या नकुल-सहदेव ला इतका घोर अवमान सहनच कसा झाला?…बहिणीची छेड काढली म्हणून मारामारी करणारे ते भाऊ या अश्या षंढांपेक्षा लाख गुणा चांगलेच…आपल्या आया-बहिणीसाठी पेटून उठणारेच खरे योद्धे…कृष्णदेव धावून आले म्हणून ती पांचाली वाचली…नाही तर काय झाले असते?…वाचून तिच्या नजरेला नजर देण त्या पाचही पांडवांना किती अवघड झालं असेलं…तिच्या नजरेत पुन्हा उभे राहण्यासाठी मांडण्यात आलेला तो डाव म्हणजेच महाभारत नाही का??? 
एका स्त्रिला दोषी ठरवून आपण खुशाल टाळ्या बडवत असतो…स्त्रिच प्रत्येक गोष्टीला कारणीभूत असते म्हणून निष्कर्ष काढून तिच्या माथ्यावर सगळ मारून बोललं जात…एक स्त्रिच विनाशाला कारणीभूत असते…पण, मग अश्या  षंढांच काय? टाळी एका हाताने कधीच वाजत नाही,…प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात…माझ्या नजरेत महाभारत घडण्यास कारणीभूत फक्त पांचाली आणि दुर्योधन नाहीत तर स्वतः पांडवच आहेत!…आताच्या जगात सुद्धा दुर्योधन कितीही असोत पण, पांडव गप्पच आहेत…जो पर्यंत ते गप्प राहतील तोपर्यंत अशी वस्त्रहरणे होतच राहणार…आता तुम्हीच ठरवा तुम्ही पांडव व्हाल कि कृष्ण!

प्रिया सातपुते 

Friday 8 November 2013

I'm in love...;)


हल्ली सगळ कसं 
गुलाबी गुलाबी दिसतंय… 
स्वतःशीच हसून 
टपली द्यायला हात 
ओपओप पुढे येतोय… 
कानाला हेडफोन लाऊन 
मोठ्याने गाणी ऐकायचं 
फॅड लागलय… 
जेटलॅग लागल्याप्रमाणे 
रात्र जागून निघते… 
पहाटेच्या स्वप्नांची जागा 
आईच्या खिटपिटने होते… 
मैत्रिणींचे फोन 
येऊन कधी गेले कळतच नाही… 
मित्रांच्या टोमण्यांना 
अर्थच नाहीय हे कळून सुद्धा 
खूप हसू येत… 
मुंबईच्या आठवणींच्या पेटीला 
मीच ताळ ठोकलय… 
येणाऱ्या प्रत्येक क्षणाला 
मला स्वतःमध्ये सामावायचंय… 
क्या पता कल क्या होगा?
म्हणत आताच सगळ जगून घ्यायचय… 
म्हणून सगळ गुलाबी गुलाबी दिसतय… 

प्रिया सातपुते 

Wednesday 6 November 2013

प्रियांश...७



मेहंदी काढताना मनात काहीच विचार नव्हते…दिवाळीच्या मुहूर्तावर या हिरव्या रंगाला चढवले खरे! प्रत्येक रेषेनजीक दरवळणारा तो मेहंदीचा सुगंध आपसूकच चारचौघांना भुरळ घालत होता…अन जणू सांगत होता, "पहा पहा मी किती सुगंधित केल या मेहंदीला!"…गालातल्या गालात खुदकन हसून मेहंदीने प्रत्युत्तर द्यायला विलंब मात्र लावला नाही,"खरा सुगंध तर तेव्हा दरवळला जेव्हा मी या हातांवर विराजमान झाले!"…दोघांच्या भांडणात हिरव्या रंगाला काळा रंग चढला,…सुगंध मात्र तसाच होता…मेहंदीला चिडवत तो म्हणाला," बघ, बघ तू तर हिरवीची काळी झालीस, मी मात्र…तेवढ्यात पूर्ण होऊन सुकलेल्या मेहंदीकडे आकर्षित होऊन कौतुक करणाऱ्यांचे शब्द ऐकताच, मेहंदी काहीच बोलली नाही…दुसऱ्या दिवशी सुकून मेहंदीचे तुकडे पडले…हातावरून ती निघून जात होती, सुगंध तिला हिणवून म्हणाला,"पाहतेयस का? आता थोड्या वेळात तू कायमची गायब होशील."…रंगलेल्या मेहंदीकडे पाहत मी आईला म्हणाले, "हे बघ कशी रंगली आहे?"…आई पाहतच म्हणाली,"वाह! मेहंदीचा रंग मस्त चढला आहे, नवरा खूप प्रेम करणारा भेटणार तुला."…हे ऐकताच मेहंदी सुगंधाला म्हणाली," हातावरून सुकून पडले म्हणून काय झालं? कधीही न जाणारा असा रंग मी तिच्या मनात कायमचा कोरला आहे!"

सुगंध शॉक्स, मेहंदी रॉक्स!!

प्रिया सातपुते

Thursday 31 October 2013

प्रियांश...६


रंग माझा गोरा…जणू तो चंद्राला सुद्धा लाजवेल…चंद्रामध्ये तर काळे डाग सुद्धा आहेत…तो काय माझ्याशी स्पर्धा करणार? नशीबवान आहे मी…कारण?…मी एक गोरी मुलगी आहे…देवाने मला गोऱ्या रंगाने जन्माला घातलंय! जिथे लाथ मारेन तिथे सोनंच पडेल…कारण?…मी गोरी आहे!…चार-चौघात काय, संपूर्ण गर्दीचं लक्ष फक्त माझाकडेच असते…अश्या या गोऱ्या रंगाच्या छटा किती विकृत असतात हे सुद्धा लवकरच जाणवलं मला… शेजारच्या काकू त्यांच्या सावळ्या मुलींना बोल लावताना ऐकलय मी…काळी जन्माला आलीय किती सोन आणि पैसे द्यावे लागणार हिच्या लग्नात! म्हणून त्यांना ओरडताना लहानपणापासून पाहतेय…तिला तोंडाला वेगवेगळ्या क्रिम्स लावलेलं रोज पाहतेय…आज तरी गोरी होईन म्हणून ती रोज आरशात पाहते…एक दिवस तर तिने रागात येउन आरसाच फोडला… त्याचे तुकडे तिच्या हातात घुसले…ते काढताना तिच्या डोळ्यातलं सावळ्या रंगाच दुः ख स्पष्ट दिसत होत…तिला समजावताना माझा गोरा रंग वरचढ झाला असंच वाटलं मला…मला देता आलं असतं तर मी देऊन टाकला असता तिला माझा रंग!!… तेवढ्यात काकू खेकसत आल्या…हि क्रिम लावून बघ अन लवकर गोरी हो…जणू गोरा रंग त्यांना सर्व काही देऊन जाणार होता…लग्नाची सावळ्या रंगाची मुलगी किती जड असते हे तुम्हा गोऱ्या मुलींना काय कळणार, हे काकूंच वाक्य माझ्या गोऱ्या रंगाला पहिल्यांदाच बोचलं…मनाच्या सुंदरतेसमोर रंगच मात करतो का?…मनात चाळवल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तर बरेचं दिवस शोधली…पण, हाती काही लागलच नाही…रोज आरश्यासमोर उभ्या राहणाऱ्या त्या सुंदर सावळ्या मुलीला कुढताना पाहिलं…रंगाच्या मोहात पडलेल्या कमनशिबी मुलांना पाहिलं…तिच्यावर हसून जाताना त्या षंढांना हे पण जाणवलं नाही का ते सुद्धा काळे-सावळेच आहेत?…आयुष्यात रंग इतका का महत्वाचा असतो? माझ्याच विचारांशी खेळत दिवस उडून गेले…रोज सकाळी खिडकीतून दिसणारी ती आज पंख्याला लटकत होती…धावत पळत तिच्यापाशी पोहचले…निपचित पडलेला तिचा सावळा रंग हसून बोलत होता…प्रिया, बघ सांगितलं होत ना मी तुला गोरा रंगच जिंकणार…

One of the most difficult article, I had written so far...Colour discrimination is among the most disgusting thing that human itself created! Whatever may be the colour, we all are creation of God! Please, respect that and say no to it!

प्रिया सातपुते  

Wednesday 30 October 2013

प्रियांश...५


नदीच्या वाहत्या पाण्यात सगळचं वाहून नेलं जात…पुरूषाच मनही  अगदी असंच आहे…तो त्याच्या मित्रांशी भांडेल, अदळाआपट करेल, मारामारी करेल, शिव्या सुद्धा घालेल…पण, दुसऱ्याच क्षणाला तो हे सगळ विसरून नव्या क्षणाला सामोरा जाईल…तो जास्ती भावनिक गुंतागुंतीत पडतच नाही…त्यामुळे अश्रू काय असतात हे त्यांना माहितच नसत…अश्रूंची क्षमता किती भयानक आहे…हे त्यांना कळत पण तेव्हा ते हतबल असतात…याच्या अगदी विरुद्ध स्त्रियांचं असतं…त्या नदीतल्या भोवऱ्या सारख्या असतात…त्या भोवऱ्यात कोणी अडकल कि ती व्यक्ती एक तर गतप्राण होऊन सुटू शकते किंवा…त्या भोवऱ्याच्या स्वाधीन होऊन…ती भांडेल, त्यातला शब्द अन शब्द मनाशी पक्का बांधून ठेवेल…अगदी दोन-तीन वर्षानंतर सुद्धा ती नव्या भांडणात जुन्या गोष्टी उकरून उकरून काढेल…ती ठरली भावनिक, त्यामुळे तिच्या मनावरच आघात होतो…शरीराच्या जखमा भरून निघतील पण, मनाच्या प्रत्येक नव्या भांडणात सोलवटून निघतील…अश्या वेळी मन मोकळ करायचा एकंच मार्ग तिच्याकडे असतो तो म्हणजे…अश्रू…एकदा का ते तिच्या डोळ्यातून बाहेर आले कि ते असंख्य तलवारी बनूनच पुरुषावर हल्ला चढवतात…वेळीच त्याने प्रेमाची ढाल बाहेर काढली नाही…दोघांच्या संसाराची लक्तरे निघाल्याशिवाय राहत नाहीत…

प्रिया सातपुते

Tuesday 29 October 2013

प्रियांश...४



एखाद्या स्त्रिच्या मनाचा थांगपत्ता लावण म्हणजे, आगीत तेल ओतण्यासारखाच झालं…ती काय विचार करतेय?…ती माझ्याबद्दल काय विचार करत असेलं?…तिच्या व्यक्तिगत आयुष्याची फोडणी चाखण्यासाठी पुरुष अर्थात परपुरुष किती त्या केविलवाण्या युक्त्या लडवतो…प्रत्येक युक्ती मध्ये त्याची वासनेने लक्तरं झालेली नजर स्पष्ट दिसत असतेच…इतकं सार करून काहीच करता येत नाही या हताशेपोटी मग तो एखाद्या जनावरासारखा तिला ओरबाडून काढतो…कधी मित्र म्हणून तर कधी एकतर्फी प्रियकर तर कधी जवळचे नातेवाईक…स्त्रिच्या वासनेचा अंत लागत नसतो…पण, त्याच जोरावर हि अबला नारी भल्या भल्या महापुरुषांना कुरुक्षेत्रात भस्मसात करू शकते…हे विसरून चालणार नाही… 

प्रिया सातपुते

Sunday 27 October 2013

प्रियांश...३



माणूस हा सर्वात मोठा धुर्त प्राणी आहे…तो स्वतःच्या सोयीने प्रेम करतो…तो स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो…कधी तो प्रेमाला आंधळ नाव देऊन, त्याच्या लेबलं खाली काहीही करतो…मग समोरची व्यक्ती आपल्यावर प्रेम करो अथवा नाही, त्याला फक्त त्याचा स्वार्थ साधायचा असतो…प्रेमात अन युद्धात सगळ माफ असतं असं बोलत तो निष्पाप माणसांना दुखवतो…जनाची सोडा तो तर मनाची सुद्धा लाज ठेवत नाही…तिथे या गोष्टींना काडीचीही किंमत नसते…प्रेम आपला स्वभाव आहे…पण, तो हेचं विसरला आहे…प्रेमाला वेगवेगळ्या झालरी असतात…कधी मैत्रीची तर कधी नात्यांची तर कधी नव्या गुंफल्या जाणाऱ्या नात्यांची…या सगळ्यांना काडी लाऊन तो स्वार्थाने बरबटलेल्या वासनेच्या आहारी जातो…व्यभिचार त्याचा परममित्र बनून जातो…स्वार्थाच्या या आगीतून निरपेक्ष प्रेमाचा शिडकावाच माणसाला वाचवू शकतो हे मात्र नक्की… 

प्रिया सातपुते

प्रियांश...२



लहानपणापासूनच मला दिवाळीची क्रेझ आहेचं नाही, का कोण जाणे?…वर्गातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिवाळी म्हंटल कि एक वेगळाच भाव ओसंडून वाहायचा…मला ते फक्त सुट्टीच अप्रूप होत…काही गोष्टी बालमनाला नेहमीच खटकत राहिल्या त्यामुळे नाही राहिलं ते अप्रूप…रस्त्याने जाताना भिक मागणाऱ्या त्या मुलांना पाहिलं कि स्वतःचीच लाज वाटायची?…आम्ही नवीन कपडे घालून मिरवणार आणि तुम्ही अश्या फाटक्या, तुटक्या, अर्धनग्न कपड्यातच फिरणार…आम्ही फटाके फोडणार आणि त्याचं कचऱ्यात तुम्ही झोपणार…जास्ती उरलेला फराळ, जेवण रस्त्यात पडणार अन ते तुम्ही खाणार! रस्त्यात झोपलेल्या गरीबांवर गच्चीतून फटाके फोडून जोरजोरात हसणारे शेजारी…अस करू नका…म्हणणारा माझा केविलवाणा आवाज मी सहा-सात वर्षाची असताना दबून गेला…पण, दबला नाही तो आतला आवाज…ज्याने मला चूक आणि बरोबर ओळखायला अन बोलायला शिकवलं…अन्याया विरुद्ध बोलायला शिकवलं…भिक मागणाऱ्या चिमुकल्यांना ओरडण्यापासून ते त्यांना आयस्क्रीम खाऊ घालताना एकंच विचार येतो, उद्या परत ते भिक मागतील का?…मुंबईत लोकल मधली ती चिमुकली मला रोज काही न काही विकायला यायची कारण तिला माहित होत मी ती वस्तू विकत घेणारच…शाळेत जातेस का पासून ते काल का नाही आलीस? अशे प्रश्न आपसूकच तिला विचारले जायचे…कधी ती स्माईल करायची तर कधी बाय! पण एक समाधान होत कि ती भिक नाही मागतेय… ती तिच्या कष्टाची मेहनत आहे…जर का आता देवाने मला इच्छा मागायला सांगितली तर एकंच मागण राहिलं…सर्वांना एकसमान, सुखी, समाधानी कर…कुठेच या लहानग्यांच आयुष्यं हरवून नको जाऊदे…त्यांना बागडू दे…शाळेत जाऊ दे…दिवाळीला त्यांना पण सुंदर कपडे दे…राहायला एक टुमदार घर… पोटभर खायला दे…त्यांना पण एक मानाच आयुष्य दे…त्यांना त्याचं बालपण दे… प्लीज देवबाप्पा एवढ करशील ना रे?… 


प्रिया सातपुते 

Saturday 26 October 2013

प्रियांश...१



दिवस हातातून निसटून जात आहेत…पण, तरीही तो, तिला कधीचं सांगणार नाही…माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे! मला तू हवी आहेस!…कारण, त्याचा खोटा अंहकार…हा त्याच्या अन तिच्या प्रेमापेक्षाही मोठ्ठा आहे का?…का नाही समजत त्याला, एकदा दुसऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात पडलं कि ती त्याची कधीचं राहणार नाही…त्याला वाटेल ती सुखात असेलं, श्रीमंत घरात राज्यं करत असेल…शरीराने ती दुसऱ्याच्या स्वाधीन होईलं, त्याचं दिवशी तिच्यातली ती मरून जाईल… रोज असंख्य वेळा ती तिच्याच प्रेमाच्या विश्वासघातामुळे विवस्त्र होत राहिलं…रोज ती पहाटे उठेल, घर आवरेल, सर्वांना काय नको ते बघेलं,…मनात मात्र कुढत राहिलं…घरात कोणी नसताना कोंडून ठेवलेला हुंदका फोडेल…स्वतःच्या चेहऱ्यात ती तिलाच शोधेल…स्वतःला दुषणे लाऊन, स्वतःवरच हसेलं…निष्पाप प्रेमाच्या शिक्षेपोटी ती स्वतःलाच संपवून टाकेलं… 


प्रेमात पडलेल्या माझ्या मित्रांना अन मैत्रीणीना एकचं सांगते, प्रेम करताय तर ते निभवा, कोणाच्याही भावनांशी खेळू नका, इथे ती लिहिलय पण कधी कधी तो सुद्धा असतो…प्रेम ही सुखद भावना आहे, तिला तसचं खुलू द्या!

प्रिया सातपुते 

Wednesday 23 October 2013

मी हरवले तेव्हा???


आपल्या सर्वांच्याच आयुष्यात काही मज्जेशीर न विसरता येण्यासारख्या काही घडामोडी घडतात. कालांतराने आपण त्या विसरून जातो, आणि कधी नकळत कॉफीच्या सुगंधात त्या नजरेसमोर येउन उभ्या ठाकतात. अशीच एक गंमत मला आठवली. मी चार वर्षाची होते, आईचा पदर धरून रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी मी राखी आणायला गेले होते, मी म्हणजे अर्थात आई! खूप गर्दी होती, वेगवेगळ्या राख्या पाहत आम्ही पुढे जात होतो, आईचा पदर चुकून हातून सुटला अन मी मागेच राहिले, आई हाक देत होती, "पिया… पिया…. ", आवाजाच्या दिशेने कूच करत मी पुढे सरकले पण, मग गर्दी आणि रस्ता क्रॉस कसा करणार म्हणून मागेच उभी राहिले. आईच्या हाका येत होत्या पण, मी हतबल होते, रडू पण येत नव्हत!

एका चष्मेवाल्या काकूंनी मला पाहिलं, माझी भेदरलेली नजर पाहून त्यांना कळून चुकलं पाखरू हरवलं आहे! महालक्ष्मी मंदिरात त्यावेळी पोलिस इतके नसायचे, त्या काकू मला महाद्वार रोडच्या पोलिस चौकीत घेऊन गेल्या, पोलिसांच्या स्वाधीन करून त्यांनी त्यांची नैतिक जबाबदारी चोख बजावली. थोड्या वेळाने पोलिस काका मला घेऊन राजवाडा पोलिस स्टेशन कडे निघाले. कॅडबरी भेटली म्हंटल्यावर मी काय खूष! पोलिस काका चक्क आमच्या दुकानासमोरून गेले, मला वाटलं ते तिथेच नेत आहेत मला, पण नंतर कळून चुकलं माझी रवानगी तर दुसरीकडे झाली आहे.

तिथे पोहोचल्यानंतर एक मस्त अंकल होते जे पिक्चर मधल्या इन्स्पेक्टर सारखी टोपी घालून बसले होते, फक्त दोन मिनिटेच मी शांत असेन, मग काय त्यांची टोपी घालून, त्यांच्याच खुर्चीत बसून गप्पा मारत बसले. हातात पोलिसांची काठी घेऊन माझी आपली मज्जा सुरु होती. शिट्टी वाजावं, काठी आपट, सल्यूट करणारे पोलिस सगळचं कसं मस्त होत. गुन्हेगारांना घाम फुटणाऱ्या त्या पोलिस स्टेशन मध्ये मी मात्र रमून गेले होते.

आई काय करत असेल? घरी काय सुरु असेल? सगळे किती घाबरले असतील? त्या काळी अंजनाबाई गावित सक्रिय होती. तिचं ती लहान कोवळ्या मुलांना पळवून नेणारी, भिक मागायला लावणारी आणि वेळ पडली तर त्यांचे कोवळे गळे कापणारी. याच्याशी माझं काहीच लेण देण नव्हत, कारण मी त्या पोलिस स्टेशनला किंडर गार्डन करून ठेवलं होत.

थोड्यावेळाने माझी आई, बाबा, आजी पोलिस स्टेशनला आले, अर्थात रिपोर्ट द्यायला, पुढ्यात मला पाहून त्यांचा जीव भांड्यात नक्कीच पडला होता. पण, मी काही आई आली म्हणून रडले नाही ना धावत तिला बिलगले, माझं आपलं मस्त खेळण सुरु होत. हे पाहून पोलिसांना खटकल, ते मला द्यायला तयार होईनात! आईचं रडण सुरूच होत, बाबा आणि आजीने पोलिसांना पटवून दिलं कि हि आमचीच मुलगी आहे. अखेर पोलिस काकांचा नाईलाज झाला आणि त्यांना मला सपुर्त करावं लागलं. त्यांना मी इतकी आवडले होते कि ते बाबांना बोलल्या वाचून राहिले नाहीत," कोणी आलं नसतं तरं मी हिला माझ्या घरी नेणार होतो!" माझे इंसिक्युर बाबा आणखीनच  इंसिक्युर झाले असतील हे मात्र नक्की!

पोलीस काकांना पापी देऊन मी माझं बस्तान हलवलं! वाईट एका गोष्टीचं वाटत कि देव अश्या गोड माणसांना लगेच का नेतो? मी सहावीत होते, त्या काकांचा अपघातात मृत्यू झाला, त्यांचा फोटो मी बरीचं वर्षे जपून ठेवला होता. पण, शिफ्टिंगच्या चक्कर मध्ये तो हरवला. पण, ते कधीच हरवणार नाहीत माझ्या हृदयाच्या कप्प्यातून!

प्रिया सातपुते 

अकराओळी!


सावरायला मला 
असा तू झुरू नकोस 
पेटत्या श्वासांना 
वाया घालवू नकोस 
सावर स्वतःला 
शेवटी पाखरांना
उडायचच असतं
कितीही वारा होऊ
दे वेडा पिसा
त्याच्यावरच स्वार
व्हायचं असतं…

-प्रिया सातपुते

Thursday 17 October 2013

कोजागिरी!


लग्न आणि Unwanted Questions

लग्न ठरताच जवळच्या आणि लांबच्या लोकांच्या प्रश्नांची सरबती सुरु होते. मग तुम्ही मुलगा असा अथवा मुलगी. 
लग्न कधी? हे ऐकून तुम्हाला थोडं ऑकवर्ड वाटेल पण, त्यांचे प्रश्न सुरूचं राहतील. जर तुमचं अरेंज आहे तर मग दहा प्रश्न आणखीन विचारले जाणार, काय आवडलं तुला याच्यात? काय ग दारू बिरू पितो का? सिगारेट वगैरे काही व्यसन आहे का? लग्नानंतर जॉब करणार कि नाही ? नाही म्हणालं तर प्रवचन आणि हो म्हणालं तर टोमणे. काय करणार असंच असतं. पण, तुम्ही हे बदलू शकता. कसं? या साऱ्या प्रश्नांची कल्पना आधीच असेल तर तुम्हाला धक्का बसणार नाही आणि काय उत्तर द्यायचं हे तुम्ही ठरवू शकता. काही महत्वाच्या प्रश्नांना आपण हात घालूया. 

प्रश्न- लग्नाची तारीख इतक्या उशीरा का काढलीय? घ्यायचं ना उरकून याच महिन्यात. 
इथे तुम्ही तुमचं स्पष्टीकरण देऊ शकता, कि तुम्हाला एकमेकाला ओळखायला वेळ मिळतोय, कोर्टशिप पिरीयड कसा महत्वाचा आहे हे पटवून देऊ शकता. आणि बोलायचं नसेलच तर डायरेक्ट मोठ्यांनी ठरवलंय काय बोलणार म्हणून हात वर करू शकता. 

प्रश्न- किती कमावतो तो? घर दार स्वतःच आहे ना?
इथे टोला लगावून डायरेक्ट बोलू शकता काकू दारात मर्सडिज पण आहे काही काळजी करू नका. मला इकडची वस्तू तिकडे ठेवायला सुद्धा लागणार नाही इतका तर तो नक्कीच कमावतो. काकी शॉक अन्ड यु रॉक्स!

प्रश्न- लग्नानंतर जॉब करणार कि नाही?
इथे जर नाही म्हणालं तर ऐकायला तयार रहा, मग इतकं शिकून उपयोग काय झाला तुझा? उत्तरात तुम्ही बोलू शकता मला थोडे दिवस माझी मेरिड लाईफ एन्जॉय करायचीय, नवऱ्याला माझ्या हातचं जेवण खाऊ घालायचं आहे, आमच नात घट्ट करायचं आहे. जॉब काय कधी पण, करता येतोच. हे झाल नाहीच. आता हो म्हणालं तर ऐकून घ्या, तुझ्या सासरच्यांना आवडलं हे? तू कशी सांभाळणार घर आणि जॉब? बघ बाई नीट विचार कर. 

प्रश्न- एकत्र कुटुंबात राहणार कि एकटे? 
एकत्र म्हणाल तर बरीच उदाहरणे ऐकावी लागणार, आमच कसं जमलं नाही वगैरे. आणि एकटे म्हणालं तर एकचं वाक्य कानी पडेल अरे वाह, यु आर सो लकी!

प्रश्न- सासू ठीक आहे ना तुझी?
इथे नाही म्हणून चालेलच कसं!!

प्रश्न- काय रे सुनबाईची लहान बहिण आहे का कोणी?
इथे आता बिच्चारा मुलगा नसेल तर सुटेल आणि असेल तर फसेल!

प्रश्न- रोज बोलता का रे तुम्ही फोनवर?
इथे काय स्माईल करा आणि पळा गाईज, फोन आला म्हणून!!

प्रश्न- शेवटची काही इच्छा आहे का रे तुझी?
इथे सांगाल तर फसाल, पुढे तोच मित्र बायको समोर तुमची इच्छा बोलून दाखवायला मागे पुढे पाहणार नाही. सो सावधान!!

प्रश्न- मुलगी एक नंबरची आहे ना?
एक नंबर अर्थात गोरी, दोन- गव्हाळी, ३- सावळी…. माहित आहे खूप विचित्र आहे हे पण काय करणार हे कोडवर्डस आपल्या पूर्वजांची देणगी!

प्रश्न- जेवण बनवेल ना रे ती? एकुलती एक अनतोयस न करून म्हणून विचारलं!
इथे ठेवून द्या टोला, अग मावशी शीला वहिनी पेक्षा लाख चांगलं बनवते ती जेवण, घरी आली कि खाऊन ठरव. 

प्रश्न- हनीमून ला कुठे जाणार आहात?
का तुम्ही पण येणार आहात का आमच्या बरोबर? हे विचारू शकता किंवा ठोकून द्या दोन तीन नाव…सिंगापूर,मलेशिया वगैरे! आणि त्यांच्या रंग बदलेल्या चेहऱ्याची मज्जा घ्या!

अशे बरेच प्रश्न असतील… काही तुम्हाला माहित असतील तर नक्की कमेंट करयाला विसरू नका. 

प्रिया सातपुते 

Tuesday 15 October 2013

मीच माझी दुर्गा!


आपल्यासोबत होणारया छळाला आपण स्वतःच कारणीभूत असतो, कधी घाबरून आपण समोरच्या व्यक्तीला दाखवून देतो कि मी किती कमजोर आहे. हे तर ये म्हशे मार! असचं झालं. स्त्रियांवर होणाऱ्या या अत्याचारात आपण सगळेच कुठून न कुठून कारणीभूत असतो, कारण, तुम्ही-आम्ही आपल्या आया-बहिणी, बाबा-भाऊ यांच्याकडून काय सल्ले घेतो कि दुर्लक्ष कर! आणि दुर्दैवाने ते दुर्लक्ष जीवावर बेतत! म्हणून, आज पासून आयडिया दिल्या जातील, आपल्या मैत्रीणीना कि अश्या गोष्टींना कसं सामोर जायचं!

आजच्या काही टिप्स-

टीप क्रं-१
कोणत्याही परिस्थितीत घाबरून हात पाय गाळू नका, भीती हा सर्वात मोठा शत्रू आहे हे लक्षात ठेवा.

टीप क्रं-२
नेहमी स्वतःच्या मोबाईल मध्ये जवळच्या पोलिस ठाण्याचा नंबर सेव करून ठेवा. फक्त चॅट साठी उपयोग न करता, सिक्युरिटी अप्स डाउनलोड करा.

टीप क्रं-३
तुम्ही परगावी राहणाऱ्या असाल तर चटकन कोणावरही विश्वास ठेवून अनोळखी ठिकाणी जाऊ नका. कुठेही बाहेर जाताना घरच्यांना, जवळच्या मित्रांना कल्पना देऊन ठेवा.

टीप क्रं-४
रात्रीच्या प्रवासात शक्यतो नावाजलेल्या टूरिस्ट कंपन्यांसोबतच प्रवास करा. सोबत चिली स्प्रे, कटर बाळगा. लेडी सीटचीच बुकिंग करा.

टीप क्रं-५
रिक्षाने रात्री प्रवास करताना, नीट लक्ष द्या, सांगितलेल्या रूटने रिक्षा जातेय कि नाही याकडे लक्ष द्या. शक्यतो फोनवर संभाषण चालू ठेवा, रिक्षाचा नंबर लक्षात ठेवा, फोनवर तो जाणून बुजून ऐकवा. घर गाठे पर्यंत फोन ठेवू नका.

टीप क्रं-६
अश्लील नजरेला वेळीच ओळखा, आजूबाजूला गर्दी आहे, आणि समोरची व्यक्तीच्या देहयष्टीकडे पाहून, न घाबरता प्रत्युतर द्या. बारीक असेल तर तुम्ही एक लावली कि पब्लिक दहा मारायला पुढे येते. पण, जर समोरची व्यक्ती ताकतवान आहे असे दिसतं असेल तर, गर्दी गाठूनच प्रत्युतर द्या.

टीप क्रं-७
पाठलाग करणाऱ्या व्यक्तीला, (देहयष्टीकडे पाहून उत्तर देता येत) चकवा देता येत असेलं तर चटकन गर्दीत घुसा, शक्य नसेल तर, जवळच्या पोलिस, डीसेंट लोकांची मदत घ्या.

टीप क्रं-८
घाबरवायचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला भररस्त्यात जाब विचारा, घाबरू नका! जशी स्त्रियांना पुरुषांची नजर कळते तशीच पुरुषांना स्त्रियांची भीती कळते, मग ते जास्ती घाबरवायचा प्रयत्न करतात.

टीप क्रं-९
सेल्फ डिफेन्स टेक्निक्स शिकून घ्या आणि रोड रोमिओना कायमची अद्दल घडवा.


टीप क्रं-१० 
न विचारता फोटो काढणे हा एक गुन्हा आहे हे लक्षात ठेवा, कोणी शूट करत आहे, लक्षात आल्यास त्या व्यक्तीला न कळू देता पोलिसांना गाठा. शक्यतो अश्या गोष्टी देवीच्या दर्शनाच्या लाईन मध्ये सर्रास घडतात. 

टीप क्रं-११ 
पार्टी, पब, डिस्को अश्या ठिकाणी अनोळखी व्यक्तींकडून ड्रिंक्स घेऊ नका, तुमच्या समोर तयार झालेल्या ड्रींक्सलाच ओठाशी लावा.  ड्रिंक सोडून आजूबाजूला जाऊन येऊन ते ड्रिंक पुन्हा घेण्याची चूक करू नका. शक्यतो अश्या ठिकाणी जाण टाळा. आपलं हित आपल्याच हातात असत हे विसरू नका. 

पुढच्या टिप्स पुढच्या भागात. 

शेवटी एकंच सांगेन "मीच माझी दुर्गा" बना म्हणजे कोणताही राक्षस तुमच्या जवळ भटकणार नाही. 


प्रिया सातपुते 

Sunday 13 October 2013

"प्रेम घ्या प्रेमासारखे रहा!"


प्रत्येक इच्छेमध्ये एकचं सुप्त गोष्ट लपलेली असते ती म्हणजे "प्रेम". ही अडीच अक्षरे जीवनात असतील तर काही असो वा नसो एक तृप्ती राहते, आनंद राहतो, पण हेच विरुद्ध असेल तर? सर्व काही असूनही माणसाला जीवनाचा विट येतो. प्रेम प्रत्येक गोष्टीत असते, ते विनाशाला सुद्धा कारणीभूत ठरते तर कधी कटकटी, भांडणे, विकृत मनोवृत्ती यांना जन्माला घालते.
जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर प्रेम करून लागतो त्याला,"लोभ" म्हणतात. अश्या लोभातून उत्पन्न झालेल्या प्रेमाला, "मद" किंवा "अंहकार" म्हणतात. प्रमाणाबाहेर जेव्हा एखादी व्यक्ती प्रेम करू लागते तेव्हा त्याला, "ईर्षा म्हणतात. संपूर्ण आयुष्यात आपण प्रेमचं शोधत असतो, लहानपणी खेळामध्ये, खेळण्यांमध्ये, मोठे झाल्यावर मित्र, बायको, नवरा मध्ये आणि वृद्ध झाल्यावर आपल्या मुलांमध्ये. एवढं सगळ करूनही आपण रिक्तच राहतो. का? मग यावर उपाय काय? अस प्रेम हवं ज्यामध्ये विकार, दु:ख, बंधने नकोत. हे शक्य आहे???

प्रेम ही एक निरामय भावना आहे, ती जितकी शोधू अथवा तिच्या मागे लागू ती तितकीच दूर पळते, म्हणून शोधण सोडून आधी स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे म्हणजे आपल्या मध्ये जी चेतना आहे अर्थात ज्याला आपण आत्मा म्हणतो ती तृप्त होते आणि मग प्रत्येक गोष्टीत व्यक्तीला प्रेम आणि प्रेमचं भरभरून मिळते. यासाठी फक्त एकंच काम करायचं आपण सुद्धा निरामय आणि निस्सीम बनायचं. मनातल्या कपटांना, जाळ्यांना कायमचं साफ करून टाकायचं.
उदाहरण द्यायचं झाल तर, दुसरयाविषयी वाईट चिंतने बंद करा,ईर्षा नावाच्या या ताईला जवळ आणू नका. तिच्याकडे एवढे कपडे माझ्याकडे नाहीत, त्याच्याकडे एप्पल मोबाईल आणि माझ्याकडे मायक्रोमेक्स, त्याची बायको अप्सरा आणि माझी… अशे बिनबुडाचे मूर्ख विचारांना कायमची तिलांजली द्या.

अस्तुदेवतेला लक्षात ठेवा! या मागचा अर्थ लक्षात ठेवा. Always think positive because, those thoughts will turn back towards you!

आज विजयादशमी सोन वाटून आपण काय बोलतो? "सोन घ्या, सोन्यासारखे रहा!" सोन अर्थात धन, अर्थात सुखमय आयुष्य. सुखमय आयुष्य अर्थात प्रेम, कारण प्रेमचं सोन आहे. म्हणूनच मी म्हणते, "प्रेम घ्या,प्रेमासारखे रहा!"

ही विजयादशमी तुम्हां-आम्हां सर्वांना भरभरून प्रेम देवो आणि प्रेमासोबत रहायला देवो!
Happy Vijayadashmi guys!

प्रिया सातपुते 

Sunday 6 October 2013

प्रियाटी!!


~~ती~~


ती तशीच बसून राहिली त्याच्या पाठमोऱ्या प्रतिकृतीकडे पाहत, त्याची सावली अंधारात गुडूप झाली होती, काही क्षण तिला कळेचना काय सुरु आहे, तिचं मन सुन्न झालं होत. त्याची प्रतिकृती छोटी छोटी होऊन नजरेआड निघून गेली. ती मात्र तशीच बसून होती गुपचूप. हळू हळू शिंपला उघडावा अन मोती हातात यावा असचं काही तिच्या चेहऱ्याकडे पाहून वाटत होत. तो आज तरी बोलेलं असं मनोमन तिला वाटत होत, त्याच्या नजरेत एक अन ओठांवर एक पाहून तिचं मन आधीच पिळवटून गेलं होत. पाच वर्षांच्या नात्याला तो इतका सहजासहजी तोडून चालू लागेलं हे मात्र तिला अजिबात वाटलं नव्हत. प्रेमभंगाच दुखं करावं कि अश्या फसव्या नात्यातून सुटका झाल्याचा आनंद करावा हेचं तिला उमगतं नव्हत.

प्रिया सातपुते

प्रियाटी!!


प्रियाटी!!


Sunday 29 September 2013

स्त्रिच, स्त्रिची सर्वात मोठी शत्रू ???


या पुरुषप्रधान समाजात स्त्रिच, स्त्रिची सर्वात मोठी शत्रू आहे.
खूप जणांना वाटेल मी अतिशयोक्ती करतेय पण, असं नाहीय. याची बरीच उदाहरणे मला देता येतील, काही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रीतीने माझ्यासमोर आलीत तर काही माझ्याचं समोर घडली.

एक स्त्रिच एका अजन्म्या स्त्री अर्भकाची खुनी असते. कारणे काहीही असोत, परिस्थिती काहीही असो, जोपर्यंत  एक आई परवानगी देत नाही तोपर्यंत कोणीही तिच्या पोटातल्या गोळ्यास मारू शकत नाही. ती हे का विसरते कि ती सुद्धा एक स्त्रिच आहे! मी खूप लहान होते, दुसरी-तिसरी मध्ये असेन, एका नातलगांच्या घरी आम्ही कार्यक्रमासाठी गेलो होतो, तिथे एक बाई दुसऱ्या बाईला सांगत होत्या," काढून टाकायला सांग तिला, पहिल्या दोन आहेत न मुली बसं झालं, आता मुलगाच पाहिजे." लहान असल्यामुळे मला त्या वाक्याचं इतक गांभीर्य कळल नाही. पण, आता अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. किती निर्दयी आहेत या बायका.

आपण पुरुषांना बोल लावण्यापेक्षा हे पाहिलं पाहिजे कि, ते तर पुरुष आहेत, मंगळावर राहणारा ज्याचा भावनांशी काडीचाही संबंध नसूनही तो उलटा अश्या उलट्या काळजाच्या बायकांपेक्षा लाख गुणांनी बराच म्हणावं लागेलं. कारण या पुरुषानाही एक स्त्रिच संस्कार देते, समाजात मान देते. काहीना ती शिवाजी महाराज बनवते तर काहीना कसाब तर काहीना बलात्कारी, खुनी! अजिबात अतिशयोक्ती नाहीय यात. मी मुंबईला असताना माझ्या एका मैत्रिणी सोबत एक किस्सा घडला होता. ती जॉब वरून घरी जाण्यास निघाली होती. अंधेरी स्टेशन, बसकरता ती लाईन मध्ये उभी होती, तिच्या बाजूला वयस्कर माणूस उभा होता, त्याच्या सोबत त्याची बायको आणि माझ्या मैत्रिणीच्या वयाच्या त्याच्या मुलीसुद्धा उभ्या होत्या. पब्लिक प्लेस वर सिगारेट ओढन कायद्याने गुन्हा आहे, तो माणूस बिंदास पणे सिगारेट फुंकू लागला होता, तिला साहजिकच त्रास होऊ लागला म्हणून तिने त्यांना नम्रपणे विनंती केली. "अंकल! प्लीज आप सिगरेट बंद करेंगे, तकलीफ हो रही हैं।" यावर त्या माणसाने तिला अशा शब्दांमध्ये उत्तर दिलं कि ते मी इथे नमूद करू शकत नाही, आपल्या बायकापोरांसमोर हा निर्लज माणूस एका मुलीचा गलिच्छ शब्दांमध्ये अनादर करत राहिला पण, त्याची बायको, मुली काहीही बोलल्या नाहीत, त्या चुपचाप तमाशा पाहत होत्या. माझ्या मैत्रिणीने त्या माणसाला तर सुनावालच, पण त्याच्या बायकोला आणि मुलींना सुद्धा ऐकवलं, "आपके सामने ये बेटी कि उमर कि लडकी के साथ ऐसी बात कर रहे हैं और आप बुत बनके खडी हैं। ती इतकी भडकली कि तिने पोलिस येऊपर्यंत त्या माणसाला सोडलच नाही. हेट्स ऑफ टू हर! काही लोक तिच्या बाजूने बोलत राहिले काही समजावत राहिले, ती मात्र ठाम राहिली.


मुंबईचाच आणखी एक किस्सा मला इथे आवर्जून सांगावासा वाटतो आहे, तुमचे संस्कार तुम्हाला कशे तग धरून, धाडसी बनवतात हे तेव्हा मला जाणवलं. मुंबईचे रिक्शावाले आणि त्यांचे किस्से तर जगप्रसिद्ध आहेत, एकदा जेव्हा मी घरी परतले होते आणि रिक्शावाला मला लल्लू बनवू पाहत होता, त्याला वाटलं एका मुलीसमोर घाणेरडा शब्द बोलेन तर ती चूप होईल, तो म्हणाला," मुझे क्या *** समझ के रखा हैं?" मग काय माझी सटकली," हा बे सही बोला, यही समझ के रखा हैं, क्या कर लेगा तू? चुपचाप मेरे ५० रुपये वापीस दे, नही तो देख क्या हाल करती हू तेरा।" बिच्चारा घाबरून पळून गेला. एक स्त्री तिथे उभी होती आणि दुसऱ्या स्त्रिला सांगत होती,"या आजकालच्या मुली जरा सुद्धा नीट वागत नाहीत." ती पुढे काही बोलणार तोच मी तिच्याकडे पाहिलं, तशी ती वरमली.  एक स्त्री असून ती, स्त्रिलाच बोलं लावत होती. वाह ग स्त्रिये! धन्य केलंस बघ. 


हे थांबल पाहिजे,  स्त्रिच  स्त्रिची शत्रू हे समीकरण बदललं गेलं पाहिजे. मुलगाच वंशाचा दिवा होऊ शकतो हे ब्रीदवाक्य कालबाह्य केलं गेलं पाहिजे. टीवीवर रोज स्त्रियांची कपटी कारस्थाने बघून रियल लाईफ मध्ये पण बायका तेच फॉलो करतात, अशी बुरसटलेली, समजला घातक नाटके बंद झाली पाहिजेत. समाजाची जननी ही एक स्त्रीच आहे, तिची विकृत मानसिकता कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण समजासाठी घातक आहे म्हणून ही मानसिकता बदलायलाच हवी.  

प्रिया सातपुते 


Saturday 28 September 2013

गट्टी तुझी माझी- कमल!

                                                                                  Photo courtesy by Abhay Waghmare

कमल आणि माझी गट्टी छान जमली होती. मलाही ती आवडायची. कधी कधी ती स्वतःहून मला उशीर झाल्याचं लक्षात येताच, चहा बनवायची, रात्री जेवताना आवर्जून मला काय पाहिजे नको ते पहायची. माझ्या भल्या मोठ्या केसांची ती खूप मोठ्ठी फॅन होती, चंपी करून देते म्हणून पुढे असायची. एकदा मी सहजंच वैतागून म्हंटले होते, "यार कंटाळा आलाय मला या मोठ्या केसांचा, मस्त हेयर कट करायचा विचार आहे माझा". माझ वाक्य पूर्ण होई पर्यंतच ती म्हणाली,"अजिबात नाही कापायचे, जर तू कापलेस तर मी बोलणारच नाही तुझ्याशी. तिच तसं रीयाक्ट होण मला आवडलं, नकळतच ती माझ्या मुंबईच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून गेली होती. 

तिला पुस्तके खूप आवडायची, मी खास करून तिच्यासाठी बरीच मराठी पुस्तके विकत आणली जी तिला पुढील आयुष्यात खूप मोलाची माहिती पुरवतील. तिला चोकलेटस आणून देण, तिला काय हवं नको मी पण पहायला लागले होते. 
सुट्टीच्या दिवशी आम्ही दोघीच घरी होतो, आमच्या गप्पा रंगल्या होत्या. 

मी- काय आवडत तुला खायला?
कमल- मला न आईस्क्रीम खूप आवडत, दीपा ताईसोबत जाऊन मी खाऊन आले होते. 
मी- अरे वाह! कोणता फ्लेवर खाल्लास?
कमल- व्हेनिला! तोच मिळतो खाली, आणि तुला माहितेय ताई, नाक्यावर पाणीपुरी खूप मस्त मिळते. 
मी- ते पण आवडत का तुला? 
कमल- हो. 
मी- छान! नाक्यावर कशाला जाता तुम्ही? होम डिलिवरी मिळते. 
कमल- अग! तेवढंच फिरायला मिळत. 
मी- अरे वाह! मग काय खरेदी करून आला?
कमल- अग! आईंना पेपर पिन्स हव्या होत्या त्या आणायला गेलो होतो, मला एक वही पण हवी होती, पण… 
मी- पण? काय 
कमल- पैसे नव्हते नेले. 
मी- ह्म्म्म 

तितक्यात इंटरकॉम वर फोन आला आणि तिच्यासाठी फर्मान आलं होत, खाली येण्याचं. ती निघून गेली मी मात्र विचार न दवडता, पटकन वॉलेट घेऊन वॉकला निघाले, संध्याकाळची नाष्ट्याची वेळ झालीच होती. आधी मी जाऊन वही विकत घेतली, त्यासोबत एक पेन घेतला, तिच्यासाठी टिकल्यांच पाकीट घेतलं. खूप दिवसांआधी ती बोलली होती टिकल्या संपलेत म्हणून. मग पाणीपुरी, शेवपुरी घेतली आणि कामत आईस्क्रीम पार्लर मध्ये जाऊन चोकलेटचे वेगवेगळे दोन फ्लेवरच आयस्क्रीम घेतलं. घरी जाऊन, इंटरकोम वर कॉल केला आणि तिला अर्जंट ये, काम आहे हा निरोप धाडला. तशी ती १० मिनिटाच्या आत हजर झाली. 

कमल- काय काम आहे? 
तिचा उतरलेला चेहरा सगळ सांगत होता. 
मी- टीवी पाहत होतीस का?
कमल- अग! मराठी पिक्चर लागला होता आणि तू बोलावलं 
मी- इथे लाव मग, आधी ती पाणीपुरी शेवपुरी घे. 
ती अवाक होऊन मला पाहतच राहिली. 
मी- बघत काय उभारली आहेस, मऊ होईल ती शेवपुरी घे पटकन, तुझ्यासाठी थांबलेय मी खायची. 
तशी ती भारावलेल्या नजरेने पुढे आली. 
मस्त ताव मारून मी तिला सांगितलं फ्रीजर मध्ये डब्बे आहेत ते घेऊन ये. 
कमल- काय आहे हे?
मी- आयस्क्रीम 
कमल- माझ्यासाठी?
मी- हो
तिच्या चेहऱ्याची खळी मस्त फुलली. चमचे घेऊन मी बाहेर आले, तर तिच्या डोळ्यातलं साठलेलं पाणी पाहून मी तिच्या पाठीवर हात ठेवला तिला जवळ घेत म्हणाले, "वेडाबाई! रडतात का कोणी असं? डोळे पुस आधी ते, आणि खाली जाताना ती टेबलावर ठेवलेली वही पेन आणि टिकल्या घेऊन जा!"
कमल- थांकू ताई, असं  कधी कोणी… 
ती काही बोलण्याआधीच मी तिला गप्प केलं.
मी- थंक यु म्हणायचं असतं ग किती वेळा सांगू तुला. 
या वाक्यावर आम्ही दोघी हसलो, आयस्क्रीम संपवत काही तिचं, काही माझं ऐकत आमची आयस्क्रीम पार्टी संपली. 

त्या दिवशी रात्री झोपताना जे सुख मी अनुभवलं होत तेच आताही अनुभवतेय आणि याचं सगळ क्रेडीट कमलला! 
थांक कु कमल! 

प्रिया सातपुते 

Thursday 26 September 2013

देवासोबतची माझी एक्स्क्लुसिव मिटिंग!


Disclaimer- All characters and situation appearing in this article are fictitious. Any resemblance to real persons, living or dead, is purely coincidental.


आज भल्या पहाटे मला देव दिसला, अरे! खरचं साक्षात कृष्ण माझ्यासमोर उभे होते. आधी तर मला पटलच नाही, देवाला तिरक्या नजरेने पाहत, स्वतःलाच एक चिमटी काढली, आणि ते स्वप्न नव्हत, साक्षात विष्णूरूप कृष्ण माझ्यासमोर उभे होते. एकदम नॉर्मल होते हा ते, अगदी आपल्यासारखेच. देवाला पाणी घेणार का विचारून मी त्यांना माझी कॉम्पुटर चेयर बसायला दिली, तशे कृष्णदेवाने आसन ग्रहण केलं. पाण्याचा एक घोट घेऊन, कृष्ण देव म्हणाले," आह! हे तर आताच्या गंगेपेक्षा चविष्ट लागतंय."

मी- ह्म्म्म!
कृष्ण देव- तू न बोलताच समजलं मला ते एक्वागार्ड आहे.
मी- तुम्हाला कसं कळल, ओह्ह तुम्ही तर देव आहात न!
कृष्ण देव- तुला अजूनही विश्वास होत नाहीय का?
मी- नाही अस नाही रे देवा, तुला अरे तुरे केल तर चालेलं न ?
कृष्ण देव - (हसून) हो चालेल ना!
मी- आज माझ्याकडे कसं येन देवा? हा ठेका तर आमच्या आऊसाहेबांचा आहे.
कृष्ण देव- का? तुला आवडलं नाही का?
मी- असं नाही रे देवा
कृष्ण देव- मग कस आहे?
मी- आता हे मला सांगता येणार नाही!
कृष्ण देव- प्रयत्न कर, आहे मी इथेच
मी- देवा तू माझी चेष्टा करतोयस का?
कृष्ण देव - नाही, अजिबात नाही.
मी- मग आज मला दर्शन कसं दिलंत?
कृष्ण देव- रोज तर माझाशी बोलतेयस, म्हंटल आज आमने सामनेच भेटतो तुला
मी- हे बर केलंस बघ देवा
कृष्ण देव - बोल मग, काल खूपच अस्वस्थ होतीस तू, नीट बोलली पण नाहीस माझ्याशी.
मी- देवा आधी सांग मी जिवंत आहे कि ?
कृष्ण देव- आत्मा नेहमीच जिवंत राहते
मी- म्हणजे मी सुटले का पृथ्वीवरून ?
कृष्ण देव - नाही ग! तुला इतकंच वाटत असेल तर तोंडावर थंड पाण्याचे फवारे मारून ये
मी- ह्म्म्म
कृष्ण देव- आता बोलणार आहेस कि नाही ?
मी- देवा मला तुझा खूप राग आला आहे
कृष्ण देव- का ग बाई?
मी- ई प्लिज देवा बाई नको म्हणू.
कृष्ण देव हसू लागतात,
कृष्ण देव- बर नाही म्हणणार!
मी- धन्यवाद!  मला तुझा काल खूप राग आला होता, म्हणजे अजूनही आहेच, द्रोपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी तू एका भावासारखा धावून गेलास, तिच्या एका हाकेला तू जागलास. आणि आता काय झालं आहे तुला? तुला या निष्पाप मुलींच ओरडण, तुझ्या धावा करण ऐकूच येत नाहीय का? तू का शिक्षा नाही करत या नराधमांना? तू असताना हे सगळ होतच कस देवा? कधी थांबणार हे? कि तू काहीच करणार नाही? कि खरच या युगाचा अंत होतोय? मग निष्पाप जिवांच काय? हे बरोबर नाही ह देवा! प्रामाणिकपणाला तर कुठे किंमतच उरली नाही, जिथे पहाव तिथे भ्रष्टाचार, तुझ्या मंदिरातपण हेच, तुझ्या नावावर ऐष करतायत लोक, तरीपण तू शांतच? लहान फुलांना कुस्करून टाकत आहेत लोक, कधी थांबणार हे? आता ही तू गप्प का? मला उत्तर हवय देवा!
कृष्ण देव - तू थांबशील तरचं मी बोलणार ना ?
मी काहीच न बोलता, कृष्ण देवाकडे एक कटाक्ष टाकला. 

कृष्ण देव- माझ्याकडून बनवली गेलेली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तुम्ही मनुष्यच. मी सर्वांना सारखीच बुद्धी देऊन जन्माला घातलं, आता तू म्हणशील मग सर्वानांच सुखी का नाही केलंस? प्रत्येक मनुष्य त्याच्या कर्मानेच जगतो, जो आज राजा आहे तो उद्या रंक सुद्धा होऊ शकतो, आणि हे कशामुळे तर फक्त कर्मामुळे! जो श्रद्धा आणि भक्तीच्या समन्वयाने पुढे जाईल त्याच्या प्रत्येक मार्गात त्याला गुलाबाच्या पाकळ्याचं भेटतील पण, जर तुम्ही अधर्म, पाप, हत्या, स्त्री अवमान या मार्गाने जाल तर नक्कीच काट्यानपेक्षाही भयानक अश्या ठिकाणी अडकून रहाल. 
मला थोडं पटलं पण, मनाच समाधान काही झालं नाही, जणू माझ्या चेहऱ्यावरून कृष्ण देवाला हे सुद्धा कळाल आणि ते पुढे बोलू लागले. 

कृष्ण देव- महाभारत होणार हे निश्चित होत आणि हे माहीत असूनही मी स्वतः तह करण्यासाठी तीन वेळा प्रचंड प्रयत्न केला. पण, जी गोष्ट घडणारच होती तिला टाळण माझ्या हातात सुद्धा नव्हत. कारण, मनुष्य स्वतःहून अश्या गोष्टी करतो ज्या त्याच्या कर्माशी निगडीत आहेत. गीतेला कुरुक्षेत्रच्या रणांगणात प्रकट व्हायचं होत कारण त्यातच तर संपूर्ण मानवजातीच्या उद्धाराच प्रकटीकरण सांगितलं आहे मी. मला सांग किती मनुष्य या धनाला जपून वापरत आहात? 
मी गप्प झाले. काय उत्तर देणार देवाला, मान खाली घालून मी पायाच्या अंगठ्याकडे पाहत राहिले. 

कृष्ण देव- ज्ञान तर मी सर्वांनाच दिलंय पण, कितीजण त्याच्यापर्यंत पोहचून स्वतःच्या ज्ञानाची तहान भागवून मोक्ष मिळवतात ? या चेतनेला माझ्यात विलीन करण्यासाठी तुम्ही मनुष्य किती खस्ता खाता हे पाहून मलाही वाईट तर वाटतच पण, म्हणून मी सुद्धा तुमच्यासारखं हतबल होऊन कसं चालेलं? मग, या सृष्टीची गाडी कशी चालू राहिलं? मी स्वतः अविरत काम करत राहतो, मी थांबलो तर हे सगळच थांबून जाईल. 

मी अवाक होऊन पाहतच राहिले. 
मी- म्हणजे देवा तुही काम करतोस ? मला वाटलं तुला तर खूप सारे पर्कसं असतील. 
कृष्ण देव हसू लागतात. 
मी- सॉरी देवा, पण, मला माहित नव्हत. 
कृष्ण देव- इट्स ओके! 
मी आणखीनच अवाक देव इंग्लिश बोलत होता. 
कृष्ण देव- अरेच्या मला नाही का येणार इंग्लिश? तुमच्या अबोल भाषेला सुद्धा ऐकू शकतो मी. 
मी- ह्म्म्म ( घाबरून आणि लाजून)
कृष्ण देव- तुला घ्यायची आहे का देव बनण्याची जबाबदारी, अगदी सेम त्या जिम केरीच्या मूवी सारखं?
मी घाबरून म्हणाले- नको, नाही, अजिबात नाही. 
कृष्ण देव- जबाबदारी अवघड आहे म्हणून नाही म्हणतेयस हो ना?
मी- देवा मला मनुष्यच राहू दे, आय मिन मला आताच वरती यायचं नाही रे, अजून तर माझं लग्न पण नाही झालं, मुले पण नाही झाली, आता कुठे आयुष्याला सुरुवात झालीय, प्लिज देवा, माझ्या पण काही जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण झाल्या कि ये न्यायला. 
कृष्ण देव खूप जोर जोरात हसू लागतात. 
कृष्ण देव- म्हणजे तुला कळाल तर कि जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या कि चेतना मुक्तीच्या मार्गावर असते, पण विसरू नकोसं आज पासून तुला गीता रोज न चुकता वाचायची आहे आणि दुसऱ्यांना पण त्याच महत्व पटवून द्यायचं आहे. 
मी- हो देवा, समजलं !
कृष्ण देव-  ह्म्म्म 
मी- आणि हे ही कळाल कि योग्य विचार आणि बुद्धीचा वापर कसा महत्वाचा आहे. 
कृष्ण देव- जरी भाग्यालिखित काही आहे तर ते तुम्ही मनुष्य कर्माच्या बळावर बदलवू शकता, हे नेहमी लक्षात ठेव. 
मी- हो नेहमीच लक्षात ठेवेन देवा!
कृष्ण देव- चल मला आता निघावं लागेल माय वाईफ इज वेटिंग फोर मी. 
मी आणि कृष्ण देव दोघेही हसायला लागलो. 
मी- ओके देवा, मग आता पुन्हा कधी भेटणार?
कृष्ण देव- तू बोलावशील तेव्हा. 
मी- पक्का?
कृष्ण देव- हो! चल काळजी घे, सी या!

मी- सी या !

देवाला सी ऑफ करून मी आजूबाजूला पाहिलं, चिमण्या जाग्या झाल्या होत्या, सुर्य जणू मी येतोय सांगत होता. सुर्यादेवांच्या दर्शनासाठी मी गैलेरीमध्ये तशीच उभी राहिले. 

प्रिया सातपुते 


Saturday 21 September 2013

Love Yourself first!!



प्रेम जगातील सर्वात सुंदर भावना जणू ओठांवरच हसू, जे कधीही न संपणार असतं. पण, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईल ते आयुष्य कसलं? प्रेम तर आपण सर्वांवरच करतो पण, त्याची खरी जाणीव कळी फुलल्यावरच होते, जणू सुकलेल्या झाडाला नवी पालवीच फुटते. प्रेम हा शब्द प्रत्येकाच्या आयुष्यात अस्तित्वात असून देखील आपण त्याच्याकडे कधीच ढुंकून देखील पाहत नाही. पण, प्रेमात पडल्यावर त्याचं माणसाचा आयुष्याबद्दलचा दृष्टीकोनच बदलतो. 

प्रेमात आकंठ बुडालेली व्यक्ती मग काय चूक? काय बरोबर? या फंदात कधीच पडताना दिसत नाही. आपलं सर्वस्व पणाला लावून भरभरून प्रेम दिलं जात, यात गैर वाटण्यासारख नक्कीच काही नाही पण, जेव्हा समोरच्या व्यक्तीकडून भ्रमनिरास होत आहे हे जाणवू लागल्यावर स्वतः मध्येच काही कमी आहे हे मानून जेव्हा ती व्यक्ती निमुटपणे गप्प बसते आणि सगळ उमगत असून सुद्धा प्रेमापोटी स्वतःची गांधारी करते याहून सर्वात मोठा मूर्खपणा काहीच नाही. प्रेम हा पैश्याचा खेळ नाही कि जिथे तुम्हाला जे हवं ते मिळेल, हा सगळा मनाचा मामला असतो, प्रेमात पडण जितकं सोप्प असतं, तितकंच ते निभावण कठीण असतं. प्रेमात नको अपेक्षा करू म्हटलं तरीही डझनभर अपेक्षा या येणारच. अपेक्षा तर आपण आपल्या आई, बाबा, दादा, बहीण या सर्वांकडून पण तर करतोच ना? कि आपण अशेच तयार झालो? मग, प्रेमात सुद्धा अपेक्षा या येणारच, आता हे ज्याचं त्यान ठरवायचं कि कोणती अपेक्षा बरोबर आहे कि नाही. 

प्रेमात पडण जितकं सोप्पं असतं तितकंच ते आता बाहेर पडणही सोप्पं झालं आहे. पण, सगळ्यांकरताच हे सोप्पं असतं असं देखील नाही. काही जण जीव देतात, काही जण जीव घेतात, तर काही जण आयुष्यभरासाठी होरपळून निघतात. योग्य ठिकाणी, योग्य वेळी जर मन मोकळ करायला त्यांना कोणी भेटलं तर अश्या भयानक गोष्टी टळू शकतात. आपल्या समोर असूनही आपण एकेकदा काहीच बोलत नाही पण, जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा आयुष्यभरासाठी आपल्या मनाला हुरहूर राहते कि आपण त्याच किंवा तिच मन का ओळखू शकलो नाही. 

प्रेम गमावल्याची हीन भावना मनातून पुसून टाकली गेली पाहिजे, जी व्यक्ती स्वतः वर प्रेम नाही करणार ती आयुष्य कशी जगणार? स्वतः वर प्रेम करा, तुम्ही स्वतः खुश असाल तरचं तुम्ही दुसऱ्याला सुख देणार. 

Hope, I had gifted you this beautiful line," Falling in love with myself is most wonderful gift in this entire world." 

Love, 
प्रिया सातपुते