Friday 18 January 2013

माझी शाळा....

माझी शाळा....





लहान असताना हक्काची जागा, जिथे असायची आमची सत्ता..तिथे नसायचा वावं राजकारणाला, कोऱ्या मनावर रोज उमटायचे वेगवेगळे भाव.
काळ्या फळ्यावर जसा खडू अक्षरे उमटवायचा तशीच काही गत आमची पण असायची, काही गोष्टी मनाच्या फळ्यावर छाप सोडून जायच्या तर काही एका कानातून आत आणि दुसरया कानातून बाहेर.
आयुष्याचा पहिला अध्याय, इथेच लिहला गेला, कोणी बाईंच आवडत तर कोणी सरांचं...कोणी बाकावर उभ तर कोणी दाराबाहेर...काहीही असो पण, आता येत प्रत्येक गोष्टीच हसू...
ऑफ तासाला गोष्टींची सराई...एक गोष्ट पाचवीत सुरु झाली ती शाळा संपली तरी सरांनी संपवलीच नाही...या गोष्टीच खूपच दु:ख अजूनही होत...तबकडीच काय झाल हे अजूनही मनाच्या कोपऱ्यात चाळवला जाणारा प्रश्नच आहे.
फोटो काढणारे मास्तर, फोटो काढूनच घ्या म्हणून मागे लागायचे, आणि आम्ही चक्क पळवाटा काढायचो...पण, आता तेच फोटो शाळेतल्या त्या सोनेरी क्षणांची साक्ष देतात.
इंग्रजीच्या तासाला सगळे असायचे गुपचूप, तर सरांची छडी चालायची सापसुप, तास संपायच्या घंटेकडे असायचे सर्वांचे लक्ष,पण छडीचा एक मार बसल्याशिवाय सर नाही सोडायचे वर्ग.
मराठीच्या तासाला सुरु असायची गम्मत, सरांचा डोळा असयचा फक्त निर्लजम सदासुखींवर!!
भिशी घ्याचा पाढा चालू असायचा बाईंचा...त्यांचा बाउन्सर जायचा डॉल्फिनच्या फेकू गोष्टींवर.
नैतिक मूल्याच्या तासाला यायचे सर तोंडात पान घेऊन आणि म्हणायचे मुलांनो पान, गुटखा, तंबाखू आहे आरोग्याला धोकादायक!!
आईच्या मायेनी डोक्यावर हात ठेऊन, वेळ पडली तर कान ओढणाऱ्या बाईंच्या आसपास घुटमळतो आजही जीव!!
केळवकर दिनाच्या धडाक्यात उधळले जायचे सजावटीचे रंग, बक्षिसांची खिरापत...
अश्या या शाळेच्या प्रवासात पूर्णविराम तो आलाच, निरोपाच्या क्षणी आपापली पंखे चढवून, सर्वांनी आपापली क्षितिजे ठरवून उंच भराऱ्या घेतल्या...
परतीचा प्रवास तितका सोपा नाही, शाळा आता ती नाही जी सोडून आम्ही गेलो,
आमचे शिक्षक, शिक्षिका तिथे असतील? ? ?
पुन्हा लहानपणीचे सवंगडी भेटतील? ? ?

प्रिया सातपुते (१० वी क )