Wednesday 19 June 2013

The show must go on...


नेहमी प्रमाणे झोपण्यापूर्वी चिंटू वाचण्याची सवयचं लागून गेली आहे मला, आज पण चिंटूला पाहिलं, प्रभाकर वाडेकर सरांच्या निधनानंतर चिंटू काही काळ येणार नाही. मनाला पुन्हा एक चटका बसला तो भूतकाळाच्या आठवणींचा. मनाच्या पटलावर धूळ झटकून मी त्यांना थोड मोकळ करायचा विचार करून हे लिखाण सुरु केल. 

लहान असताना मला वाटायचं कधी कोणी वृद्ध होऊचं नये. जगात कोणीच देवाघरी जायला नको, देव का बरे घेऊन जातो? हा प्रश्न मी आईला हजारदा विचारला असेल, कदाचित त्यापेक्षाही जास्तचं. आईपण मग काही सारवासारव करून मस्त पटवून द्यायची कि देवाला जो आवडतो तोच त्याच्या घरी जातो, त्याच घर खूप मोठ्ठं असतं, तिथे सर्व काही मिळत, आणि यावर जेव्हा मी म्हणायचे,"मग मी जाते ना देवबाप्पाच्या घरी, कस जायचं सांग ना?" तेव्हा आईच काळीज पिळवटून निघायचं कारण तिच्या डोळ्यात पाणी साठलेलं अजूनही मला आठवत, मग ती मिठ्ठीत घेऊन म्हणायची,"मी नाही का आवडतं तुला? मला सोडून जाणार असं पुन्हा बोलायचं नाही हं बाळा!" आताही डोळ्यात पाणी दाटून आलं. प्रत्येक मुलं असचं निष्पाप असतं. 

कधी कधी वाटायचं पंख असते तर चालायला लागलं नसतं, शाळेतून सुटल्यावर पक्षांसोबत उडतं उडतं घर गाठल असतं. पण, असं कधी घडलच नाही, रस्त्यातून जाताना गरीब लहान मुलांना पाहून खूप वाईट वाटायचं, कधी कधी वाटायचं त्यांना घरी घेऊन जावूया आणि एकदा तसा प्रयत्न करताना ओरडा देखील बसला. का भिक मागताय विचारलं कि ते हसतच जायचे, तेव्हा मला त्याचं कारण कधी उमगलच नाही. 

अजूनही आठवत एक खूप सुंदर आजी, मंदिरात बसलेली असायची, मी तिच्या अवती भोवती फिरत राहायचे, कधी कधी माझा खाऊ त्यांना पण द्यायचे, कालांतराने त्या खूपच दयनीय झाल्या, आणि काळाच्या ओघात गुडूप झाल्या. त्या आजी खूप घरंदाज घराण्यातल्या होत्या, त्यांचा मुलगा सोनार होता, तरी सुद्धा त्याने आपल्या आईची ही स्तिथी करून ठेवली होती. शेवटी म्हणतात ना, जे पेराल तेच उगवते, आणि तसचं झालं, तो सोनार एका अपघातात मारून गेला, त्याचं दुकान सुद्धा बंद पडलं. 

मनाच्या या कपाटात अश्या कितीतरी गोष्टी बंद आहेत, काही आता सांगितल्या कारण होता तो चिंटू… काही दिवसांनी तो पुन्हा येईल आणि सगळ्यांना हसवू लागेल. आयुष्य पण काही असंच असतं, नेहमी पुढे चालत राहायचं. म्हणतात ना The show must go on...

प्रिया सातपुते

Tuesday 18 June 2013

कमल

                                                                             Photo courtesy by Abhay Waghmare

रत्नागिरी जवळच्या छोट्याश्या गावातून आलेली हि चिमुरडी. लांब काळेभोर केस, रंग सावळा, नाकी-डोळी छान. अंगावर मळकटलेला ड्रेस. पहिल्यांदा जेव्हा मी तिला पाहिलं होत तेव्हा मला तिच्या डोळ्यांत खूप काही जाणवलं होत. तिचे छोटेशे डोळे खूप काही बोलून गेले होते. 

आमची ओपचारिक भेट, आमच्या घर मालकिणीने घालून दिली होती. घरापासून दूर, इतक्या लहान वयात ती मुंबईत चार पैसे कमवायला आली होती. त्या दिवशी तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता, का कोण जाने मला ती मुलगी आवडली होती कि मला तिच्या बद्दल सहानभूती वाटत होती. आम्ही हतबल होतो, आम्ही पेईंग गेस्ट होतो जर आम्ही काही बोलायला जाऊ तर आम्हीच अडकू अशी आपसूक भीती बाळगून मी माझ्या घर मालकिणीना बोलले पण होते, उत्तर ऐकून मी गप्पं झाले होते कि ते सत्य मला आधीच माहित होत याचा विचार सुद्धा मी तेव्हा केला होता. मला मिळालेलं उत्तर होत, "कमलच्या घरी तिचा दारुडा बाबा, आजारी आई, एक लहान भाऊ आणि एक मोठी बहिण आहे. मोठी बहिण गावं सोडून कोणाच्या तरी घरी काम करत आहे आणि तेव्हा पासून तिने मागे वळून पाहिलं नाहीय, आता नंबर लागला तो या चिमुरडीचा, मुंबईत ती तिच्या काकासोबत आली, काकी खूप त्रास देत होती, म्हणून तिच्या काकाने तिला इथे आणून सोडलं आहे , तिला इथे घरकाम करायचं आहे आणि मिळणारा पैसा तिच्या घरी जाणार आहे. कपडे, जेवण, राहायला घर, पाहायला टीवी सगळ काही मिळणार आहेच तिला! गावी उपाशी मरण्यापेक्षा इथे काम करून पोट भरण यात काय पापं आहे प्रिया ? आणि कोण यांना फुकट खायला देणार? उलटा इथे राहून चार पैसे कमवेल आणि थोड्या दिवसांनी चांगला मुलगा पाहून मी तिचं लग्न लावून देईन, यात गैर काय? गावाकडून आलेल्या कितीतरी मुलींचं आयुष्य मी मार्गी लावलं." आणि सत्य माझ्यासामोर होत, त्यांनी त्या मुलींचं चांगलच केलं याचं कौतुक करावं कि नको हा प्रश्न अजूनही मनात थैमान घालतोय. 

अश्या या कमल बरोबर मी माझ्या आयुष्यातले काही क्षण घालवले तर कधी काही मनातले सांगितले आणि कधी मनातले ऐकले. आमची गट्टी कशी जमली ते तिने केलेली केसांची चंपी, ते तिच्या डोळ्यातले पुसलेले अश्रू ते तिला केलेला मेकअप, तिला वाचायला दिलेली पुस्तके ते तिला आवडणारा माझा परफ्यूम, आणि असं बरचं काही मला इथे मांडायचं आहे. 

कारण ही खूप भयंकर आहे, गेले कित्येक वर्षे मी तिला माझ्या मनात साठवून ठेवलेलं आहे, तिची छोटीशी स्वप्न, मला इथे मांडायची आहेत जेणेकरून ती माझ्या विचारांतून मुक्त व्हावी आणि मी शांत चित्ताने झोपू शकेन. 

प्रिया सातपुते 




Friday 14 June 2013

ही पिटुकली कविता माझ्या भाचीसाठी…



ही पिटुकली कविता माझ्या भाचीसाठी… 

एक मुलगी रुसली 
आणि कोपरयामध्ये बसली 
मुळूमुळू डोळ्यामधून 
पाणी काढू लागली 
काय झालं तुला?
तर म्हणते कशी माझी बाहुली रुसली… 

प्रिया सातपुते

Wednesday 5 June 2013

"पप्पा"


रोज तोंडामध्ये एकचं शब्द येतो, "मम्मा". हे आई नावाचं पात्र असतचं जादूमय, प्रेमळ. नेहमी वाचत आलेय आईबद्दलचे लेख, कविता. पण, या "पप्पा" पात्रांबद्दल खूपच कमी वाचलंय, कारण ही तसंच आहे, खूप कमी मुले आपल्या वडिलांसोबत क्लोज असतात. 

बाबा, वडील,पप्पा, फादर ही एकाच व्यक्तीची वेगवेगळी नावे जरी असली तरी त्यांच दिसणे हे अगदी या डोंगरासारखं असतं… वरून जरी ते या बर्फासारखे शांत दिसतं असले, पण त्यांच्या आतमध्ये चालू असलेली घालमेल आपल्याला कधी कळूच शकत नाही. 

लहान असताना टीवी वर एक झायरात यायची, एक लहान मुलगी म्हणत असे, "MY DADDY STRONGEST". तसं काहीसं प्रत्येक मुलीला आपल्या बाबांबद्दल वाटतच असतं. पण, प्रत्येक स्टोरी आणि त्यातली भावना इथे मांडण अवघड आहे, म्हणून "फादर्स डे " च्या निम्मिताने मी माझ्या बाबांबद्दल काही लिहणार आहे. 

मी आणि माझे पप्पा हे समीकरणच भन्नाट आहे, जितके आम्ही एकमेकांवर प्रेम करतो तितकेच एकमेकांचे कट्टर समीक्षक पण आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल काय हे? ही वडिलांची समीक्षक?, स्वतःला जास्तीच शहाणी समजते!! पण, तसं काही नाहीय, आम्ही दोघेपण एकदम विरुद्धार्थी जनरेशनला रिप्रेझेंट करतो. मग, जर माझ्या पिढीतलं किंवा माझं काही खटकल तर ते मनात न ठेवता बोलून टाकतो किंवा त्याचं मला काही खटकलं तर मी पण बोलून टाकते. यामुळेच पप्पा माझे खूप चांगले मित्र बनले आहेत, एकंदरीत बोलायचं तर आयुष्यभराचा जिवलग मित्र!!

पप्पांची प्रेमाची थाप आणि एक वाक्य सार काही देऊन जाते, ती म्हणजे, "मी आहे ना." या तीन शब्दात सार जग ठेंगण होऊन जात. हे बर्फाच्या डोंगराच चित्र त्यांना तंतोतंत लागू पडत, मी इतकी छळते त्यांना पण ते कधीच वितळत नाहीत.

मी माझ्या नात्यांना नवीन अर्थ दिला आहे आणि म्हणूनच आयुष्य खूपच सुंदर आहे!!

Wish you all Happy Father's Day!
Accept people as they are, and see how lucky you are!!

प्रिया सातपुते