Friday 2 August 2013

मोरपीस

Photo courtesy by Rahul Bage

आयुष्याच्या या प्रवासात खूप वळणे येतात, नवीन लोक भेटतात… पण, एक हुरहूर नेहमीच राहील, जे कधी आपल्याला मिळणारच नसतात ते का गालावरून फिरणाऱ्या मोरपिसासारखे हळुवार या मनात येतात आणि मोरपिसाचा स्पर्श निघताच निघून जातात. खूपजण म्हणतात कि ते आपल्याला बरचं शिकवून जातात तर काही म्हणतात ते मनाला कधीही न भरणाऱ्या जखमा देऊन जातात. 
अश्या या माझ्या काही मनातून मग एकचं आवाज येतो, "ते मोरपीस किती सुंदर होत, हेही त्याच्यापेक्षा जास्तीच सुंदर आहे". 
समजल? नाही ? उफफो !! 

एक छोटीशी गोष्ट सांगते, एकदा एक गुरु आणि शिष्य एका गावातून फिरत फिरत जात असतात. वाटेतून जाताना एक लग्नाची वरात जाताना पाहून शिष्याच्या मनात एक प्रश्न पडतो आणि तो गुरुंना विचारतो," गुरुजी प्रेम म्हणजे काय आणि लग्न त्याच माणसाशी कराव ना ज्याच्यावर आपण प्रेम करतो? मग लग्न म्हणजेच प्रेम आहे का?" यावर गुरुजी हसतात आणि शिष्याला म्हणतात,"हे समोर दिसणार सुंदर सूर्यफुलांच शेत आहे, तिथे जा आणि सगळ्यात सुंदर, तुला आवडणार फूलं घेऊन ये."
शिष्य गोंधळला मग तो शेताकडे निघाला,"फुलांवरून कस उत्तर सांगणार गुरुजी!" असं पुटपुटत तो शेतात घुसला, सगळीकडे सुंदर पिवळीधम्मक फुले, जणू ती फक्त सुर्यासाठीच जन्माला आली आहेत, असचं त्याला वाटत होत. थोडं पुढे जाऊन त्याला एक खूप सुंदर फुल दिसलं, बराच वेळ तो मंत्रमुग्ध होऊन त्याच्याकडे पाहतच राहिला, मग अचानक त्याच्या मनात आलं, "आता हे नको तोडायला, थोडं आणखी पुढे जाऊन पाहतो, याच्या पेक्ष्याही अत्यंत सुंदर फुलं मला मिळेल." तो पुढे जातो, खूप पुढे जातो, पण, हाती काहीच येत नाही, मनाला भावणार एकही फुल त्याला भेटत नाही, तो त्या आधीच्या फुलाला शोधण्याचा अतोनात प्रयत्न करतो पण ते सुद्धा तो हरवून बसतो, हताश मनाने परत येताना तो एक फुल तोडून घेतो. गुरुजींकडे येउन तो ते फुल त्यांना देतो. त्याला हताश झालेला पाहून गुरुजी त्याला झालेला सगळा प्रकार सांगण्यास सांगतात, तो जे काही झालं ते सार गुरुजीना सांगून टाकतो. गुरुजींच्या चेहऱ्यावर आपसूकच एक हास्य उमटत आणि ते बोलू लागतात," जेव्हा तू पहिल्या फुलाला पाहिलंस तेव्हा तुला ते खूप आवडलं, त्याच्या रंगाने, स्पर्शाने तू मोहून गेलास, ते तुला सुख देणार कि दु:ख यातलं काहीही तू मनात आणलं नाहीस; हेच तुझं 'प्रेम' होत. पण, आणखीन सुंदर मला पुढे मिळेल या आशेपोटी तू त्याला झिडकारलस, खूप शोधून सुद्धा तुला त्याच्या तुलनेइतकं दुसंर काहीच हाती आलं नाही म्हणून तू वाटेत मिळेल ते उचलून पुढे आलास, हेच 'लग्न' आहे."

या गोष्टीचा सांगण्याचा मतितार्थ इतकाच आहे कि जर कोणी तुम्हाला प्रवासाच्या वाटेत अर्ध्यातच सोडून गेलं आहे तर ती चूक तुमचीच आहे असं मानून स्वतःचा जीव जाळू नका, तुमची कदर करणार, तुमच्यावर जीव ओतणार तुम्हाला शोधत नक्कीच येईल. 

शेवटी काय ते तुम्ही ठरवायचं पुस्तकातल्या मोरपिसासारख जगायचं? कि, डोळ्यांना सुख देणाऱ्या, गालावरून मुक्तपणे फिरणाऱ्या खट्याळ मोरपिसासारख आनंदी राहायचं. 

प्रिया सातपुते 



No comments:

Post a Comment