Friday 7 March 2014

काही मनातलं-महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छ्या!


जागतिक महिला दिनानिम्मित काही मनातलं सांगावस वाटतंय…लहान असतांना असा काही महिला दिन असतो हे माहितच नव्हत. लहान मुलांमध्ये कुठे आला लिंगभेद? ते तर आपण मोठी माणसे त्यांच्यावर बिंबवतो. खरचं! तुमच्या कानी पडली असतील ना काही अशी वाक्ये…तू मुलगा आहेस, मुलींसारख काय रडतोयस? तू बॉय आहेसं, बॉईज स्ट्रोनग असतात, हिरो असतात, बॉईज  गर्ल्स सोबत खेळत नाहीत, बाहुल्या मुलींसाठी असतात, दुध पिलं की शक्ती येते अन मग तू गर्ल्स ना वाचवू शकतो…काय यार तू जेवण बनवतोस? लाज वाटली पाहिजे तुला, मुलगी आहेस का तू? आईला काय मदत करतोस मुलगी आहेस का तू? अशी बरीचं वाक्ये सर्रास कानी पडतच आपण मोठे झालोय, झालोय ना? 

लहानपणापासून दोन पारडी आपण बनवतो, हे मुलांनी करायचं आणि हे मुलीनी! मुलींना कणखर, सक्षम बनवायचं सोडून आपण त्यांच्यावर बिंबवतो की त्या किती नाजूक आहेत, त्यांनी कसं पवित्र राहिलं पाहिजे, मुलांनी छेड काढली की लक्ष द्यायचं नाही, स्त्रिया असतातच कमजोर, सहन करत रहायचं, त्यांनी कसं घर सांभाळल पाहिजे, नवऱ्याचा मार कसा खाल्ला पाहिजे, माहेरी परत यायचं नाही, सासरचं तिचं खंर घर, तिथूनच बाहेर पडायचं ते चार माणसांच्या खांद्यावर वगैरे वगैरे आणि वगैरे…पण या सगळ्यात एक स्त्री असून आपण हे कशे विसरतो, "जी स्त्री पुरुषाला जन्माला घालते ती कमकुवत होईलचं कशी?" 

आज स्त्री प्रत्येक अनुषंगाने पुढे गेली आहे, पण, अजूनही पारडी समान व्हायचं नाव घेत नाहीत, याला कारणीभूत काही अंशी स्त्रिया सुद्धा आहेत, स्त्रिच स्त्रिची शत्रू बनून तिला जन्मायच्या आतच संपवून टाकते तर कधी हुंड्याच्या आगीत पेटवून देते, तर कधी ओझं समजून आपल्याचं मुलीला बाजारात विकायला मागे पुढे पाहत नाही…मग तर पुरुषांच्या मार्फत होणाऱ्या अपराधांच तर काय बोलणार, संपूर्ण देश होरपळून निघाला तरीही बलात्कारी उघड्या तोंडाने फिरतच आहेत. ना कोर्टात त्या अंधळ्या मूर्तीसमोर न्याय मिळतोय स्त्रियांना ना घरात मान…आज ही सुशिक्षित लोकांमध्ये सुद्धा घरगुती अत्याचारांच प्रमाण दिसून येत…रोज एक व्रण तोंडावर घेऊन ती कामावर जाते, रोज तिला मारलं जात आहे, पेटवल जात आहे,…हे कोणामुळे? या निगरगट्ट समाजामुळे! 

प्रत्येक आई अन बाबाने जर ठरवलं, "मी जन्माला घालणाऱ्या या परीला मला उडायला एक सुरक्षित आकाश द्यायचं आहे." तर हे का नाही होऊ शकणार? मुलींना मुलांप्रमाणेच शिकवा लढायला, स्वसंरक्षणाचे धडे घरातूनच मिळायला सुरु व्हायला हवं, मग मजाल आहे कोणा षंढाची! 

सर्व आईबाबांना, अन भविष्यात आईबाबा होणाऱ्या सर्वांना आवर्जून एक विनंती करते की, "आजच्या या महिला दिनानिम्मित ठरवा स्वतःच्या मनाशी माझ्या परीला स्वच्छंदी बागडायला मी एक निर्भय, सुरक्षित आकाश देणारच."

प्रिया सातपुते




2 comments:

Unknown said...

अप्रतिम !

prachi...... said...

उठ चल,यशाच्या शिखरांची तुला साद..ऐक तू
‘स्त्री’ म्हणून जन्मलीयेस,’व्यक्ती’ म्हणूनही जग तू


happy women day ...

Post a Comment