Sunday 31 August 2014

प्रियांश...४९

हल्ली जिकडे पहाव तिकडे फ़क्त मुली/बायको/गर्लफ्रेंड/स्त्रियांवर सुख घेऊन जोक्स मारले जातात, मग तो कोणत्याही पटातला जोक असू दे, तिथे चव लाऊन कमेंट्स सुद्धा दिले जातात. या पुरुषांच आम्हा बायकांशिवाय काही चालतच नाही...हेच खर आहे, काहीही करून कुठल्या न कुठल्या कारणाने ते स्त्री नावाच्या पात्रा भोवतीच फिरत राहतात कधी गोल गोल तर कधी वेड्यावाकड्या वळनांनी. याची प्रचिती मिळाली...

प्रिया सातपुते

Friday 22 August 2014

प्रियांश...४८

आयुष्यात जेव्हा कधी आपणास जाणवत की आपली निवड चुकली, मार्ग चुकला, किंवा हे तुम्हांला न वाटता तुमच्या घरच्यांनाच जास्ती वाटत असेल...त्यावेळी एकच लक्षात असू दे, सो व्होट, देयर इज अदर वे टू! मोस्टली, कसं होत ना, आपल्याला करायचं असत एकं अन आपल्या आईवडिलांच्या इच्छा असतात दहा…नाही बारा…त्यात अजूनही ऐकायला लागत की तू जेव्हा आई बाप होशील तेव्हा तुला कळेल? कधी कधी ना या टिपिकल फालतू वाक्यांचा अगदी विट येतो…अरेच्या नाही आहोत आम्ही सध्या आईबाप मग, जगू दया ना आम्हांला आमच्या मनासारखं…कुठेतरी ठेच खाऊ, कुठेतरी स्वतःहून कुर्‍हाडीवर पाय देऊ, थोडं लागेल, पण ते आमचे अनुभव असतील, ते आम्हांला आयुष्यभर शिदोरी म्हणून पुरतील…नाही संस्कार सोडणार नाहीच हो, पण स्वतःची स्पेस, स्वतःच आकाश हवंय आम्हांला भरारी घेण्यासाठी…जर खरचं वाटलं खूप दूर जातोय तर येऊच ना परत आम्ही…पण, तेवढा विश्वास तरी दाखवा ना तुम्ही…पिल्ली मोठी होतात अन मग घरटी सोडून उडून जातात हे त्रिकालाबाधित सत्य कधी उमगणार माणसाला? नात्यांच्या जाळ्यात मग तो असा काही गुरफटतो की कधी मनाने तर कधी शरीराने रक्तबंबाळ होतो…अन मग, मन मारून, चरफडत आयुष्य रेटतो… 

प्रिया सातपुते

Friday 15 August 2014

प्रियांश...४७

आज सकाळी कॉफ्फी घेताना, त्रिशाच्या शाळेची तयारी पाहून अप्रूप वाटलं, सात वर्षाची चिमुकली नाश्ता करत म्हणत होती, "आज माझी स्कूल लवकर सुटणार, मस्त ना आत्तु!". मी हसून म्हंटल, "हो, पण, आज आहे काय?" त्यावर ती पटकन बोलली, "इंडपेंडंस डे!" मी खट्याळपणे म्हंटल ते काय असत? त्यावर तिने भलमोठ प्रवचन दिल, "आज परेड होणार स्कूल मध्ये, फ्लाग सेरेमनी होणार, प्रोग्रॅम होणार, गाणी गाणार,…" मग, तिला चिडवून म्हंटल, "पण, का?" यावर ती फक्त माझ्याकडे पाहत राहिली. इंडपेंडंसला  मराठीत काय म्हणतात विचारल्यावर तिने परफेक्ट सांगितलं, "स्वातंत्र्य!" मला खूप भारी वाटल,…पण तिचा पुढचा प्रश्न होता, "आत्तु स्वातंत्र्य म्हणजे काय?" कॉफ्फीचा मग खाली ठेऊन मी तिच्याकडे पाहत म्हंटल, "स्वातंत्र्य म्हणजे, बिनारोकटोक चॉकलेट खायला मिळन, डोरेमॉन आयुष्यभर पहायला मिळन, अभ्यास केला नाही म्हणून मम्माचा ओरडा न मिळन, पक्ष्यांप्रमाणे आकाशात उंच उंच उडता येण, स्वातंत्र्य म्हणजे कधीही कुठेही न घाबरता जाता येण, स्वातंत्र्य म्हणजे खूप खूप शिकून मोठ होण, स्वातंत्र्य म्हणजे खूष राहण, स्वातंत्र्य म्हणजे ज्यांना मदत हवीय त्यांना मदत करण, स्वातंत्र्य म्हणजे जगण आणि दुसऱ्यालाही जगू देण, स्वातंत्र्य म्हणजे आनंद देण….आणि, यावर ती पटकन बोलली, "स्माईल करण, हो ना आत्तु?" यावर खूप मोठीवाली स्माईल देऊन, मी तिच्याकडे फक्त पहातच राहिले…ते क्षण मनाच्या पेटीत साठवून, मी माझ्या स्वांतत्र्य दिनाची सुरुवात केली… 


Freedom is Smile....Keep Smiling guys, Keep spreading smiles... :D

प्रिया सातपुते 

Sunday 3 August 2014

प्रियांश...४६

विधवा स्त्री अन अविवाहित स्त्री यांमध्ये दिसण्यात साम्य नसलं तरीही जास्ती असा फरक देखील नसतो…कारण, दोघींनाही समाज अजूनही परक धन, दुसऱ्या घरची मुलगी आणि सर्वात मुख्य म्हणजे ओझचं मानत आला आहे. बदल घडतोय हे जरी खर असलं तरी, समाजाच मन कधी खुल्ल होणार आहे? याच विषयावर मी अन माझी आई बोलत होतो, तेव्हा तिने एक जुनी गोष्ट सांगितली,…

माझ्या एका मावशीच लग्न ठरवण्याचा कार्यक्रम सुरु होता, मंडळी पुण्याची होती. बारकी आई हिरीरीने सारकाही पाहत होती, तोच मंडळी मधल्या बायकांनी सूर ओढला, "ही विधवाबाई कशाला पुढे पुढे करतेय? मंगल कार्यात विधवा कशाला पाहिजे? कळत नाही का तुम्हां लोकांना अपशकून होईल!" हे ऐकताच तात्याजी आणि आई खवळून उठले. आपल्या बहिणीला लावलेले बोल त्यांना खपले नाहीत. आई खंबीरपणे म्हणाली, "रोज सकाळी तिचा चेहरा पाहिल्याशिवाय आमचा दिवस सुरु होत नाही, आणि तुम्ही असं काय म्हणताय? आम्ही असलं काही मानत नाही. अन, अस बोललेलं चालणार नाही."

त्या काळात मुलीची पार्टी असूनही आई अशी तडफदारपणे बोलली, कोणाचीही तमा न बाळगता! त्या काळातले असूनही आईचा तो विचारी बाणा मनाला सुख देऊन गेला आणि मुख्य म्हणजे ती एका स्त्रिच्या बाजूने ठामपणे उभी राहिली. आज उमगतंय आम्हां सर्व भावंडांमध्ये हा तडफदारपणा कोठून आला आहे ते. फिलिंग ग्रेट की आम्ही तुझ्या सावलीत लहानाचे मोठे झालोत. आज आई तू, तात्याजी अन बारकी आई स्थूलदेहाने जरी आमच्यापाशी नसलात तरीही आमच्या कणाकणात सामावलेले आहात. आता शब्द संपवते लिहू शकणार नाही… 

प्रिया सातपुते 

Friday 1 August 2014

सिम्मी…The unconditional love


देवाने मनुष्याला फुरसती मध्येच बनवलं असणार…देवाने जन्माला घातलेला सुसंस्कृत, सभ्य, बुद्धीमान प्राणी म्हणजे कोण असेलं तर तो "मनुष्यच"…म्हणून तर हा मनुष्य सगळीकडे मिरवत राहतो, वरचढपणाच्या ढोंगात तो स्वतःचा अहंकार कुरवाळत राहतो आणि बाकी सर्वं प्राणीमात्रांना तुच्छ समजतो. 
पण, याच उत्कृष्ट देवाच्या कलाकृतीत एकचं काळा ठिपका आहे अन तो म्हणजे, "निरपेक्ष प्रेम". 
या निरपेक्ष प्रेमापोटी माणूस जंगजंग पिछाडतो पण हाती मात्र काहीच लागत नाही…अश्या या माणसाला प्रेमाचा खरा अर्थ कोण शिकवत? याचं भूतलावरचे तुच्छ प्राणी. 

प्रत्येकाला कोवळ्या वयात पडलेला गंभीर प्रश्न कोणता होता? तर तो म्हणजे, "प्रेम म्हणजे काय?" प्रत्येकजण त्याच्यापरीने प्रयत्न करतो, अर्थ सांगण्याचे, तर काही व्याख्या तयार करतात. प्रेमावर कविता करतात तर काहीजण प्रेमावर कथा लिहितात, पण, कितीजणांना खरचं प्रेम कळत??? मलाही पडलेलं हे एक कोडच होत, पण, जर प्रश्न मनातून असेल तर काळ आणि वेळ तुम्हांला तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे नेऊन पोचत करतेच. 

माझ्या प्रश्नाचं उत्तर होत "सिम्मी"…या नावाशी माझा काहीच समंध नव्हता, पण याच एका शब्दांत आयुष्याचं गमक ती मला देऊन गेली. सिम्मी माझ्या एका मित्राची पेट फिमेल डॉग होती. खर बोलायचं तर मला सगळे प्राणी आवडतात पण, जंगलंमध्ये!! किती हा विपर्यास…कारण, लहानपणापासून त्यांच्याबद्दलची भीती मनात घर करून अशी राहिली होती की जे पेटस ठेवतात, त्यांच्याबद्दल सुद्धा मला अप्रूप वाटायचं किती गट्स आहेत यांच्यात! पण, या पठ्याला तिच्याबद्दल भरभरून बोलतांना मनात कुठेतरी वाटायचं की काश, माझ्याकडे पण सिम्मी असती! असं, काय होत तिच्यात???

सिम्मीबद्दल बोलतांना माझ्या मित्राच्या बोलण्यात मी कधीच मालकीभाव पाहिला नाही, तो जणू ती घरचीच मेंबर असल्यासारखा बोलायचा. जणू ती त्याची बच्छडीच होती. तो लहान असतांना त्याच्या काकांच्या घरातून एक छोटुस पिल्लू, घेऊन आला होता. पांढऱ्या रंगाची, गोबरी गोबरी सिम्मी तेव्हापासून त्याचीच झाली होती. किती अजब आहे हे, तो हॉस्टेलला असूनही ती त्याला कधी विसरली नाही. माझ्या ऐकण्यात आलेली ही पहिली पेट डॉग असेलं जी वेजीटेरीयन होती आणि तिला कैडबरी खूप आवडायची. सगळ्यात मोठी हाईट म्हणजे ही चिमण्यांशी खेळायची. अंगणात झाडावरून पडलेल्या पिल्याला हलकेच तोंडात घेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवायची, घरच्यांना बोलावून त्या पिल्याला वाचवल्याची गोष्ट मला अजूनही थोडीथोडी लक्षात आहे. माझ्या आळशी मित्राला ती फिरायला ने म्हणून मागे लागायची. दिवसभर काकूंच्या मागेमागे घरभर त्यांच्या सावलीसारखी फिरायची…सकाळी पेपर आणून देण्यापासून, जी जी कामे सांगाल ती सारी गपचूप करायची, ना चेहऱ्यावर आठी ना भुंकणे…घरभर बागडायची, पायाशी लोळण घालायची, मायेने हात फिरवावा म्हणून पायात घुटमळायची… घरात कोण आलंय याची वर्दीपण द्यायची…ओवरऑल ती ऑलराउंडर होती. 


सिम्मीबद्दल इतकं ऐकलं होत की तिला पाहण्याची इच्छा तर सॉलिड होती आणि भीती त्याहून डब्बल. पण, जेव्हा मी त्यांच्या घरी पाहिलं की ती निवांतपणे घरभर फिरते आहे, माझ्यातर पायाखालची जमीनच गायब झाल्यासारखं झालं होत, मी अश्या जागा पाहून बसतं होते जिथे सिम्मी येणार नाही पण, ती नेमकी माझ्याच पायाखाली येत होती तर कधी खुर्चीखाली तर कधी चक्क माझ्या बाजूला, पण ना ती माझ्यावर  गुरगुरली ना ओरडली, उलटा ती इतकं क्युट लूक द्यायची ना की वाटायचं, अरे एकदा हिला टच करूयाच, पण, हिम्मत ने दाद नाही दिली. इतक्या वर्षांची भीती अशी कशी जाईल! काही लोकं त्यांच्या पेट्सना घराबाहेर ठेवतात…थंडीत कुडकुडायला, किंवा त्यांना त्याचं सेप्रेट डॉग हाउस देतात, पण, याच्या घरी ती निवांत दिसली, त्याच्याच बेड मध्ये झोपेल, एकदा त्याने सांगितलं पण होत की ती त्याच्या जवळच झोपते, कधी पायांजवळ तर कधी कुशीत तर कधी सोफ्याखाली. किचेन मध्ये जाऊनही ती कुठेच तोंड घालत नव्हती, खाण्यासाठी ती तिच्याच प्लेटकडे जायची…किती विनम्र, आताची लहानमुलेही इतकी नम्र नसतात. बाहेरच्या लोकांना पाहताच डॉग्स भुंकायला लागतात,… पण, लग्नासाठी भरगच्च पाहुण्यांनी भरलेल्या घरातही ती गुरगुरतानासुद्धा मी नाही पाहिली. खरचं!!!


किती प्रेमाने ती त्यांच्या घरच्यांच्या गळ्यात पडायची, खरचं जाणवत होत की ती किती प्रेम करते त्यांच्यावर…एक महत्वाची बाब म्हणजे लग्नाआधीच्या परित्राण पाठात त्यांनी सिम्मिला सुद्धा बाजूला बसवलं होत, आणि ती संपूर्ण मंत्र ऐकतेय की काय याचंच कौतुक वाटलं होत मला! त्यानंतर मी तिला कधी पाहिलं नाही! सिम्मिला पाहिल्यानंतर कौतुक वाटत होत की ही खरचं डॉग आहे??? माणसे सुद्धा इतकी शहाणी नसतात. 

मित्राचं अन सिम्मीच नात उमगण्या इतपत माझी बुद्धी त्यावेळी तितकी प्रगल्भ नव्हती, मी फक्त तिला एक पेट म्हणूनच पाहिलं! जेव्हा सिम्मी हे जग सोडून निघून गेली तेव्हा तो खूप रडला.  तो मला अगदी एका लहान मुलासारखा वाटला, जो सिम्मिला घेऊन घरी आला होता फरक फक्त इतकाच होता की आता सिम्मी त्याच्याजवळ नव्हती म्हणून तो रडतं होता. 

दिवस निघून गेले, प्रत्येकजण आपापल्या व्यापात बुडून गेले. मी सिम्मिला विसरले, पण, जेव्हा जेव्हा सिम्मिसारखीच दिसणारी डॉग्स समोर दिसायची, सिम्मी नजरेसमोर तरळून निघून जायची. आजही आठवत आहे, रात्री झोप येत नव्हती म्हणून मी टीवी पहात होते, "हाचीको" मूवी सुरु होती, छोटुस पिल्लू पाहून, सिम्मी मनात तरंग उठवून गेली…जणू, त्या पिल्ल्यात ती मला "प्रेमाचा खरा रंग" पहायला सांगत होती. शेवटी मी तीच मूवी पहायचा निर्धार केला, तोंड पाडून मूवी पाहताना मला जाणवलच नाही, की मी किती गुंग होऊन गेले होते. मन दाटून आल होत, हुंदका गळ्याशी आला होता.  "निरपेक्ष प्रेमाचा" अर्थ उमगून न उमगल्यासारखीच माझी गत झाली होती, हाचीच्या शेवटच्या क्षणात मला माझ्या मित्राचं दुखः स्पष्टपणे जाणवत होत…जणू तो चक्कं सिम्मिला पकडून रडतोय की काय! असाच भास झाला होता. त्याच्या दुःखाची सर माझ्या जाणीवेत येणार नाही कारण, त्यान त्याचं हक्काचं निरपेक्ष प्रेम करणार माणूस हरवलंय, पण, सिम्मी मात्र नेहमीच त्याच्या मनाच्या कप्प्यात कायमची राहिलं. 


Thank you Simmy, for letting me know the secret of "Unconditional Love", I'll cherish your memory for lifetime.

प्रिया सातपुते 





प्रियांश...४५

परीक्षा संपवून बाहेर पडल्यावर जेव्हा जाणवत की पाऊस थोडा दमलाय, दोन सेकेंद का होईना त्याला थॅंक यू म्हणत मी माझा मोर्चा घरी वळवणार तोच, थंडगार हवेची झुळूक पोटात कावळे ओरडत असल्याची खूण देऊन गेली, मग काय पटकन घर गाठण्याचा चंग बांधला तोच एक कॉफी हाउस नजरेत आलं,…पटकन जाऊन मी आयरीश कॉफी ऑर्डर केली… बाजूलाच मुलामुलींचा ग्रुप होता, त्यातला एकाने जोरात ओरडून म्हंटल, "पुरुष कितीही वेळा लग्न करू शकतो पण, स्त्रीला एकंच लग्न मान्य असत धर्मात!" यावरून त्यांच्या ग्रुप मध्ये बाचाबाची सुरु झाली,…कॉफीचे घोट घेत, कानांवर पडणारे शब्द कर्कश वाटत होते…जवळच्या नातातल्या लोकांची नावे घेऊन त्यांच्या दुसऱ्या लग्नाच्या गोष्टींवर ते पिझा चसके लाऊन खात होते,…"अरे ती माझी चुलत बहिण तिने सेकेंड मेरेज केलं, काय गरज होती अस करायची? त्यावर त्यांच्याच ग्रुपमधल्या एकीने टोकल अन म्हणाली, "अरे, मग तुझ्या सख्ख्या भावाने पण तर दुसर लग्न केलं आहे, हे विसरलास का तू? यावर तो तिच्यावर डाफरला… तशी ती चिडून उठून निघून गेली! अभिमान वाटला तिचा तिने प्रतिकार तरी केला, हो मध्ये हो करत राहिली नाही ती!

आपला समाज किती पार्सलिटी करतो...जेव्हा एखादी अविवाहित स्त्री एखाद्या विधुर अथवा बिजवारयाशी लग्न करते, तेव्हा त्या स्त्रिला अगणित आरोपांना सामोरे जाव लागत...तिच्यात काही खोट असेल, पैश्याला भाळुण केल असेल, गड़बड़ आहे, काहीतरी लफड असेल, चारित्र्य चांगल नाही तिच, अश्याच असतात या बायका....अशे बरेच बोल ऐकण्यात येतात. पण, जेव्हा एखादा अविवाहीत पुरुष एखाद्या विधवा अथवा घटस्फोटित स्त्रिशी लग्न करतो तेव्हा मात्र त्याच्यावर जास्ती करून स्तुतिसुमने उधळल़ी जातात, वाह! किती ग्रेट काम केल त्याने, गट्स लागतात अस करायला, त्या बाईचं भाग्यच भारी! एखादी विधवा, घटस्फोटीत स्त्री पुनर्विवाह करत असते तेव्हाही तिलाच का वेगळ्या नजरेला सामोर जावं लागत? पुरुष मग तो विधुर असो वा घटस्फोटीत वा अविवाहित, तो अश्या कोणत्याच नजरेत का येऊ नये??

मी स्वतः लहानपणी पाहिलेल्या एक काकू , अकाली नवरा गेल्यामुळे विधवा झाल्या, पण, आजतागायत त्यांना मी तशाच वेशात पाहत आले…अर्थात त्यांनी पुनर्विवाह केला नाही, शिकलेल्या, स्वतःच्या पायावर त्या आजतागायत तश्याच उभ्या आहेत. अश्या बऱ्याच स्त्रियांना आजवर पाहिलं, बऱ्याचजणी खरचं रंगांपासून कायमच्या दूर झाल्या, लहानपणापासून लावणाऱ्या टिकल्या आता त्यांच्या माथी दिसत नाहीत, हातात बांगड्या सुद्धा दिसत नाहीत, का? तर टिकली, बांगड्या, रंग म्हणे नवऱ्याच्या चितेसोबत राख होतात. 
आता, पुरूषाच उदाहरण देते, उच्चशिक्षित, बक्कळ पगार, दोन मुले, अन काळाने घाला घातला, बायको देवाघरी गेली. अन, अवघ्या तीन महिन्यात तो दुसंर लग्न करून मोकळा झाला. किती हा विपर्यास! इथे हेही नमूद करेन, पुनर्विवाह न केलेले पुरुषही मी पाहिले आहेत. पण, ते कोणताही रंगापासून वंचित नाहीत, त्यांना समाजात तोच मान आहे, किंबहुना त्यांच्याबद्दल सहानभूती जास्ती आहे! का? बायको अकाली गेली अन अजूनही मुलांखातर ते अविवाहितच राहीले. हिचं सहानभूती, मान त्या विधवेला का येऊ नये? 

आपल्याला स्टिकर्स लावायची फार सवय लागून गेली आहे…हा/ ही घटस्फोटीत, हा/ही विधुर…लहानपणीच एवढी चांगली नावे दिली आहेत ती तर काही कामाचीच नाहीत…चांगली स्टिकर्स ठेवा हो, पण, माणुसकीला काळ फासणाऱ्या अश्या स्टिकर्सना कोणाच्याच माथ्यावर लावू नका…एकंच स्टिकर माथी लाऊन फिरा ते म्हणजे "मानवतेच"… 

प्रिया सातपुते 





My love -The beautiful beast!!!

                                                                 फोटो सौजन्य - अभिजीत कोथळे

तुम्ही कधी कोणावर पहिल्या नजरेत प्रेम केलंय? समोर कोण आहे याची किंचितही पर्वा नसतांना? मी केलं आहे, अगदी प्रेम काय असतं हे उमगण्याआधी…एक दिवस शाळेच्या पुस्तकात त्याचा फोटो पाहिला अन तेव्हा पासून तो माझ्या मनाच्या अश्या कप्प्यात जाऊन बसला आहे की जेव्हा मी माझ्या विचारांत हरवलेली असते तेव्हा तो हळूच येउन माझ्या कानांत गुरगुरतो… अन, मग आपसूकच माझे डोळे मिटून जातात, कधी तो उडी मारून माझ्या मनातून बाहेर येऊन, माझ्याकडे निरागसपणे पाहत राहतो…त्या क्षणात मी अनुभवलेलं आहे, निरागस प्रेम…आफ्टर ऑल टायगर इज माय पॅशन… 

एकेकाला स्वर्ग दाखवणारा हा सुंदर, क्रूर, देखणा प्राणी…मला मात्र वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो, त्याच्या डोळ्यात मला एक वेगळंच जग दिसत,…जिथे फक्त असतो एकंच चंग…"शिकार"…पण, तेच तर असतं ना त्याचं खरखुर जगण! आणि मुख्य म्हणजे "प्रामाणिक" जगण…माणसासारख थोडीच खायचे दात वेगळे अन मारायचे वेगळे…

साखरझोपेत असतांना अचानक मला जाणवलं मी तर एका खुल्या हिरव्यागार मैदानात लोळतेय अन, जेव्हा डोळे उघडले तेव्हा तो सुंदर वाघ, माझ्याकडे एकटक पाहत होता, जणू तो देखील प्रियाच होता की मी स्वतःला त्याच्यात पहात होते? काहीच विचार नव्हते,…वाघाची बछडी जशी एकमेकासोबत खेळतात तशेच आम्ही खेळत होतो,…जणू मला विसर पडला होता माणूस असण्याचा…माणसाच्या रक्ताला आसुसलेल्या वाघासोबत खेळताना खरचं खूप सॉलिड वाटत होत, त्याची मऊ मऊ फर, त्याचा तो सुंदर रंग, मीच फालतू दिसत होते त्याच्यापुढ्यात… एकमेकांना गुदगुल्या करत, जोरजोरात हसत…अन, आईने कधी धपाटा दिला ते कळलच नाही…पण, ते स्वप्न होत यावर अजूनही विश्वास बसतं नाही…

एकेकदा तर तो खुल्या डोळ्यांसमोर दिसतो मला…आता हे तर स्वप्न असू शकत नाही ना, हे सार काय आहे??? एका मित्राशी बोलन केलं ज्याला वाघ नाही पण, फुलपाखरू दिसायचं…मग, आणखीन एका मैत्रिणीशी बोलन झालं, त्यात उमगलं की तिला आधी जे घडणार आहे ते आधीच स्वप्नांत दिसायचं, अर्थात तिची स्वप्ने खरी होतात याची साक्षीदार मी सुद्धा आहे! मग, थोड वाचन केलं, त्यात कळाल की या प्रकाराला "Animal Totem" असं म्हणतात, अर्थात, प्राण्यांचा स्वरुपात ऊर्जा तुम्हांला प्रत्येक ठिकाणी गाईड करते. मग, त्या त्या प्राण्याचे गुणधर्म सुद्धा काही अंशी आपल्यात असू शकतात. या गोष्टी मानण न मानण हे प्रत्येकावर आहे, पण, ही अंधश्रद्धा नक्कीच नाही! कारण, या भूतलावर सगळीकडे ऊर्जा आहे, माझ्यात, तुमच्यात, प्रत्येक जीवात, कणात…हीच ऊर्जा म्हणजे आध्यात्मिक भाषेत बोलायचं तर, "चैतन्यच" आहे, साक्षात "ईश्वरच"…लहान असतांना या सुंदर प्राण्याच्या प्रेमात मी पडले, मग तिच सकारात्मक ऊर्जा, त्याचं स्वरुपात मला गाईड करत गेली…मुंबई मध्ये असताना जॉब वरून परतताना कधी कधी ऊशीर व्हायचा, मग कधी कधी याच सुंदर प्राण्याचा साक्षात्कार अधे मध्ये व्हायचा, कधी कधी जाणवायचं तो माझ्या बाजूने चालतोय, माझं रक्षण करतोय…कधी कधी काही करंटे पाठलाग करायचे तेव्हा, जणू तो वाघच त्यांच्यावर तुटून पडायचा… अर्थात त्यांना चोपणारी वाघीणच होती, अस म्हणायला हरकत नाही. 

सायकॉलोजीकली पहायला गेलं तर माणूस, ज्या गोष्टींकडे मनापासून आकर्षित झालेला असतो, पण, ती गोष्ट मिळवण अशक्यप्राय असतं हे जेव्हा त्याला जाणवत, तेव्हा एकतर माणूस त्या गोष्टीचे गुण स्वतःमध्ये उतरवतो किंवा डिप्रेशन मध्ये जातो!  पण, गुण आत्मसात करतांना स्वतःला गमावू नका, आणि हो, चंग बांधा चांगल्या गुणांचा!

One last thing guys, "Please, save Tigeres/Tigeress,..this beautiful beast!"

प्रिया सातपुते 




प्रियांश...४४

आजचा दिवस संथ घालवला, खर बोलायचं तर काहीच केलं नाही…हिवाळा आला की काही प्राणी कशे हायबरनेटिंग पोझिशन मध्ये जातात ना, तसचं काहीसं केलं…आता काही क्षणांपूर्वी हॉट चॉकलेट पिण्याची इच्छा उफाळून आली, मग काय स्वारी रथात बसून किचेन मध्ये पोहचली…हॉट चॉकलेट मग मध्ये घेतांना थोडासा चटका बसला…"आई ग!" तसा मी हात पटकन पाण्याखाली धरला, त्या एवढ्याश्या चटक्याने मला क्षणार्धात त्या निष्पाप स्त्री जीवांचे चटके मनात द्यायला सुरुवात केली…कधी सती म्हणून तर कधी, एकतर्फी प्रेमात, तर कधी हुंडाबळी,…. विचार भरकटत आहेत, कधी ते मला स्पष्ट चित्र दाखवत आहेत…नवऱ्याच्या चितेवर जिवंत सती जाणाऱ्या स्त्रिच…शांत, जणू तिला काही जाणवतच नाहीये, जणू ते शरीर सुन्न झालं आहे, नवरा गेल्याच्या दुखात तिला खरचं काही जाणवत नाहीय…एका जिवंत स्त्रिला, जी धडधाकट आहे, फक्त नवरा मेला म्हणून जिवंत जाळण अन, मग "सती" पदवी देऊन मान देण…कितपत योग्य होत हे? तेव्हाचा समाज इतका कसा निष्ठुर होता? की एका जिवंत माणसाला आगीत लोटल जायचं…त्या स्त्रिच्या आर्त किंकाळ्यांनी त्यांची हृदये पिघळली का नसावीत? हा कधीही न उमगणारा प्रश्न आहे… 

लॉच्या अभ्यासक्रमात, इंडियन पिनल कोड हा विषय सुरुवातीला मला खूप भारी वाटायचा. केसेस एकदम सॉलिड वाटायच्या वाचायला,…पण, जेव्हा मी पुस्तकांना हात घातला, जस जश्या क्रूर, माणुसकीला काळीम्बा फासणाऱ्या केसेस अभ्यासात यायला लागल्या, माझं मन मलाच घाबरू लागलं…आरशात पाहतांना मला भीती वाटू लागली होती…रोज स्वप्नांत त्या स्त्रिया नजरेसमोर यायच्या…झोपण मुश्किल झालं होत…तेव्हा मला जाणवलं हे ज्याच्यावर बेतलंय त्याचं काय? आयुष्य गुलाबी असतं अशी समजूत तेव्हा कायमची नष्ट झाली होती… 

काळ बदलला पण अजूनही माणूस तसाच निष्ठूर का? आज ही रोज एक स्त्री हुंड्यापायी जाळली जाते, मारली जाते…हात कशे कापत नाहीत या नराधमांचे? याची उत्तरे माझ्याकडे नाहीत, मला नाही माहित माणूस कधी शहाणा होईल, पण मी आशावादी आहे, देवाकडे एकचं मागण आहे, "देवा तू जन्माला घातलेल्या या सर्व माणसांमध्ये फक्त प्रेम हीच एक भावना दे, सगळ्यांना सुखी ठेव. "

प्रिया सातपुते