Saturday 26 April 2014

प्रियांश...३१



I heard somewhere, "Steal your love!"


प्रेमात चोरी शक्य असते का हो? म्हणजे जसं म्हणतात ना, प्रेमात अन युद्धात सगळ काही माफ असतं! ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला चोरणं शक्य आहे का? अन ते कितपत योग्य आहे? एकतर्फी प्रेम वगैरे म्हणू नका, दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात पण, गोष्ट पुढे जात नाहीय, कारणे काहीही असू शकतात, जशे की घरचा विरोध, लग्नाची भीती, किंवा चक्क मेलोड्रामा! मग त्या व्यक्तीला चोरणं कितपत योग्य आहे? अपहरण तर अनोळखी व्यक्तीचं करतात, इथे तर ज्याच्यावर मनापासून प्रेम करतोय त्यालाच चोरून न्यायचं म्हणजे किती धम्माल अन कसरतीच काम आहे ना? 

प्रिया सातपुते

Saturday 19 April 2014

हुंडा!


हुंडा ही भारतीय समाजातील वर्षानुवर्षे चालत आलेली जुनी परंपरा आहे. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी चांगला उद्दात हेतू जरी दडला असला तरी सुद्धा माणसांच्या हव्यासापोटी गालबोट लागल्या शिवाय रहात नाही. हुंडा ही परंपरा चांगल्या कारणासाठीच सुरु झाली असावी, आपल्या मुलीच्या लग्नानंतर तिला नव्या घरी काही कमी पडू नये, ती आर्थिक दृष्ट्या कोणावरही अवलंबून राहू नये म्हणून आई-वडील तिला पैसे, दागदागिने भेट म्हणून द्यायचे. नव्या घरात मिळून मिसळून रहायला थोडा वेळ लागेल आणि त्या वेळात तिला कोणासमोरही हात पसरावे लागू नयेत म्हणून धान्य दिलं जायचं. या मागचा हेतू सर्वस्वी आपल्या मुलीला आनंदी बघणे हाच होय. पण, कालांतराने माणसाची मती फिरली, मुलींना भेट म्हणून आलेले दागदागिने पाहून सासरच्या माणसांची डोकी फिरलीत अन नजराही. यातूनच, जन्म झाला तो अनिष्ट हुंडा बळींचा अन अत्याचाराचा.

हुंडा म्हणजे नेमकं काय? माझ्या शब्दात बोलायचं तर, चक्कं नवरा मुलगा विकत घेणे! खरचं, आता लग्न ठरवताना मुलांचे आईवडील किती टाहो फोडून सांगत असतात की आम्ही आमच्या मुलाच्या शिक्षणावर एवढे पैसे खर्च केलेत, मग अमुक एवढा हुंडा पाहिजेचं. मग, काय ती मुलगी आकाशातून टपकली का? डायरेक्ट शिक्षण घेऊन? तिच्यावर सुद्धा तिच्या आईबाबांनी खर्च केलेलाच असतो ना? मग, हा भेदभाव कशासाठी? मोठी माणसे म्हणतात, " मुलगी, आनंदाने रहावी, तिचा मान असावा सासरी म्हणून भरपेट हुंडा द्यायचा." मग, प्रश्न पडतो तो म्हणजे, विकत घेतलेल्या नात्यात खरा आनंद असतो का? दोघेही मग तो नवरा असुदे अथवा नवरी, खरचं ते एकमेकांवर प्रेम करतात की फक्त दिखावा करतात?

हुंडा हा असा अजगर आहे जो सगळ्यांनाच गिळंकृत करतो…सुरुवात होते ती स्वप्नांमध्ये मग्न असणारया परी पासून, वास्तवाचे चटके अशे बसतात की तन-मन हुंड्याच्या अग्नीत जळून खाक होते, तिचे आईवडील, तिची पाखर(मुले)! निलाजरेपणाचा कळस असा की इतक्या जणांचा खून होऊन सुद्धा नराधम मोकाट सुटतात…दुसंर, तिसर…पाचवं लग्न करून तोंड वर करून समाजात मानाने मिरवतात.

दोष द्यायचा कोणाला? आईवडिलांना ज्यांनी हुंडा दिला? लोभाने गलितग्रान झालेल्या नराधमांना? त्या स्त्रिलाच जी स्वतःहून या अग्नीत उडी मारून बसली? की या समाजाला? योग्यं वेळी न्याय न देता, चुकीच्या रूढीवादी परंपराना खतपाणी घालणाऱ्या या समाजानेच आता स्वतःच षंडत्व सोडून दिलं पाहिजे. हुंडा हा समाजाला लागलेला कर्करोगचं आहे. त्याचा कायमस्वरूपी इलाज त्याला मुळासकट उपटून टाकण्यातच आहे.

लग्न हे प्रेमाचं बंधन असायला हवं ना की व्यवहारच.

प्रिया सातपुते 

Friday 11 April 2014

मला उमगलेली याज्ञसेनी... भाग- ३


माझ्या डोळ्यातले आनंदाश्रू गालावर तरंगण्याआधीच, मी एका भव्य दालनात उभी होते, नववधू सारखं नटलेलं ते दालन, वेगवेगळ्या ऋषी, राजे, दास-दासींनी भरून गेलं होत. याज्ञसेनीने तिच्या आयुष्यातील महत्वाच्या भागात मला सामील करून घेतलं होत. तिला नखशिखांत नटलेली पाहून माझे डोळे दिपून गेले, ती तेजस्वी, सुंदर, निरागस दिसतं होती. प्रत्येक पांडवपुत्रा बरोबर सप्तपदी घेऊन ती पांडवांची "धर्मपत्नी" बनली होती. धर्माला अनुसरून राहण्यासाठी पाची पांडव अन याज्ञसेनी यांना महर्षी व्यासांनी, श्रीकृष्णासमक्ष काही नियम घालून दिले. मी एकटक फक्त तिलाच पाहत राहिले. तिच्या सौंदर्याची मोहिनी किती विलक्षण!

डोळ्यासमोरून चित्र वाळूसारख उडून जावं अन एका वेगळ्या वर्तुळात जाव अगदी तसचं काहीसं झालं. एका विराट वनाकडे पाहत ती उभी होती, भगवान कृष्ण, पांडव देखील होते! भगवान कृष्णाकडे पाहून याज्ञसेनी उदगारली, "कृष्णा, तू आहेसं तर इथे साक्षात इंद्रप्रस्थ उभं राहिलं!" भगवान कृष्ण मंद हसले. एका झटक्यात मी एका भोवऱ्यात उभी असल्याचा भासं मला झाला, सगळा इतिहास माझ्या डोळ्यासमोर जलदगतीने पुढे चालला होता! इंद्रप्रस्थाच वसन, नगरात प्रवेश, पूजा-अर्चा, सर्वांची काळजी घेणारी याज्ञसेनी, राजसूय यज्ञाकरता त्रिलोक जिंकून आलेले पांडव! मयासुराने बांधलेलं हे इंद्रपस्थ आपल्या आताच्या इंजिनियरसना सुद्धा लाजवेल असंच होत. राजसूय यज्ञाची झलक तर अप्रतिम होती! 

गोलं गोलं फिरत धपकन जमिनीवर आदळाव अश्याच जोरात घुमून मी अलगद याज्ञसेनीच्या बाजूस ऊभी होते. तिच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट पडलं होत, जणू तिला काही अभद्र होणार असल्याची तगमग लागली होती. तितक्यात एक दासी आली, अन तिच्यापाठोपाठ एक दरबारी देखील आला अन म्हणाला," राणीसाहेब, युधिष्ठीर महाराज, आपणास द्यूतात पणाला लावून हरले आहेत, आणि दुर्योधन युवराजांनी तुम्हांला राजसभेत बोलावलं आहे." याज्ञसेनीचा चेहरा लालबुंद झाला, ती ओरडली, "काय बरळत आहेस तू हे? स्वतःच्या पत्नीला कोणी द्यूतात लावत का?" तसा तो दास घाबरून म्हणाला, "राणीसाहेब, महाराजांनी आधी चारी पांडवांना अन स्वतःला द्यूतात पणाला लावलं, त्यात ते हरले, मग तुम्हांला…" त्याचे शब्द तिथेच गळून पडले. 

इतिहासाला काळीमा फासणारा तोच हा क्षण, माझ्या छातीत तीव्र वेदना झाल्या, अंगावर काटे उभे राहिले, स्वतःच्या हतबलतेवर मला किव येत होती, मुका प्रेक्षक बनून मला हे पहावं लागणार, माझं मन सुन्न झालं होत. याज्ञसेनीच्या मनात आक्रोश होता! एक क्षण सुद्धा शतकांसारखा असतो हे मला कळून चुकलं होत. 

दास उद्गारला, "राणीसाहेब! युवराज दुर्योधानांनी आपणास राजसभेत बोलावलं आहे." 
याज्ञसेनी उफाळून उठली अन म्हणाली, "कुरुवंशाच्या स्त्रिया राजसभेत येत नाहीत, हे माहित नाही का युवराजांना? तू जा, युधिष्ठीर महाराजांना विचार, स्वतःला हरवून त्यांनी मला द्यूतात पणाला लावलं की, त्याआधी? जा, पटकन जा! अन मला येउन सांग ते काय उत्तर देतात ते." दास निमूटपणे निघून गेला, त्याची पाठमोरी प्रतिमा काय उत्तर आणणार हे मला माहित होत, मी विसरून गेले की मी एक प्रेक्षक आहे, जिवाचा आकातांडव करून मी ओरडत होते, बाजूला भिंतीवर टांगलेली तलवार काढण्याचा विफल प्रयत्न करत होते, याज्ञसेनीच्या जवळ जाऊन तिला पकडायचा प्रयत्न करत होते, ओरडत होते, तलवार घे सम्राज्ञी, अग! ऐक ना माझं, त्या दु:शासानाला आडवा काप, याज्ञसेनी, याज्ञसेनी… 
दास, पुन्हा आला, त्याने निष्क्रिय युधिष्ठीर महाराजाबद्दल कथन केलं, त्या निलाजरया दुर्योधनाचा आदेश पुन्हा ऐकवला. दास निघून गेला, याज्ञसेनी म्हणाली, "विधिलिखित कोणी टाळू शकत का?" तिच्या नजरेत स्पष्ट जाणवत होत की तिला आधीच कळून चुकलं आहे. 

दासी पळत पळत येऊन याज्ञसेनीला काही सांगणार इतक्यात तिच्या मागोमाग दुःशासन आला, अर्वाच्य शब्दात तो म्हणाला, " ऐ दासी, तुला आता माझ्या दादाने जिंकली आहे". 
याज्ञसेनी म्हणाली, "दुःशासन मर्यादेत राहून बोलं, कुलवधू आहे मी, तुझी वहिनी आहे."
यावर तो निलाजरा म्हणाला, "दासीला कसली आली आहे मर्यादा, आता तू तर आम्हा सर्वांचीच दासी झाली आहेसं."
याज्ञसेनी कडाडून बोलली, "निर्लज्जा!" 
आता मात्र, तिच्या चेहऱ्यावरच सावट अधिकच गडद झालं, पुढे काय होणार हे माहित असूनही मी त्याला ढकलण्याचे, मारण्याचे प्रयत्न करत राहिले, अन तो पुढे धावला कारण मी पारदर्शी होते, तिच्या मोकळ्या लांबसडक कुरळ्या केसांना पकडून त्याने याज्ञसेनीला ओढली. ती प्रतिकार करत राहिली, तो तिला खेचून नेण्याचा प्रयत्न करू लागला, माझ्या मनात आग लागली होती, मी सोड तिला हरामखोरा म्हणून ओरडत होते, तो तिला ओढत, खेचत नेत होता, कधी केसांना धरून ओढत होता, तर कधी हाताला हिसडे देऊन फरफटत नेत होता, याज्ञसेनीच्या तोंडून फक्त सोड, सोड नराधमा! इतकेच शब्द येत होते. तो हिंस्त्र जनावरासारखा भक्ष्याला नेतात तसं तिला नेत होता. अन, मी फक्त एक मूक प्रेक्षक बनून मागे धावत होते, देवाला प्रार्थना करत होते, "देवा! बदल हा इतिहास." पण, सगळचं व्यर्थ होत. सभा कधी आली कळलचं नाही, कारण, एक ही पुरुष अन्यायाला सामोरा गेला नाही. मी डोळे पुसून पहात होते पण, सगळ धुसर दिसतं होत, पांडव षंढासारखे मान खाली घालून बसले होते, मी धावत त्यांच्या जवळ गेले, ओरडले, "अरे! अशे काय बसला आहात, ऊठा, थांबवा हे सगळ, पत्नी आहे ना तुमची, उठा ना रे, तुमच्यामुळे अखंड स्त्री जातीला भविष्यातही असचं भोगावं लागेलं…" 

याज्ञसेनी धगधगत्या अग्निसारखी दिसू लागली, तिचं मोहवून टाकणारं सौंदर्य जळून खाक झाल्यासारखं भासतं होत. ती ज्वलंत अग्निसारखी बोलू लागली, "धिक्कार असो या कुरुवंशाचा! स्त्रीचे रक्षण करणं हा क्षात्रधर्म आहे. ज्या अर्थी आज या सभेत एका स्त्रिला अपमानित करून आणलं गेलं आहे, त्याअर्थी इथे एकही क्षत्रिय उरलेला नाही. पत्नीला द्यूतात पणाला लावण हा अधर्म आहे, पत्नी संपत्ती नसून अर्धांगिनी आहे, जरी सम्राट युधिष्ठीरांनी मला पणाला लावली असली तरीही, माझ्या अन्य पतींचा विचार ऐकण्यात आला होता का? महाराज धृतराष्ट्र, मी तुमची पुत्रवधू असून, तुमच्या देखी माझी सुरु असलेली ही विटंबना तुम्ही निमुटपणे पहात आहात? पितामह तुम्ही का मान खाली घातली आहे? गुरु द्रोण तुमच्या मित्राची मी यज्ञ कन्या, म्हणजे मी तुमचीही कन्याच नाही का झाले, स्वतःच्या कन्येचा सुरु असलेला असा अपमान तुम्हांला पाहवला तरी कसा?" तोच आतापर्यंत मौन असलेले पितामह बोलले, "द्रोपदी, तुझ्या पतीनेच तुला अन पांडवांना द्यूतात पणाला लाऊन अधर्म केला आहे, पती कोणत्याही स्थितीत असला तरीही पत्नीवर असलेली सत्ता नाहीशी होत नाही, त्यामुळे निर्णय घेण खुपचं नाजूक आहे." यावर याज्ञसेनी काही बोलण्याआधीच, दुर्योधनाने याज्ञसेनीला आपली मांडी दाखवत म्हंटले, "ये दासी इथे बसं!" आतापर्यंत मुंडी खाली घालून बसलेला भीम उफाळून उठला, मोठ्या भावाच्या हाताला न जुमानता तो गर्जना करत म्हंटला," प्रण घेतोय दुर्योधना, तुझ्या याचं मांडीला फोडून मारणार तुला!" 

यावर डंख मारल्या सारखा दुःशासनाने याज्ञसेनीच्या वस्त्राला हात घालत म्हंटले, आता तर साक्षात पितामहांनी कबूल केलं आहे, चल आता गपचूप…" तो पुढे काही बोलण्याआधीच विकर्ण जोरात ओरडत उठून उभा राहिला, "दुःशासना हात आवर तुझा! याज्ञसेनीने जो प्रश्न केला आहे त्याचं उत्तर पितामहांना देता येत नाही आहे, धर्मात भेद असतील पण, स्त्रिला तेही पत्नीला पणाला लावणे अत्यंत चुकीचं आहे, हा अधर्मच आहे!" तितक्यात कर्ण उठून उभा राहिला, "अरे! मुर्ख विकार्णा, आपल्याच भावांचा तू शत्रू बनत आहेस तेही एका अश्या स्त्रिसाठी जी पाच पुरुषांशी संबंध ठेवते, आणि तू तिला कुलीन संभोद्तोस? धर्म सांगतो जगातील कुठल्याही कुलीन स्त्रीला देवाने एकचं पती नेमलेला असतो, ही तर पाचांची पत्नी म्हणून मिरवते, अश्या स्त्रिला कुलवधू नाही वैश्या म्हणतात, अश्या स्त्रीला निर्वस्त्र आणली तरी काहीच गैर नाही." 
माझ्या काळजाचे ठोके चुकले, माझा प्रिय कर्ण, एका स्त्री बद्दल अशे अपशब्द बोलूच कसा शकतो, या विचारात असतांनाच, कर्णाच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसले, सूडबुद्धीचे! तोच दुर्योधन कडाडला, "दुःशासन! बघतोयस काय फेड तिचं वस्त्र, निर्वस्त्र कर तिला." संपूर्ण शरीरावर साप फिरत आहेत अशी होती ती भावना. 

याज्ञसेनी शांत झाली होती, डोळे बंद करून ती मनाशी म्हणाली, " सख्या, कृष्णा, धाव! तुझ्या सखीसाठी, माधवा म्हंटला होतास ना मला, नेहमी माझ्यासोबत राहशील, आता तुझ्या कृष्णेसाठी धाव, लज्जारक्षणासाठी धाव …" याज्ञसेनी, डोळे बंद करून, हात जोडून उभी होती. अन मी हतबल, डबडबले डोळे घेऊन धावत तिच्यापाशी पोहचले. तो निष्ठुर, निर्लज्ज दुःशासन एक एक पाऊल पुढे येत होता, अन सभा मूकपणे माना खाली घालून तमाशा पाहत होती, पांडव सुद्धा! त्याने तिच्या पदराला हात घातला, माझ्यातलं सांर अवसान गळून गेलं होत, याज्ञसेनीच्या पायाशी मी कोसळले, धायमोकलून रडू लागले, मरमरून एकचं विचार येत होता, कृष्णा धाव, कृष्णा धाव! अन भगवान कृष्ण खरचं धावले, एक वस्त्रामध्ये आलेली रजस्वला याज्ञसेनी, स्थिर, निश्चल बनून उभी होती. तिच्या अंगावर तिचं वस्त्र आहे तसचं होत, दुःशासन फेडत फेडत दमून कोसळून पडला. तिचं तेज वाढतच चालल होत, जणू अग्नीतून पुन्हा ती उमलत होती, संपूर्ण राजसभा अग्नीच्या धगीने भयकंपित झाली. 

माझं मन सुन्न झालं होत, काही कळण्या समजण्याच्या पलीकडे गेलं होत, मी निपचित याज्ञसेनीच्या डोळे बंद चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिले, तिचं सतीत्व अनुभूवत राहिले, रडून रडून माझे अश्रू सुकून गेले होते, हुंदके विरून गेले होते. तोच याज्ञसेनीच्या गालावरून ओघळणारा टपोरा मोती माझ्या पुढ्यात पडला, तो कृष्णमय झाला होता. सभेत एकंच गजर झाला, "याज्ञसेनी की जय! धन्य याज्ञसेनी!"

क्रमश:

प्रिया सातपुते 

Sunday 6 April 2014

एक वॉरियर-बाळासाहेब दराडे!


बाळासाहेब दराडे, एक उच्चशिक्षित युवा, अमेरिकेसारख्या देशातलं सुखदायी, प्रशस्त आयुष्य सोडून पुन्हा आपल्या गावी परतलेला…लोणार तालुका, जिल्हा बुलढाणा. चक्कं एका खेडेगावात. पहिल्यांदा तुम्हां सर्वांना वाटेल, "काय, पागल आहे हा? काय ठेवलय भारतात? का परतला? ब्रेक घेत असेल म्हणून आला असेल…" अशे बरेचं विचार मनात चाळवले गेले असतील. याचं एकचं उत्तर तो परत आला आपल्या मातृभूमीसाठी, या भारत देशासाठी!

अमेरिकेतला हा विकेंड वॉरियर, देशातल्या प्रत्येक गोष्टींचा आढावा घ्यायचा, त्याचंही रक्त सळसळून उठायचं, देशासाठी काय करता येईल या विचाराने तो झपाटलेला होताच. आपल्या गावाकडील मुलांना, लोकांना मदत व्हावी या उद्देशाने त्याने एक संस्था काढली, "शंकरा ग्राम परिवर्तन". दर सुट्टीला येउन तो काही न काही करून जाऊ लागला. पण, त्याच्या आतला "सच्चाईचा किडा" काय त्याला स्वस्त बसू देइना, त्यात त्याला मार्ग दाखवला तो श्री. श्री. रविशंकरजीनी अर्थात गुरुजींनी, आणि देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलामयांनी. त्यांच्या आश्वासक शब्दांच्या घेऱ्यात विचार करत असतांनाच, माननीय अन्ना हजारेंच भ्रष्टाचाराविरोधी चालू असलेल्या आंदोलनामुळे हा विकेंड वॉरियर पेटून उठला, मनाचा निश्चय करून भारतात परतला. सुरुवातीला समाजसेवाच करणार आहे असं घरच्यांना सांगून या विकेंड वॉरियरने थेट अण्णांना गाठलं, त्यांच्या सोबत राहून चळवळीला हा विकेंड वॉरियर उभा ठाकला.

मूळचाच हुशार, धाडसी, वृत्तीच्या या विकेंड वॉरियरकडे सुप्त अशे बरेचं गुणही आहेत. हा वॉरियर आर्ट ऑफ लिविंगचा अध्यात्मिक शिक्षक देखील आहे. त्याने २०११ मध्ये अमेरिकेत भारतीय, अमेरिकन तरुणांना घेऊन अण्णांच्या आंदोलना समर्थनात रैली देखील काढली. हा विकेंड वॉरियर छे,छे! वॉरियरच आहे!
भ्रष्टाचाराशी दोन हात करायला हा वॉरियर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभा राहिला तो, एका ब्रिदावर, "ना जात, ना पात, ना पक्ष! ग्राम परिवर्तन एकचं लक्ष." घरच्यांनी माघार घ्यायला सांगितली तरीही तो ठाम राहिला, अन चक्क ५०% मतांनी अजिंक्य झाला. पैसा, मटण आणि दारू शिवायही जिंकता येत हे या वॉरियरने सिद्ध केलं आहे. भ्रष्टाचाराला न जुमानता, एकही पैसा न चारता, हा पठ्ठ्या एकेक उपक्रम यशस्वी करतच गेला…अन, आता तो उभा ठाकला आहे लोकसभेच्या निवडणूकीसाठी! ग्रेट भेट मध्ये वागलेनी या वॉरियरला शेवटचा प्रश्न केला, "जिंकलात तर आनंद आहे, जिंकला नाही तर काय?" त्याचं उत्तर इतकं समर्पक,"मी निवडणूकीला उभं राहाण, लढण यातच माझा विजय आहे, राजकारण, पद, प्रतिष्ठा हा माझा उद्धेश नाही, राजकारण बदलण हा माझा उद्देश आहे."

स्वतःच्या स्वः ला सोडून अशी मोजकीच माणसे समाजाला बदलण्यासाठी पुढे येतात, देशातलं जाती धर्माचं राजकारण कायमच संपवण्यासाठी, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्याला एका सुंदर, प्रगत, भ्रष्टाचारमुक्त भारत देशाकडे नेत आहेत. साथ द्या, पुढे या! 

मतदान करा, स्वतःचा हक्क बजावा! अन्यथा चार वर्षे मुग गिळून बसा!

*वॉरियरच्या अर्थात बाळासाहेब दराडेंच्या बद्दल अधिक व्ययक्तिक माहिती, उपक्रम, कार्यांबाबत जाणून घेण्यासाठी विझिट करा खाली दिलेली लिंक.
http://www.balasahebdarade.org/#!bio/csgz

प्रिया सातपुते

प्रियांश...३०


रोज सकाळी कॉफीच्या घोटासोबत वर्तमानपत्र वाचण्याची सवयचं लागून गेली आहे. पण, निवडणूकांच्या वाऱ्यामुळे हे वर्तमानपत्र कमी अन जाहिरातबाजीच एक मासिक बनून राहिलं आहे. तळ्यात मळ्यातच्या बातम्या तर सुरूच होत्या त्यात आता भर पडली आहे ती, एकमेकांच्या चारित्र्यावर शाई, चिखल, चप्पल…जे मारता येईल ते मारायची! त्यात आता नवी भर ज्योतिषांच्या भविष्यवाण्यानी केली आहे, रोज एक नवी भविष्यवाणी भारत देशाचं स्वागत करत असते. तर, ध चा मा करण्याच्या धमक्याही खुलेआम सुरु आहेत. या निवडणूकांना वेगळाच रंग चढला आहे, अन तो कधी लाल दिसतो तर कधी काळा! रोज एक नवा खुलासा होत आहे, रोज एक नवा आरोप होत आहे तर कधी काळाआड लपलेले मुखवटे झिंज्या उपटून नाचत आहेत! जोरजोरात हसत असेलं ती भारतमाता अन मध्येच हताश होऊन पाहत असेलं हा खेळ "स्वतंत्र" भारताचा! एकेकाळी गुलामगिरीत जखडलेली ती साध्वी आता गरिबी, भ्रष्टाचार, घोटाळे, दंगली, खून, बलात्कारांच्या साखळ्यात जखडून गेली असेलं. 
एका प्रामाणिक मतावर एक एक साखळीचा तेढ सुटेल! चिन्हांच्या जाळ्यात अडकू नका ना इतिहासाच्या! तुमचं मत द्या या भारत देशासाठी, आपल्यासाठी, आपल्या  येणाऱ्या नव्या पिढीसाठी, आपल्या देशाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी… 
एक काळी शाई बदलून टाकेल बरचं काही! 
मतदान नक्की करा मित्रांनो, स्वतःच्या बुद्धीच्या बळावर, डोळे उघडे ठेऊन…एक चुकीच मत भोगायला लावेल चार वर्षांचा वनवास! बनू नका, धृतराष्ट्र ना युधिष्टिर…बना फक्त मी, माझा, स्वः….
Please Vote For Better India!

प्रिया सातपुते 

Wednesday 2 April 2014

प्रियांश...२९


मिळालेल्या सुखापेक्षा माणसाला ओरबाडून घेतलेल्या सुखातच जास्त आनंद वाटतो.  कारण, मिळालेल्या सुखाची त्याच्या लेखी काही किंमत नसते अन दुसऱ्याच कसं चांगलं झालं? या प्रश्नापोटी माणूस अंत लागणार नाही इतक्या खालच्या पातळीस उतरून, दुसऱ्याच्या संसार कसा धुळीत पडतो हे चव्हाट्या देत आनंद उपभोगुन पाहत राहतो. अश्या या माणसालाच का आपण राक्षस म्हणतो??

प्रिया सातपुते  

एप्रिल फुल


एप्रिल फूलच्या नादात,
राग मला आला,
विनाकारण माझ्या मनाने,
शंकांचा घाट घातला,
समोरच्याच्या प्रेमापोटी,
मी क्षण माझा झिजवला,
अन पदरात माझ्या,
"फूल" चा टॅग पडला,
मूड ऑफ करून,
फोन कट केला,
तरीही नाकावरचा,
लाल शेंडा,
काही केल्या,
कमी होईना,
लव यू चा मेसेज वाचून,
राग माझा वितळला,
पण तुम्ही सुद्धा,
"फूल" व्हावं म्हणून,
मीही घाट घातला…

प्रिया सातपुते

खेळ...


प्रेमाच्या या जीवघेण्या खेळात 
कोण जिंकेल याची खात्री नाही 
पण कोणीच हरणार नाही 
याची मात्र हम्मी आहे...


प्रिया सातपुते

अश्रू


गालावरून ओघळणारा हा अश्रू 
तुझ्यावरच्या प्रेमाची साक्ष देतोय 
तुझ्या कुशीत विसावण्यासाठी 
तो किती रडतोय...

प्रिया सातपुते