Friday 25 November 2016

Celebration of Puberty! उत्सव ऋतुचक्राचा!

Celebration of Puberty!
उत्सव ऋतुचक्राचा!

कळीच फूल बनणं हा प्रवास खरतरं खूपच सुंदर आहे! एखादा गुलाब जेव्हा उमलतो तेव्हा सारेचं भान हरपून जातात, हे जरी खरं असलं तरीही कळीतून फूल हा प्रवास त्याहूनही सुंदर आहे. पण, जेव्हा एखादी मुलगी या प्रवासाची पायरी चढते तेव्हा आसपासच्या लोकांच्या भुवया वरती जातात. अग! एवढ्या लवकर कशी मोठी झाली? अग बाई! कावळा शिवला का पोरीला? काय ग बाई सगळं बाईच्याच जातीला! मग हळुहळू त्या लहानगीच बालपण अश्या टोमण्यांनी आपणच हिरावून घेतो आणि नको त्या वयात तिला प्रौढ करतो.

वयात येणं! ही एक नैसर्गिक बाब आहे. तिला धर्माच्या चौकटीत बांधून स्त्रियांना स्वतःच्याच शरीराबद्दल अनादर, अनास्था करण्यास वर्षानुवर्षे भाग पाडले जाते. तिच्या मनात भयानक गोष्टी बिंबवल्या जातात. लहानग्या जीवाला तिच्या शरीराची सगळ्यात नॉर्मल बाबीचा बाऊ करायला शिकवलं जातं. या दिवसांत एका कोपऱ्यात बसायचं, कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही, देवासमोर अथवा देवाला स्पर्श नाही करायचा, मंदिर प्रवेश बंद, घरात काही शुभ कार्य असेल तर फिरकायच नाही! जशी काही ती अपवित्रच झाली आहे, त्यावर कहर म्हणजे जर देवाला शिवलंस तर नापास होशील, ढ होशील, मुलांशी बोलशील तर प्रेगनंट होशील...अशे वाटेल त्या वाईट गोष्टी तिच्या मनात भरवल्या जातात, जेणेकरून तिच्या मनात भीतीच हे पिल्लू, भूताच रूप घेऊन ते आयुष्यभर तिच्या मानगुटीवर बसलं जाईल.

आपणांस निसर्ग अर्थात देवाने घडवलं असं जरी मान्य केलं तरी निसर्गतः प्रत्येक महिन्याला येणाऱ्या ऋतुचक्रास घृणास्पद, हीन का समजावं? ज्या गोष्टीमुळे संपूर्ण जग अस्तित्वात आहे; ती बाब पाप असूच कशी शकते?
ज्या परमेश्वराने स्त्रिला गर्भाशय दिला, त्या गर्भात नऊ महिने राहून जन्माला येणार मुलं पाप नसतं पण, एक स्त्री मात्र या नैसर्गिक ऋतुचक्रात पापी, कावळा शिवलेली, अडचण असलेली एका अडगळीच्या खोलीत बसवली जाते, का?? तर, घरात तिची सावली पडेल, अन्न नासेल, तुळस जळून जाईल, देव कोपेल अन बरंच काही...

एका हाडामासाच्या मुलीला मन असू शकत हे सारे विसरून गेलेत, हीन बुरसटलेल्या परंपरांनी शिक्षित समाजालाही अडाणी करून टाकलं आहे म्हणूनच अगदी काही डॉक्टर बनलेल्या मुलीही या परंपरा पाळतात तर कमी शिकलेल्या स्त्रिया आपल्या मुलींना यातून बाहेर काढताना मी पाहिलं आहे, किती हा विरोधाभास!

आपली लहानमुले सध्या इंटरनेटच्या महाजाळात वेगवेगळ्या विकृतींना बळी पडू शकतात, त्यांना त्यांच्या शरीरातले बदल नीटपणे सांगायला हवेत. योग्य वयात, योग्य माहिती त्यांना वाईट प्रकारांपासून दूर ठेवू शकते. वाईट प्रकार मग ते मानसिक नैराश्य असो, पॉर्न पाहणं असो वा नको त्या वयात लैंगिक संबंध, या अश्या प्रकारांपासून त्यांना योग्य माहितीच परावृत्त करू शकते. यासाठी त्यांना आपली साथ अन मैत्रीचा हातच हवा असतो.

या लहानग्यांना कळीतून फुलात रुपांतरीत होऊ द्या! त्यांना त्यांचं बालपण मजेत घालवू द्या! तारुण्याच्या उंबरठ्यावर नवं आयुष्य त्यांना साद देत आहे, महिन्याचे ते दिवस अशी ओळख करून देण्यापेक्षा त्यांना कळू द्या हे तर सेलिब्रेशन आहे...Don't make it embarrassment for them, make it celebration of Puberty to welcome new phase of life.

प्रिया सातपुते

Thursday 24 November 2016

प्रियांश...९५

प्रियांश...९५

कधी कधी वाटत खूप दूर निघून जावं, जिथे कोणी दुखावणार नसाव, जिथे फक्त प्रेम असावं...आयुष्य गोलमालच आहे! कधीही न संपणार वर्तुळ! जे शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला गोल गोल फिरवतच राहील! काही मोक्याच्या क्षणात वाटेल झुगारून देऊया सारं पण, हे पाश सोडवत नाहीत! सगळी मोहमाया आहे...शेवटी काय तर भांडी वाजणारच 😂

प्रिया सातपुते

Sunday 20 November 2016

चारोळी

पावसाच्या अवेळी
येण्याचं कोड आज सुटलं?
पहिल्या वहिल्या डेटचं
रोपटं आज रोवलं...

प्रिया सातपुते

Saturday 19 November 2016

प्रियांश...९४

'पुरुष' हे पात्र खरतरं खूप वाईट पद्धतीने मार्केटिंग केलं गेलंय! वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये ते अत्यंत विचित्र आणि वाईट पद्धतीने मांडलं गेलंय, त्यामुळेच या पुरुषाला ओळ्खताना आपण गफलत करतो.

लहानपणापासून यांच्या मनावर बिंबवलं जात, तू मुलगा आहेस! मुले रडत नाहीत! मुले स्ट्रॉंग असतात अन मुली  नाजूक! तू हिरो आहेस! घरातील कामे मुलांनी नाही मुलींनी करायची असतात! एखादा मुलगा आईला मदत करतोय म्हटलं तर त्याला, बायकी आहेस का तू? असं बोलून हिणवल जातं! पहायचं झालं तर एका मातीच्या गोळ्याला सुंदर पुरुषात किंवा स्त्रिमध्ये घडवताना या भेदाभेदांमुळे ही एकमेकांस पूरक पात्रे, एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी होऊन जातात.

एका स्त्रिला जसं मन असतं अगदी तसंच मन पुरुषाला सुद्धा असतं, त्यालाही भावना असतात, त्यालाही दुःखत, खुपत, त्यालाही रडू येतं! तो काही दगड नसतो ना भावनाशून्य! तोही हाडामासाचा, मन, प्रेम, यातना, अश्रू असणारा पुरुष असतो! फरक असतो तो जडणघडणीचा, विचारांचा! बस्स, बाकी काय स्त्री असो वा पुरुष आपण सारे एका माळेचे मणी...

जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रिया सातपुते

Friday 11 November 2016

प्रियांश...९३

Feeling....??? Empty  वाह! Sounds interesting!विचारचं किती सुंदर आहे हा, काश असं खरंच होता आलं असतं तर, किती जाम मज्जा आली असती! रोज माणूस एक बटन दाबून सगळ्या त्रासातून मोकळा होऊन झोपी गेला असता! काळ्या निरभ्र आकाशात एकटक चांदण्यापाहून स्वतःच अस्तित्व शोधायची गरज पडली नसती! आपल्याला ग्रांटेड धरणारी आपली माणसे, मित्रपरिवार न कळत का होईना कधी कधी आपल्यावर भावनांचा मारा करतात, मग त्या कधी इन्स्टंट असर दाखवतात तर कधी हळुहळू! काश असं बटन माझ्याकडे असतं तर काय झालं असतं? कदाचित काही मनातले कधीच जन्माला आलं नसतं, मला मीच सापडले नसते, मीही त्या बटणासारखी कृत्रिम बनून राहिले असते एक चालता फिरता जीव, ज्याला भावनाच नाहीत! Sounds not at all interesting! Feeling something inside you, is nothing but the sign that you're still alive!
मी जिवंत असल्याचा दाखला माझे शब्द मला रोज देतात!

प्रिया सातपुते

Thursday 10 November 2016

प्रियांश...९२

प्रियांश...९२

नात्यांचं समीकरण करणं खूपच अवघड आहे! तू X, मी Y, की 2X, 5Y?  जिथे तुम्ही विचार न करता वावरता, कोणतेही छक्के पंजे न ठेवता वागता, जिथे तुमचे सारे मुखवटे गळून पडतात तिथे जे नातं रुजत ते अगदी मनातून असतं, ज्याच्या नशिबी हे नातं तो नखशिखांत श्रीमंत!

प्रिया सातपुते

Monday 7 November 2016

चारोळी

आज काही श्वास
उसने देशील?
अजून थोडावेळ
पाहू दे तुला...

प्रिया सातपुते