Tuesday 28 August 2012

कुंडलीच्या पळवाटा...



आज मनात एक वेगळ्याच विचारांचं काहूर माजलाय, पहाटेचे ५ होत आलेत, पण तरीही मला झोपेन ग्रासल नाही याची खंत मनाला नक्कीच आहे, पण अंधश्रद्धेच जे काळे ढग आजूबाजूला पाहते तर मनात पाल चुकचुकते.

माझी प्रिय आई हल्ली एका वेगळ्या चिंतेने ग्रासली गेलीय, एका झाडाखाली बसणाऱ्या ज्योतिष्याने म्हणे माझी कुंडली पहिली आणि तो म्हणाला, मुलगी फार छान आहे, पण मनासारखा वर भेटत नाहीय, मंगल आहे, मग काय माझ्या बिचार्या आईला बरच काही सांगून त्यांन भीती नक्कीच दाखवली, वरती त्याने तिला आपण नवीन कुंडली काढून पण देतो आणि का देतो यावर पण प्रवचन दिल। मी आणि बाबांना वेळ नाही लागला तिच्या डोक्यातल हे भूत काढायला. जो माणूस स्वतः इतक्या वर्षांपासून हा धंदा करत आहे, एका पोपटाला जवळ घेऊन, पण त्याला स्वतःच भविष्य सांगता नाही आल का? कि तो किती वर्ष त्याच झाडाखाली हे काम करणार आहे?? आणि किती माणसाना असा खुळ्यात काढणार आहे.

असो, मुद्दा हा नाही कि वयाने मोठी माणसेच अशा भूलथाप्पाना बळी पडतात, पण काही माणसे याचा वापर माणसाना घाबरवण्या करता पण करतात.
माझी एक मैत्रीण, परजातीच्या मुलाच्या प्रेमात पडली होती, दोघे कितपत एकमेकावर प्रेम करत होते हे एक प्रश्न चिन्हच आहे? पण जेव्हा मुलीपासून सुटका हवी म्हणून त्याने अतिशय बालिश आणि मूर्खपणाचा कळस गाठला, कुंडली मध्ये थोडा काय मोठाच लोचा आहे, प्रेम करताना तर पहिली नव्हती कुंडली पण लग्न करताना बरोबर कुंडली आली आणि त्याने छान पळवाट पण काढली.

अशेच काही किस्से, माझा मित्रानसोबत पण झालेत, त्यातला एक मित्र जो अशा गोष्टींच्या इतका आहारी गेला होता कि त्याच्या प्रत्येक बोटात एक अंगठी असायची,का? तर एक शांती करता, एक गुरु करता, एक शनी करता.

हे बाबा लोक समोरच्या माणसाला इतके घाबरवून टाकतात कि त्यांची विचार करण्याची शक्ती क्षीण होते, आणि ते त्यांच्या आहारी पडतात, किंवा मनोबल हरवलेल्या व्यक्तींना आणखीन घाबरवून, ते उपाय पण सांगतात आणि तितकीच मोठी रक्कम उकळतात.

माणूस जेव्हा पहिला श्वास घेतो तेव्हाच त्याच आयुष्य सुरु होत, आणि जेव्हा तो परमेश्वर नावाच्या या शक्ती समोर लीन होतो तेव्हा तो सगळ्या भूल्थाप्पान पासून दूर राहतो. देव आपल्या मनात वास करतो. प्रत्येक श्वासात तो आहे आणि जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने त्याला आपल्या मनात विराजमान करतो तेव्हा अशे हे उपद्रवी, मूर्ख, ढोंगी लोक आपल काहीच बिघडवू शकत नाहीत.

कर्म करत राहा आणि वर्तमानात जगा, कोणीही दुसरी व्यक्ती तुमच भविष्य सांगू शकत नाही, ते फक्त तुम्हीच घडवता, तुमच्या हातानी.

।।सुखी भवन्तु।।

प्रिया सातपुते


Monday 6 August 2012

"सेकण्ड इंनिंग" भाग-१


सकाळपासून सिगरेटच्या धुराने पूर्ण घर भरून गेल होत, तरीपण विक्रमला शुद्ध नव्हती, एका पाठोपाठ एक सिगरेटस...आणि साथ द्यायला बियरचे कॅन दिसतच होते...
मधेच तो शिव्या देत होता, मधेच रडत होता....संध्याकाळ होऊन काळोख पडला तरीपण त्याला शुद्ध नव्हती...दरवाज्यावर कोणीतरी ठोकत होत...पण तो काही उठून दरवाजा उघडण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हता...हळूहळू दारावरचे ठोके जोरात वाजू लागले, अस वाटत होत कि दरवाजा तोडला जात आहे,...जोरात आवाज झाला धाड.....चार-पाच लोक लगबगीने आत आले...एक २८ वर्षाचा तरुण पुढे येऊन विक्रम वर ओरडू लागला,"साल्या तुला काय  कळत कि नाही...काय आहे हे"...
बाकीचे दोघे खिडक्या उघडतात, पंखा सुरु करतात, दिवे लावतात,...दोन मुली तश्याच मगासपासून दारात उभ्या होत्या, तशी त्यातली एक पुढे येऊन विक्रम जवळ जाऊ लागली..."मुग्धा थांब नको जूस त्याच्या जवळ, it's not safe to talk to him now"....
पण मुग्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती, ती विक्रमकडे जाऊ लागली...तसा विक्रम चेताळला,"जवळ येऊ नकोस तू, चालती हो, मला कोणाशीच काहीच बोलायचं नाही, निघा इथून.. मुघ्धा त्याच्या समोर जाऊन बसली, तसा तो तोंड फिरवू लागला, उठण्याचा प्रयत्न करणार तोच...मुग्धाने त्याला मिठीत घेतलं...त्याच्या अंगाला दारू, सिगरेटचा वास येत आहे याची परवा न करता...विक्रम तिच्या वर ओरडू लागला..आणि क्षणात तो मुग्धाच्या मिठीत रडू लागला...छोट मुल जस आईच्या मिठीत जाऊन लपत आणि स्वतःला सुरक्षित करत अगदी तसच तो करू पाहत होता...मुग्धा त्याला समजावत होती...तसा त्याचा  बांध  पूर्णपणे सुटला होता..तो ओक्साबोक्शी रडत होता...
खोलीत अजूनही सिगरेटचा वास येत होता...पण त्यात आता भर पडली होती ती विक्रमच्या अश्रूंची...पर्वतासारखा खंबीर, मनकवडा, प्रेमळ, शांत, तडफदार...अश्या शब्दात त्याचे मित्र, मैत्रिणी त्याला ओळखायचे...आणि आज तोच पर्वत ढासळून गेला होता...स्मिता उर्फ त्याच आयुष्य..त्याची प्रिय बायको त्याला कायमची सोडून निघून गेली होती...स्मिताला जाऊन दोन आठवडे झाले होते, पण विक्रम टस कि मस झाला नव्हता, तो शांतपणे ऑफिसला जात होता, येत होता, कोणाशीच बोलत नव्हता, पण गेले दहा दिवस तो कुठेच फिरकला नाही, सगळे त्याला फोन करायचे तरी तो उचलत नव्हता, स्मिता गेल्याच दुख त्याने दाबून टाकण्याकरता सिगारेट आणि दारू पत्करली होती हे साफ दिसत होत, गेले दोन दिवस तो घराबाहेर आलाच नाही, फक्त धूर आणि एकांत यातच तो आयुष्य संपवायला निघाला होता.
रमेशने मुग्धाला घडलेला सारा प्रकार फोनवरून कळवला होता, मुघ्धा आणि विक्रम जिवलग मित्र...स्मिता गेलेवर ती येऊन गेली होती..पण विक्रम असा तुटेल अस तिला स्वप्नात पण वाटल नव्हत....दिल्लीहून ती पुण्याला जशी पोहचली ते विक्रमच घर तिला आणखीच दूर वाटू लागल होत....तिच्या पोटात भीतीने गोळा आला होता..डोळे पाणावले होते...घराच दार तोडताना ती डोळे मिटून उभी होती...रमेश जाऊन जसा विक्रमवर ओरडला तसा तिच्यात धीर आला आणि तिने डोळे उघडले...समोर पडला होता तिचा मित्र कि प्रेत...त्याच ते रूप पाहून ती सुन्न झाली होती..हळू हळू पुढे जात ती त्याच्या समोर बसली ते एक आई म्हणून,...

प्रिया सातपुते