Sunday 22 October 2017

प्रियांश...१०५

स्त्री संपूर्ण घराचा ऑक्सिजन असते, घरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या समाधानामागे हाच ऑक्सिजन अविरतपणे आपलं काम करत असतो. या ऑक्सिजनमध्ये विषारी वायू मिसळले गेले की हळुहळू साऱ्या घरात वेगवेगळे आजार बळावू लागतात. त्यातले ९९% आजार हे कुत्सित मानसिकतेतूनच जन्माला आलेले असतात. या मानसिकतेमध्ये त्या व्यक्तीची जडणघडण स्पष्टपणे दिसते. दुर्दैवाने जेव्हा दिसते तेव्हा खूप काळ लोटून गेलेला असतो. अन याचे दुष्परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात.

मत्सर हा शब्द मला अजिबात आवडत नाही. पण, वास्तवामध्ये हा स्त्रियांमध्ये कुटून भरलेला असतो, मी स्वतःला नशीबवान मानते माझ्या आईचे गुण माझ्यात उतरल्यामुळे मी यापासून कोसो दूरच राहिले पण, तुम्ही कितीही छान वागा अथवा असा समोरचा तुमच्याशी तसाच वागेल याची शाश्वती नसते. हा किडा फक्त बायकांना असतो असं नाही हा, पुरुषांमध्ये पण याचा वावर असतोच. फरक हा की स्त्रियांची तीव्रता अधिक आणि स्पष्टपणे जाणवणारी अन दिसणारी असते, हे त्यांच्या शंकरासारख्या शांत पतीदेवांनाच माहित असतं.

वाईट या गोष्टीचं वाटत की आपल्या पदरात सर्व सुख असूनही काही बायका दुसऱ्या व्यक्तीसोबत तुलना करून स्वतःच सुख मातीत लोळवून टाकतात. काही स्त्रिया संसाराला हातभार लावून घराला बहरवून टाकतात अन काही घरासोबत मनाचीही लत्करे काढून रिकाम्या होतात पण, तरीही त्यांना हे समजत नाही त्या किती भाग्यवान आहेत की त्यांना इतकं सहनशील कुटुंब भेटलं आहे, स्वतःचे पंख उघडून भरारी घेण सोडून या भरल्या घरात मनांचे खूण करत राहतात. अन, सोलवटून निघलेल्या मनांना आगीची फुंकर घालत राहतात. किती भयानक आहे सार!

या मत्सराच्या अन दुसऱ्यांशी तुलनेपोटी अशी माणसे स्वतःसाठी सुद्धा खड्डाच खोदत असतात, अन अशे काही पडतात की पुन्हा कधीही उठू शकत नाहीत! कारण, एकदा का मनातून माणूस पडला की तो कायमचा पडतो, तो कधीही परत न येण्यासाठी!

देव करो अन अश्या लोकांना सद्बुद्धी देवो!

प्रिया सातपुते


Tuesday 1 August 2017

चारोळी

काही क्षण अशेच सोड
अगदी श्वास सोडतो ना तशे,
अलगद डोळे मिट
बघ माझी ऊब जाणवते का?

प्रिया सातपुते 😘

Friday 21 July 2017

चारोळी

झिम्मड पाऊस
मिलनाची आस
दोन देहांची मिठीत
चुंबनांची रास...

प्रिया सातपुते

Sunday 4 June 2017

प्रियांश...१०४

प्रियांश...१०४

परवा बाहेर जाताना माझ्या पुढे असणाऱ्या बाईकवाल्याने पिचकारी थुंकली, माजाने, थाटात पुढे निघाला. नेहमी अश्या माणसांना ओरडून वैताग आलाय म्हणून, हॉर्नच्या आवाजांची सख्त नफरत असणारा प्राणी मी, चक्क, एका सुरात त्या बाईकवल्याला हॉर्न देत राहीले...मधुर आवाजाने त्याने बाईक स्लो केली मी पण स्लो करत गाणं वाजवत राहीले!  मग, सिग्नल आला तरीही मागे राहून माझं सुरूच होत! वैतागून तो बोलू लागला, आजूबाजूचे पाहू लागले, मी म्हंटल, " भाऊ, थोड्या वेळापूर्वी तुम्ही रस्त्यात थुंकला तेव्हा तुमची मर्जी होती! माझं शहर, माझा रस्ता, माझी गाडी, माझा हॉर्न अन माझा हात, मी वाजवेन अथवा नाही माझी मर्जी!"
शरमेने मान खाली घालून, सॉरी एकचं शब्द फुटला त्याच्या तोंडून, तोपर्यंत सिग्नल सुटला, लोकांच्या नजरेतला तिरस्कार आता आश्चर्यामध्ये बदलला होता!

प्रिया सातपुते

Tuesday 18 April 2017

प्रियांश...१०३

प्रियांश...१०३

अंधारात खडे मारायचे नसतातच, ते दुसऱ्यांना लागण्याआधी तुमच्याच हाताला टोचतात! आजकाल बहुतांश प्रत्येक आईवडिलांना स्वतः च्या मुलासाठी त्यांचं ऐकणारी, त्यांच्या मुठीत राहणारी, स्वतः च मत नसणारी सून हवी असते! कारण, मग ती आमच्या मुलाला आमच्या पासून तोडेल, आमचं ऐकणार नाही, आमचं काही चालणार नाही, आमचा मुलगा तिचा होऊन बसेल, म्हातारपणात सेवा करणार नाही...पण, जावई मात्र श्रावणबाळ नको, तो तर मुलीचं ऐकणारा पाहिजे, आमची मुलगी स्ट्रॉंग हेडेड आहे, मग न्यूक्लियर, शक्यतो स्वतः च घर असणारा अर्थात एकटा राहणारा असेल तर बरंच! आईवडील काय एकटे राहतातच की, भेटायला जातीलच की, नाही तर आहेच वृद्धाश्रम!

Hypocrisy! आजकाल हे खूप पाहायला भेटत आहे! तू कर मेल्यासारखं मी करतो झोपल्यासारखं!
पांचटगिरी नुसती, लग्न करून बाहुली नाही आणत आहात, एक जिवंत व्यक्ती आणणार आहात, प्रेम द्या अन घ्या!

धन्य आहेत लोकं, स्वतः डोळे बंद करून बसतील, ज्ञानाचं ढोंग करतील, अन शकुनी मामा सारखे गेम करून जातील!

कर्म करत रहा याचा अर्थ काहीही करा असा नव्हे! अन शेवटी  कितीही ग्रंथ वाचा, कीर्तने ऐका, गावोगावी फिरा पण, मनात दुसऱ्यासाठी प्रेम नसेल, आदर नसेल, माणुसकी नसेल तर मग हे सारं व्यर्थ आहे, ढोंग आहे!

प्रिया सातपुते

Wednesday 5 April 2017

प्रियांश...१०२

प्रियांश...१०२

काही लोकांच्या बुद्धीची किव करावी की हसावं हेचं कळतं नाही, दुसऱ्याला ज्ञान द्यायला हे लोक समोरचा कसा चुकीचा आहे हेच दाखवून देत असतात. त्यांचे अनुभव एखाद्या बाबतीत नसतील चांगले म्हणून समोरच्या व्यक्तीने नंदीबैल बनून मान का डोलवावी? प्रत्येक व्यक्तीला स्वतःच मत, अस्तित्व असलंच पाहिजे! स्वतः ज्ञानाच्या समुद्रात डुबकी मारलेले तत्वज्ञान ऐकवतील पण, तेच स्वतः कधीच अनुकरण करणार नाहीत! गावोगावी अक्कल वाटत फिरतील पण, स्वतः त्याचं बुरसटलेल्या, नासक्या विचारांचे हे लोक अवती भोवती घिरट्या घालत बसतात! Destructive mentality चे हे लोक दुसऱ्याचं चांगलं होऊच नये यातच सडून नष्ट होतात! आपल्या सारख्या सामान्य माणसाने नेमकं काय करायचं या लोकांचं? काही नाही, स्वतःच्या चेहऱ्यावरचं हसू कधीही कमी होऊ द्यायचं नाही, समोरचा कितीही का काही करेना, आपण ठाम राहायचं!
या जगात आपणांस दुःखी करणार कोणीही अस्तित्वात नसतं!
हा स्वः च आपला मित्र अन शत्रू! तुम्हीच ठरवा तुम्हाला काय बनून जग जिंकायचं आहे!
Stay cool and be happy guys 😀

प्रिया सातपुते

Monday 3 April 2017

प्रियांश...१०१

प्रियांश...१०१

आयुष्य खूप सुंदर आहे, काही क्षणांत असं वाटून राहत चुकीचं घडत आह सारं काही, पण, नाही जे काही घडतं असतं ते आपल्या चांगल्या करताच असतं! हे आशा नावाचं पिल्लू आपल्याला आयुष्यात पुढे नेत राहतं...हे पिल्लू कधी कधी खूप रडवत तर कधी, माणसाला ओळखायची नजर देत, अंधारात धोका खाऊन रडत न बसण्याची खुमारी देत, लढायची हिम्मत देत, मनावर झालेल्या जखमांना फुंकर घालत, एकदा रक्त लागल्यावर तलवार झळाळून निघते तसंच काहीसं आपल्या माणसांचं असतं... आयुष्यात येणाऱ्या या अडचणींवर लाथ मारून पुढे जात राहायचं, आनंदी राहायचं! 😇

काही मनातले-प्रिया सातपुते
Prreeya Satputeh

Saturday 18 March 2017

प्रियांश...१००

प्रियांश...१००

मनुष्याचे अर्ध्यापेक्षा जास्ती आजार मानसिक असतात! कृपया आपल्या आसपास मनाने आजारी मित्रांना मदत करा! प्रेमात विश्वासघात, फायनानशली अडचणी, घरगुती कलह, नैराश्य...अश्या असंख्य अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी वेगवेगळे मुखवटे घालून येणारचं... म्हणून, स्वतःला संपवन, दुखावून घेणं, हे पर्याय नाहीत! मनाच्या दुखण्यात माणूस असा गुंततो की वाममार्गाला लागतो, कधी ड्रग्स, कधी एकटेपणाच्या जाळ्यात अडकून गतप्राण होतो.
वेळीच मदत घ्या, आयुष्य सुंदर आहे...जगा, हसा, स्वतःवर प्रेम करा!

प्रिया सातपुते

Tuesday 21 February 2017

प्रियांश...९९

प्रियांश...९९

लग्नाच्या पायरीवर उभी असलेली मुलगी जेव्हा सुंदरतेच्या व्याख्येत बसत नाही तेव्हा रोज तिला टोचून टोचून मारलं जात! कधी तिच्या रंगावरून, रुपावरून तर कधी देहावरून! रोज अगदी रोज ती हळुहळु मरत असते, कधी तरी स्वतः ला संपवण्याचे केविलवाणे प्रयत्न ती करते! कधी राखेत खाक होते तर कधी जबरदस्तीने कोणाही गैराच्या गळ्यात मारली जाते! काही मात्र लढतात, टोचून मरण्यापेक्षा, त्यांना ठेचतात! यशाच्या, पैशाच्या तेजासमोर झळाळून निघतात!

जेव्हा याचं मुली लोकांच्या सौंदर्याच्या व्याख्येत सामावल्या जातात तेव्हा अगदी साखर ठेवू तिथे मुंग्या जमतात असचं काही पहायला भेटत आहे!

प्रिया सातपुते

Friday 17 February 2017

प्रियांश...९८

प्रियांश...९८
प्रामाणिकपणा नडतोच मग ते पर्सनल आयुष्य असू दे अथवा प्रोफेशनल! कधी कधी वाटतं हा एक असा ठेवा मिळाला आहे आई वडिलांकडून की त्याला तोडचं नाही! पण, प्रत्यक्षात आताच्या कलयुगात हा प्रामाणिकपणा तुम्हांला कुठेच घेऊन जात नाही, तर तो उलटा तुम्हाला दुर्बल बनवतो, हिनवतो... प्रामाणिकपणा असा किडा आहे जो आयुष्यभर जळू सारखा रक्त पित राहतो अन एकदा का शरीर संपलं कि मग सारंच संपत...म्हणून वाईट नाही पण, स्वार्थी बनावच लागत! 

प्रिया सातपुते