Wednesday, 26 February 2014

अध्यात्माचा पंच-२

                                                                         जय गुरुदेव!

आयुष्य खूप छोट आहे अन चिरंतन आहे.

हे वाक्य काही क्षणांपूर्वीच माझ्या वाचनात आलं. सात शब्दांच्या या वाक्यात बरंच काही दडल आहे. पहायला गेलं तर नवीन आयुष्यं अन नवा दृष्टीकोन. ज्याला हा अर्थ उमगला त्याला काशी काय स्वर्ग सुद्धा ठेंगणा होईलं. वाक्याच्या चार शब्दांमुळे आयुष्यात गती निर्माण होईलं, ते किती महत्वाने जगायचं हे उमगेल. आयुष्यं खूप छोट आहे म्हणून काही महाभाग ते वाटेल तसं जगायचं ठरवतील पण, तसं करू नका, पुढच्या तीन शब्दांमध्ये संपूर्ण जगाचं गमक लपलेले आहे. त्याचा थोडासा विचार करा! आयुष्य चिरंतन आहे, चिरंतन ज्याचा अंत नाही. विरोधाभासात गुंतू नका, आपण सगळेच एका चेतनेने अर्थात उर्जेने बनलेलो आहोत. काही त्याला आत्मा सुद्धा म्हणतील. ही चेतना कधीच लोप पावत नाही, एक शरीर थकलं कि ती दुसरया शरीरात प्रवेश करते, जसे आपण कपडे बदलतो तसचं काही ही चेतना सुद्धा करत असते. जेव्हा आपण हे अंतिम सत्य जाणतो, तेव्हा अधीरता, चालढकलपणा, आळशीपणा आणि आपण केलेल्या चांगल्या कामाची पोच पावती मिळवण्याची केविलवाणी अगतिकता पूर्णविराम पावते. 

तुम्ही एखाद्यासाठी मरमर मरून चांगलं काम केलं असेलं आणि तरी सुद्धा तुम्हाला साधा, "धन्यवाद" हा शब्द मिळाला नसेल किंवा कोणी तुमचा फायदा घेत असेलं, तरी सुद्धा उदास होऊ नका. एक लक्षात ठेवा, तुम्ही जे पेराल तेच तुम्हांला मिळेल! तेही व्याजासहित! हाच निसर्गाचा नियम आहे. 

आयुष्याचा आनंद घ्या!

प्रिया सातपुते 

Monday, 24 February 2014

मला उमगलेली याज्ञसेनी... भाग-१


           
एक स्त्री असूनही मी या महान स्त्रिला ओळखू शकले नाही, याचं कारण होत, माझ्यातला माहितीचा अभाव, उद्दात दृष्टिकोनाची कमतरता आणि गैरसमज! पण, जेव्हा ठरवून मी या कोड्याला उलघडायचा प्रयत्न केला तर माझ्या समोर एक याज्ञसेनी उभी नव्हती. यज्ञकुंडातून जन्मलेली याज्ञसेनी, पांचालाची कन्या, पांडवांची पत्नी, कृष्णाची सखी, पांडवपुत्रांची आई, बुद्धिमान- चारित्र्य संपन्न स्त्री, एक महान हृदय असणारी अग्नी, हस्तिनापुरची सम्राज्ञी, महाभारताची कर्ती! एकाचं स्त्रिची इतकी रूपे?

ती माझ्यासमोर उभी होती, अग्नीसारखी तेजपुंज, नखशिकांत जिच्या देहातून अग्नीचा दाह जणू अनुभवता येत होता. क्षणभर वाटलं आता माझं काही खंर नाही. पण, असं काही घडलच नाही, याज्ञसेनीच्या इशाऱ्यावर मी निर्भय होऊन तिच्या समक्ष उभी ठाकले. जशी स्वप्नातली परी आपल्याला गोष्टी सांगायला बसते तशीच ती महान स्त्री माझ्यासमोर बसली होती. तिचा चेहरा सावळा होता , डोळे पाणीदार, चेहऱ्यावर अग्नीच तेज, ओठांवर स्मितहास्य, लांबसडक कुरळे केसं…तिच्या कडे पाहत मी हरवूनच गेले होते. ती एक सामान्य स्त्री सारखी नव्हती तिच्या बाजूला उभे राहून सुद्धा तिचं वलय मला जाणवत होत. काही कळण्याआधीच तिच्या वलयात जाऊन मी लुप्त झाले, याज्ञसेनीला अनुभवण्यासाठी!

एखाद्या चित्रपटात भूतकाळात जातात तशी मी पांचाल राजापुढे उभी होते, मी बावचळले, क्षणभराने लक्षात आले कि मी यांना पाहतेय पण, हे मला पाहू शकत नाहीत… तो राजा यज्ञ करत होता, द्रोणाला मारणारा मुलगा मला दे म्हणून ओरडत होता, अन सॉलिड त्या यज्ञातून खरचं एक राजकुमार बाहेर आला, बाप रे हे लोक भयाण सॉलिड आहेत हे म्हणताच, याज्ञसेनी त्याच अग्नीतून बाहेर आली. ती जन्मतःच तेजपुंज होती. आयुष्यात प्रथमच एक जिवंत मुलगा अन मुलगी माझ्या डोळ्यासमोर अग्नीतून जन्माला आलेले पाहून माझे डोळे आधीच अवाक होऊन मोठे झाले होते तोच थोड्या थोड्या झटक्यात मला याज्ञसेनीचं बालपण दिसलं, तिची कुशाग्र बुद्धिमत्ता तिच्या बोलण्यातून जाणवत होती.

एका झटक्यात मी याज्ञसेनीच्या स्वयंवरात उभी होते, अगदी तिच्यापाशीच, गोंधळून मी इकडे तिकडे पाहत होते, स्वयंवरासाठी जमलेले राजे, पांचाल नृपाची घोषणा, सार कसं खरचं माझ्यासमोर घडतं होत जणू! माश्याच्या डोळ्यापाठी बरेचं राजे स्वतःचे हसे करून जात होते. पांचाल अन धृष्ट्धुम्नचे चेहरे गंभीर होत चालले होते, याज्ञसेनीच्या चेहऱ्यावर मात्र एक गूढ जाणवत होत. तितक्यात मला "श्रीकृष्ण" दिसले, त्यांना जवळून पाहण्याच्या लालसेने मी पुढे जाणार इतक्यात, दुर्योधनाने कर्णाची घोषणा केली, कर्ण माझा अत्यंत प्रिय, तो जसा पुढे आला माझा काळजाचा ठोका चुकला, माहित होत मला कि याज्ञसेनी माझ्या प्रिय कर्णाचा अपमान करणार. माझं मन खट्टू झालं, मी याज्ञसेनी कडे पाहिलं, तशी ती भर सभेत न घाबरता उठून मोठ्या आवाजात म्हणाली," क्षमा असू दे, पण मला सूतपुत्राशी विवाह करायचा नाही." क्षणभर मी तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले, त्यात कुठेच अहंकार नव्हता. कर्ण दुखावला गेला होता, मला समजत नव्हत कोण चूक, कोण बरोबर, सभागृहात कल्लोळ माजला होता. मी एकटक याज्ञसेनीकडे पाहत होते, तिच्या मनातले शब्द माझ्या कानी पडत होते, "अर्जुन, मला त्याच्याशी विवाह करायचा आहे, मग मी कर्णाला कशी वरमाला घालू, मला ही हक्कं आहे ठरवायचा कि मी कोणासोबत विवाह करणार!" माझ्या छातीत धस्स झालं, किती ही धाडसी याज्ञसेनी, ज्या काळात स्त्रियांना मान तुकवण्याखेरीज पर्याय नसायचा, तिथे भरलेल्या सभेत तिने कर्णाला नाही म्हंटले. तेवढ्यात एक ब्राम्हण अर्थात अर्जुन पुढे आला, याज्ञसेनीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं, जणू तिला आधीच कळल होत कि तोचं अर्जुन आहे. जल्लोष सुरु झाला, माश्याचा डोळा भेदला गेला होता.

वाद्यांच्या आवाजात अचानक घनदाट जंगलात मी याज्ञसेनीसोबत चालत होते. पाच पांडव पुढे मागे याज्ञसेनी अन मी! मनात काहूर माजलं होत, पुढे काय अनर्थ ओढवणार होता तो फक्त मलाच माहित होता. मी याज्ञसेनीचा हात पकडण्याचा प्रयत्न केला पण, मी फक्त एक मूक भविष्यकालीन प्रेक्षक होते. कुटीर जवळ येत गेलं, मी जीवाच्या आकांताने पळत होते पण मी हतबल होते. भविष्याची सुंदर स्वप्ने घेऊन चालणारी, अर्जुनामध्ये रममाण याज्ञसेनी, प्रत्येक पावलागणिक त्या स्वप्नांनाच जणू भस्मसात करत होती. कुंती मातेच्या फर्मानाने ती याज्ञसेनी तिच्याच भस्मसात झालेल्या स्वप्नांत गळून पडली. मी घट्ट डोळे मिटून घेतले, आवंढा गिळला अन डोळे उघडले.

याज्ञसेनी एकटीच उभी होती, कुंती मातेची पाठमोरी सावली तिच्या तेजपुंज चेहऱ्याला काळकुट्ट करून गेली होती. जणू, एक याज्ञसेनीचा अंश इथेच मरून गेला होता. मी स्तब्ध होऊन तिला पाहत होते. ती स्वतःशीच बोलत होती, "वाटून घ्या? किती सहजतेने म्हंटल यांनी, कसं वाटणार आहेत हे मला? तलवारीने पाच भाग करून? कशी जगेन मी पाच पुरुषांची पत्नी बनून? हेच विधिलिखित आहे, असं म्हणतात हे? छे छे  शक्य नाही हे, हा व्यभिचार ठरेल, अधर्म ठरेल, या पेक्षा मी स्वतःला अग्नितच झोकून देईन." इतकं बोलून ती मटकन खाली बसली, तिच्या शरीरातून अग्नीचा दाह प्रचंड जाणवत होता. मन होरपळून निघत होत, मग याज्ञसेनीच काय झालं असेल, आतापर्यंत थांबवलेले अश्रू  अन माझा हुंदका दाटून आला, तिच्या हुंदक्यामध्ये माझे हुंदके विरून गेले. मी तिच्या शेजारी मूक बनून राहिले.

क्रमश:

प्रिया सातपुते 

Sunday, 23 February 2014

अध्यात्माचा पंच-१जय गुरुदेव!


विश्वास ठेवा कि तुमच्यासोबत सर्वकाही छान होणार आहे. फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टीचं माझ्यासोबत होऊ शकतात आणि जरी काही अघटीत घडलं तर  ते सुद्धा माझ्या चांगल्यासाठीच आहे, कारण निसर्ग मला कणखर बनवत आहे. त्या मागे ही एक उद्दात हेतू लपलेला आहे. हा विश्वास सदैव तुमच्यामध्ये जागृत ठेवा. लक्षात ठेवा विचारानेच माणूस घडतो. हा निसर्ग आकर्षणाच्या नियमावर चालतो, तुम्ही जे विचार कराल तेच तुम्हाला मिळेल. 

आपण नेहमीच ऐकत आलोय विश्वासावर जग चालत! पण, आपल्याला व्यवहारी विश्वास नकोय, इथे आपणास एका निरागस लहान बाळासारखा विश्वास बाळगायचा आहे. एखाद्या लहान मुलाला त्याचे आई-बाबा जेव्हा खेळवण्यासाठी हलकेच हवेत भिरकावतात आणि झेलतात, तेव्हा त्या लहान मुलाला माहितही नसतं कि ते मला पकडतील ना? कि त्यांचा झेल सुटेल? त्या पिल्लूचा त्याच्या आईबाबांवर असतो तोच असतो खरा "विश्वास" अगदी असाच विश्वास आपणास ठेवायचा आहे. 

प्रिया सातपुते 

Friday, 21 February 2014

प्रियांश…२१


प्रेम पहायला गेलं तरं, आयुष्यातील सर्वात सोप्पी गोष्ट अन, निभवायला अत्यंत कठीण! प्रेमाचे चार दिवस संपले, गिफ्ट्स एक्स्चेंज झाले, आणि आता वेळ आहे गिफ्ट्स परत मागून घेण्याची, चार दिवसांतच तो तिला खटकू लागला आणि त्याला ती…आता कुठे नव्याची नवलाई होती ना? मग? हे काय झालं? प्रेम असतं काय? हेच ठाऊक नसणाऱ्या या बदकांना कसं समजावेल कोणी! नेहमी बोललं जात कोणत्याही नात्यात जेव्हा नव्याची नवलाई संपते तिथून त्या नात्याचा खरा प्रवास सुरु होतो. प्रवास स्वतःशीच प्रामाणिक राहण्याचा, प्रवास प्रेम टिकवण्याचा, प्रवास एकमेकांना पुरेपूर ओळखून हसत खेळत आयुष्य जगायचा! पण, हा प्रवास सर्वच नात्यांमध्ये सारखाच का राहत नाही? कधीतरी कजोड पायताणे एकत्र आल्याप्रमाणे त्यांचा गाडा चालू असतो, एकमेकाला शिव्या हासडत, भांडत ते एकत्रच राहतात, त्यांच्या मनात का येत नाही मोकळ होऊया म्हणून? लग्नाच्या वेदीवर उभे असतांना हेच दोघे एकमेकाच्या शरीर आणि आत्म्यासोबत एकत्र झालेले असतात ना? कि तो ही एक डावच असतो? खरचं किती भयंकर आहे हे! 

आजकाल एक नवीन वाक्य रोज कानी पडत असत क्रेडीट गोज टू स्टार वर्ड…"पुरुषांना भावनांशी काहीच लेन धेन नसतं. " हे खर आहे का? फक्त या भावनाशून्य पुरुषांमुळे नाती तुटतात का? यांच्यामुळे प्रेम विभस्सना बनलं आहे का? हे फक्त बायकांना उपभोगाची वस्तू मानतात का?
जर हे खंर मानलं तर मग, परीक्षेत नापास झाला किंवा नोकरी मिळाली नाही म्हणून आईच्या कुशीत रडणारा तरुण मुलगा कोण असतो? प्रेमात दगा फटका बसल्यावर दारू हासडत, ढसाढसा रडणारा प्रियकर कोण असतो?  पहिल्या पगाराचं पाकिट आईच्या हातावर ठेऊन डोळे पाणावणारा कोण असतो? बहिणीच्या विदाईला रडणारा तो भाऊ कोण असतो? आपल्या थकलेल्या बाबांना हळूच चोरून पाहणारा पण त्यांचा अहंकार न दुखावू देणारा तो कोण असतो? रस्त्यात आपल्या मैत्रिणीला छेडणाऱ्या भामट्यांना अद्दल घडवणारा कोण असतो?…या अगणित गोष्टी भावनांमधूनच येतात ना? मग, पुरुष भावनाहीन होऊच कसा शकतो? तो नामानिराळा होऊ शकतो हे मात्र नक्की! प्रेमातून बाहेर पडायला पुरुषाला एक क्षण पुरेसा असतो अन, स्त्रिला संपूर्ण आयुष्य पुरून उरत. याला अपवाद असू शकतात हे मात्र नक्की!

प्रेमाची अवस्था अश्या या रिटर्न गिफ्ट्स सारखी होऊ नये हे मात्र नक्की! प्रेम करा, हो खरचं करा, पण, त्यातलं गांभिर्य सुद्धा जाणा!
Keep smiling & Keep loving!

प्रिया सातपुते 

Saturday, 15 February 2014

प्रियांश…२०


ज्याच्यावर खूप अतोनात प्रेम आहे…अश्या व्यक्तीच्या अगदी जवळ जाऊन सुद्धा तुम्ही त्यांना साथ देत नाही…पण, परतीच्या वाटेवर मात्र  डोळे टिकून असतात, तो आता येईलं मला घ्यायला… कान चातकासारखे दाटून आलेले असतात एक परतीची साद ऐकण्यासाठी…प्रत्येक पाऊलागनिक तिच्या इच्छा, स्वप्न, तिचं स्वतःवरच प्रेम धुसर होऊन जातात…साताजन्माची वचने क्षणांत विरून जातात आणि उरतो तो फक्त "भूतकाळ"… 

प्रिया सातपुते 

Wednesday, 5 February 2014

प्रियांश…१९


कधी कधी मनात एक प्रश्न उमटतो…दोन सुंदर व्यक्ती, एकमेकांवर अतोनात प्रेम करणाऱ्या…एकमेकाला सोडून कशा काय देऊ शकतात? कित्येक वर्ष त्यांनी हा प्रेमाचा धागा जपलेला असतो…आणि अचानक एका दिवशी ते बोलून जातात, "मी तुझ्यासोबत राहू शकत नाही". अन, इतक्या वर्षांचा तो धागा तुटून जातो तो कायमचाच…याचं धाग्यात दोन्ही आयुष्याचं मर्म साठलेलं असतं…दोन हृदयांना बांधून ठेवणारा तो धागा प्रेमाचा, इतका कच्चा असतो का? कि तो सहजासहजी तुटून जातो?…प्रेमात पडण जितकं सोप्पं आहे, तितकंच ते टिकवण अवघड आहे…प्रेमात असणाऱ्या माणसाला त्याच्या गुणदोषासहीत स्विकारण इतकं अवघड जात कि काही वर्षातच माणसाला प्रेम आणि सवय यांमधल अंतर कळेनास होत…कदाचित येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या पार्टनरसाठी नव्या प्रेमाचा, नव्या सुखाचा, नव्या उमेदीचा असेलं, असं जर प्रत्येकाने ठरवलं तर मात्र चित्रच वेगळ असेल नाही का? पण, या सोप्प्या मार्गाचा उपयोग सोडून सारे, वर्षातून एकदा का होईना…विसरून…न विसरून व्हेलेंटाइन डे ची वाट धरतात…प्रेम व्यक्त करायला हा आताचा क्षणही पुरेसा ठरतो…म्हणजे प्रेमाचे धागे आणखी मजबूत होतील…प्रेम करा खुल्लमखुल्ला……अन प्रेमात म्हातारे व्हा, अर्थात चिरतरुण व्हा!

Happy Valentines Day!
Grow old in Love! 

प्रिया सातपुते 


Tuesday, 4 February 2014

प्रियांश…१८


निष्प्राण चिमुकल्या जिवाचा गतप्राण झालेला तो चिमुकला देह…हल्ली मला झोपू देत नाहीय…कोणाला वाटेल, काय एवढ्याश्या चिमणीसाठी इतकं भावनाप्रधान होण चांगलं नाही!…काही वाचून हरळतील अन दुसऱ्याच क्षणाला निवांत होतील…कधी कधी मला तुमचा हेवा वाटतो…तुमच्यासारखा वास्तविक असण किती सुखमय आहे ना? पण, जर त्या जागी आपल्यासारखी जिवंत, चालता, बोलता येणारी व्यक्ती असती तर मात्र, आपण जातीने लक्ष घालून विचारलं असत, काय झालं? वर्तमानपत्रातली बातमी चहाच्या कपाबरोबर चव लाऊन वाचली असती.…माणसाने इतकी प्रगती केली पण, तो माणुसकी, भूतदया अश्या गोष्टींपासून वंचित राहिला आहे…आपल्या पुढच्या पिढ्या कदाचित वास्तवापेक्षाही जास्ती व्यावहारीक असतील, समोर होणारा खून, तडफडणारा माणूस, रक्ताच्या थारोळ्यात पडलेली माणसे त्यांना किड्यामुंगी प्रमाणेच दिसतील…कारण, आज सुद्धा रस्त्यात टाकून गेलेल्या चार दिवसाच्या तान्हुल्याला घ्यायला सुद्धा हे निर्लज्ज लोकं धजावत नाहीत…तिथे मग आमच्यासारखी भावनाप्रधान आणि बिनडोक व्यावहारीक माणसेच पुढे धजावतात आणि त्यांनाच लेबेल लावलं जात…"मूर्ख"…आणि कानी उद्धार करणारी वाक्ये… निस्तरा आता पुढच, कोणी सांगितलं होत हिरोगिरी करायला?
तरी सुद्धा प्रश्न अनुत्तरीतच राहतो…मला झोप कधी येणार?

प्रिया सातपुते 

प्रियांश...१७


आज सूर्याला निरोप द्यायचाच राहून गेला…त्याच्या समोर उभी असून देखील…निरोप द्यायचा राहून गेला…त्याचं ते मोहक लालबुंद रूप पाहून क्षणभर मी हरवून गेले…त्याचा प्रत्येक सोनेरी किरण माझ्या शरीराला स्पर्शून जात होता…जणू तो मला मी जिवंत असण्याची ग्वाहीच देत होता…शब्दांचे थवे माझ्या मनाशी खेळत होते…कि मला जागे करत होते? नाही ते तर माझ्या मनात स्पर्शून सांगत होते…प्रिया आम्ही आहोत…आम्ही आहोत…

प्रिया सातपुते 

Monday, 3 February 2014

डिस्को विठ्ठला डिस्को…


डिस्को विठ्ठला डिस्को… 
डिस्को विठ्ठला डिस्को…
विटेवरी ऊभा विठ्ठला 
आता तरी आत ये विठ्ठला 
पुंडलिक वाट बघतोय 
आता तरी आत ये विठ्ठला 
डिस्को विठ्ठला डिस्को… 
डिस्को विठ्ठला डिस्को… 
माउली तू या जगाची 
पाझरु दे तुझं हृदय  
वारी करतय लेकरू 
आता तरी पाव रे विठ्ठला 
डिस्को विठ्ठला डिस्को… 
डिस्को विठ्ठला डिस्को… 
रोज रोज मरतोय शेतकरी 
धाव रे आता विठ्ठला
नको करू उशीर  
चीरहरण थांबव आता 
विठ्ठला धाव विठ्ठला 
विठ्ठला धाव विठ्ठला 
विठ्ठला विठ्ठला………. 

प्रिया सातपुते