Wednesday, 24 December 2014

चारोळी...

आज आठवणींची भेट
पुन्हा आसवांशी झाली
गालावरुन ओघळताना
हृदयाची पिळवणूक झाली...

प्रिया सातपुते

Monday, 15 December 2014

घोस्ट राईड

(प्रिया, क्रिति आणि रीचा, एका भन्नाट अनुभवासाठी ठरवतात नामांकीत स्मशानभूमीला भेट द्यायची. जिथे बसेस बंद पडतात आणि मग कोणत्याही रूपातलं भूत बस मधून खाली उतरून निघून जात. तिघीही बसच्या दरवाज्याजवळ बसलेल्या असतात. प्रियाच्या बाजूस एक आजी बसलेली आहे. तिच्या मैत्रिणी पाठीमागच्या सीटवर बसलेल्या आहेत.)

प्रिया - यार, I'm so excited!
क्रिति - Me too यार, मजा आयेगा आज, हम तीनो को छोड के भी कोई भूत हो सकता है क्या?
(तिघींचा हश्या पिकतो)
रीचा - पागल हो क्या यार? प्रिया मला तर जाम भीती वाटतेय. 
प्रिया - काय बे तू….शी!
कंडक्टर - तिकीट मडम?
प्रिया - तीन लास्ट स्टोप. 
(कंडक्टर गूढ चेहऱ्याने तिकीट पंच करून देतो.)
(बाजूच्या सीटवरची बाई फारच घाबरी घुबरी होऊन घाम पुसत असते, तिचा नवरा तिचं सांत्वन करत असतो)
बाई - मला बाई जाम भीती वाटतेय! तुम्हांला काय हीच बस मिळाली का? जळल मेलं लक्षणं हे!
नवरा - गप्प ग! आहे ना मी सोबत, मग कशाला घाबरत आहेसं?
(बसच्या बेलचा आवाज टिंग टिंग. बस थांबते. बरेच प्रवासी उतरतात तर काही आत चढतात, काहीशे गंभीर चेहऱ्याने.)
कंडक्टर - (मोठया आवाजात) चला, बस दहा मिनिट थांबणार बघा इथ. 
(दहा मिनिटाच्या ब्रेकनंतर काही नवे प्रवासी पुन्हा बस मध्ये चढतात, शेवटची बस असल्यामुळे, बस मध्ये थोडी गर्दी होते, प्रवाश्यांचा आपसांत कुजबुजण्याचा आवाज, कंडक्टर बेल वाजवतो टिंग टिंग अन बस सुटते. )
क्रिति- अबे, तुने देखा क्या?
प्रिया - क्या?
क्रिति - (जोरात  ओरडतेच) पाँव. (सगळे क्रितिकडे पाहतात, तशी ती हळू आवाजात बोलते.) भूत के उल्टे पाँव?
प्रिया- नही बे, कितना ध्यान से देख रही हूँ, कुछ भी तो नहीं दिखा, लेकिन मुझे ना उस सफ़ेद साड़ीवाली औरत पे शक है!
(रीचा मागे वळून पाहू लागते)
प्रिया - मूर्ख…मागे  नको पाहूस! Act normal. 
(बसची बेल वाजते टिंग टिंग. प्रिया जवळ बसलेली आजी उतरू लागते)
आजी - जपून जावा हो पोरींनो! पुढ लय धोखा हाय!
(प्रियाचा चेहरा काळवंडतो, आजी उतरते. कंडक्टर सीट रिकामी झाल्यामुळे प्रियाच्या बाजूस बसतो.)
रीचा - यार, बघ ती आजी काय बोलली. 
क्रिति - कमीनो! मुझे समझ में नहीं आया, वह कुछ ज्यादा ही अच्छी मराठी बोल रही थी । 
प्रिया - अरे यार, वह बोली कि आगे खतरा है, संभल के जाओ। 
(प्रिया आणि रीचा क्रितिकडे पाहून हसतात.)
(प्रिया कंडक्टरकडे पाहून विचारते)
प्रिया- काका, स्मशानभूमीवर खरचं बस बंद पडते का हो? 
(कंडक्टर चुपचाप नोटा मोजत राहतो.)
(अचानक जोरात आवाज येतो…खाडडड…बस थांबते. बाजूलाच  स्मशानभूमीचा बोर्ड झळकत असतो. बस मध्ये चिडीचूप शांतता पसरते, उरतो तो फक्त श्वासांचा आवाज. कोणी एक बाई किंकाळी फोडते  तर कोणाच्या तोंडून राम राम चा जप सुरु होतो. प्रिया झरकन मागे वळून पाहते. कोणीच उठतांना दिसत नाही. तिघी मैत्रिणी टक लाऊन त्या पांढऱ्या साडीवाल्या बाईकडे पाहत राहतात.)
(दरवाजा उघडतो किरकिर. हळूच कंडक्टर उठून उभा राहतो. उल्ट्या पायांनी तो स्मशानभूमीकडे चालू लागतो.)
(तितक्यात बाईकचा आवाज येतो, प्या प्या! हॉर्नचा आवाज, बाईक थांबते, अन बाईकच्या पाठीमागून कंडक्टर उतरतो.)
कंडक्टर - काय बे साल्या, चहा प्यायला गेलो अन तू बस पळवलास व्हयं रे बत्ताश्या!
(प्रिया, क्रिति, रीचा चिडीचूप बसलेल्या असतात.)

प्रिया सातपुते 
Thursday, 11 December 2014

प्रियांश...६०

तोंडावर चाटायच, अन पाठीमागे पायतान मारायच हा माझा प्रांत नव्हे! प्रत्येकाने आपापल्या प्रांतात निष्ठेने रहाव, जगाव! प्रत्येकाच्या आयुष्यात कोणती फोडनी टाकली आहे? हे जाऊन चाखण्यापेक्षा, स्वतः पुढे काय मांडून ठेवलय ते पहाव आणि एक लक्षात ठेवाव इतकंच आवडत लुड़बुडन, चोच मारण, टोचुन मिटक्या देत खाण तर, तुमच्या समोर जेव्हा माणुसकीचा खून होत असतो तेव्हा का नाही वापरत हीच सवय? नेमकं तेव्हाच का पळ काढतात! 

प्रिया सातपुते 

Monday, 8 December 2014

कुछ मनसे...

अजब है यह दुनिया
सितम से भरी
न जाने कितनी
राहों पर मौत है बिछी
फिर भी मुस्कुराते
हमें चलना हैं
इनी राहों पे जीना है।

प्रिया सातपुते


Sunday, 23 November 2014

पाऊल खुणा

भूतकाळाच्या चादरीत
लपलेला असतो 
अतृप्त इच्छांचा कोंडमारा

चेहरयावर ओढताच 
होतो जीव अर्धमेला 

आताच्या क्षणांना 
गिळंकृत  करू पाहतात 
या अतृप्त इच्छा 

पण घाबरणार नाही मी 
की थकणार नाही 

उमटवत राहीन 
नव्या पाऊल खुणा 
पुन्हा लढण्यासाठी
पुन्हा  जगण्यासाठी… 

प्रिया सातपुते 

Tuesday, 18 November 2014

प्रियांश...५९

लहानमुले म्हणजे निरागस्ता, प्रेमाचा अविरत झरा! आपल्या आजुबाजुला अशी लहानमुले असन ही ईश्वरी कृपाच आहे.

एका मैत्रिणीच्या घरी गेले होते तिथे तिचा पाच वर्षाचा भाचा टीवीवर हनीमून शब्द ऐकून हसायला लागला. मला जाणून घ्यायच होत या पाच वर्षाच्या मुलाला हसायला काय झाल? मी विचारल, "का हसला रे तू? तुला काय माहित आहे याच्याबद्दल, मला तर नाही माहित?" पाच वर्षाचा पिटुकला म्हणाला, "किती सोप्प आहे, मून म्हणजे चंद्र आणि हनी म्हणजे मध! हनीमून म्हणजे सगळे मिळून पिकनिकला जाण!" हे ऐकून हास्याचा कारंजा उडाला.

आजकाल टीवीवर येणारे वेगवेगळे शब्द अन त्या शब्दांच कुतुहल त्यानां असन यात गैर काहीच नाही पण, त्याला योग्य मार्गदर्शन खुप महत्वाच आहे. नको त्या वयात त्यांना प्रौढ न बनवलेलच बर!

प्रिया सातपुते

Thursday, 13 November 2014

गाणं मनातलं!


*आजच्या, दिनांक १३ नोव्हेंबर २०१४,  महाराष्ट्र टाईम्समध्ये "गाणं मनातलं" सदराखाली प्रकाशित झालेला माझा हा लेखं तुम्हां सर्वांसोबत शेयर करतांना खूप आनंद होत आहे. *

भावनांना जेव्हा जिद्द मिळते, तेव्हा शब्द जन्माला येतात, अन शब्दांना जेव्हा सूर मिळतो, तेव्हा जन्माला येत, "गाणं". प्रत्येक माणसाच्या मनात त्याच्या जवळच असं एक गाणं असतच. जे त्यांना भरभरून प्रेम देत तर कधी प्रेरणा! ते कधी हसवत, तर कधी आठवणींच्या वारुळात घेऊन जात.  भावनांच्या कल्लोळात ते जगण्याची उभारी देत. आपण एकटे नसून आपल्यासोबत कोणी आपल आहे, याची जाणीव करून देत. 

लहानपणी प्रत्येक घासाबरोबर मम्माच्या तोंडून ऐकलेलं हे गाण,
" ये ग गाई गोठ्यामध्ये,
 पिल्ल्याला दुध दे वाटीमध्ये, 
 पिल्ल्याची वाटी मांजर चाटी,
 मांजर गेले रागाने, 
 तिथेच खाल्ले वाघाने, 
 वाघमामा गुरगुर करतो, 
 अस्वलमामी पोळ्या करते,
 एक पोळी करपली, 
 पिल्ल्याने आमच्या ती, 
 दुधासंगे ओरपली, 
 दुध झाले कडू, 
 पिल्ल्याला आले रडू…"

आजही हे गाणं माझ्या कानांमध्ये घुमत राहत. अन आईच्या निरपेक्ष प्रेमाची जाणीव करून देत. याची तीव्रता मी अनुभवली जेव्हा मी मुंबईला होते, मम्माला फोन करून गाणं म्हणायला लाऊनच पहिला घास घ्यायचे. या गाण्यात एक जादू अशी होती की माझे पाय नेहमी माझ्या संस्कारांच्या मुळांशी घट्ट रोवले गेले. या गाण्याशी माझ बालपण जोडलेलं आहे अन माझ भविष्यही. माझ संपूर्ण आयुष्य या गाईच्या गोठयाभोवतीच फिरत राहणार हे नक्की!

प्रिया सातपुते 

Tuesday, 11 November 2014

प्रियांश...५८

काही दिवसांपूर्वी माझी ११-१२वीची मैत्रीण अचानक घरी आली! मला धक्काच बसला, माझ्या भावाच्या लग्नात ती राहून गेली होती इतकी घट्ट आमची मैत्री होती! माझ्यासमोर काय कस बोलायच हा प्रश्न तिच्या चेहरयावर आवासून उभा होता! मी मात्र काही झालच नाही या आविर्भावात बोलत होते, फोन नंबरही घेतला!गळ्यातल न दिसणार मंगळसुत्र पाहून मीच विचारल, " लग्न झाल का तुझ?" यावर संकोचुन हो बोलत तिने पळ काढला, मेबी शी वोझ फिलिंग गिल्टी!!! ऑर नॉट!!!!

आमची मैत्री तुटली, तुटलीच म्हणाव लागेल! या मागच कारण तस वैलिड आहे, सायन्स सोडून ती आर्ट्सला दुसरया कॉलेजमधे गेली, त्यावेळी मोबाईल होते कुठे? असले तरी ते आम्हाला मिळाले नव्हते! दोघी आपापल्या आयुष्यात बिजी झालो, तरीही फ्रेंडशिप डे, सनवारंना फोन करून विश करायचो! मग हळुहळु तेही बंद झाल, एकमेकींच्या नव्या आयुष्याच्या पानात नवे मित्रमैत्रिणी जोडले गेले, अन आमची मैत्री धुसर होत गेली. कुठेतरी इगो आला, मीच का फोन करायचा नेहमी! पण, इगोवर मात करून एकदा फोन लावला देखील, तेव्हा जे बोलन झाल ते शेवटच! शेवटी कोणतही नात फक्त एकाच बाजूने सावरता येत नाही हेच खर! 

प्रत्येक नात्याची एक्सपायरी डेट असते हेही पुन्हा एकदा सिद्ध झालं!!!

प्रिया सातपुते

Saturday, 8 November 2014

प्रियांश…५७

आयुष्य एक सुंदर नक्षीदार पडदा आहे, जो कधी ना कधी पडणारच आहे, शेवट हा होणारच आहे. मग तो पुढच्या क्षणाला, काही वर्षांनी, पण होणार हे नक्की! कितीही सुंदर का असेना तो पडदा, त्याच्यावर धूळ लागणार, त्याचा रंग जाणार, त्याचा तो क्लासी लुकपण ओघात नाहीसा होणार, हळुहळू तो विदीर्ण होऊन फाटायला सुद्धा लागणार, अन अखेर तो उतरवला तरी जाणार किंवा धुळीत माखुन स्वतःच फाटक्या तुटक्या अवस्थेत तग धरून राहणार…पण किती काळ? शेवटी तो पडणारच ना ?

माणसाच शरीरही असंच आहे.  आपण त्याला वेगवेगळ्या परिमाणात मोजून ते किती सुडौल? सेक्सी? बेढभ? बारीक? जाड?  अश्या वेगवेगळ्या परिमाणात मोजत राहतो जणू काही ते आयुष्यभर सोबत करणार आहे. मग, आपण यातच गुरफटून जातो, मी सुंदर! तू काळा! मी गोरा!, माझी बायको सुंदर अन तुझी….अशी बरीच वाक्य सादर करता येतील, पण मग लिस्ट वाढत जाईल! आयुष्य या साऱ्या लिस्टच्या, परिमाणांच्या पलीकडेचे आहे. आयुष्य एकच चेतना, चिरंतन, निरंग, नितळ आहे जिथे सारी लेकरे एकाच परमेश्वरीची आहेत फक्त भेद आहे तो माणसानेच बाटलेल्या नावांचा, कधी गणपती बाप्पा, अल्लाह, येशु तर कधी बुद्धा…
सारे पडदे सोडून द्या अन जाणा प्रत्येक जीव किती सुंदर आणि अलोकिक आहे! 

प्रिया सातपुते

Sunday, 2 November 2014

प्रियांश...५६

आज प्रोजेक्टच प्रिंटिंग, बायंडींग पूर्ण झाल! मी आणि माझी भाची प्रोजेक्ट रिपोर्ट घेउन, उरलेल अर्जंट काम करायला जात होतो, मोपेड पार्क करताना, थोड्या दुरून दोन आजीबाई एकमेकिला सोबत करून पैसे मागत होत्या. माझी भाची मला विचारत होती," आत्तु, ते पैसे का मागत होते?", तोपर्यंत आम्ही इश्चित स्थळी अर्जंट कामासाठी पोहचलो, माहिती घेउन बाहेर यायला १० मिनिटे झाली होती. पटकन बाहेर येउन त्या दोन आजी कुठे दिसत आहेत का पाहिल, पण त्या दृष्टीआड गेल्या होत्या. तोपर्यंत माझी छकुली बोलली, "आत्तु तू त्या आजींना शोधत आहेस का?" होय म्हणताच तिने त्या कोणत्या दिशेला गेल्या ते सांगितल. पटकन समोरच्या दुकानातून बिस्किट्चा पुडा विकत घेतला, त्या आजींना शोधत आम्ही पुढे निघालो. दोघी आजी दिसल्या, गाडी विरूद्ध दिशेने कशी घालणार? साइडला उभी केली, पण ट्रफिक खुप होत, पटकन पळत जाऊन पुढे जाणाऱ्या आजींना हाक दिली, एका आजीच्या हाती बिस्किट्चा पुडा दिला, नमस्ते केल, पटकन भाचीला गाठल, मोपेड अन पर्सची रखवालदार तिच होती!

मोपेड सुरु केली, त्या दोघीही आजी इतक्या दुरून माझ्याकडे पाहत होत्या! ज्या आजीने मला पाहिल नव्हत ती आजी दुरून माझाकडे पाहून हात हलवून जे काही सांगत होती, ते माझ्यापर्यंत पोहचल होत. माझ्या भाचीच्या नजरेत एक वेगळीच चमक मला दिसत होती अन माझ्या मन गदगदून गेल होत.

परमेश्वरा तूच धाड्लस सर्वांना, प्रतेकाच्या मनात जागा हो, म्हणजे वृद्ध झालेल्या आईवडिलांना दारोदारी भीक मागावी लागणार नाही.

प्रिया सातपुते

Thursday, 30 October 2014

प्रियांश...५५

आपण नीट जगलो की नाही याची पोचपावती आपल्या निष्प्राण देहाला चितेवर ठेवण्याआधी, कितीजण प्रेमाने हात फिरवतात? कितीजण कवटाळुन रडतात? आगीच्या डोहात जळणाऱ्या देहाला पाहून कितीजण धाय मोकलुन हमबरडा फोडतात? कितीजनांचे डोळे पाणावतात? आपल्या शरीराची राख गोळा करताना कितीजण आठवनीनी गदगदून जातात? पिंडदानावेळी किती नैवेद्य हजेरी लावणार? १२ दिवस किती चुली फक्त आपल्यासाठी जळतात? तोंड गोड करण्यासाठी किती मिठाया न मागवता घरी पोहचतात! दुरदेशीचे नातलग किती दिवसात धावत येतात? किती आठवणीने फोन करतात? यातच साऱ्या आयुष्याचा लेखा जोखा आला!

हे सार जर का घडेल तर आपण खुप सुंदर जगलो, जन्माला येताना आपण सारे रडत येतो पण, शेवटच्या श्वासासोबत जाताना मात्र आपण राजा/राणी बनून जायच! पण, संपूर्ण रस्त्यात प्रेमाच्या अश्रुंची झालर पसरलेली असली पाहिजे! तरच आयुष्य जगल्याची पोचपावती मिळेल नाही का?

प्रिया सातपुते

Tuesday, 21 October 2014

प्रियांश...५४

आज संध्याकाळी कोल्हापूरच्या बालसंकुलला भेट दिली, आधीच द्यायची होती पण, तब्येत नरम होती. दिवाळीच्या आधीच जाऊन यायच हे मनाशी ठरवल होत, अन ते पूर्णही केल. चिमुकल्यांना पाहिल, त्यांच्या डोळ्यातील सोनेरी स्वप्ने स्पष्टपणे दिसत होती, त्यांच्या स्वप्नांना साकार करण ही माझीही जबाबदारी आहे याची जाणीव मला या चिमुकल्यांनी करून दिली. त्यांच्या ओठांच्या हास्यात मला दिवाळीची मौल्यवान भेट मिळाली. मला ज्यापरीने करता येईल ते सार मी यांच्यासाठी करेन. दिवाळी अशीही साजरी होते अन तो क्षण स्वर्गालाही ठेंगना करतो.

एक पणती प्रेमाची उजळुदे
लाखो मने प्रेमाने
एका नव्या जगासाठी
जिथे असेल फक्त अन फक्त प्रेम...

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रिया सातपुते

Friday, 17 October 2014

सेकण्ड इंनिंग भाग-५

मुग्धा खिडकीत उभी राहून रात्री टिमटिमणाऱ्या चांदण्यांकडे पाहत होती, रमेश मागून येत म्हणाला, "खूप भूक लागलीय, आता पाने वाढूयात का?" मुग्धाने हसून मान हलवली. सगळी तयारी झाली होती, रमेश मुग्धाला विक्रम बद्दल बोलणार इतक्यात तिचं बोलली, "त्याला हे देऊन ये, आणि सांग जर त्याला वाटत असेलं माझ्याबद्दल काही तर बाहेर येऊन आपल्यासोबत जेवायला. आपल्या बायकोचा समजूतदारपणा पाहून त्याची छाती फुलून गेली होती. आता रमेश ला कळून चुकलं होत कि सगळ नीट होणार आहे. रमेशने जाऊन मुग्धाचे शब्द विक्रमच्या कानावर घातले आणि निमुटपणे तो मुग्धाला मदत करायला निघून गेला.

दोघे डायनिंग टेबलवर विक्रमच्या येण्याची वाट पाहत होते, बराच वेळ झाला होता, विक्रम काही बाहेर आला नाही. हताश होऊन रमेश मुग्धाला म्हणाला, "काही उपयोग नाहीय, तो काही येणार नाही!" मुग्धा ठामपणे म्हणाली, "येणार तो, अजून दोन मिनिट थांब." दोन मिनिट व्हायच्या आतच विक्रम मान खाली घालून जेवायला बाहेर आला. कोणीच कोणाशी बोललं नाही, एक भयाण शांतता होती. विक्रमला अन्न जात नव्हत, प्रत्येक घासासोबत तो पाणी घेत होता, इतके दिवस दारूच त्याचं अन्न होती…जेवण उरकून मुग्धा विक्रम कडे पाहू लागली. अस्तावस्त वाढलेली दाढी, कुपोषित मुलांसारखा झालेला त्याचा देह, चूरगळलेले त्याचे कपडे, डोळ्यात विश्वासघाताच दुखः अन सोबत अपराधीपणाची भावना… विक्रमने शेवटचा घास घेताच, मुग्धा ठामपणे विक्रमला म्हणाली, "विकी." विक्रमने कान टवकारले त्याला विश्वास बसतं नव्हता त्याची बालमैत्रीण मुरु, जी गेल्या पाच वर्षात एकदाही त्याच्याशी बोलली नाही, तिने आज त्याचं नाव घेतलं. त्याची हिम्मत होत नव्हती तिच्या नजरेला नजर भिडवण्याची, तरी सुद्धा हलकेच मान उचलून त्याने नजर खाली घेतली…ओठ थरथरत होते पण त्याचे पाणावलेले डोळे आणि अश्रु बोलत होते. मुग्धालाही गहिवरल होतचं, तरीही ठामपणे ती म्हणाली, "किती दिवस हे असं जगणार आहेस तू? तुला जर काही आमच्याबद्दल वाटत असेलं तर पुन्हा नव्याने जगायला सुरुवात कर, तू  जे काही वागलास त्याची जबाबदारी तुला उचलावीच लागेल!" विक्रम काहीच बोलला नाही, त्याच्या डोळ्यांमधून वाहणाऱ्या आसवांना बरंच काही बोलायचं होतं! अचानक झपकन तो उठला अन मुग्धाच्या पायाशी जाऊन बसला, एक लहान मुलं आईच्या पायाशी लोळण घेत, अगदी तसंच, त्याच्या हुंदक्याच्या आवाजाने रमेश गहिवरून मुग्धाकडे पाहू लागला, तिला तटस्थ पाहून तो तसाच बसून राहिला! 
विक्रम- माफ कर मला मुरू! 
मुग्धा- केलं!
विक्रम- मार मला, सोडून जा, तुझ्या आयुष्यात सुखी रहा!
मुग्धा- माझं आयुष्य मी जगतेच आहे, तू कोण रे मला सांगणारा? मी इथे माझ्या विकीला परत आणायला आलीय, तुझ्यासारख्या हार मानलेल्या विक्रमशी माझा काही समंध नाही! माझा विकी फायटर आहे, कोणा मुलीने फसवलं म्हणून आयुष्य संपवणारा नाही तो!
विक्रम- मी तुला, आईबाबांना दुखावलं, त्या मुलीसाठी! मी तुमच्यावर अविश्वास दाखवला, प्रेमात आंधळा झालो मी, कोणत्या तोंडाने जाऊ आई समोर? काय बोलू, संपलं सारं, काही अर्थ नाही या जगण्याला!
मुग्धा- अर्थ नाही? तिकडे काका काकू माझ्या फोनची वाट पाहत असतात, विकी कसा आहे ग? जेवला का? तो भेटेल का आम्हाला? आमच्या सोबत पुन्हा राहील का तो? एक शब्द बोलला नाही ग तो, विकीचे बाबा रोज रात्री हळूच टेरेसवर जाऊन रडतात, तब्येत खालावली त्यांची! काय सांगू त्यांना? विकीने लढायच्या आधीच हार मानली? अजून किती त्रास देशील त्यांना? 
विक्रम- मेलो...
मुग्धा- (ओरडून)बास! तू मरशील रे मग, तुझ्यामुळे आम्ही सगळे रोज मरू, आयुष्यातून उध्वस्त होऊ, हेचं हवंय का तुला?? सांग ना? 
विक्रम- नाही, मला कोणालाच त्रास नाही द्यायचा आहे.
मुग्धा- अरे, मग वाग ना तसा! बाहेर पड यातून, आयुष्य वाहता प्रवाह आहे, कोणी फसवलं म्हणून तिथेच अडकून, संपूर्ण आयुष्य खराब का करायचं? स्मिताने फसवलं तुला, आम्हा सर्वांना! तिच्या कर्माने ती गेली! तू काहीच केलं नाहीयेस, विसर आता हे गिल्ट! हो आम्ही दुखावले गेलो पण, आम्ही खूप प्रेम करतो रे तुझ्यावर, तुला असं पाहणं सहन होत नाही! 
विक्रम मान खाली घालुन ऐकत होता..
मुग्धा- आपल्याच माणसावर रागावतो, ओरडतो, माफ करतो अन पुन्हा एकत्र येतो! We're family Vicky! We love you, please come back...असं बोलून मुग्धाचा बांध सुटला, दोन्ही हातांनी चेहरा लपवून इतक्या दिवसांचा हुंदका बाहेर पडला!
रमेश तरीही शांत होता, त्याला उमगलं होत, ती मोकळी होतेय! 
विक्रम कासावीस होऊन, तिच्या गयावया करायला लागला! तिच्या हुंडक्यांची तीव्रता इतकी जास्त होती की रमेश मूठ बंद करून डोळे घट्ट मिटून बसला होता, आता कोणत्याही क्षणी त्याचीही लिमिट संपणार असं वाटत असता तोच,
विक्रम- प्लिज मुरू रडू नकोस, प्लिज रडू नकोस, मी वचन देतो तुला, मी बाहेर पडेन यातून, इथून...मी वचन देतो तुला आधीचा विकी बनेन! प्लिज रडू नकोसं...

रमेश थोडा भावुक होऊन उठतो, दोघांनाही मिठीत घेतो! अन बोलतो, "Awww...Babies!"

प्रिया सातपुते


Monday, 6 October 2014

आयुष्यातले सारे खटाटोप कशासाठी?

आयुष्यातले सारे खटाटोप कशासाठी?
क्षणभराच्या सुखासाठी,
विणले, ओंजळीत पकडले,
काही कपाटात कुलूप लाऊन,
पकडून ठेवले,
काही माजघराच्या डब्यात,
लपवून ठेवले,
काही बँकेच्या लॉकरमध्ये,
सुरक्षित ठेवले,
पण हातात काहीच लागणार नाहीत,
सारे कधीचेच भुर्रकन उडून गेले,
त्या सुंदर मनाच्या शोधापाठी,
ऊभे रहा क्षणभर आरश्यापुढे,
न्याहाळा स्वतःच्या मनाला,
मिठीत घ्या स्वतःच्याच देहाला,
आयुष्यभराच्या सुखापोटी….

प्रिया सातपुते

Wednesday, 1 October 2014

प्रियांश...५३

काल रात्री ८०% प्रोजेक्टच काम संपवून, आज निवांतपणे कॉफीचा सुगंध घेत, प्रत्येक घोट चव घेत पिला! एक वेगळाच आनंद मिळाला!
थोडावेळ करमणुक म्हणून लाइफ ओके लावल, सावधान इंडिया सुरु होत. टॉपिक भुवया उंचावणारा होता, सुरुवातच बायको मिसिंग अशी झाली होती,...लव मैरेज, नवरा उच्चशिक्षित प्रोफ़ेसर, बायको प्रेगनंट होती, त्यातच तिला नवरयाचे विवाहबाह्य संबंधाविषयी माहिती मिळाली. तेही त्याच्याच विध्यार्थीनिंसोबत! नवरयाचे प्रताप ऐकून ती माहेरी निघाली होती. पण, ती गायबच झाली, पुढच्या इनवेस्टिगेशन मध्ये जे समोर आल ते तर भयानकच होत, नवरयाच्या एका विद्यार्थीनी ने थंड डोक्याने सार प्लान केल, आणि त्याच्या बायको अन अजन्म्या बाळाला अमानुषपने ठार केले. काहीही चुक नसताना  त्या बायकोला जीव गमवावा लागला आणि ज्याच्यामुळे हे घडल तो तर निवांत सुटला. गुरु शिष्याच्या नात्याला काळीम्बा फासून तो सुटला!

आपल्या कायद्याला आता तरी फाटकी वस्त्रे सोडून नवी वस्त्रे घालावी लागतील, शिक्षा अश्या असाव्यात की त्यांची हिमत होणार नाही अस काही करण्याच! नैतिकता भंग केल्याच्या अपराधाखाली अश्या लोकांना शिक्षा मिळायलाच हवी.

प्रिया सातपुते

प्रियांश...५३

काल रात्री ८०% प्रोजेक्टच काम संपवून, आज निवांतपणे कॉफीचा सुगंध घेत, प्रत्येक घोट चव घेत पिला! एक वेगळाच आनंद मिळाला!
थोडावेळ करमणुक म्हणून लाइफ ओके लावल, सावधान इंडिया सुरु होत. टॉपिक भुवया उंचावणारा होता, सुरुवातच बायको मिसिंग अशी झाली होती,...लव मैरेज, नवरा उच्चशिक्षित प्रोफ़ेसर, बायको प्रेगनंट होती, त्यातच तिला नवरयाचे विवाहबाह्य संबंधाविषयी माहिती मिळाली. तेही त्याच्याच विध्यार्थीनिंसोबत! नवरयाचे प्रताप ऐकून ती माहेरी निघाली होती. पण, ती गायबच झाली, पुढच्या इनवेस्टिगेशन मध्ये जे समोर आल ते तर भयानकच होत, नवरयाच्या एका विद्यार्थीनी ने थंड डोक्याने सार प्लान केल, आणि त्याच्या बायको अन अजन्म्या बाळाला अमानुषपने ठार केले. काहीही चुक नसताना  त्या बायकोला जीव गमवावा लागला आणि ज्याच्यामुळे हे घडल तो तर निवांत सुटला. गुरु शिष्याच्या नात्याला काळीम्बा फासून तो सुटला!

आपल्या कायद्याला आता तरी फाटकी वस्त्रे सोडून नवी वस्त्रे घालावी लागतील, शिक्षा अश्या असाव्यात की त्यांची हिमत होणार नाही अस काही करण्याच! नैतिकता भंग केल्याच्या अपराधाखाली अश्या लोकांना शिक्षा मिळायलाच हवी.

प्रिया सातपुते

Sunday, 21 September 2014

जागे व्हा!

रोज दारोदारी आता दरवाजे वाजतील
हळदी-कुंकू, मिटिंग, पार्टीच्या नावाखाली
अनोळखी माणसे काकी, मावशी, ताई, बेटा
अशी जबरदस्तीची पाच मिनिटाची नाती जोडतील
कधी पेढे तर कधी मटण
कधी मोसंबी तर कधी फिरंगीचे
ताजे ताजे बेत आखले जातील
पाण्यासारखा पैसा रोज
दुधडी भरून वाहताना दिसेल
अन आपण म्हणतो भारत हा देश गरीब आहे!
बोटावरची शाई मिरवायला
सेल्फी काढले जातील
कर्तव्यपूर्तीच्या फसव्या आनंदात
सारे साखर झोप घेऊन टाकतील
तिही पुढच्या पाच वर्षांकरता
अन आपण म्हणतो आम्ही जागेचं आहोत!
हळदी-कुंकूही हसत असेलं
कोणत्या माथ्यावर मिरवणार
या चिंतेत तेही घामाने
वाहून जात असेल
अन आपण म्हणतो पापे धुवायला गंगा आहे ना!
पेढ्याच्या फुकटच्या डब्यात
पुरुषाचां पुरुषार्थ पोटात जाऊन
डकार देऊन निघून जातो
अन आपण म्हणतो जगाची हिच रीत आहे!
जागे व्हा!
डोळ्यांनी नाही तर बुद्धीनेही
आपला हक्क जाणा
कर्तव्य जाणा
अन समाजाला एक चांगला नेता मिळवून द्या!

प्रिया सातपुते

Wednesday, 17 September 2014

प्रियांश…५१

आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करतो त्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेलं पाहून, मनाची होणारी चिरफाड किती भयाण अन विदारक असेलं याची कल्पनाही करवत नाही. प्रेम कधीच संपत नाही, संपतो तो सहवास, संपतो तो नात्यातला गोडवा, नात्यातला विश्वास…प्रेम तसचं हृदयाच्या एका कोपऱ्यात तोंड लपवून, बसलेलं असतं ते त्याच्या जखमा लपवायला, एकटेपणाच्या, विश्वासघाताच्या, अन मनाला स्वतःच ओरबाडलेल्या, मारून मारून सुंद केलेल्या त्याच्या विद्रूप चेहऱ्याला पहायची हिंमतच होत नाही…अन, मग हळुहळू प्रेम स्वतःच अस्तित्वच विसरून जात…या प्रेमाला कोपऱ्यात जाऊ पर्यंत वाट का पाहत रहायची? प्रेम तुमचं स्वतःच अस्तित्व आहे, कोणत्याही व्यक्तीशी ते निगडीत नाही… तुम्ही स्वतःवरच प्रेम करत नसाल तर मग समोरून धावत येणारया प्रेमाची लाट तुम्हांला चिंब करेलच कशी? त्यासाठी स्वतःच प्रेमाचा असा सागर बना की कितीही कोणीही काहीही केलं, ते सार सामावून घ्या…नको असणाऱ्या नकारात्मक विचारांना धुडकावून किनाऱ्यावर भिरकावून द्या…मग आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करतो त्याला आपण मुक्त करू शकू, स्वतःच्या विचारातून, अगदी एखाद गुलाबाचं फुल सागरात वाहून जात पण, सागराला ना  काटे टोचतात ना त्याचा सुगंध मोहवून टाकतो, ना त्याच्या मादक पाकळ्यांचा स्पर्श भुलवतो…सागर फक्त वाहवत जातो…स्वतःच्या प्रेमात…अन फक्त प्रेमात…

प्रिया सातपुते 


Monday, 15 September 2014

अशीच सुचलेली एक कविता!

सावरायला मला
असा तू झुरू नकोस
पेटत्या श्वासांना
वाया घालवू नकोस
सावर स्वतःला
शेवटी पाखरांना
उडायचच असतं
कितीही वारा होऊ
दे वेडा पिसा
त्याच्यावरच स्वार
व्हायचं असतं…

प्रिया सातपुते
https://www.facebook.com/KahiManatale

Wednesday, 10 September 2014

क्षण कसोटीचे

महाराष्ट्र टाईम्स, तारीख १० सप्टेंबर २०१४, मध्ये प्रकाशित झालेला माझा लेखं. 


प्रिया सातपुते 

Friday, 5 September 2014

प्रियांश...५०

मला फ़क्त एकच माहित आहे कि माझ्यात देव आहे!  मी काय आपल्या सर्वांमध्ये आहे. मग त्याला तुम्ही कोणतही नाव दया ईश्वर, अल्लाह, येशु, शिव,...देह अगणित पण आत्म्याचा अंश एकच! आयुष्याच्या या प्रवासात प्रत्येक धर्माचे मित्रमैत्रिणी भेटले, एकमेकांच्या ग्रंथांबद्दल जाणून घेताना एकच लक्षात येत, फ्रंटपेज वेगळ असल तरीही आतला गाभा सारखाच आहे. फायनली महत्वाच काय तर, आपल्यातला देव आपणच शोधावा लागतो, मनाच्या कोणत्या गाभाऱ्यात हे चैतन्य लपलेल असत काय माहित? पण, एकदा का तुम्ही या गाभाऱ्यात शिरला की मग, एक वेगळीच दुनिया साद घालते, जिथे तुम्हाला फ़क्त आणि फ़क्त प्रेमच दिसेल!

प्रिया सातपुते

Sunday, 31 August 2014

प्रियांश...४९

हल्ली जिकडे पहाव तिकडे फ़क्त मुली/बायको/गर्लफ्रेंड/स्त्रियांवर सुख घेऊन जोक्स मारले जातात, मग तो कोणत्याही पटातला जोक असू दे, तिथे चव लाऊन कमेंट्स सुद्धा दिले जातात. या पुरुषांच आम्हा बायकांशिवाय काही चालतच नाही...हेच खर आहे, काहीही करून कुठल्या न कुठल्या कारणाने ते स्त्री नावाच्या पात्रा भोवतीच फिरत राहतात कधी गोल गोल तर कधी वेड्यावाकड्या वळनांनी. याची प्रचिती मिळाली...

प्रिया सातपुते

Friday, 22 August 2014

प्रियांश...४८

आयुष्यात जेव्हा कधी आपणास जाणवत की आपली निवड चुकली, मार्ग चुकला, किंवा हे तुम्हांला न वाटता तुमच्या घरच्यांनाच जास्ती वाटत असेल...त्यावेळी एकच लक्षात असू दे, सो व्होट, देयर इज अदर वे टू! मोस्टली, कसं होत ना, आपल्याला करायचं असत एकं अन आपल्या आईवडिलांच्या इच्छा असतात दहा…नाही बारा…त्यात अजूनही ऐकायला लागत की तू जेव्हा आई बाप होशील तेव्हा तुला कळेल? कधी कधी ना या टिपिकल फालतू वाक्यांचा अगदी विट येतो…अरेच्या नाही आहोत आम्ही सध्या आईबाप मग, जगू दया ना आम्हांला आमच्या मनासारखं…कुठेतरी ठेच खाऊ, कुठेतरी स्वतःहून कुर्‍हाडीवर पाय देऊ, थोडं लागेल, पण ते आमचे अनुभव असतील, ते आम्हांला आयुष्यभर शिदोरी म्हणून पुरतील…नाही संस्कार सोडणार नाहीच हो, पण स्वतःची स्पेस, स्वतःच आकाश हवंय आम्हांला भरारी घेण्यासाठी…जर खरचं वाटलं खूप दूर जातोय तर येऊच ना परत आम्ही…पण, तेवढा विश्वास तरी दाखवा ना तुम्ही…पिल्ली मोठी होतात अन मग घरटी सोडून उडून जातात हे त्रिकालाबाधित सत्य कधी उमगणार माणसाला? नात्यांच्या जाळ्यात मग तो असा काही गुरफटतो की कधी मनाने तर कधी शरीराने रक्तबंबाळ होतो…अन मग, मन मारून, चरफडत आयुष्य रेटतो… 

प्रिया सातपुते

Friday, 15 August 2014

प्रियांश...४७

आज सकाळी कॉफ्फी घेताना, त्रिशाच्या शाळेची तयारी पाहून अप्रूप वाटलं, सात वर्षाची चिमुकली नाश्ता करत म्हणत होती, "आज माझी स्कूल लवकर सुटणार, मस्त ना आत्तु!". मी हसून म्हंटल, "हो, पण, आज आहे काय?" त्यावर ती पटकन बोलली, "इंडपेंडंस डे!" मी खट्याळपणे म्हंटल ते काय असत? त्यावर तिने भलमोठ प्रवचन दिल, "आज परेड होणार स्कूल मध्ये, फ्लाग सेरेमनी होणार, प्रोग्रॅम होणार, गाणी गाणार,…" मग, तिला चिडवून म्हंटल, "पण, का?" यावर ती फक्त माझ्याकडे पाहत राहिली. इंडपेंडंसला  मराठीत काय म्हणतात विचारल्यावर तिने परफेक्ट सांगितलं, "स्वातंत्र्य!" मला खूप भारी वाटल,…पण तिचा पुढचा प्रश्न होता, "आत्तु स्वातंत्र्य म्हणजे काय?" कॉफ्फीचा मग खाली ठेऊन मी तिच्याकडे पाहत म्हंटल, "स्वातंत्र्य म्हणजे, बिनारोकटोक चॉकलेट खायला मिळन, डोरेमॉन आयुष्यभर पहायला मिळन, अभ्यास केला नाही म्हणून मम्माचा ओरडा न मिळन, पक्ष्यांप्रमाणे आकाशात उंच उंच उडता येण, स्वातंत्र्य म्हणजे कधीही कुठेही न घाबरता जाता येण, स्वातंत्र्य म्हणजे खूप खूप शिकून मोठ होण, स्वातंत्र्य म्हणजे खूष राहण, स्वातंत्र्य म्हणजे ज्यांना मदत हवीय त्यांना मदत करण, स्वातंत्र्य म्हणजे जगण आणि दुसऱ्यालाही जगू देण, स्वातंत्र्य म्हणजे आनंद देण….आणि, यावर ती पटकन बोलली, "स्माईल करण, हो ना आत्तु?" यावर खूप मोठीवाली स्माईल देऊन, मी तिच्याकडे फक्त पहातच राहिले…ते क्षण मनाच्या पेटीत साठवून, मी माझ्या स्वांतत्र्य दिनाची सुरुवात केली… 


Freedom is Smile....Keep Smiling guys, Keep spreading smiles... :D

प्रिया सातपुते 

Sunday, 3 August 2014

प्रियांश...४६

विधवा स्त्री अन अविवाहित स्त्री यांमध्ये दिसण्यात साम्य नसलं तरीही जास्ती असा फरक देखील नसतो…कारण, दोघींनाही समाज अजूनही परक धन, दुसऱ्या घरची मुलगी आणि सर्वात मुख्य म्हणजे ओझचं मानत आला आहे. बदल घडतोय हे जरी खर असलं तरी, समाजाच मन कधी खुल्ल होणार आहे? याच विषयावर मी अन माझी आई बोलत होतो, तेव्हा तिने एक जुनी गोष्ट सांगितली,…

माझ्या एका मावशीच लग्न ठरवण्याचा कार्यक्रम सुरु होता, मंडळी पुण्याची होती. बारकी आई हिरीरीने सारकाही पाहत होती, तोच मंडळी मधल्या बायकांनी सूर ओढला, "ही विधवाबाई कशाला पुढे पुढे करतेय? मंगल कार्यात विधवा कशाला पाहिजे? कळत नाही का तुम्हां लोकांना अपशकून होईल!" हे ऐकताच तात्याजी आणि आई खवळून उठले. आपल्या बहिणीला लावलेले बोल त्यांना खपले नाहीत. आई खंबीरपणे म्हणाली, "रोज सकाळी तिचा चेहरा पाहिल्याशिवाय आमचा दिवस सुरु होत नाही, आणि तुम्ही असं काय म्हणताय? आम्ही असलं काही मानत नाही. अन, अस बोललेलं चालणार नाही."

त्या काळात मुलीची पार्टी असूनही आई अशी तडफदारपणे बोलली, कोणाचीही तमा न बाळगता! त्या काळातले असूनही आईचा तो विचारी बाणा मनाला सुख देऊन गेला आणि मुख्य म्हणजे ती एका स्त्रिच्या बाजूने ठामपणे उभी राहिली. आज उमगतंय आम्हां सर्व भावंडांमध्ये हा तडफदारपणा कोठून आला आहे ते. फिलिंग ग्रेट की आम्ही तुझ्या सावलीत लहानाचे मोठे झालोत. आज आई तू, तात्याजी अन बारकी आई स्थूलदेहाने जरी आमच्यापाशी नसलात तरीही आमच्या कणाकणात सामावलेले आहात. आता शब्द संपवते लिहू शकणार नाही… 

प्रिया सातपुते 

Friday, 1 August 2014

सिम्मी…The unconditional love


देवाने मनुष्याला फुरसती मध्येच बनवलं असणार…देवाने जन्माला घातलेला सुसंस्कृत, सभ्य, बुद्धीमान प्राणी म्हणजे कोण असेलं तर तो "मनुष्यच"…म्हणून तर हा मनुष्य सगळीकडे मिरवत राहतो, वरचढपणाच्या ढोंगात तो स्वतःचा अहंकार कुरवाळत राहतो आणि बाकी सर्वं प्राणीमात्रांना तुच्छ समजतो. 
पण, याच उत्कृष्ट देवाच्या कलाकृतीत एकचं काळा ठिपका आहे अन तो म्हणजे, "निरपेक्ष प्रेम". 
या निरपेक्ष प्रेमापोटी माणूस जंगजंग पिछाडतो पण हाती मात्र काहीच लागत नाही…अश्या या माणसाला प्रेमाचा खरा अर्थ कोण शिकवत? याचं भूतलावरचे तुच्छ प्राणी. 

प्रत्येकाला कोवळ्या वयात पडलेला गंभीर प्रश्न कोणता होता? तर तो म्हणजे, "प्रेम म्हणजे काय?" प्रत्येकजण त्याच्यापरीने प्रयत्न करतो, अर्थ सांगण्याचे, तर काही व्याख्या तयार करतात. प्रेमावर कविता करतात तर काहीजण प्रेमावर कथा लिहितात, पण, कितीजणांना खरचं प्रेम कळत??? मलाही पडलेलं हे एक कोडच होत, पण, जर प्रश्न मनातून असेल तर काळ आणि वेळ तुम्हांला तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे नेऊन पोचत करतेच. 

माझ्या प्रश्नाचं उत्तर होत "सिम्मी"…या नावाशी माझा काहीच समंध नव्हता, पण याच एका शब्दांत आयुष्याचं गमक ती मला देऊन गेली. सिम्मी माझ्या एका मित्राची पेट फिमेल डॉग होती. खर बोलायचं तर मला सगळे प्राणी आवडतात पण, जंगलंमध्ये!! किती हा विपर्यास…कारण, लहानपणापासून त्यांच्याबद्दलची भीती मनात घर करून अशी राहिली होती की जे पेटस ठेवतात, त्यांच्याबद्दल सुद्धा मला अप्रूप वाटायचं किती गट्स आहेत यांच्यात! पण, या पठ्याला तिच्याबद्दल भरभरून बोलतांना मनात कुठेतरी वाटायचं की काश, माझ्याकडे पण सिम्मी असती! असं, काय होत तिच्यात???

सिम्मीबद्दल बोलतांना माझ्या मित्राच्या बोलण्यात मी कधीच मालकीभाव पाहिला नाही, तो जणू ती घरचीच मेंबर असल्यासारखा बोलायचा. जणू ती त्याची बच्छडीच होती. तो लहान असतांना त्याच्या काकांच्या घरातून एक छोटुस पिल्लू, घेऊन आला होता. पांढऱ्या रंगाची, गोबरी गोबरी सिम्मी तेव्हापासून त्याचीच झाली होती. किती अजब आहे हे, तो हॉस्टेलला असूनही ती त्याला कधी विसरली नाही. माझ्या ऐकण्यात आलेली ही पहिली पेट डॉग असेलं जी वेजीटेरीयन होती आणि तिला कैडबरी खूप आवडायची. सगळ्यात मोठी हाईट म्हणजे ही चिमण्यांशी खेळायची. अंगणात झाडावरून पडलेल्या पिल्याला हलकेच तोंडात घेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवायची, घरच्यांना बोलावून त्या पिल्याला वाचवल्याची गोष्ट मला अजूनही थोडीथोडी लक्षात आहे. माझ्या आळशी मित्राला ती फिरायला ने म्हणून मागे लागायची. दिवसभर काकूंच्या मागेमागे घरभर त्यांच्या सावलीसारखी फिरायची…सकाळी पेपर आणून देण्यापासून, जी जी कामे सांगाल ती सारी गपचूप करायची, ना चेहऱ्यावर आठी ना भुंकणे…घरभर बागडायची, पायाशी लोळण घालायची, मायेने हात फिरवावा म्हणून पायात घुटमळायची… घरात कोण आलंय याची वर्दीपण द्यायची…ओवरऑल ती ऑलराउंडर होती. 


सिम्मीबद्दल इतकं ऐकलं होत की तिला पाहण्याची इच्छा तर सॉलिड होती आणि भीती त्याहून डब्बल. पण, जेव्हा मी त्यांच्या घरी पाहिलं की ती निवांतपणे घरभर फिरते आहे, माझ्यातर पायाखालची जमीनच गायब झाल्यासारखं झालं होत, मी अश्या जागा पाहून बसतं होते जिथे सिम्मी येणार नाही पण, ती नेमकी माझ्याच पायाखाली येत होती तर कधी खुर्चीखाली तर कधी चक्क माझ्या बाजूला, पण ना ती माझ्यावर  गुरगुरली ना ओरडली, उलटा ती इतकं क्युट लूक द्यायची ना की वाटायचं, अरे एकदा हिला टच करूयाच, पण, हिम्मत ने दाद नाही दिली. इतक्या वर्षांची भीती अशी कशी जाईल! काही लोकं त्यांच्या पेट्सना घराबाहेर ठेवतात…थंडीत कुडकुडायला, किंवा त्यांना त्याचं सेप्रेट डॉग हाउस देतात, पण, याच्या घरी ती निवांत दिसली, त्याच्याच बेड मध्ये झोपेल, एकदा त्याने सांगितलं पण होत की ती त्याच्या जवळच झोपते, कधी पायांजवळ तर कधी कुशीत तर कधी सोफ्याखाली. किचेन मध्ये जाऊनही ती कुठेच तोंड घालत नव्हती, खाण्यासाठी ती तिच्याच प्लेटकडे जायची…किती विनम्र, आताची लहानमुलेही इतकी नम्र नसतात. बाहेरच्या लोकांना पाहताच डॉग्स भुंकायला लागतात,… पण, लग्नासाठी भरगच्च पाहुण्यांनी भरलेल्या घरातही ती गुरगुरतानासुद्धा मी नाही पाहिली. खरचं!!!


किती प्रेमाने ती त्यांच्या घरच्यांच्या गळ्यात पडायची, खरचं जाणवत होत की ती किती प्रेम करते त्यांच्यावर…एक महत्वाची बाब म्हणजे लग्नाआधीच्या परित्राण पाठात त्यांनी सिम्मिला सुद्धा बाजूला बसवलं होत, आणि ती संपूर्ण मंत्र ऐकतेय की काय याचंच कौतुक वाटलं होत मला! त्यानंतर मी तिला कधी पाहिलं नाही! सिम्मिला पाहिल्यानंतर कौतुक वाटत होत की ही खरचं डॉग आहे??? माणसे सुद्धा इतकी शहाणी नसतात. 

मित्राचं अन सिम्मीच नात उमगण्या इतपत माझी बुद्धी त्यावेळी तितकी प्रगल्भ नव्हती, मी फक्त तिला एक पेट म्हणूनच पाहिलं! जेव्हा सिम्मी हे जग सोडून निघून गेली तेव्हा तो खूप रडला.  तो मला अगदी एका लहान मुलासारखा वाटला, जो सिम्मिला घेऊन घरी आला होता फरक फक्त इतकाच होता की आता सिम्मी त्याच्याजवळ नव्हती म्हणून तो रडतं होता. 

दिवस निघून गेले, प्रत्येकजण आपापल्या व्यापात बुडून गेले. मी सिम्मिला विसरले, पण, जेव्हा जेव्हा सिम्मिसारखीच दिसणारी डॉग्स समोर दिसायची, सिम्मी नजरेसमोर तरळून निघून जायची. आजही आठवत आहे, रात्री झोप येत नव्हती म्हणून मी टीवी पहात होते, "हाचीको" मूवी सुरु होती, छोटुस पिल्लू पाहून, सिम्मी मनात तरंग उठवून गेली…जणू, त्या पिल्ल्यात ती मला "प्रेमाचा खरा रंग" पहायला सांगत होती. शेवटी मी तीच मूवी पहायचा निर्धार केला, तोंड पाडून मूवी पाहताना मला जाणवलच नाही, की मी किती गुंग होऊन गेले होते. मन दाटून आल होत, हुंदका गळ्याशी आला होता.  "निरपेक्ष प्रेमाचा" अर्थ उमगून न उमगल्यासारखीच माझी गत झाली होती, हाचीच्या शेवटच्या क्षणात मला माझ्या मित्राचं दुखः स्पष्टपणे जाणवत होत…जणू तो चक्कं सिम्मिला पकडून रडतोय की काय! असाच भास झाला होता. त्याच्या दुःखाची सर माझ्या जाणीवेत येणार नाही कारण, त्यान त्याचं हक्काचं निरपेक्ष प्रेम करणार माणूस हरवलंय, पण, सिम्मी मात्र नेहमीच त्याच्या मनाच्या कप्प्यात कायमची राहिलं. 


Thank you Simmy, for letting me know the secret of "Unconditional Love", I'll cherish your memory for lifetime.

प्रिया सातपुते 

प्रियांश...४५

परीक्षा संपवून बाहेर पडल्यावर जेव्हा जाणवत की पाऊस थोडा दमलाय, दोन सेकेंद का होईना त्याला थॅंक यू म्हणत मी माझा मोर्चा घरी वळवणार तोच, थंडगार हवेची झुळूक पोटात कावळे ओरडत असल्याची खूण देऊन गेली, मग काय पटकन घर गाठण्याचा चंग बांधला तोच एक कॉफी हाउस नजरेत आलं,…पटकन जाऊन मी आयरीश कॉफी ऑर्डर केली… बाजूलाच मुलामुलींचा ग्रुप होता, त्यातला एकाने जोरात ओरडून म्हंटल, "पुरुष कितीही वेळा लग्न करू शकतो पण, स्त्रीला एकंच लग्न मान्य असत धर्मात!" यावरून त्यांच्या ग्रुप मध्ये बाचाबाची सुरु झाली,…कॉफीचे घोट घेत, कानांवर पडणारे शब्द कर्कश वाटत होते…जवळच्या नातातल्या लोकांची नावे घेऊन त्यांच्या दुसऱ्या लग्नाच्या गोष्टींवर ते पिझा चसके लाऊन खात होते,…"अरे ती माझी चुलत बहिण तिने सेकेंड मेरेज केलं, काय गरज होती अस करायची? त्यावर त्यांच्याच ग्रुपमधल्या एकीने टोकल अन म्हणाली, "अरे, मग तुझ्या सख्ख्या भावाने पण तर दुसर लग्न केलं आहे, हे विसरलास का तू? यावर तो तिच्यावर डाफरला… तशी ती चिडून उठून निघून गेली! अभिमान वाटला तिचा तिने प्रतिकार तरी केला, हो मध्ये हो करत राहिली नाही ती!

आपला समाज किती पार्सलिटी करतो...जेव्हा एखादी अविवाहित स्त्री एखाद्या विधुर अथवा बिजवारयाशी लग्न करते, तेव्हा त्या स्त्रिला अगणित आरोपांना सामोरे जाव लागत...तिच्यात काही खोट असेल, पैश्याला भाळुण केल असेल, गड़बड़ आहे, काहीतरी लफड असेल, चारित्र्य चांगल नाही तिच, अश्याच असतात या बायका....अशे बरेच बोल ऐकण्यात येतात. पण, जेव्हा एखादा अविवाहीत पुरुष एखाद्या विधवा अथवा घटस्फोटित स्त्रिशी लग्न करतो तेव्हा मात्र त्याच्यावर जास्ती करून स्तुतिसुमने उधळल़ी जातात, वाह! किती ग्रेट काम केल त्याने, गट्स लागतात अस करायला, त्या बाईचं भाग्यच भारी! एखादी विधवा, घटस्फोटीत स्त्री पुनर्विवाह करत असते तेव्हाही तिलाच का वेगळ्या नजरेला सामोर जावं लागत? पुरुष मग तो विधुर असो वा घटस्फोटीत वा अविवाहित, तो अश्या कोणत्याच नजरेत का येऊ नये??

मी स्वतः लहानपणी पाहिलेल्या एक काकू , अकाली नवरा गेल्यामुळे विधवा झाल्या, पण, आजतागायत त्यांना मी तशाच वेशात पाहत आले…अर्थात त्यांनी पुनर्विवाह केला नाही, शिकलेल्या, स्वतःच्या पायावर त्या आजतागायत तश्याच उभ्या आहेत. अश्या बऱ्याच स्त्रियांना आजवर पाहिलं, बऱ्याचजणी खरचं रंगांपासून कायमच्या दूर झाल्या, लहानपणापासून लावणाऱ्या टिकल्या आता त्यांच्या माथी दिसत नाहीत, हातात बांगड्या सुद्धा दिसत नाहीत, का? तर टिकली, बांगड्या, रंग म्हणे नवऱ्याच्या चितेसोबत राख होतात. 
आता, पुरूषाच उदाहरण देते, उच्चशिक्षित, बक्कळ पगार, दोन मुले, अन काळाने घाला घातला, बायको देवाघरी गेली. अन, अवघ्या तीन महिन्यात तो दुसंर लग्न करून मोकळा झाला. किती हा विपर्यास! इथे हेही नमूद करेन, पुनर्विवाह न केलेले पुरुषही मी पाहिले आहेत. पण, ते कोणताही रंगापासून वंचित नाहीत, त्यांना समाजात तोच मान आहे, किंबहुना त्यांच्याबद्दल सहानभूती जास्ती आहे! का? बायको अकाली गेली अन अजूनही मुलांखातर ते अविवाहितच राहीले. हिचं सहानभूती, मान त्या विधवेला का येऊ नये? 

आपल्याला स्टिकर्स लावायची फार सवय लागून गेली आहे…हा/ ही घटस्फोटीत, हा/ही विधुर…लहानपणीच एवढी चांगली नावे दिली आहेत ती तर काही कामाचीच नाहीत…चांगली स्टिकर्स ठेवा हो, पण, माणुसकीला काळ फासणाऱ्या अश्या स्टिकर्सना कोणाच्याच माथ्यावर लावू नका…एकंच स्टिकर माथी लाऊन फिरा ते म्हणजे "मानवतेच"… 

प्रिया सातपुते 

My love -The beautiful beast!!!

                                                                 फोटो सौजन्य - अभिजीत कोथळे

तुम्ही कधी कोणावर पहिल्या नजरेत प्रेम केलंय? समोर कोण आहे याची किंचितही पर्वा नसतांना? मी केलं आहे, अगदी प्रेम काय असतं हे उमगण्याआधी…एक दिवस शाळेच्या पुस्तकात त्याचा फोटो पाहिला अन तेव्हा पासून तो माझ्या मनाच्या अश्या कप्प्यात जाऊन बसला आहे की जेव्हा मी माझ्या विचारांत हरवलेली असते तेव्हा तो हळूच येउन माझ्या कानांत गुरगुरतो… अन, मग आपसूकच माझे डोळे मिटून जातात, कधी तो उडी मारून माझ्या मनातून बाहेर येऊन, माझ्याकडे निरागसपणे पाहत राहतो…त्या क्षणात मी अनुभवलेलं आहे, निरागस प्रेम…आफ्टर ऑल टायगर इज माय पॅशन… 

एकेकाला स्वर्ग दाखवणारा हा सुंदर, क्रूर, देखणा प्राणी…मला मात्र वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो, त्याच्या डोळ्यात मला एक वेगळंच जग दिसत,…जिथे फक्त असतो एकंच चंग…"शिकार"…पण, तेच तर असतं ना त्याचं खरखुर जगण! आणि मुख्य म्हणजे "प्रामाणिक" जगण…माणसासारख थोडीच खायचे दात वेगळे अन मारायचे वेगळे…

साखरझोपेत असतांना अचानक मला जाणवलं मी तर एका खुल्या हिरव्यागार मैदानात लोळतेय अन, जेव्हा डोळे उघडले तेव्हा तो सुंदर वाघ, माझ्याकडे एकटक पाहत होता, जणू तो देखील प्रियाच होता की मी स्वतःला त्याच्यात पहात होते? काहीच विचार नव्हते,…वाघाची बछडी जशी एकमेकासोबत खेळतात तशेच आम्ही खेळत होतो,…जणू मला विसर पडला होता माणूस असण्याचा…माणसाच्या रक्ताला आसुसलेल्या वाघासोबत खेळताना खरचं खूप सॉलिड वाटत होत, त्याची मऊ मऊ फर, त्याचा तो सुंदर रंग, मीच फालतू दिसत होते त्याच्यापुढ्यात… एकमेकांना गुदगुल्या करत, जोरजोरात हसत…अन, आईने कधी धपाटा दिला ते कळलच नाही…पण, ते स्वप्न होत यावर अजूनही विश्वास बसतं नाही…

एकेकदा तर तो खुल्या डोळ्यांसमोर दिसतो मला…आता हे तर स्वप्न असू शकत नाही ना, हे सार काय आहे??? एका मित्राशी बोलन केलं ज्याला वाघ नाही पण, फुलपाखरू दिसायचं…मग, आणखीन एका मैत्रिणीशी बोलन झालं, त्यात उमगलं की तिला आधी जे घडणार आहे ते आधीच स्वप्नांत दिसायचं, अर्थात तिची स्वप्ने खरी होतात याची साक्षीदार मी सुद्धा आहे! मग, थोड वाचन केलं, त्यात कळाल की या प्रकाराला "Animal Totem" असं म्हणतात, अर्थात, प्राण्यांचा स्वरुपात ऊर्जा तुम्हांला प्रत्येक ठिकाणी गाईड करते. मग, त्या त्या प्राण्याचे गुणधर्म सुद्धा काही अंशी आपल्यात असू शकतात. या गोष्टी मानण न मानण हे प्रत्येकावर आहे, पण, ही अंधश्रद्धा नक्कीच नाही! कारण, या भूतलावर सगळीकडे ऊर्जा आहे, माझ्यात, तुमच्यात, प्रत्येक जीवात, कणात…हीच ऊर्जा म्हणजे आध्यात्मिक भाषेत बोलायचं तर, "चैतन्यच" आहे, साक्षात "ईश्वरच"…लहान असतांना या सुंदर प्राण्याच्या प्रेमात मी पडले, मग तिच सकारात्मक ऊर्जा, त्याचं स्वरुपात मला गाईड करत गेली…मुंबई मध्ये असताना जॉब वरून परतताना कधी कधी ऊशीर व्हायचा, मग कधी कधी याच सुंदर प्राण्याचा साक्षात्कार अधे मध्ये व्हायचा, कधी कधी जाणवायचं तो माझ्या बाजूने चालतोय, माझं रक्षण करतोय…कधी कधी काही करंटे पाठलाग करायचे तेव्हा, जणू तो वाघच त्यांच्यावर तुटून पडायचा… अर्थात त्यांना चोपणारी वाघीणच होती, अस म्हणायला हरकत नाही. 

सायकॉलोजीकली पहायला गेलं तर माणूस, ज्या गोष्टींकडे मनापासून आकर्षित झालेला असतो, पण, ती गोष्ट मिळवण अशक्यप्राय असतं हे जेव्हा त्याला जाणवत, तेव्हा एकतर माणूस त्या गोष्टीचे गुण स्वतःमध्ये उतरवतो किंवा डिप्रेशन मध्ये जातो!  पण, गुण आत्मसात करतांना स्वतःला गमावू नका, आणि हो, चंग बांधा चांगल्या गुणांचा!

One last thing guys, "Please, save Tigeres/Tigeress,..this beautiful beast!"

प्रिया सातपुते 
प्रियांश...४४

आजचा दिवस संथ घालवला, खर बोलायचं तर काहीच केलं नाही…हिवाळा आला की काही प्राणी कशे हायबरनेटिंग पोझिशन मध्ये जातात ना, तसचं काहीसं केलं…आता काही क्षणांपूर्वी हॉट चॉकलेट पिण्याची इच्छा उफाळून आली, मग काय स्वारी रथात बसून किचेन मध्ये पोहचली…हॉट चॉकलेट मग मध्ये घेतांना थोडासा चटका बसला…"आई ग!" तसा मी हात पटकन पाण्याखाली धरला, त्या एवढ्याश्या चटक्याने मला क्षणार्धात त्या निष्पाप स्त्री जीवांचे चटके मनात द्यायला सुरुवात केली…कधी सती म्हणून तर कधी, एकतर्फी प्रेमात, तर कधी हुंडाबळी,…. विचार भरकटत आहेत, कधी ते मला स्पष्ट चित्र दाखवत आहेत…नवऱ्याच्या चितेवर जिवंत सती जाणाऱ्या स्त्रिच…शांत, जणू तिला काही जाणवतच नाहीये, जणू ते शरीर सुन्न झालं आहे, नवरा गेल्याच्या दुखात तिला खरचं काही जाणवत नाहीय…एका जिवंत स्त्रिला, जी धडधाकट आहे, फक्त नवरा मेला म्हणून जिवंत जाळण अन, मग "सती" पदवी देऊन मान देण…कितपत योग्य होत हे? तेव्हाचा समाज इतका कसा निष्ठुर होता? की एका जिवंत माणसाला आगीत लोटल जायचं…त्या स्त्रिच्या आर्त किंकाळ्यांनी त्यांची हृदये पिघळली का नसावीत? हा कधीही न उमगणारा प्रश्न आहे… 

लॉच्या अभ्यासक्रमात, इंडियन पिनल कोड हा विषय सुरुवातीला मला खूप भारी वाटायचा. केसेस एकदम सॉलिड वाटायच्या वाचायला,…पण, जेव्हा मी पुस्तकांना हात घातला, जस जश्या क्रूर, माणुसकीला काळीम्बा फासणाऱ्या केसेस अभ्यासात यायला लागल्या, माझं मन मलाच घाबरू लागलं…आरशात पाहतांना मला भीती वाटू लागली होती…रोज स्वप्नांत त्या स्त्रिया नजरेसमोर यायच्या…झोपण मुश्किल झालं होत…तेव्हा मला जाणवलं हे ज्याच्यावर बेतलंय त्याचं काय? आयुष्य गुलाबी असतं अशी समजूत तेव्हा कायमची नष्ट झाली होती… 

काळ बदलला पण अजूनही माणूस तसाच निष्ठूर का? आज ही रोज एक स्त्री हुंड्यापायी जाळली जाते, मारली जाते…हात कशे कापत नाहीत या नराधमांचे? याची उत्तरे माझ्याकडे नाहीत, मला नाही माहित माणूस कधी शहाणा होईल, पण मी आशावादी आहे, देवाकडे एकचं मागण आहे, "देवा तू जन्माला घातलेल्या या सर्व माणसांमध्ये फक्त प्रेम हीच एक भावना दे, सगळ्यांना सुखी ठेव. "

प्रिया सातपुते 

Thursday, 24 July 2014

प्रियांश...४३

काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये भेटलेल्या एका मैत्रिणीशी गप्पा झाल्या, वोट्सअप्प वर आल्याची कुनकुन तिला मिळाली अन गप्पांचा ओघ सुरु झाला. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. हिच्याकडून गुजराती शिकण्याचा फोल प्रयत्नही करुन झाला होता. नोकरी मिळाली, पायवाटा वेगळ्या झाल्या, फेसबुकवर तिच्या लग्नाचे फोटो अपलोड झाल्यावर जाणवल, की मैडमच लग्न झाल, मग काय, फेसबुकवरच शुभेछ्या दिल्या. पर्याय नव्हता, शेवटी मनाला माझ्याही कुठेतरी लागल होतच. असो हा सारा भूतकाळ!

प्रत्येक विवाहीत स्त्री फिरून फिरून ''सा" नावाच्या शब्दावर येऊन अशी काही अटकते की तो धड तिला धरताही येत नाही अन सोडताही! पण, शेवटी सोडते वेळी ती तो "सू" लाऊनच सोडते. असो, काळ बदलला तरीही स्त्रियांची मानसिकता बदलणार नाही हेच खर! तसच हिच्या बाबतीतही झाल. शिकलेली, नोकरी केलेली, देखणी सखी सून म्हणून गेली पण, सोन्याच्या पिंजरयात कैद झाली. नोकरी करायची नाही, कारण, त्यांच्या घरात हे आवडत नाही...मग, क्लासेस घेते तर, बाहेरच्या माणसांनी घरात आलेल चालणार नाही...नवरयाशी बोलते तर तो मुका गडी! बायकोला अटलिस्ट तिच्या खर्चासाठी महिन्याचे पैसे द्यायचे, तर हा पठया तेही करत नाही...स्वत: कमवणारया सखीवर काय ही वेळ? नव्या घरात पहिला हक्काचा माणुस असतो तो नवरा, त्याच्याकडेच ती काही लागल, खुपल सांगणार ना की शेजारयाला? माहेरी आलेल्या बायकोला रिकाम्या हाताने जाऊ द्यायच? ही कोणती पद्धत, आपल्या बायकोला काही आवडले, आपल्या बाळाला काही पाहिजे असेल तर, काय? माहेरही तिच्या हक्काच आहे, पण एक नवरा, बाप, जावई म्हणून त्याच काही कर्तव्य आहे की नाही? एक मुलगा म्हणून तो चांगला नक्कीच वागतोय पण, मग बाकीच्या नात्यांवर इतका अन्याय का??

एका परक्या मुलीला तुम्ही सून म्हणून घरी मापट ओलांडून आणता, मग तिला माणुस म्हणूनही वागवा. कारण, ती सुध्हा कोणाच तरी एकुलत एक पाखरुच असते ना हो!  ती काही पाळलेल कुत्र-मांजर नसते, चक्क मन असणारी तुमच्या आई, बहिणी, मुली सारखीच एक स्त्री असते. शेवटी ती मला एक सल्ला देऊन गेली, अरेंज मैरेज करुच नकोस, सार क्लियर करून मगच लग्न कर...अन तिच एक वाक्य अजुनही मला काळजात खुपत आहे, "मी तर अजिबात प्रेम करत नाही याच्याशी, माझ फ़क्त शरीर त्याच्याजवळ आहे, आत्मा नाही." काय म्हणाल याला, तीन वर्षापेक्षा जास्ती होऊन गेले तिच्या लग्नाला अन किती भयानकता आहे ही लग्न नावाच्या पवित्र नात्यातील!

हे झाल लग्नानंतरच, लग्नाआधीच काही नमुने सुरु होतात, लग्नानंतरही तुला जॉब करावा लागेल, घरी पण पहाव लागेल, आमच्या घरी कुकच्या हातच चालत नाही त्यामुळे तुलाच कराव लागेल, जस बायको नको कामवाली बाई हवी असते यांना, जी नॉन स्टॉप पायाला चाके लाऊन फिरेल...आणि काय तर तुझा जॉब टाइमिंग कमी करून घ्यावा लागेल, जशी कंपनी याच्या बापाचीच आहे ना! तुला नॉनवेज सोडाव लागेल, घरी कोणी खात नाही, बाहेर खाऊ शकतेस! अरे वाह रे बापुड्या जर ती वेजी असेल तर मात्र तुला पंचाईत, तुला शिकाव लागेल अन खावही लागेल,... हाउस वाईफ बनुन रहायच नाही, अरेच्या म्हणजे घर मैनेज करण तुच्छ काम आहे का? घर सांभाळायलाही डोक लागत, कोणत्याही ऐरया गैरयाच काम नाही ते, मुलांच्या मागे धावण, चिऊ माऊ करत जेवू घालण, त्यांना लहानाच मोठ करण, स्वत:च्या पायावर उभ करण, चेष्टा वाटतेय का ही?

लग्न दोन जीवांच मिलन, पण, त्यात दोन कुटुंब पण सामील असतात, एकमेकांना सावरून, नवीन नाती जुळवायची असतात...जुन्या नात्यांना नवीन परिघ द्यायचा असतो अन नव्या नात्यांना त्यात सामील करायच असत...हे गमक ज्याला आल त्याच्या घरी स्वर्गच नांदेल हे मात्र नक्की! डोळे झाकून बसू नका मित्रांनो परिघ वाढवा...

प्रिया सातपुते

Saturday, 19 July 2014

माझं फुलपाखरू


आज माझ्या फुलपाखराने अचानक मला एक प्रश्न केला, "आतु, फक्त गोरी माणसेच चांगली असतात का?" तो प्रश्न ऐकून मला थोडं खटकलच, कारण, अशीच वेगवेगळी वाक्यं माझ्या कानावर आली होती. बाहेर जाताना, जेव्हा मी तयार होऊन, एखादा प्रश्न विचारते, "कशी दिसतेय मी?" त्यावर तिचं आधी उत्तरं असायचं, तेही हसून, "खूप छान, तू छानच दिसतेस, किंवा वॉव, क्युट…" पण, हल्ली हे उत्तर थोडं बदललं होत, "ह्म्म्म तू गोरीच आहेस ना, मग छानच दिसणार…" आधी माझं लक्षच गेलं नाही! पण, काही दिवसांपूर्वी ती आणि तिचा मित्र माझ्यासोबत खेळत होते, तितक्यात मला वोटसअप्प वर मेसेज आला, तर माझ्या एका सिनियरने तिच्या बाळाचे फोटो शेयर केले होते, त्या बाळाला पाहून, तिचा मित्र झटकन बोलून गेला, "शी, काळ बेबी आहे." त्यावर मला खटकल, मी त्याला समजावून सांगितल, "अरे! बेबी सगळे क्युटच असतात, त्यात काळ-गोर असा भेदभाव नसतो. सगळ्या जगामध्ये वेगवेगळ्या रंगाची माणसे असतात, मग बेबी पण तशेच असतात, आता तू पण तर दुधाच्या शाईसारखा गोरा नाहीयेस ना? तुझ्यापेक्षा पण, कोणीतरी गोर असेलच ना? मग, त्याने तुला काळा मुलगा म्हणून चिडवलं तर ते तुला चालेल का?" यावर तो नाही म्हणून गप्प झाला पण फुलपाखराच्या चेहऱ्यावर प्रश्नाचं जाळ स्पष्ट दिसतं होत, तिला विचारलं पण, तेव्हा ती काहीच बोलली नाही. 

आज संधी सापडली होती, तिचा सुद्धा मूड मस्त होता, त्याचाच फायदा घेत मी तिला विचारलं, "त्रिशू, तुला कोणी काही बोललं आहे का?" 
माझं फुलपाखरू उडता उडताच म्हणाल, "नाही आतु"… 
मी- मग तू असा प्रश्न का विचारलास? नक्कीच कोणीतरी बोललं हो ना?
त्रिशू- ह्म्म्म, अग शाळेत तो  ***(मला इथे नाव टाकायचं नाही, कारण, एखाद्या लहान मुलाच नाव टाकण्याची माझी मुळीच इच्छा नाही!) आहे ना, त्याने मला, काळी म्हंटल, तो जास्ती गोरा आहे ना म्हणून तो सगळ्यांना काळच म्हणतो, अन मग मला वाईट वाटत, मी गोरी नाही ना म्हणून, बघ ना नेहा दीदी, रिया, वेदांत, टीया टीशा सगळे गोरे आहेत, आणि मीच फक्त काळी आहे, तू पण गोरी आहेस… 
एवढ सगळ बोलू पर्यंत या सात वर्षाच्या पाखराचा चेहरा केवढूसा झाला. तिचं सार ऐकून, मला पोटात गोळा आल्यासारखंच झालं. मग, मी म्हणाले, "कोण म्हणालं तुला काळी आहेस, तू खूप सुंदर, स्मार्ट आहेसं, बघ तुझे डोळे, किती बोलके आहेत, त्यांच्यात फक्त प्रेमच दिसतं. आणि तू व्हीटीश आहेस, काळी नाही… 
त्रिशू- व्हीटीश म्हणजे?
मी चक्रावलेच आता रंगांच्या चक्रात मला पडायचं नव्हत कारण मला तिच्यातला न्यूनगंड काढून टाकायचा होता रंगभेदाला खतपाणी न घालता. 
मी- अरे बाबा, आधी मला सांग, तुला कसं कळाल कि फक्त गोरी माणसेच चांगली असतात? 
यावर ती गप्प राहिली. 
मी- रंगाने माणूस चांगला की वाईट हे ठरवायचं नसतं बाळा, आता मग बाबा आणि पप्पा काळे आहेत म्हणून ते वाईट झाले का?
यावर ती पटकन बोलली, "नाही, ते खूप छान आहेत, आपल्यावर किती प्रेम करतात, आपल्याला खाऊ आणतात, खूप काम करतात, बिलकूल दमत नाहीत,… 
तिच्या चेहऱ्यावर उमटलेला निरागसपणा मला खाऊन टाकावासा वाटला. 
मी- माणूस चांगला त्याच्या गुणांनी होतो. 
त्रिशू- गुण म्हणजे?
मी- गुण म्हणजे गुड हबिटस, आता सांग मला गुड हबिटस काय असतात ते?
त्रिशू- सकाळी लवकर उठण, ब्रश करण, पॉटी करण, अंघोळ करण, स्कूल ला जाण, अभ्यास करण, मोठ्यांचा आदर करण,… 
मी- हे सगळे करणाऱ्याला कोण म्हणतो आपण? गुड गर्ल ऑर गुड बॉय! 
त्रिशू- हो
मी- मग, इथे कुठे रंग आहे??
त्रिशू- नाही (हसून)
मी- कावळा कोणत्या रंगाचा असतो?
त्रिशू- काळ्या!
मी- तुला ती गोष्ट माहितेय ना? पक्ष्यांना तहान लागलेली असते आणि सगळे सुंदर पक्षी माठातलं पाणी पिऊ शकत नाहीत, पण, कावळा काय करतो तेव्हा?
त्रिशू- तो दगड टाकतो, मग पाणी वर येते, आणि मग तो पाणी पितो. 
मी- मग, कावळा काळा असूनपण पाणी पितो का?
त्रिशू- कारण कि तो स्मार्ट असतो
मी- शाबास! म्हणजे रंगापेक्षा काय महत्वाच आहे? बुद्धी!
तिच्या डोळ्यांमध्ये लकाकी स्पष्टपणे दिसत होती. 
मी- अजून एक गोष्ट सांगते, एकदा अर्जुन, भगवान कृष्णांना प्रश्न विचारतो, "चांगल म्हणजे काय? अन वाईट म्हणजे काय? मग, कृष्ण, दुर्योधन आणि युधिष्टिरला भेटायला बोलावतात … 
त्रिशू- दुर्योधन, युधिष्टिर कोण? 
मी- ते दोघे कझिन्स असतात. 
त्रिशू- अच्छा! मग आतु?
मी- मग, कृष्ण दुर्योधनला सांगतात, तू मला एक चांगला माणूस आणून दे! आणि युधिष्टिरला सांगतात, तू मला एक वाईट माणूस आणून दे! मग, थोड्यावेळाने दुर्योधन येतो आणि सांगतो मला काही कोणी चांगला माणूस भेटला नाही,आणि तो निघून जातो. मग, युधिष्टिर येतो, तो म्हणतो, मला कोणीच वाईट दिसलं नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आपण जशे बघू तशेच लोकं आपल्याला दिसतात. आपलं मन चांगल असलं की आपल्याला सगळ छानच दिसत. 
त्रिशू- हो, म्हणजे आपण छान आहोत म्हणून सगळे आपल्याला छान दिसतात हो ना आतु?
मी- हो बरोबर! म्हणजे आता तुला काय कळाल रंगापेक्षा काय महत्वाचं असत ?
त्रिशू- बुद्धी, मन आणि गुड हबिटस! बरोबर आतु?
मी- हो…म्हणून जे वर्णभेद करत आहे त्यालापण आपण समजवायचं की असं करू नको, नाहीतर मला सांग मीच येऊन बघते त्या तुझ्या मित्राला… 
त्रिशू- खरचं आतु… अरे वाह, पण, वर्णभेद म्हणजे काय आतु?
सांगा याला काय म्हणू? ज्या बछड्याला वर्णभेदाचा अर्थ कळत नाही त्यान ते अनुभवलं सुद्धा… 

प्रिया सातपुते 


Friday, 18 July 2014

प्रियांश...४२


आज माझी सकाळ खूपच उशीरा झाली, डोक्यावरचं ओझं जेव्हा हलक होत तेव्हा, खूप छान झोपं लागते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मग, काय कॉफीच्या मगासोबत, काळ्याकुट्ट ढगांची साथ मिळाली…कॉफीच्या वाफा अन पावसाच्या धारा…खूप सही वाटत… एकटक त्या कोसळणाऱ्या पावसाकडे पाहून, मन अगदी रीत होऊन जात…काहीच उरत नाही…मन अगदी तल्लीन होऊन जात…पावसाच्या प्रत्येक थेंबाचा आवाज कानाशी येउन एक वेगळाच राग गात असतो…पावसाची एखादी झुळूक मग हलकेच येऊन स्पर्शून, या देहाला जिवंत असल्याची जाणीव करून देते…पावसालाच चावटपणा सुचत असावा म्हणून तो हळूच, एक दोन थेंबाना माझ्या गालापर्यंत पोहचवून देतोच…त्या धांदरटाला मला जाग करण्याची इतकी का घाई झाली होती…त्या सुंदर, रोमांटिक पावसाला श्वासात भरून घेऊन, मी माझा मुक्काम गैलरीमधून हलवला…

प्रिया सातपुते 

Tuesday, 15 July 2014

प्रियांश...४१

कालच मी आणि माझा एक मित्र (उच्चवर्णीय बर का…नाही तर काहींना मी पुन्हा उच्चवर्णीय द्वेषी वाटेन, म्हणून स्पष्टीकरण देतेय) वॉटसअप वर गप्पा मारत होतो,…त्याचा हळदीचा डीपी पाहून मी त्याला अभिनंदन केलं, तर कळाल की तो तर ताईच्या लग्नातला फोटो आहे…मग,  काय एकमेकांच्या लग्नाची इन्क्वायरी सुरु झाली… मी पण मग विचारून टाकलं कधी लग्न करतोयस? अर्थात त्याची गर्लफ्रेंड आहे…तर तो चक्कं नाही म्हणाला… का? वर त्याचं समर्पक उत्तर ऐकून मीही अवाक झाले… इथे एक महत्वाची बाब सांगायची राहिली ती मुलगी सुद्धा उच्चवर्णीयच आहे, पण, जात वेगळी…अडलं घोड इथे…उच्च असो वा काहीही…इथेही जातीने घाला घातलाच! मी त्याला विचारलं होत, "असं कसं जमत रे तुम्हांला? प्रेम एकावर अन लग्न दुसरयासोबत?" त्याचं उत्तर अत्यंत समर्पक होत, "दोघेही भित्रे असतील तर जमत सहज, घरच्यांचा विचार केला कि जमत, सिस्टीमचा विचार आला कि जमत आणि सर्वात महत्वाच म्हणजे जगायचं आहे म्हंटल की हे जमतच जमत!" 

काहींना हे उत्तर भित्र वाटेल पण, त्यातला गाभा खूप महत्वाचा आहे, माणूस उच्च जातीतला असो वा काहीही…इथे ना प्रेमाला थारा आहे ना जगण्याला…म्हणून तर निडर होऊन जे पळून जाऊन लग्न करतात त्यांच्या वाट्याला भयानक मृत्यू येतो…यालाच तर आपण "ऑनर किलिंग" म्हणतो…प्रेम ही किती सुंदर भावना आहे, दोन निष्पाप जीवांची एकमेकांवरची माया, तिथे ना धर्म महत्वाचा असतो ना जात, तिथे फक्त मानल्या जातात भावना, पण…इथे ही आडवी येते ती जात… अधून मधून रोज वाचायला मिळत प्रेमी युगुलांना राखी बांधायला लावली, विवाहित जोडप्यांना सुद्धा भाऊ बहिण करून टाकल, तर काहीची प्रेते लटकवली, तर काही कधीच दिसले नाहीत, दगडांनी ठेचून मारलं… किती भयानक आहे हे… 

प्रेम करणही गुन्हा होऊन बसल आहे तर…याच्यावर एकच उपाय आहे, आपण सर्वांनी ना गळ्यात एक पाटी अडकवून फिरायला हवं, धर्म अमुक, जात तमुक, घरी आंतरजातीय विवाह चालेल वा नाही, *Conditions Apply,…म्हणजे प्रेम करताना सेम जातीतला भेटायला सोप्पं होईल आणि हो तिथे फायानंशियाल कंडीशन पण टाकायला विसरू नका हं…

प्रिया सातपुते


Monday, 14 July 2014

प्रियांश...40

जात ही माणसाच्या मनात, रक्तात इतकी बिंबवली गेली आहे की काय सांगु, ती सावली सारखी सगळीकड़े पिच्छा पुरवते. एक घड्लेलच उदाहरण देते...

एका मैत्रिणीने ऑनलाइन वधुवर मंडलात नाव नोंदवल होत...दिसायला देखनी, कर्तबगार, पाच अंकी पगार...तिला एका समजातीय मुलाने लग्नासंधार्बत फोन केला, दोघेही बोलले, त्या मुलाचे वडिल तिच्याच जातीचे होते पण, आई उच्चवर्णीय जातितली होती, तिला अप्रूप वाटल, ही गोष्ट तिने मला लगेच सांगितली, मी तिला सावध केल पण, तिला ते रुचल नाही. दुसरया दिवशी त्या मुलाने तिला फोन केला नाही फ़क्त मेसेज करून नकार पाठवला. ऑफिस सुटताच तिने त्याला फोन लावला कारण, दोघांच बोलन आधीच झाल होत, त्याला ती पसंत होती, मग घडल तरी काय? तिला उत्तर हव होत, तो फोन उचलत नव्हता, शेवटी तिने त्याला मेसेज करून विचारल, काहीच उत्तर आल नाही. घरी पोहचून तिने पुन्हा एकदा फोन केला, त्याने तिला उत्तर दिल, त्याचा आवाज दबला होता, तो म्हणाला माझ्या आईला आंतरजातीय लग्न चालेल पण, खालची जात नको आहे, सॉरी बोलून त्याने फोन कट केला. ती एखाद्या मृत बाहुली सारखी उभी होती...

मनाच्या चिंधड्या, तिच्या गालावरून ओघळत होत्या, ती फ़क्त विचारत राहीली, "कधी संपणार हे प्रिया, किती चटके सोसायचे या जातीचे?" मी चेहरयावर एक कुस्हीत हास्य आणून म्हंटल होत, "आपल्या शेवटच्या श्वासाबरोबर..."

प्रिया सातपुते