Monday 31 October 2016

चारोळी

एक पिंटुकला दिवा
उजळवतो आसमंत सारा
खुलवतो प्रत्येक मनाला
गुंफतो नात्यांना साऱ्या...

शुभ दीपावली!
प्रिया सातपुते

Thursday 20 October 2016

प्रियांश...९०

प्रियांश...९०

स्त्रीचं आयुष्य हे कधीच तिच्या एकटीची मक्तेदारी असू शकत नाही! हवं तेव्हा कुठेही जाता यावं एवढा सुद्धा हक्क तिला नसतो. मनासारखं वागता यावं इतकाही नाही! तिला नेहमीच नात्यांच्या साखळदंडात जखडून ठेवलं जातं. ती कधीच स्वतःची नसते, अगदी कधीच शेवटच्या श्वासापर्यंत! तिला मनासारखं जगू देणारा पार्टनर जर तिच्या आयुष्यात आला तर ती एक स्त्री म्हणून वेगवेगळ्या रंगात त्याच्यासोबत जगू शकते!

प्रिया सातपुते

Wednesday 19 October 2016

चारोळी

एक क्षण तुझा
एक क्षण माझा
दोघांच्या मिठीत
दरवळतो तो आपला...😘

प्रिया सातपुते

Thursday 13 October 2016

प्रियांश...८८

प्रियांश...८८

आजकाल लग्नासाठी नवरा शोधणं खूपचं अवघड झालंय बाबा! अरेंज मॅरेज म्हणजे सगळ्यात भयंकर हॉरर मूवीच आहे! एका भल्या मोठ्या झाडाला नवरे नावाची फळे लागली आहेत, त्यातलं जे आवडेल ते तोडा, खा! नाही आवडलं तर फेकून द्या, दुसरं घ्या, तिसरं घ्या...! हा विचार एकदम भन्नाट आहे, पण रियल मध्ये न पचण्याजोगा! आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत मुलांचे अफेयरस प्रेम, टीपी असतात अन मुलींचे लफडं! जरी काहीही नसलं तरीही प्रश्नार्थक चिन्ह इथे येतंच! मुलगी बाहेर होती याचा अर्थ तिचा बॉयफ्रेंड असणारच, ती व्हर्जिन नसणारच! व्हर्जिन असूनही होणाऱ्या नवऱ्याच्या मनातली घालमेल फर्स्ट नाईट पर्यंत तरी जात नसणारच! बिचारा पुरुष किती रे त्याची घालमेल! स्वतः तो व्हर्जिन नसला तरी त्याला व्हर्जिन बायकोच हवी असते! व्हाय पीपल आर सो जजमेंटल? देवा सद्बुद्धी दे यांना!

काही दिवसांपूर्वीच एका मैत्रिणीशी बोलणं झालं, (😢 साला सगळे मला काऊनस्लर समजायला लागलेत, जो स्वतःच नवरा शोधत आहे😂) लग्नाआधी त्यांचं यावर बोलणं झालं होतं, सो कॉल्ड अफेयरस!
बिचारी तिला म्हणू कि तिच्या नवऱ्याला? दिसायला सुंदर, गोरी बायको तिचं अफेयर होत हे सल त्याच्या मनातून काही जात नाहीय! स्वःताला मॉडर्न म्हणून घेणारा, लग्न होईपर्यंत गोड गोड बोलणारा, अन लग्न झाल्यावर तिच्या भूतकाळाचे तिला टोमणे मारणारा हा प्राणी...स्वतःहून कुऱ्हाडीवर पाय मारतोय! मे बी याचं कधीच अफेयर नसावं, तिच्या पुढ्यात स्टाईल मारण्याच्या प्रकारात त्यानं जाणून बुजून देखील केलेलं असावं! म्हणून तो सत्य स्वीकारत नाहीय!
असं बिल्कुल समजू नका कि मी स्त्रियांची कड घेतेय, काही बायका सुद्धा असतात अश्या विचारांच्या, आमच्या फ्रेंड्सझोन मधल्या बऱ्याच जणांना बायकांच्या पुढ्यात हतबल व्हावं लागलं! हिचा का फोन आला तुला? मी आहे ना मग कशाला हव्यात तुला मैत्रिणी? मोजून पैसे देणाऱ्या, घर टू ऑफीस! तिकडेच का पाहिलस तू? सेम लाईक ऑब्सेस्ड गाईज!

आधीच्या काळात खूप बरं होत, कोणीच जास्ती शिकत नव्हतं, ना माणसाच्या अपेक्षा असायच्या, ज्याच्या पुढ्यात उभं केलं जायचं त्याच्याशी लग्न होऊन जायचं! ना प्रेम असायचं ना प्रश्न! ना मन ना भावना! शिक्षणाने सगळीकडे उद्धार केला! मनुष्याला स्वःताच्या भावना, मनाप्रमाणे जगण्याचं लायसन्स दिलं! मग, लग्नात देखील मला ज्याच्याशी कम्फर्टेबल वाटेल, त्याच्यासोबत प्रेमाने जगता येईल असा पार्टनर हवा असेल तर यात वावगं काय? इथे मग आडव्या येतात आपल्या परंपरा, जाती, पोटजाती, गोत्र, कुंडली! हा पसारा न संपणारा आहे! समोर असणारा आपला परफेकट् पार्टनर मग आपण तसाच जाऊ देतो, आपलं मन आपल्याला सांगत असतं शी इज द वन ड्युड! ही इज द वन बेब्स! पण, आपण ऐकतो आपल्या जवळच्या लोकांचं अर्थात कुटुंबाचं! आणि चूक करतो असं नाही, पण, आपला सोलमेट आपण गमावून बसतो! घरच्यांच्या खातीर मन मारून करून देखील टाकतो लग्न! आणि आयुष्यभर रिग्रेट करत राहतो काश....

प्रिया सातपुते

Tuesday 11 October 2016

दसरा उर्फ विजयादशमी

सण प्रेमाचा
सण मनाच्या श्रीमंतीचा
सण माणसाच्या चांगुलपणाचा
सण नात्यांची परिभाषा बदलण्याचा
सण जुनं खुपण विसरून एक होण्याचा
सण भरभरून सोनं लुटून प्रेम वाढवण्याचा...

माझ्या साऱ्या कुटुंबियांना, मित्र परिवाराला विजयादशमीच्या सोनमयी शुभेच्छा!

सोनं घ्या सोन्यासारखे रहा
अन, प्रेम घ्या प्रेमासारखे रहा!

प्रिया सातपुते

Sunday 9 October 2016

चारोळी

मन हे वेडे
का होते बावरे
तू समोर नसता
का होते कावरे...

प्रिया सातपुते

Friday 7 October 2016

प्रियांश...८७

मुंबईहून परतल्यानंतर पहिल्यांदाच नवरात्रीत आई अंबाबाईच दर्शन घेण्याचा मोह झाला. संपूर्ण दिवस दगदगीचा होता, त्यातून इंटेन्स वर्कआउट करून बॅटरी पूर्ण डाऊन होती, तरीही जेवण उरकून पप्पा, त्रिशा अन मी दर्शनास सज्ज झालो. संपूर्ण बालपण मंदिराच्या शेजारी गेल्यामुळे आताच कमर्शियल मंदिर हल्ली मनाला भावत नाही! तरीही आज का कोणास ठाऊक एक ओढ लागली होती.
रात्रीचे साडे दहा वाजून गेले तरी सुद्धा दर्शनाची लाईन भली मोठी होती, मुख दर्शन करण्यातच शहाणपणा सुचला, त्याची रांग तर काही केल्या पुढे सरकेना, शेवटी अकराच्या सुमारास गर्दी पुढे सरकू लागली, लहान असताना या मंदिराच्या प्रत्येक पायरीवर हक्काने उडया मारायचो, गरगर देवी भोवती फिरत रहायचो अन आज भाचीच्या हातात स्टोलंच एक टोक बांधून माझ्या हाताला दुसरं! तिला धक्के लागू नयेत यांतच माझं सार लक्ष, अन पप्पा आम्हां दोघींना धक्का लागू नये यात!
शेवटी कित्येक वर्षांनी मंदिराची पायरी ओलांडली, दर्शन झालं, दोन क्षण सुद्धा तिथे उभं सुद्धा राहू शकणार इतकी गर्दी! तरीही देवीने दर्शन दिलं! सारा भूतकाळ त्या काही क्षणांत मनाला भरून पावणार सुख देऊन गेला!
दर्शन करून भवानी मातेला भेटून जाऊ हे मनात का आलं कोणास ठाऊक? तिथे देवीचा गोंधळ सुरु होता, सुंदर होत, पण, पटकन दर्शन घेऊन बाहेर येताना एक लहान मुलगा एकटाच रडत मंदिरात येत होता, त्रिशा पटकन बोलून गेली, "आतू तो मुलगा रडतोय एकटाच!" आजुबाजूला पाहिलं त्याच्यासोबत कोणीच नव्हतं, जवळ जाऊन त्याला उचलून घेतलं, थोडी विचारपूस केल्यावर कळलं पाखरू हरवलंय! जेमतेम चार वर्षाचा मुलगा, नाव श्रवण सांगत होता, धड त्याला संपूर्ण नाव पण सांगता येईना! पप्पांच नाव काय? "पप्पा". मला उमगलं याला काही सांगता येणार नाही, पटकन, बाहेर गोंधळ चालू होता तिथे गेले, तिथल्या वादकांना घडलेला प्रकार सांगितला, ते अनाऊंसमेन्टला रेडी झाले, ते बाळ काही केल्या त्या माणसांकडे जाईना! माझा हात घट्ट पकडून धरला, अन मनात प्रश्नांचं काहूर उठलं, मनात एकच विचार होता, याचे आईवडील इथेच भेटू देत! पोलीस काकांकडे जाऊया का आपण? यावर लगेच मान डोलवत, डोळ्यात पाणी आणून बावरलेल्या नजरेने पाहत होता! एवढ्यात त्याचे पप्पा आले! माझ्या काखेतून झपकन उडी मारली त्याने त्याच्या पप्पांकडे! हुश्श! थंक गॉड! बस एवढाच विचार आला तेव्हा! पप्पांना शंका तुमचाच मुलगा आहे ना? पप्पा जाम चिडले होते, तरीपण कंट्रोल केलं त्यांनी! मी त्या काकांना विचारलं, नाव श्रवणच आहे ना याच? ते बोलले नाही, "सर्वेश"! मग, शेवटी उपदेश म्हणण्यापेक्षा काळजीपोटी मी त्यांना बोलून गेले, असं सोडू नका हात, आजकाल जमाना ठिक नाही. त्याला नाव सांगता यायला हवं, कुठेही जाताना त्याच्या पॉकेट मध्ये चिठ्ठी ठेवा त्यात नाव, फोन नंबर ठेवा! अथवा गळ्यात आयडी लावा!प्लिज!
त्यांनी आणि त्यांच्या बायको दोघांनीही आभार मानले, अन सर्वेशला बाय करून आम्ही घर गाठलं!

हे सगळं सांगण्याचा प्रपंच का? तुमच्या आजूबाजूस कोणतंही लहानमुल एकटं, रडताना, अथवा बावरलेल दिसलं तर प्लिज इग्नोर करू नका! त्याला तुमची गरज असू शकते, त्याला तुम्ही पुढील धोक्यांपासून वाचवू शकता! आपल्या संपर्कातील सर्वांनाच लहानमुल गर्दीत नेण्याआधी आयडी गळ्यात घालायला द्या अथवा चिठ्ठी द्यायला सांगा. त्यावर संपूर्ण नाव, फोन नंबर नमूद करा. घरातील मुलांना संपूर्ण नाव आणि फोन नंबर तोंड पाठ शिकवा! सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहानमुल आपली जबाबदारी आहेत हे विसरू नका!

प्रिया सातपुते