Friday, 28 March 2014

प्रियांश...२८

परवा अचानक हुक्की आली, भेल खायची…मग काय मोपेड काढली अन सुसाट दोडवली "राजाभाऊंच्या भेल" कडे. गर्दी होती पण, थोडी पांगली होती. मोपेड पार्क करून चटकन गड गाठला, भेल घेतली, पैसे दिले…साईडला उभी राहून पहिला घास तोंडात टाकला, अमृताचा स्पर्श मनामनाला व्हावा असंच वाटलं. खूप दिवसांनी भेल खायला मिळत होती ना म्हणून!  

माझ्या बाजूलाच मुलामुलींचा ग्रुप उभा होता, त्यांच्यापेकी बऱ्याच जणांच खाऊन झालं होत, तशी त्यांची भेलची कागदे त्यांनी रस्त्यावरच टाकून दिली…क्षणभर मला धक्काच बसला, इतके सुशिक्षित, चांगल्या घरची मुले मुली आणि…माझी नजर थोडी किळसवाणी झाली होती, माझ्यातला किडा मला डिवचू लागला, "हे काही बरोबर नाही, मुस्काट फोडायची इच्छा होत आहे, हेच शिकवणार का ते त्यांच्या मुलांनापण? कुठेही कचरा फेका, कुठेही थुंका आणि बरचं काही." 

माझ्या मनात विचारांचं सत्र चालूच राहिलं, शेवटच्या घासाबरोबर, मनात काही ठरवून मी, त्यांनी फेकलेले सारे कागदाचे गोळे उचलेले, ते पुन्हा त्यांच्या पुढ्यात टाकले, त्यांच्याकडे पाहून पुन्हा मी ते उचलून कचऱ्याच्या पेटीत टाकले. त्यांच्यासमोर पुन्हा जाऊन, एक झक्कास स्माईल दिली! त्या सगळ्यांचे चेहरे पटापट खाली पडले, माझ्या स्माईलला काय उत्तर द्यायचं हेचं त्यांना कळेना. शेवटी फक्त एकचं वाक्य म्हणाले, "प्लीज डोन्ट डू धिस अगेन!" मला उर्मटपणा अपेक्षित होता पण, जवळपास सर्वांच्या तोंडून फक्त एकंच शब्द निघाला, "सॉरी!" का कोणास ठाऊक विश्वास वाटत होता की ते पुन्हा असं कधीच करणार नाहीत. 

काय सांगू मी, मला तर स्वर्ग जिंकल्याचा अनुभव आला होता!

प्रिया सातपुते 

Wednesday, 26 March 2014

अनुराधा भोसले-अवनि


खूप दिवसांपासून मी या सामान्य स्त्री बद्दल माहिती शोधत होते, सर्वात प्रथम त्या नजरेत आल्या ते झी मराठीच्या "उंच माझा झोका" अवार्ड्समुळे, पहिल्यांदाच मला कळाल होत की "अनुराधा भोसले" कोल्हापुरात "अवनि" नावाची संस्था चालवत आहेत. पण, त्यांच्या बद्दल हवी तशी माहिती मिळत नव्हती. एक वेगळ आकर्षण मात्र वाटत होत त्यांच्याबद्दल, सांगता येणार नाही का? 


त्याचं दरम्यान माझं पासपोर्टच वेरिफ़िकेशन चालू होत. मी तिथे बसले होते अन एक पोलिस दुसऱ्या पोलिसांना सांगत होते अवनि कडून सहकार्याचा अर्ज आला आहे, तशे माझे कान टवकारले गेले. बालकामगारांना सोडवण्यासाठी त्या धाड टाकणार होत्या. पोलिसांनी अर्ज मंजूर केला. तशी मी आणखीनच विचारात पडले, बापरे, धाड! ग्रेट! हे दुसऱ्यांदा घडलं तेही अकस्मात, का? त्याचं वलय माझ्याभोवती जणू पिंगाच घालत आहे असचं वाटू लागलं. 


एखाद्या गोष्टीचा ध्यास लागला की मग आपण,  सगळ कसं पिंजून काढतो. थंक्स टू इंटरनेट, त्यांची एक मुलाखत नजरेस पडली. ग्रेट भेट- अनुराधा भोसले, वागले सोबतची. प्रत्येक प्रश्नागनिक त्याचं वलय वाढतच गेलं. परिस्थिती समोर हार न मानता तिच्याशी चार हात करणारी ही नायिका माझ्या नसनसात शिरली. 


दलित कुटुंबातला जन्म, धर्माच्या नावावर भोगलेले अपार कष्ट, संपूर्ण कुटुंबाने सोसलेली हलक्याची अवस्था, त्यातूनच ख्रिश्छन धर्मांतर, धर्मांतरामुळे त्यांना शिकता आलं, पण, तेही इतकं सोप्पं नव्हत, १०वी च्या परीक्षेची फी नव्हती म्हणून त्यांना शिक्षकांनी शाळा सोडून जाण्यास सांगितलं, तरीही त्यांनी हार मानली नाही, गावी जाऊन शेतमजुरी करून हात छिलले असूनही त्या काम करत होत्या, त्या मालकाने त्यांना बोलवून १० रुपये दिले आणि त्यांनी शाळेचं शिक्षण पूर्ण केलं. चर्चच्या आवारातील स्वच्छतागृहे साफ करून त्यांनी आपल्या मास्टर्स इन सोशल वर्क साठी पैसे जमवले खरे, पण, त्यांच्या मुंबईच्या या शिक्षणाचा सारा खर्च मिशनरीने केला. हे त्या आवर्जून सांगत होत्या, आयुष्यात ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली त्या सर्वांची नावे त्या खडाखडा सांगत होत्या. वैयक्तिक आयुष्यात त्यांनी आंतरजातीय विवाह केला, पण, तिथेही त्यांना दलित वागणूकच मिळाली. अशा वेळी बायका हार मानून जीव द्यायला मागे पुढे पाहत नाहीत पण ही रणरांगिनी आपल्या दोन पाखरांना घेऊन समर्थ पणे पुढे निघाली. आपण जे सोसलं ते दुसऱ्या कोणाच्याही वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी कोल्हापुरात "अवनि" संस्था सुरु केली. वीटभट्टी कामगारांच्या मुलांकरता शाळा भरवण, त्याचं बालपण कोणीही हिरावून घेऊ नये म्हणून त्या अतोनात झगडतात. अनाथ झालेल्या मुलांची जबाबदारीही त्यांची संस्था उचलत आहे. बेघर स्त्रियांनाही त्या मोलाची मदत करून त्याचं पुनर्वसन करत आहेत. हे करताना ही त्यांना खूप मानसिक त्रासांना सामोर जावं लागलं. पण, त्या डगमगल्या नाहीत, शेवटी काय तर, "हत्ती चालला की कुत्री भुकंतच असतात". त्यांच्या कामाची दखल गांधीजींचे नातू अरुण गांधीनी घेतली. दोन्ही संस्था मिळून खूप मोलाची कामगिरी बजावत आहेत. त्यांना आजही धमक्या येतात, आजही त्या लढतच आहेत. 

त्यांच्या चेहऱ्यावरच तेज अन तडफदारपणा त्यांच्या आवाजातून जसा जाणवतो तसाच त्यांच्या व्यक्तिमत्वातूनही जाणवतो. त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला त्यांनी जे उत्तर दिलं ते सर्रकन काळजात भिडलं आहे. "मी कोणालाच भीत नाही, अजिबात भीत नाही, जास्तीत जास्त काय करणार हे, मारून टाकणार ना? मारून टाका." दुसऱ्यांसाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणारे क्वचितच भेटतात, अन समाजासाठी सर्वस्व पणाला लावणारे सुद्धा! अशा या महान नारीस माझा त्रिवार सलाम!
डाईंग टू मीट हर!प्रिया सातपुते 

Monday, 24 March 2014

प्रियांश...२७


स्त्रिच्या मनाला उलगडताना, असा भास होतो की जणू कमळाची कळी; हलक्या हातांनी आपणच फुलवत आहोत…पण, अश्या कमळाला उमलवायला खूप कष्ट आणि मेहनत घ्यावी लागते…पण, एकदा का तू उमलली की ती साऱ्या आसमंताला मोहरून, प्रेममयी करून सोडते. स्त्रीमनाला समजणारे पुरुष क्वचितच सापडतात अन जपणारे तर त्याहूनही दुर्मिळ! पण, ज्यांना ती उमगली त्यांच्या सारखा भाग्यवान या जगात शोधूनही सापडणार नाही. 

प्रिया सातपुते 

Sunday, 23 March 2014

प्रियांश...२६


नाती ही पत्त्यांच्या बंगल्यासारखी असतात…नाजूक पण विश्वासावर उभी…जेणेकरून कोणताही वारा येऊन यांना पाडूच शकणार नाही. पण, दुर्दैवाने पत्त्यांचा बंगला हलक्याश्या वाऱ्याच्या झोतासोबत झर्रकण कोलमडून पडतो. नात्यांचं पण काही असंच असतं, वाऱ्याच्या झोतासारखी तिराहीत व्यक्ती येते अन त्यांच नात झर्रकन कोसळून पडतं…जसा त्यांच्यात कधी विश्वास नव्हताच की प्रेम? पण, अश्या तिराहीत व्यक्तीला दुषणे लावण्यापेक्षा त्यांना धन्यवादच दिले पाहिजेत कारण, त्यांनी तुमच्या मजबूत नात्याची खरी नीव तुम्हांला दाखवून दिलेली असते!

प्रिया सातपुते 

Saturday, 22 March 2014

गुढीपाडवा...एक चैतन्य!गुढीपाडवा…म्हणजे नव्या वर्षाची सुरुवात, अर्थात आपलं हेप्पी न्यू ईयर! आपल्यातला बऱ्याच जणांना याबद्दल काहीच माहित नाही, काहीजण घरी करतात म्हणून हजेरी लावतात, पण, खूप जणांना त्याचं महत्व माहितच नाही! म्हणून, ही पराकाष्ठा!

चैत्राची सुरवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. त्या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करून गुढी उभी केली जाते. गुढी अर्थात, एका शुचिर्भूत काठीला नवं कोर कापड अथवा नवी साडी बांधली जाते, तिला साखरेची माळ, कुडूनिंबाची पाने, आणि कलश बांधला जातो, हळद-कुंकू च्या साक्षीने चाफ्याची माळ चढवली जाते. अशी ही गुढी दारात पाटावर उभी केली जाते. यालाच "ब्रह्मध्वज" असेही म्हणतात. कारण, ब्रम्ह हा नव्या सृष्टीचं प्रतिक आहे, सूर्याची किरणे या गुढीच्या स्पर्शाने आपल्या घरात पडली जावीत, अन नवचैतन्याने संपूर्ण घरभर अन आपल्या मनात ही हे चैतन्य यावं हा यामागचा हेतू आहे. 
पूजा झाल्यानंतर कुडूनिंबाच्या पानांचा प्रसाद दिला जातो, कारण कडुनिंब औषधी आहे अन यावरूनच समजते आपल्या पूर्वजांनी किती चौकस बुद्धीने अश्या  सुंदर गोष्टी आपल्यापर्यंत पोहचवल्या आहेत. 


हा झाला मूळ उद्धेश. गुढीपाडव्याबद्दल पुराणात सुद्धा बऱ्याच कथा आहेत आणि त्यात सर्वमान्य आहे ती कथा अशी… चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी पाडव्याला प्रभू राम सपत्नीक आपल्या सर्व दलासमवेत अयोध्येला १४ वर्षांचा वनवास संपवून परत आले होते. त्या रावणावरच्या अतुलनीय विजयाचे कौतुक म्हणून रावणाच्या त्रासातून मुक्त झालेल्यांनी, राम आपल्या घरी परत आल्यामुळे आनंदीत झालेल्या नगर जनांनी, आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढ्या उभ्या केल्या. आपली घरेदारे सजवली, अन संपूर्ण अयोध्या सजली. 

नव्या वर्षाच स्वागत आनंदाने कराव अन जुन्या कडू आठवणींना विसरून साखरेच्या मालेसारख नववर्ष गोड गोड जावं हाच त्यामागचा उद्धेश. सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी गुढीला नैवैद्य दाखवून, नारळ फोडून, गुढी उतरवली जाते, साखरेची माळ सर्व लहान-मोठ्यांना प्रसाद म्हणून दिली जाते. 

प्रत्येक घरी थोड्या फार फरकाने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने गुढी उभारली जाते, नव्या वर्षाच्या स्वागतासाठी!

अशी ही गुढी सोनेरी किरणांनी तुम्हां-आम्हां सर्वांना प्रेममयी, आनंदमय, आरोग्यदायी, धनधान्य देणारी जावो हीच ईश्वरचरणी सदिच्छ्या!

नवं वर्षाच्या सुवर्णमयी शुभेच्छ्या!

प्रिया सातपुते 

Thursday, 20 March 2014

प्रियाटी!

   
    प्रिया सातपुते 

प्रियांश...२५

आपण लहान असायचो तेव्हा आपण खरखुर आयुष्य जगलो, ना आपल्याला म्यानर्सची चिंता, ना कोण काय बोलेलं याची…पण, आता साधं आपण आपल्या  मामा, काकाच्या घरात जाताना सुद्धा कचरतो, टवाळक्या करत घरभर हिंडणारे आपण, आता बोलायला सुद्धा कचरतो…किती वेगळे होऊन जातो नाही का आपण? जुन्या वळणाच्या बायकांच्या तोंडून एकेकाळी ऐकलेले शब्द मग आठवतात, "आताच काय ते खेळतील ही, मग या भावांची लग्न झाली की पहा, पाय पण पडणार नाही घरात." हाय रे केवढा मोठा हा विपर्यास! हे थोडं विचित्र वाटलं तरीही खूप मोठ्ठं सत्यच आहे हे, मानवी वृत्तीचं बेढब सत्यं! कधी कधी हेचं वर्तन सगळ्यांच्या हिताचच असतं!

प्रिया सातपुते

Tuesday, 18 March 2014

खंत!

आताच्या लहानमुलांकडे पाहिलं की आश्चर्य वाटत, त्यांना ना पैशांची किंमत आहे ना आई-बाबांच्या कष्टाची! सुट्ट्यांच्या काळात आई-बाबांना मदत सोडाच ते तर स्वतःवर उपकार केल्यासारखे खेळतात, अभ्यास करताना पण त्यांना वह्या पुस्तकांची कदर राहिलेलीच नाही. आपल्या हातून चुकून जरी पुस्तकं खाली पडलं की आपण ते उचलून नमस्कार करून छातीशी लावायचो अन आताची मुले पाय लागला तरी वाकायची नाहीत. ना मैदानी खेळांचं महत्व आहे, त्यांना तर फक्त टीवी एके टीवी, टीवी दुणे गेम, टीवी त्रिक मोबाईल,…हेचं माहित आहे. त्यामुळे त्यांची बुद्धी क्षीण होत चालली आहे, एकाग्रता नसल्यामुळे अभ्यासाच्या नावाने शंक होत आहे, लहान वयातच त्यांचे पाय, गुडघे, हात, पोट दुखत असतं…फास्ट फूड मुळे आपल्या पौष्टिक घरगुती जेवण त्यांना रुचत नाहीय अन त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या डीफिशीयनसी होत आहेत. 

सुट्ट्यांमध्ये आम्ही भावंडे लहान असतांना आमच्याच  कारखान्यात जाऊन कोल्हापुरी चप्पला बनतात कश्या ते पहायचो, पुठ्याच्या नंतर खरोखरच्या कोल्हापुरी चप्पला बनवायचो, आजोबांना दाखवायचो, दुकानांत जाऊन त्याचं चप्पला विकायचो अन मग आजोबा आम्हांला शाबासकी द्यायचे त्यातच आमचं पोट भरून जायचं, आम्हांला आताच्या मुलांसारखे गोष्टी गोष्टीला फूस लावायचं माहित नव्हत! आजोबांना गोल भाकरी कोण करून देणार? यात आमची स्पर्धा चालायची जिंकायचो तर आम्ही सारेचं, कारण आजोबा प्रत्येकाची भाकरी किती गोड बनली आहे ते पटवून सांगून सगळ्यांनाच खूष करायचे. कधी आम्ही दुकानात गल्ल्यावर बसायचो, येणाऱ्या जाणाऱ्या गिराहीकाना नमस्ते करायचो, बिलावर शिक्का मारून, "पुन्हा या म्हणायचो"…आज काल मुलांना थंक यु म्हणायला पण अवघड जात, किती तरी आई-वडील डोक धरून सांगतांना मी स्वतः पाहिलं आहे, "अरे, थंक यु म्हणायचं म्हणून सांगितलं आहे की  नाही तुला मी? जा म्हणून ये." ते मुलं टस नाही मसं नाही!

शेजारी शेजारी, लपंडाव, तकतुंबा, आईचं पत्र, कानगोष्टी, पळापळी, विष-अमृत, भवरभेंडी, भाजीवाला, टीचर टीचर, लंगडी, वाघोबा, कोकनेट…. अशे बरेचं खेळ खेळायचो, काही स्वतःच्या सर्जनात्मकतेमुळे नवे नवे खेळ तयार करयचो, त्यामुळे मेंदूला चालना मिळायची. पण, आताच्या मुलांमध्ये मेंदू सुन्न पडला की  काय असं वाटू लागलय. टीवी बघून अश्लिल गाणी तोंडपाठ होतात पण, कविता काही पाठ होत नाही, सलमान खानची फायटिंगमुळे प्रत्येक मुलाला तो तसाच व्हावा असं वाटत मग, त्यातून दुसऱ्या मुलांना मारहाण करण, मोठ्यांना पण हिरोपंती दाखवण सुरु होत. नको त्या वयात निरागसता हरवून बसतात ही आजकालची मुल!

याला कारणीभूत कोण? टीवी? वेळ न देणारे आई-वडील? टेक्नोलोजी? एकत्र कुटुंबच विलोप? की संस्कारांची कमी? मी तर म्हणेन, लहानमुलं तर आपण घडवू तशेच घडतात, मातीच्या गोळ्याला जो आकार देऊ त्याचं आकाराची बाहुली तयार होणार ना? आई-वडील दोघांनीही ठरवलं पाहिजे त्यांना त्याचं मुलं कसं घडवायचं आहे. टीवी, मोबाईल कोणत्या वयात आपल्या मुलाला दिलं गेलं पाहिजे? इंटरनेट वापरतांना किती वापर? फेसबूक कोणत्या वयात सुरु करायचं? लैंगिक शिक्षण, चांगला वाईट स्पर्श, स्वःसरंक्षण,…त्यांना काउच पोटेटो होऊ देऊ नका, खरया जगाचा आस्वाद घ्यायला शिकवा ना की वर्चुअल. 

प्रिया सातपुते प्रियाटी!

   
    प्रिया सातपुते 

Wednesday, 12 March 2014

अनुत्तरीत प्रश्न?


स्टार प्लस वर हल्ली एक नवीन सिरीज सुरु झाली आहे, "ईश्क़ किल्स" म्हणून…मी आणि वहिनी मराठी नाटकं पाहून उठणार इतक्यात, माझ्या नजरेस हे पडलं, पाहूया म्हणून आम्ही दोघी बसलो खऱ्या…पण, या विकृत नाटकात प्रेमाच्या नावावर सुरु असलेला हा वासनापट पाहून झटके नाही बसले कारण, आम्ही आमचे तर्क लावत होतो, आता खून होईल, मग होईल, पण, असं काही घडलं नाही. क्राईम पेट्रोल पाहून आपल्या सगळ्यांचीच डोकी थोडी जास्तीच चालतात हल्ली. विवाहबाह्य समंधांवर याआधी सुद्धा बरेचं चित्रपट, नाटके येउन गेली आहेत. मग, यात असं काय खासं होत की मी चक्कं या विषयाला हात घातला? 

सदर कुटुंब, श्रीमंत, नवरा-बायको आकंठ प्रेमात बुडालेले, इतकं सांर असूनही नवरा अथवा बायको स्वतःच्या नात्यात प्रामाणिक का राहू शकत नाहीत? जर खोलवर पाहिलं तर काहीजण मानसिक प्रेमाला आसुसलेले असतात, ते मग त्यांचा वेळ दारू, सोशल ग्येदरिंग्स, किटी पार्टी, मध्ये घालवू लागतात अन काही वासनेच्या आहारी जाऊन सगळंच उध्वस्त करून सोडतात. आणि या वासनेला "प्रेमाचं" लेबलं लाऊन मोकळे सुद्धा होतात. 

माणूस स्वतःला स्वैराचार करता यावा म्हणून लेबलं लावतो, इन ओपन रिलेशनशिप किंवा कॉम्पलीकेटेड…पण, विवाहीत माणसाच काय? तो तर काहीच लेबलं लावत नाही, शेवटी फिरून फिरून तो अथवा ती सुद्धा या ओपन रिलेशनशिपच्या जाळ्यात येऊन पडतात. काही त्यांच्या पार्टनरसना न कळता सार मारून नेतात, काही अडकतात अन कोर्टाच्या पायऱ्या चढतात. एवढ सगळ असूनही एक प्रश्न अनुत्तरीत राहतो, त्या पार्टनरची काय चूक? त्याने कुठे घोडं मारलं? तो किंवा ती तर प्रामाणिक होतीत ना? त्या तिसऱ्या व्यक्तीचं काय? माहित असूनही हा वासनेचा खेळ खेळताना त्यांना लाज कशी वाटत नाही? आणि समजा माहित नव्हत पण, कळल्यानंतरही डोळे कशे उघडतं नाहीत? जी व्यक्ती आयुष्यभराच्या आणाभाका घेऊन, विवाह नावाचं हे पवित्र बंधन चुटकीसरशी सोडू शकते मग त्या तिसऱ्या व्यक्तीला नाही का सोडू शकत? 

याची उत्तरे मिळण अवघडच आहे. एक कटूसत्य हेच की होरपळून निघते ती प्रामाणिक व्यक्तीचं!

देव सर्वांना सदबुद्धी देवो!

प्रिया सातपुते
Tuesday, 11 March 2014

अध्यात्माचा पंच-३

बरीच मित्रमंडळी म्हणत असतात, "चांगलं वाईट काही नसतं, आपणच त्या व्याख्या केलेल्या आहेत." इथे फक्त एकंच म्हणता येईलं, स्वतःच्या चुका दिसू नयेत किंवा स्वतःच्याच वर्तनाची लाज वाटते अशीच माणसे अश्या गोड पळवाटा शोधून काढून स्वतःच सांत्वन करतात. काय चांगलं अन काय वाईट हे ठरवण्याची बुद्धी परमेश्वराने सर्वांना दिलेलीच आहे. उदाहरण द्यायचं झालं तर, लहानपणापासून ऐकलेली एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते

भगवान कृष्णाने, अर्जुनाने विचारलेल्या चांगल्या वाईट व्याखेवर काहीच न बोलता, मनुष्यामात्रांना एक जिवंत उदाहरणं तयार केलं. कृष्णाने युधिष्ठीर आणि दुर्योधन दोघांना एक कार्य दिलं. युधिष्ठीरला सांगण्यात आलं, "दिवस संपण्याच्या आत, एक दुष्ट, पापी माणसाला घेऊन माझ्यासमोर ये!" आणि दुर्योधनाला सांगण्यात आलं, "सुर्य अस्ताला जाण्याआधी तू एका सदगुणी, पवित्र माणसाला माझ्यासमोर उभा कर." दिवस मावळला, दुर्योधन त्रस्त डोक्याने , जीवाचा आटापिटा करत परत आला अन कृष्णाला म्हणाला, "मला एकही सदगुणी मनुष्य भेटला नाही, माधवा!" त्यावर कृष्णाने हलकेच हसून त्याला आराम करायला पाठवून दिले. तोच पांडू पुत्र युधिष्ठीर आला, त्याचा चेहरा शांत, प्रसन्न, हसरा होता! तो कृष्णाला म्हणाला,"हे, श्रीकृष्णा! मला कोणीच दुष्ट व्यक्ती दिसलीच नाही, सगळेच चांगले वाटले मला." युधिष्ठिराला निरोप देऊन, दुरून सर्व काही पाहणाऱ्या पार्थाला जवळ बोलावून भगवान श्रीकृष्णाने म्हंटले, "मनाने स्वच्छ, पवित्र, सदगुणी मनुष्याला सगळीकडेच पवित्रताच दिसते, त्याला सगळीकडे फक्त चांगलंच दिसत! पण, मनाने विशुद्ध मनुष्याला सगळीकडे पाप अन दुराचारच दिसतो! हीच व्याख्या आहे पार्था चांगल्या वायटाची.

आपण कोणत्या गटात जायचं हे प्रत्येकाला माहितच असतं, पण, दुसऱ्या गटाचे गुण स्वतःमध्ये कधीच उतरवू नका! इथे मी हे स्विकारून पुढे जातेय की साऱ्यांनाच चांगल्या गटातच जायचं आहे. 
"चांगलं पहाल तर चांगलचं घडेल!"

प्रिया सातपुते  

प्रियांश…२४


शब्दांची दुनियाच न्यारी…कधी ते बागडायला शिकवतील तर कधी फुलपाखरासारख उडायला…कधी ते प्रेम करायला शिकवतील तर कधी विऱ्हातून कणखरपणे बाहेर यायला…कधी ते सुंदर गाणं बनून मनाला भूरळ घालतील तर कधी मनाला ध्यानात पोहचवतील…कधी ते आयुष्याचे सोबती बनतील तर कधी गहिरे-पक्के मित्र…कधी ते हसवतील, तर कधी विचारांत पाडतील, तर कधी रडायला सुद्धा लावतील…मन हलक करून ते कधी मनात जाऊन बसतील याचा नेम नाही…या शब्दांना दोन्ही हातांनी किती गोळा करू ? तितकेच ते वाढत जातात…ओंजळीत पकडले की निसटून जातात…त्यांच्या मागे धावले की पळत सुटतात…आणि शांत उभी राहिले की सारे मला येऊन बिलगतात… 

प्रिया सातपुते 

Monday, 10 March 2014

प्रियांश...२३


माणूस हा प्राणीच असा आहे कि त्याला तहान लागल्यावरच विहिरीची आठवण होते पण, आजकाल विहिरी असतात कुठे, बिसलरी मिळाली कि माणूस तहान भागवून घेतो आणि त्याची खरी तहान काय होती हे विसरून जातो. सांगण्याच तात्पर्य हेचं कि माणसाला जाणीव होते मात्र काही थोड्यांनाच रस्ता सापडतो विहिरी पर्यंत पोहचायचा, आणि त्यातूनही काही जणांनाच विहीर सापडते. अन ती विहीर समोर असूनही पाणी पिणारे सुद्धा अल्पमतच आहेत. शेवटी प्रत्येकाने त्याचे त्यानेच ठरवायचे असते की त्याला कोणत पाणी हवं आहे. आता या पाण्याचे ज्याचे त्याने अर्थ काढून मोकळे व्हा पण थोडा मनातून विचार नक्की करा. 

प्रिया सातपुते

Friday, 7 March 2014

काही मनातलं-महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छ्या!


जागतिक महिला दिनानिम्मित काही मनातलं सांगावस वाटतंय…लहान असतांना असा काही महिला दिन असतो हे माहितच नव्हत. लहान मुलांमध्ये कुठे आला लिंगभेद? ते तर आपण मोठी माणसे त्यांच्यावर बिंबवतो. खरचं! तुमच्या कानी पडली असतील ना काही अशी वाक्ये…तू मुलगा आहेस, मुलींसारख काय रडतोयस? तू बॉय आहेसं, बॉईज स्ट्रोनग असतात, हिरो असतात, बॉईज  गर्ल्स सोबत खेळत नाहीत, बाहुल्या मुलींसाठी असतात, दुध पिलं की शक्ती येते अन मग तू गर्ल्स ना वाचवू शकतो…काय यार तू जेवण बनवतोस? लाज वाटली पाहिजे तुला, मुलगी आहेस का तू? आईला काय मदत करतोस मुलगी आहेस का तू? अशी बरीचं वाक्ये सर्रास कानी पडतच आपण मोठे झालोय, झालोय ना? 

लहानपणापासून दोन पारडी आपण बनवतो, हे मुलांनी करायचं आणि हे मुलीनी! मुलींना कणखर, सक्षम बनवायचं सोडून आपण त्यांच्यावर बिंबवतो की त्या किती नाजूक आहेत, त्यांनी कसं पवित्र राहिलं पाहिजे, मुलांनी छेड काढली की लक्ष द्यायचं नाही, स्त्रिया असतातच कमजोर, सहन करत रहायचं, त्यांनी कसं घर सांभाळल पाहिजे, नवऱ्याचा मार कसा खाल्ला पाहिजे, माहेरी परत यायचं नाही, सासरचं तिचं खंर घर, तिथूनच बाहेर पडायचं ते चार माणसांच्या खांद्यावर वगैरे वगैरे आणि वगैरे…पण या सगळ्यात एक स्त्री असून आपण हे कशे विसरतो, "जी स्त्री पुरुषाला जन्माला घालते ती कमकुवत होईलचं कशी?" 

आज स्त्री प्रत्येक अनुषंगाने पुढे गेली आहे, पण, अजूनही पारडी समान व्हायचं नाव घेत नाहीत, याला कारणीभूत काही अंशी स्त्रिया सुद्धा आहेत, स्त्रिच स्त्रिची शत्रू बनून तिला जन्मायच्या आतच संपवून टाकते तर कधी हुंड्याच्या आगीत पेटवून देते, तर कधी ओझं समजून आपल्याचं मुलीला बाजारात विकायला मागे पुढे पाहत नाही…मग तर पुरुषांच्या मार्फत होणाऱ्या अपराधांच तर काय बोलणार, संपूर्ण देश होरपळून निघाला तरीही बलात्कारी उघड्या तोंडाने फिरतच आहेत. ना कोर्टात त्या अंधळ्या मूर्तीसमोर न्याय मिळतोय स्त्रियांना ना घरात मान…आज ही सुशिक्षित लोकांमध्ये सुद्धा घरगुती अत्याचारांच प्रमाण दिसून येत…रोज एक व्रण तोंडावर घेऊन ती कामावर जाते, रोज तिला मारलं जात आहे, पेटवल जात आहे,…हे कोणामुळे? या निगरगट्ट समाजामुळे! 

प्रत्येक आई अन बाबाने जर ठरवलं, "मी जन्माला घालणाऱ्या या परीला मला उडायला एक सुरक्षित आकाश द्यायचं आहे." तर हे का नाही होऊ शकणार? मुलींना मुलांप्रमाणेच शिकवा लढायला, स्वसंरक्षणाचे धडे घरातूनच मिळायला सुरु व्हायला हवं, मग मजाल आहे कोणा षंढाची! 

सर्व आईबाबांना, अन भविष्यात आईबाबा होणाऱ्या सर्वांना आवर्जून एक विनंती करते की, "आजच्या या महिला दिनानिम्मित ठरवा स्वतःच्या मनाशी माझ्या परीला स्वच्छंदी बागडायला मी एक निर्भय, सुरक्षित आकाश देणारच."

प्रिया सातपुते
Wednesday, 5 March 2014

प्रियांश...२२

आयुष्यं कोणासाठी थांबत नसतं,
ना प्रेमासाठी, ना घृणेसाठी,
ना माझ्यासाठी, ना तुझ्यासाठी,
ना स्वप्नांसाठी, ना वचनांसाठी,
ना काळासाठी, ना वेळेसाठी,… 

आयुष्यं म्हणजे वाहता झरा, अल्लड, अवखळ, सोन्याची बाहुली, हसणारी,…थोड्या थोड्या अंतराने नदीचं रूप घेणार हे आयुष्यं…यश-अपयश, नाती-गोती, विश्वास- घात सगळ काही पात्रात घेऊन पुढे जात…वाटेत जे येईल त्याला सुद्धा घेऊन जात कोणी अडवू पाहत असेल तर वेगळ्या वळणाने जात…मनाच्या मोठेपणात स्वतःच सागराच रूप दाखवणारं हे आयुष्यं…आरंभापासून घेऊन आलेल्या कित्येक गोष्टींना छिन्न विच्छिन करून टाकत तर कधी किनाऱ्यावर भिरकावून रिकामं होत…अन शेवटी अनंतात विलीन होत…

प्रिया सातपुते 

प्रियाटी!


    प्रिया सातपुते

Saturday, 1 March 2014

मला उमगलेली याज्ञसेनी... भाग-२


याज्ञसेनी एकटक चंद्राकडे पाहत होती, तिच्या मनात काहीच चालू नव्हत, कारण मला काहीच ऐकू येत नव्हत, कि तिला ते माझ्यापासून लपवायचं होत? मी आजूबाजूला पाहिलं, आम्ही एका भल्यामोठ्या राजदालनात होतो! आसपास कोणीच नव्हत, होते ते फक्त दिवे! बराच वेळ मी तशीच उभी होते, तिची पाठमोरी सावली माझ्या पायापर्यंत पोहचली होती. त्या सावलीत मी एकटक पाहत राहिले तोच मला याज्ञसेनीचा आवाज आला, मी झटकन मान वरती केली, ती तशीच स्तब्ध उभी होती, फक्त आवाज कानी पडत होता. "मला मरता ही येणार नाही! किती घोर विटंबना आहे ही, पाच पुरुषांची पत्नी! किती मोठा अधर्म आहे हा! तरीही मला हे करावं लागेलं! मी एका स्त्रिच्या पोटी जन्म घेतला नाही म्हणून इतकी मोठ्ठी किंमत मला मोजावी लागणार! महर्षी व्यास तर म्हणाले, माझ्यामुळे धर्म प्रस्थापित होईलं! पण, या महान कार्यास मला योजून ठेवताना माझातल हे मन सुद्धा लुप्त करायचं ना परमेश्वराने! पूर्वजन्मीचे भोग म्हणू कि वरदान? महर्षी व्यासांनी बाबांना माझी मागील जन्मीची कथा सांगितली, भगवान शिवांना प्रसन्न करून मी ज्ञानी, प्रेमळ, सुंदर, प्रतापी, बलवान,  पती मागितला, यावर भगवंताने मला पाच वेळा "तथास्तू" म्हंटलं! म्हणून का या जन्मी मी पाच पुरुषांची पत्नी बनू? हा कोणता न्याय आहे परमेश्वरा? हे तर पाप आहे, हे मला संपवावच लागेलं, मला स्वतःलाच संपवावं लागेलं."  मी घाबरून याज्ञसेनीकडे धाव घेतली, ती डोळे घट्ट दाबून उभी होती, तोच एक आवाज कानी पडला, "सखी!"

मी झपकन मागे वळून पाहिलं, भगवान कृष्ण आमच्याकडेच चालत येत होते. याज्ञसेनीने मात्र मान सुद्धा वळवली नाही, ना डोळे उघडले. ती आधीच्याच अविर्भावात उभी होती, जणू तिला माहितच नव्हत, आसपास काय सुरु आहे. भगवान कृष्णाचा चेहरा धीरगंभीर भासत होता, याज्ञसेनीच्या डोक्यावर प्रेमळपणे हात ठेवून त्यांनी पुन्हा तिला हाक दिली, "सखी." इतक्या वेळापासून सुरु असलेली तिची घालमेळ, तिच्या हुंद्क्यातून बाहेर पडली. शरीराच्या जखमेवर औषध लावता येत पण, मनाच्या जखमेचं काय? ती तर भळभळून वाहत राहते. काही क्षण विरले, अजूनही याज्ञसेनीचे अश्रू थांबले नव्हते. समजावणीच्या सुरात श्रीकृष्णाने म्हंटल, "सखे, आता तरी डोळे उघड, मी आहे ना! मी सदैव तुझ्यासोबत आहे". एखाद्या लहान मुलीला आपण समजावतो अगदी तशेच भगवान कृष्ण आपल्या सखीची समजूत काढत होते.
याज्ञसेनी हुंदके देत म्हणाली, "कृष्णा, मला मरता ही येणार नाही का रे? मागच्या जन्मीच्या कर्माची इतकी मोठी शिक्षा? कशी वरणार मी पाच पुरुषांना? कशी जगणार मी? हा अधर्म आहे, समाज मला काय काय बोलेलं? नाही नाही मला असह्य आहे हे"…कृष्णाकडे पाहून, दोन्ही हात जोडून ती त्याला विनवणीच्या स्वरात म्हणाली, "माझी सुटका कर यातून कृष्णा!" त्या निष्पाप याज्ञसेनीच्या आकांताने माझं मन पिळवटून निघालं, माझी नजर कृष्णावर खिळली होती.
कृष्ण आता गंभीर होत म्हणाले, "याज्ञसेनी, तू स्वतः शास्त्र जाणतेस, आत्महत्या हे सर्वात मोठ पाप आहे."
हे ऐकताच याज्ञसेनी लालबुंद झाली, प्रकशोभून म्हणाली, "पाच पुरुषांशी एका स्त्रीने विवाह करणे हे पाप नाही का कृष्णा?"
कृष्ण- हो! पापच आहे, अधर्म आहे हा.
याज्ञसेनी- आणि तरीही तू मला या दरीत लोटतोयस? तुझ्या सखीला?
कृष्ण- शांत हो सखे, तुला दरीत जाऊ देईन का मी?
याज्ञसेनी- मग हे काय आहे ?
कृष्ण- सखे, तू या जगाच्या कल्याणार्थ अवतरीत झाली आहेसं, तुझ्यामुळे या सामान्य लोकांना एक न्यायप्रिय राजा मिळेल, एक अशी सम्राज्ञी मिळेल जी या पृथ्वीतलावर धर्माचं राज्य प्रस्थापित करण्यास कारणीभूत ठरेल, जी धर्माच्या पाच स्तंभांना एकजूट करेल. सखे, एक स्त्री, जी सदैव अग्नितेजासारखी पवित्र आहे, जी अलौकिक आहे, बुद्धिमान आहे, जी धर्माला जाणते, तिचं हे शिवधनुष्य पेलू शकेल ती तुचं आहेसं! तुझ्या व्यक्तिरिक्त या जगात अशी स्त्री कधीच होणार नाही. सखे, तू धर्माचं प्रतिक आहेसं, हे पाच पांडव धर्माचे पाच स्तंभ आहेत. ज्ञान, प्रेम, समर्पण, धैर्य, न्याय यांव्यतिरिक्त धर्माची स्थापना होत नाही. तू या पांडवांच्या एकात्मतेच प्रतिक आहेस. सखे तू आणि पांडव या धर्मस्थापनेच्या महान कार्यसिद्धीसाठीच या भूतली अवतरलेले आहात. या भूतलावर प्रत्येक मानवाच कार्य नेमलेल आहे, ते पूर्णत्वाला नेण हेचं तुमचं कर्तव्य आहे. 
याज्ञसेनी शांत झाली होती, तिच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव दिसू लागला. तिच्या चेहऱ्यावरच प्रश्नचिन्ह जाणून कृष्ण म्हणाले, "सखे, तू कोणतीच काळजी करू नकोसं, मी सदैव तुझ्यासोबत आहे."
याज्ञसेनीच्या मनातला भक्तीचा झरा तिच्या डोळ्यात स्पष्ट जाणवत होता. कृष्णाचं सखी प्रेम अन याज्ञसेनीची  भक्ती, मोगऱ्याच्या सुगंधासारखी माझ्या श्वासांत भिनली. भक्ती अन मैत्री मधलं हे प्रगाढ प्रेम पाहून माझ मन आनंदाने भरून गेलं.

प्रिया सातपुते