Thursday, 6 December 2012

आई



आई फक्त तुझ्यासाठी......

आताच मी फेसबूकवर एक छानशी "आई" नावाची कविता वाचली आणि विस्मृतीच्या आड लपलेली काही पाने नकळत फुंकर देऊन उघडी झाली. 
मी पहिली मध्ये असेन माझी आई मला तिच्या आईजवळ ठेऊन बाबांना मदत करायला जायची, अर्थात त्यावेळी एकंदरीत परिस्थिती इतकी सोप्पी नव्हती, पण, लहान असल्यामुळे मी या आई नावाच्या पात्राला  कधी समजूच शकले नाही. तशी ती वेळीही  नव्हती समजून घेण्याची. पण, शाळेतल्या एका कवितेतल्या आईसारखी माझी आई कधीच शाळा सुटल्यावर यायची नाही, ना दारात उभी राहून वाट पहायची की घरी  गेल्या मला कुशीत घेईल. त्यावेळी मी आईचा खूप मार देखील खाल्ला...पण, एक फुलपाखरू जसं  बोटांवर त्याच्या मऊ  स्पर्शाचे रंग ठेऊन उडून जात, अगदी तसं मला देखील कळून चुकल होत कि आई तर हे सार माझ्याकरताच करत आहे. 
शाळेत निबंध लिहायचा होता, "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी"....हा निबंध लिहताना आपसूकच माझं  मन मी त्यात ओतल होत म्हणूनच तो निबंध अजूनही माझ्या स्मरणात आहे. माझ्या आईला मी जाणलं होत म्हणूनच त्या निबंधाला खूप वाहवाही पण भेटली.

आई हा शब्दच जादूमय आहे, "आ" म्हणजे "आत्मा" आणि "ई" म्हणजे "ईश्वर", यांच्या संयोगातूनच आई बनते. आई खरीखुरी जादुगारच असते, नऊ महिने ती आपल्याला उदरात जपते, आणि हीच जगातली सगळ्यात मोठी जादू आहे...ती एका पिटुकल्या जीवाला बोलायला, चालायला शिकवते. ती तिच्या संस्कारांच्या शिकवणीतून शिवबा ला छत्रपती बनवते तर कधी आपल्या दुबळ्या बाळाला जगण्याच बळ देते. 
या आईच्या प्रेमाखातर देव-देवी सुद्धा मनुष्य रूपाने जन्मास आल्याच्या पुराणातल्या गोष्टी आपण ऐकतच आलोय. 
आई बद्दल जितकं लिहू तितकं कमीच आहे, म्हणूनच बोलतात, "आईवर निबंध लिहायला समुद्राची शाई  आणि आकाशाचा कागद सुद्धा अपुरा पडेल."

अजूनही मी आईच पूर्ण मन कधीच समजू शकणार नाही, पण, मी रोज प्रयत्न करतेय तिला समजून घेण्याचा. आई मला ऐकवत असतेच की "तुला नाही कळणार आता, आई हो एकदा मग कळेल आई म्हणजे काय असते." सो ट्रू !! 

प्रिया सापुते