Friday 21 December 2012

मी सुरक्षित आहे???



आज मला समजत नाही आहे, कि एक स्त्री म्हणून मी या देशात किती सुरक्षित आहे??
आई-बाबांच्या पंखांत लहानाची मोठी झाले, थोडस जग पाहण्याच्या लालसेपोटी मी घराबाहेर पडले, ज्या जगाला मी सुंदर समजलं, ते खरच खूप सुंदर होत...कि माझा भ्रम होता हेच मला कळत नाही. 

रोज वर्तमानपत्रात येत, स्त्रियांवरचे अत्याचार...त्याच विश्लेषण होत, प्रत्येक ठिकाणी एकचं  चर्चा असते...घरगुती अत्याचार, बलात्कार, लैंगिक छळ, अश्या बातम्यांनी पूर्ण वर्तमानपत्र खचाखच भरून गेलेलं असत.

स्त्री हि निसर्गाची सर्वात अप्रतिम निर्मिती आहे. ती कधी आई बनून मायेची पाखर घालते, तर पत्नी बनून आयुष्याच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ करते, बहिण बनून खोड्या काढते, आणि छोटीशी गुलाबाची कळी बनून संसाराची वेल बहरून आणते. पण, माणसांमधली वैश्यभावना इतक्या खालच्या पातळीला पोहचली आहे कि ते या कळ्यांनापण कुसकुरुन टाकत आहेत. हे आधीपासून होत आल आहे, फरक हा आहे कि आता मिडिया या सगळ्या बाबींना प्रकाशझोतात आणत आहे. पण, फक्त हेच करून काही होणार आहे का??

या सगळ्या गोष्टीना आळा बसलाच पाहिजे, या निर्घुण माणसांना जगण्याचा काहीच अधिकार नाही.
ती फक्त २३ वर्षाची होती, आणि तिच्यावर हल्ला करून बलात्कार केला गेला, हा शब्द इथे लिहितानाच मला इतका त्रास होत आहे, तिच्यावर ते बेतल, तेही महान भारत देशात, जिथे मोठ मोठ्या पार्टी भारताच्या संस्कृतीचा टेंभा मिरवत आहेत. आता ती कधी सामान्य आयुष्य जगु  शकेल? बलात्कार हा शरीराचा जितका होतो तितकाच मनाचा, तिच मन कधी सावरेल? पण, ज्यांनी हे कृत्य केल, त्यांना तर मस्त काळा मुकुट घालून पोलिसांनी आणलं, अश्या नराधमांना इतक्या मानाने कस मिरवलं  जाऊ शकत? सोडून द्या त्यांचे काळे मुकुट आणि सोडा ती आंधळी तराजू पकडणारी मूर्ती, जनताच करू दे निवाडा.
हि २३ची होती, एक ३ वर्षाची, ज्या कळीला अजून जग काय आहे हेच माहित नाही त्यांना सुद्धा हे नराधम सोडत नाहीत मग कायदा काय कामाचा? फक्त फाशी देऊन काही होत नाही, यांना तर शिवकालीन शिक्षा द्यायला हव्यात,...आणि त्याचं थेट प्रेक्षपण व्हाव, जेणेकरून आयुष्यात कधीच अशी हिम्मत होणार नाही कोणाचीच.

प्रिया सातपुते 

No comments:

Post a Comment