Monday 29 November 2021

झुंज भाग - २

अजय दोन मिनीट तसाच बसून होता मग अचानक एक चैतन्य सळसळल्याप्रमाणे तो कार मधून उतरला. त्याची पावले आज जड वाटत नव्हती, अगदी लगबग तो लिफ्टमध्ये पोहचला, ३० व्या मजल्यावर बटन दाबताना त्याचा चेहरा आज रिल्याक्स वाटत होता. डोअरबेल वाजताच धावत पळत चिमुकल्या पावलांनी वरद जाळीदार दाराजवळ येऊन गोड हसून, बोबड्या बोलात बोलत होता, "काका, आला! कशा आहे तू, थकला आहेस का? बॅग दे!" एवढ्याश्या चिमुकल्या हाताने तो त्याची बॅग खेचून घेण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होता, तसं अजयने वरदच्या हातात बॉटल पकडवली! अगदी दिमाखात तो ती सगळ्यांना दाखवत, किचनमध्ये घेऊन गेला. अजय आईशी दोन शब्द बोलून फ्रेश होण्यासाठी रूममध्ये निघून गेला. तो रूममध्ये जाताच, आई हळू आवाजात बाबांना म्हणाली, "आलाय बघा तो, विचारा त्याला पवारांच्या मुलीबद्दल की मी विचारू ?" त्याच्या प्रेमभंगानंतर आई त्याच्या लग्नासाठी जास्ती काळजीत पडली होती. वयाने वाढत जाणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांची दुखणी त्यानांच ठाऊक! बाबा काहीच बोलले नाहीत, नुसतेच मान डोलावून ते पुन्हा, फुलाला सुगंध मातीचा नाटकात गुंतून गेले. तसा आईचा पारा चढला, "नुसती नाटकातल्या पोरांची लग्न बघा तुम्ही, स्वतःच्या पोराचं तर काय पडलेलंच नाही तुम्हांला!" चिडून आई किचन मध्ये दूध बंद करायला निघून गेली. तेवढ्यात फ्रेश होऊन अजय किचन मध्ये आला. अजय - आई, कॉफी कुठे ठेवलीय ग ! आई - आता कशाला रे पाहिज कॉफी तुला ? अजय - आज काम करावं लागणार आहे रात्रभर, जागाव लागेल म्हणून आई - हे घे, मी करू का ? अजय - नको दे मी करतो, जा तू झोप जा! आई - बरं ! म्हणून आई तिथेच रेंगाळली. अजयला कळून चुकलं होत आजही कोणी मुलगी आली असणार आणि त्याबद्दल हिला बोलायचं असणार. अजय - आज कोणाची मुलगी पहायची आहे? दे आण, तो बायोडेटा इकडे तशी आई हरणासारखी लगोलग पळाली आणि तो कॉफीमध्ये साखर टाकण्याआधीच प्रकट सुद्धा झाली. तसं अजयच तोंड जरा वाकडचं झालं. तरीही आईच मन राखण्यासाठी तो बघतो म्हणणार इतक्यात त्याचा फोन रिंग होऊ लागला, तसा तो थोडा आईसमोर बावचळला आणि कॉफी घेऊन रूम मध्ये सटकला. अजय बच्चा कंपनीकडे पाहून डाफरून बोलला, "झोपा आता!" तशी पिल्लावळ बेडरूममध्ये पळून गेलीत. विजेत्याची ढाल घेऊन अजय रूम मध्ये आला, दरवाजा बंद करून, फोन बघणार तोच, जॉर्जचा फोन लॅपटॉपवर रिफ्लेकट होऊ लागला. कॉल आन्सर करून त्याने फोन मध्ये पाहिलं, रियाचा मिस्डकॉल येऊन गेला होता, तसं त्याने तिला मेसेज करून दिला, "ऑन कॉल, वील टॉक लेटर." तसा इन्स्टंट रिप्लाय व्हाट्सअपवर आला, "हाय! रिया हियर.." आणि कॉफी चा फोटो तिने शेयर करून स्माईली टाकली होती. अजय ने कप निरखून पाहिला, "हॅपिनेस इज बीइंग इन लव्ह!" त्याच्या कपाळाची शीर थोडी ताठली आणि त्याच्या अहंकाराने त्याला रिप्लाय करू दिला नाही. कॉल दोन तास सुरु होता, त्याच मन आणि हात सारखे तिचा स्टेट्स चेक करत होते, मोटिव्हेशनल कोट्स तेही तिने लिहले होते, त्याला थोडा डाऊट आला तसा कॉलच्या मध्येच त्याच्यातला स्पाय देखील जागा झाला होता, एका पाठोपाठ त्याने रिया नावाचं पुस्तक शोधून काढलं होत...तसा रियाचा मेसेज आला, "सिम्स यु डोन्ट वॉन्ट टू टॉक, टेक केयर, गुड नाईट!" बोलून तू ऑफलाईन गेली आणि तिने चक्क त्याचा नंबर डिलीट केला. अजय चा इगो जरा जास्तीच डिवचला गेला होता. जॉर्जशी बोलण्यात त्याच मन लागत नव्हतं, अजून एक तासाने कॉल संपला तसा तो झपाटल्या सारखा प्रत्येक सोशल नेटवर्किंग साईट वर तीच प्रोफाइल शोधून काढून तिला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत होता पण, त्याला कुठे माहित होत तोच रिया नावाच्या पुस्तकात गुरफटून चालला होता. तिच्या कविता, स्टोरीज, ब्लॉग त्याला तिच्याकडे खेचून नेत होत. अजयला कळण्याआधीच त्याने आयुष्याच्या नव्या कादंबरीचा श्री गणेशा करून दिला होता...त्याच्या हातात पेन तर होता पण, शाई मात्र रियाकडे होती! जणू, तीच त्याचं सारं आयुष्य लिहणार होती... निळ्या शाईने की काळ्या ? क्रमश: प्रिया सातपुते

Friday 19 November 2021

झुंज भाग -१

 


रेड सिग्नलवर थांबलेल्या गाडीतुन अजय स्वतःच्या आयुष्यातल्या ग्रीन सिग्नलची वाट बघत होता. हिरानंदानी मधून त्याची कार जणू त्याच्या भुतकाळाच्या वळणांवर पुढे जात होती, मात्र त्याच्या चेहऱ्यावर त्याच सूतमात्र देखील दिसतं नव्हतं. ना चेहऱ्यावर हास्य, ना डोळ्यात तेज, दिसतं होता तो वयाआधी पोक्त झालेला अजय. जो पेशाने सॉफ्टवेयर इंजिनियर होता, जागतिक टॉप टेन कंपनीमध्ये वर्षाला ३० लाखांच्या वर कमाई करत होता. ज्याच्या खांद्यावर संपूर्ण घरादाराचं ओझं जुंपलं होतं. आई-वडील, लग्न झालेला बिनकामाचा लहानभाऊ, त्याची बायको आणि पोर. असं इन मीन ते सात माणसांचं कुटुंब, ज्यांच्या सुखासाठी तो दिवसातले चार तास झोपून मर मर राबायचा. नागपूरच्या पुलगांव मधून अकरावीला बाहेर पडलेला अजय, डोळ्यात ढीगभर स्वप्ने घेऊन बाहेर पडला. अकरावीला मुंबई गाठलेला अजय जणू, मनाशी चंग बांधून आयुष्यातल्या प्रत्येक परीक्षेला सामोरा गेला अन एका विजयी योध्य्याप्रमाणे तलवारीच्या धारेप्रमाणे येईल त्या प्रसंगांना पुरून उरला.

अचानक धाडकन कारच्या काचेवर एक लहान मुलगी हात मारून त्याला गुलाब दाखवून मंद स्मितहास्य करून पाहत होती. अजय ने काच खाली घेऊन तिच्याकडून गुलाबाचा गुच्छ घेत तिच्या हातांवर पैसे आणि एक पुस्तक ठेवलं. तिच्या टपोऱ्या डोळ्यांनी ती त्याच्याकडे पाहत, "थँक यू भैया !" बोलून पुढे जात पुन्हा मागे येऊन म्हणाली, "भैया, पुस्तक पुढच्या आठवड्यात देईन, चालेल ना ?" त्यावर अजय म्हणाला, " अरे, मीरा तुझ्यासाठीच आणलं आहे ते, तुझ्याकडेच ठेव." तेवढ्यात सिग्नल ग्रीन झाला होता. नाईलाजास्तव त्याला कार पुढे न्यायला लागली. मीराच्या टपोऱ्या डोळ्यात मोठे मोठे मोती भरून आले होते हे मात्र नक्की! हात जोडून ती देवाला प्रार्थना करते, "देवा, भैयाला खूप आनंदी ठेव, हल्ली तो हसतच नाही रे!" हे बोलून ती पुन्हा त्या नव्या पुस्तकाला निहारू लागली होती. असा हा अजय, अनोळखी लोकांवर जीव लावणारा मग विचार करा, कुटुंबावर किती प्रेम करत असेल ?

कार पार्किंग मध्ये लाऊन, तो शांत बसून होता, आपसूकच फोन चेक करताना त्याच लक्ष गेलं, त्याला आलेल्या भारत मॅट्रिमोनी चॅट नोटिफिकेशन विंडो वर, इंटरेस्ट मेसेज होता, जो एका रिया नावाच्या मुलीकडून आला होता. फोटो मध्ये मुलगी सुंदर दिसत होती, त्याला साजेशी दिसेल अशी पण, त्याच्या मनात काय आलं देव जाणे, त्याने तिला रिप्लाय मध्ये लिहून टाकलं, हॅलो! मी गेले चार वर्षे एका मुलीसोबत रिलेशनशिप मध्ये होतो.

रिया - सो ? तो तुझा भूतकाळ होता.

अजय - मी तिच्यासोबत फिज़िकली इन्व्हॉल्व्ह होतो.

रिया - अच्छा!

अजय - तुला तरीही माझ्याशी बोलायचे आहे का ?

रिया - इट्स नॉर्मल, चार वर्षाच्या रिलेशनशिप मध्ये असणारच ना!

अजय - हम्म..

रिया - आर यू ओके ?

अजय - येस, आय एम फाईन, थँक यू !

रिया - गुड ! लाईफ ईज टू शॉर्ट टू क्राय!

अजय - हम्म..

रिया - टेक अ चिल पिल यार, आय एम नॉट गोईंग टू ईट यू

अजय - नो यू कान्ट, आय नो दॅट 

रिया - हाऊ ?

अजय - यू आर व्हेजिटेरियन!

रिया - लोल

अजयला रियाचा पोझिटिव्ह अप्रोच फार आवडला, सहसा तो प्रोफाईल डबल चेक करून, सोशल मीडियावर स्पाय करून प्रत्येक मुलींना बोलण्याआधीच रिजेक्ट मारायचा...त्यात देव जाणे रियाशी कसा एवढं चॅट करत होता.

रिया - आय एम नॉट ईन हरी, इफ यू नीड फ्रेंड पिंग मी ऑन धिस नंबर ७२८*******

आणि ती लॉग आऊट झाली. त्याला कळलंच नाही काय झालं, असं कधीचं कोणत्याही मुलीने त्याला झटकल नव्हतं. तिच्या प्रोफाईल पुन्हा एकदा वाचून काढला, तिला फेसबुक ला सर्च केलं...त्याच्यातला स्पाय जागा झाला होता. कारण काहीही असो त्याचा ईगो दुखावला गेला होता. त्याने रियाचा नंबर डायल केला,..रिंग जाणार तेवढयात त्याने कट केला. पुन्हा धाडस करून त्याने फोन केला...

रिया - हॅलो अजय !

अजय शॉक झाला, त्याला कळलंच नाही, हिने कसं ओळखलं.

रिया - आय नो यू गोईंग टू कॉल , हाऊ आर यू डूड ?

अजय थोडा जास्तीचं शॉक झाला छोट्या शहरातील मुलगी इतकी छान इंग्लिश कशे बोलत आहे. स्वतःला सावरत तो बोलला, " आय एम फाईन, थँक यू! हाऊ आर यू डुईंग ?"

रिया - ओह, जोई स्टाईल (हसून) हाऊ वॉज युअर डे ?

गेल्या कित्येक वर्षात त्याला हा प्रश्न कोणी केलाच नव्हता.

अजय - डे वॉज हेक्टिक, यू नो वर्क...

रिया - सिम्स लाईक यू आर टायर्ड, लेट्स ह्याव कॉफी टुगेदर, व्हॉट से ?

रात्रीचे ११ वाजून गेले होते, अजय मनातच हसला.

अजय - एजन्ट इट टू लेट फॉर कॉफी ?

रिया - नॉट रियली, यू मस्ट ह्याव ह्यड डिनर, आय नीड कॅफीन! नीड टू फिनिश सम वर्क 

अजय - नाऊ ? व्हॉट यू वर्क ?

रिया - आय एम फ्रिलान्स रायटर

अजय - रियली? यू ह्यवन्ट मेन्शन इट 

रिया - यू ह्यवन्ट आस्क्ड 

अजय - आता विचारतोय ना ?

रिया - ओह माय, मराठी येते तुला ?

अजय - हो 

रिया - लेट्स चेक हाऊ फ्लूयंट यू स्पिक इन मराठी 

अजय - नो, लेट्स स्टिक टू इंग्लिश ओन्ली 

रिया - व्हाय ?

अजय - आय एम नॉट कम्फरर्टेबल स्पिकिंग मराठी

रिया - आय गेट इट, यू आर स्केयर्ड

अजय - ऑफ ?

रिया - यू माईट क्राय ऑन माय शोल्डर दॅट्स व्हाय 

अजय - ओह प्लिज, असं काही नाहीये, माझा मराठी एक्सेंट तुझ्या इतका चांगला नाहीये म्हणून 

रिया - (हसून) छान, तर बोलतो आहेस!

अजय - हम्म 

रिया - जातोयस का घरी आता? कि गाडीतच बसणार आहेस ?

अजय चपापून, " तुला कसं..?"

रिया - आय ह्यव पॉवर्स, आय एम फ्रॉम अनादर प्लॅनेट...जादू जादू...

दोघेही हसतात..

अजय - तू ना...

रिया - आय नो आय एम द बेस्ट

अजय पुन्हा हसतो!

रिया - जा घरी, कॉफी करून फोन कर

अजय काही बोलण्याआधीच, रियाने सी या बोलून फोन ठेऊन पण दिला.

पाच वर्षांत पहिल्यांदाच तो मनापासून हसला होता. त्याने दीर्घ श्वास घेतला, मन रीत व्हायला त्याला आज एक अनोळखी व्यक्ती समोरून साद घालत होती...

क्रमश:

प्रिया सातपुते 


Friday 26 March 2021

प्रियांश...

 आपण सर्वांनी आपणास आता मॉडर्न नावाच्या कक्षेत सामावून घेतलं आहे. मग ती स्त्री असो वा पुरुष आपण सगळेच बाविसाव्या शतकाकडे पाहतो आहोत आणि जगण्याच्या नव्या कक्षा रुंदावत आहोत. हे कितीही प्रमाणात खरं असलं तरीही शिकलेली सवरलेली मुले-मुली लग्न नावाच्या बंधनात सामावून जाताना मात्र बुरसटलेल्या जुनाट रितिभातींच्या चौकटीतच राहून आपापल्या सासरच्या माणसांशी तुटक वागायला सुरू करतात. मग भलेही दोघे कितीही शिकलेले का असेनात, कधी कधी वारंवार मन दुःखर होऊन विलिप्त होऊन माणूस संपूर्ण बदलून जातो तर अहंकार दुखावला की माणूस नागाच्या फण्यासारखा चिडून फुत्कारत राहून आयुष्य पुढे ढकलत ढकलत जगतो! ज्यांना असं ओढून ताणून जगण्यात रस नसतो ते आपापले मार्ग वेगळे करून आयुष्यात पुढे निघून जातात हेच बरे नाही का?

सुखी संसाराचा मंत्र खरे तर आईवडिलांनी शिकवण्याची गरज आताच्या पिढीला तरी नाही पडली पाहिजे कारण, आधीच्या पिढ्यांची दुखणी पहातच मुले मोठी होतात. त्यात सोलवटून निघालेल्या मित्रमैत्रिणींची जिवंत उदाहरणे डोळ्यासमोर असूनही यांची सदविवेकबुद्धी जागी कशी होत नाही याचंच अप्रूप वाटतं. शिकून माणूस शहाणा होतो, योग्य काय, अयोग्य काय याची जाणीव होते पण, ती जाणीव नेमकी स्वतःच्या पार्टनर समोर कुठे गायब होते देव जाणे! ही गडबड नेमकी होते कुठे? जेव्हा तुम्हाला दोनाचे चार, सहा, आठ...अशे कान वाढत जातात तिथेच खरी गल्लत होते! मग तुम्ही डॉक्टर का असेनात तुमची अक्कल मसनातच जाते हे मात्र नक्की! लग्न हे दोन व्यक्तींचं नातं आहे, त्यात दोन्ही व्यक्ती एकमेकांना देत राहिल्या तरचं ते नातं पुढे पर्यंत टिकेल!  मुलांना अगदी लहानपणापासून प्रत्येक गोष्ट हातात मिळत राहते, लग्नाआधी आई करते नंतर बायको! गफलत होते कुठे? लग्नामध्ये असणाऱ्या या दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या संस्कारात, वातावरणात वाढलेल्या असतात! काहींच्या घरात आजही मुलींना परक्याच धन म्हणून आई लहानपणापासून वेठीस धरून, स्वयंपाकापासून ते सारी कामे शिकवते. पण, सगळ्याच कुटुंबात मुलींना अशी वागणूक मिळत नाही, त्यांनाही मुलांसारखे खेळायला बागडायला मिळते, अश्या वातावरणातील मुली जेव्हा वेगळ्या वातावरणात जातात तेव्हा मोठी गडबड होते. ज्या गोष्टी आजतागायत तिने कधीच केल्या नाहीत, त्या सगळ्यागोष्टी ती प्रेमापोटी पार्टनरसाठी करते त्यात त्याला काहीच अप्रूप वाटत नाही कारण? त्याने ते गृहीत धरलेले असते, त्यात त्याला काही नवीन वाटत नाही आणि त्यामुळेच तो तिने केलेल्या प्रत्येक गोष्टीला गृहीत धरून नात्याचं गणित कोलमडून टाकतो कारण, तो गृहीत धरतो की ती हे सगळं लहानपणापासून करते आहे त्यामुळेच तो तिचं कौतुक सोडा, मान अथवा मन देखील राखू शकत नाही!

नात्यांची खरीच अफलातून मज्जाच आहे जिथे आपण आपल्या पार्टनरला एखादी गोष्ट तू का केली नाहीस म्हणून त्याचा किंवा तिचा पाणउतारा करून सोडतो तीच बाब समजा उलटली किंवा सोयीनुसार गोष्टी झाल्या नाहीत की मग नेमकं यावेळी आपण गृहीत धरून बसतो की घेईल तो किंवा ती समजून! आपण नेहमीच ऐकत आलोय संसार म्हणजे गाडी आणि त्याची चाके म्हणजे नवरा बायको पण, एक चाक गृहीत धरून बसलं की दुसरं फिरेल मग संसाराची गाडी धावेल का? मागील वर्षी एक प्रोजेक्ट आला होता लिखाणासाठी, रेफरन्ससाठी स्त्री पुरुष दोघांच्याही मुलाखती घेण्यात आल्या होत्या, विषय तसा भन्नाट होता, भारतीय कुटुंब विभाजन आणि घटस्फोटांचे वाढते प्रमाण! खरं सांगू का, घरोघरी मातीच्या चुलीप्रमाणे सगळीकडे एकच शिमगा पेटलेला असतो तो म्हणजे "मुलाचे लग्न"! प्रोजेक्टचे रेफरन्स वाचताना खरं तर मला पुरुषांसाठी खूप वाईट वाटलं कारण, ते खूप पिसतात आणि त्याला जबाबदार देखील ते स्वतःच असतात! गृहीत नावाच्या मित्राशी केलेली मैत्री त्यांना महागात पडते कारण, सर्रास ठिकाणी ते त्यांचं मन, बुद्धी न वापरता ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून स्वतःच स्वतःच्या पार्टनर पासून दूर होतात. हल्ली घटस्फोटांचे प्रमाण का वाढलं आहे? कारण, मुलीकडून गोष्टी गृहीत धरल्या जातात पण, त्याच मुलांकडून मिळत नसल्यामुळे मानसिक संतुलन ढासळल्यामुळे मुली टोकाचा निर्णय घेऊन मोकळ्या होतात! आमच्या जिममध्ये फॅमिली कोर्टात जज असणाऱ्या काकूंनी एकदा आम्हां तरुण मुलांमुलींसमोर हा विषय मांडला होता, घटस्फोट घेण्याची कारणे कशी असतात, हा माझ्या घरच्यांना एकदाही विचारत नाही, कोणी घरी आले तरीही हा ऑफिसला जातो सुट्टी घेत नाही पण, तेच याच्या घरचे आले की मलाही सुट्टी घेऊन घरी बसवतो, ही माझ्या आईवडिलांना फोन करत नाही, माझ्या नातलगांना विचारत नाही! मग समोरून मुलगी बोलते हा तरी कुठे माझ्या आईवडिलांना फोन करतो, साधे ते आजारी आहेत हे सांगूनही तो विचारपूस करत नाही. माझ्या आईवडिलांना पण वाटत जावयाने घरी यावं दोन चार दिवस राहावं पण, हा नेहमी तोऱ्यातच असतो. काकूंच्या म्हणण्यानुसार ९२% घटस्फोट हे घरच्यांच्या दबावामुळे होतात, का? तर दोघांमध्ये भांडण होण्यामागे घरचेच मूळ कारण ठरतात! मानसिक, शारीरिक त्रासाला कंटाळून मुली माघार घेतात तर काही ठिकाणी वेगळे राहण्यासाठी नकार मिळाल्यामुळे देखील घटस्फोट होत आहेत. हे म्हणजे असं झालं दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! भावाचे-बहिणीचे, मुलाचे-मुलीचे लग्न झाले तर तो किंवा ती आम्हांला पैसे देणार नाही किंवा आमची प्रॉपर्टी आम्हांला मिळणार नाही, कारण काय तर पार्टनर हुशार निघाला आणि मग? आंतरिक हेवेदावे, स्त्री मत्सर अश्या ना तश्या अनेक गोष्टींमुळे पतीपत्नीमध्ये वितुष्ट निर्माण केले जाते. एकमेकांशी संवाद नाही, सगळं माहीत असूनही विश्वास नाही, प्रेम करणारे पार्टनर मिळूनही, पार्टनरला गृहीत धरल्यामुळे, एकमेकांना दुखवण्याचा नादात ते एकमेकांपासून कायमचे दूर होऊन जातात!

मनाला बोचणाऱ्या प्रत्येक गोष्टी बोलायला शिका, ऐकायला शिका, समजून घ्यायला शिका, वेळेत सॉरी आणि मिठीची मेलेडी पार्टनरसोबत खायला शिका! गैरसमजाच्या जाळ्यात अडकण्याआधीच पार्टनरला विश्वासाच्या गाडीत घेऊन लॉंग ड्राईव्हला निघा! दुखावल असेल खूप तर फुंकर घालून कशी चालेल? भरपाई करायला शिका, भरभरून प्रेम करायला शिका!
लग्नाला बंधन मानून बसाल तर फसाल! पार्टनरशिप मानाल तर चॅम्पियनशिप जिंकाल!

प्रिया सातपुते