Thursday, 31 October 2013

प्रियांश...६


रंग माझा गोरा…जणू तो चंद्राला सुद्धा लाजवेल…चंद्रामध्ये तर काळे डाग सुद्धा आहेत…तो काय माझ्याशी स्पर्धा करणार? नशीबवान आहे मी…कारण?…मी एक गोरी मुलगी आहे…देवाने मला गोऱ्या रंगाने जन्माला घातलंय! जिथे लाथ मारेन तिथे सोनंच पडेल…कारण?…मी गोरी आहे!…चार-चौघात काय, संपूर्ण गर्दीचं लक्ष फक्त माझाकडेच असते…अश्या या गोऱ्या रंगाच्या छटा किती विकृत असतात हे सुद्धा लवकरच जाणवलं मला… शेजारच्या काकू त्यांच्या सावळ्या मुलींना बोल लावताना ऐकलय मी…काळी जन्माला आलीय किती सोन आणि पैसे द्यावे लागणार हिच्या लग्नात! म्हणून त्यांना ओरडताना लहानपणापासून पाहतेय…तिला तोंडाला वेगवेगळ्या क्रिम्स लावलेलं रोज पाहतेय…आज तरी गोरी होईन म्हणून ती रोज आरशात पाहते…एक दिवस तर तिने रागात येउन आरसाच फोडला… त्याचे तुकडे तिच्या हातात घुसले…ते काढताना तिच्या डोळ्यातलं सावळ्या रंगाच दुः ख स्पष्ट दिसत होत…तिला समजावताना माझा गोरा रंग वरचढ झाला असंच वाटलं मला…मला देता आलं असतं तर मी देऊन टाकला असता तिला माझा रंग!!… तेवढ्यात काकू खेकसत आल्या…हि क्रिम लावून बघ अन लवकर गोरी हो…जणू गोरा रंग त्यांना सर्व काही देऊन जाणार होता…लग्नाची सावळ्या रंगाची मुलगी किती जड असते हे तुम्हा गोऱ्या मुलींना काय कळणार, हे काकूंच वाक्य माझ्या गोऱ्या रंगाला पहिल्यांदाच बोचलं…मनाच्या सुंदरतेसमोर रंगच मात करतो का?…मनात चाळवल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तर बरेचं दिवस शोधली…पण, हाती काही लागलच नाही…रोज आरश्यासमोर उभ्या राहणाऱ्या त्या सुंदर सावळ्या मुलीला कुढताना पाहिलं…रंगाच्या मोहात पडलेल्या कमनशिबी मुलांना पाहिलं…तिच्यावर हसून जाताना त्या षंढांना हे पण जाणवलं नाही का ते सुद्धा काळे-सावळेच आहेत?…आयुष्यात रंग इतका का महत्वाचा असतो? माझ्याच विचारांशी खेळत दिवस उडून गेले…रोज सकाळी खिडकीतून दिसणारी ती आज पंख्याला लटकत होती…धावत पळत तिच्यापाशी पोहचले…निपचित पडलेला तिचा सावळा रंग हसून बोलत होता…प्रिया, बघ सांगितलं होत ना मी तुला गोरा रंगच जिंकणार…

One of the most difficult article, I had written so far...Colour discrimination is among the most disgusting thing that human itself created! Whatever may be the colour, we all are creation of God! Please, respect that and say no to it!

प्रिया सातपुते  

Wednesday, 30 October 2013

प्रियांश...५


नदीच्या वाहत्या पाण्यात सगळचं वाहून नेलं जात…पुरूषाच मनही  अगदी असंच आहे…तो त्याच्या मित्रांशी भांडेल, अदळाआपट करेल, मारामारी करेल, शिव्या सुद्धा घालेल…पण, दुसऱ्याच क्षणाला तो हे सगळ विसरून नव्या क्षणाला सामोरा जाईल…तो जास्ती भावनिक गुंतागुंतीत पडतच नाही…त्यामुळे अश्रू काय असतात हे त्यांना माहितच नसत…अश्रूंची क्षमता किती भयानक आहे…हे त्यांना कळत पण तेव्हा ते हतबल असतात…याच्या अगदी विरुद्ध स्त्रियांचं असतं…त्या नदीतल्या भोवऱ्या सारख्या असतात…त्या भोवऱ्यात कोणी अडकल कि ती व्यक्ती एक तर गतप्राण होऊन सुटू शकते किंवा…त्या भोवऱ्याच्या स्वाधीन होऊन…ती भांडेल, त्यातला शब्द अन शब्द मनाशी पक्का बांधून ठेवेल…अगदी दोन-तीन वर्षानंतर सुद्धा ती नव्या भांडणात जुन्या गोष्टी उकरून उकरून काढेल…ती ठरली भावनिक, त्यामुळे तिच्या मनावरच आघात होतो…शरीराच्या जखमा भरून निघतील पण, मनाच्या प्रत्येक नव्या भांडणात सोलवटून निघतील…अश्या वेळी मन मोकळ करायचा एकंच मार्ग तिच्याकडे असतो तो म्हणजे…अश्रू…एकदा का ते तिच्या डोळ्यातून बाहेर आले कि ते असंख्य तलवारी बनूनच पुरुषावर हल्ला चढवतात…वेळीच त्याने प्रेमाची ढाल बाहेर काढली नाही…दोघांच्या संसाराची लक्तरे निघाल्याशिवाय राहत नाहीत…

प्रिया सातपुते

Tuesday, 29 October 2013

प्रियांश...४एखाद्या स्त्रिच्या मनाचा थांगपत्ता लावण म्हणजे, आगीत तेल ओतण्यासारखाच झालं…ती काय विचार करतेय?…ती माझ्याबद्दल काय विचार करत असेलं?…तिच्या व्यक्तिगत आयुष्याची फोडणी चाखण्यासाठी पुरुष अर्थात परपुरुष किती त्या केविलवाण्या युक्त्या लडवतो…प्रत्येक युक्ती मध्ये त्याची वासनेने लक्तरं झालेली नजर स्पष्ट दिसत असतेच…इतकं सार करून काहीच करता येत नाही या हताशेपोटी मग तो एखाद्या जनावरासारखा तिला ओरबाडून काढतो…कधी मित्र म्हणून तर कधी एकतर्फी प्रियकर तर कधी जवळचे नातेवाईक…स्त्रिच्या वासनेचा अंत लागत नसतो…पण, त्याच जोरावर हि अबला नारी भल्या भल्या महापुरुषांना कुरुक्षेत्रात भस्मसात करू शकते…हे विसरून चालणार नाही… 

प्रिया सातपुते

Sunday, 27 October 2013

प्रियांश...३माणूस हा सर्वात मोठा धुर्त प्राणी आहे…तो स्वतःच्या सोयीने प्रेम करतो…तो स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो…कधी तो प्रेमाला आंधळ नाव देऊन, त्याच्या लेबलं खाली काहीही करतो…मग समोरची व्यक्ती आपल्यावर प्रेम करो अथवा नाही, त्याला फक्त त्याचा स्वार्थ साधायचा असतो…प्रेमात अन युद्धात सगळ माफ असतं असं बोलत तो निष्पाप माणसांना दुखवतो…जनाची सोडा तो तर मनाची सुद्धा लाज ठेवत नाही…तिथे या गोष्टींना काडीचीही किंमत नसते…प्रेम आपला स्वभाव आहे…पण, तो हेचं विसरला आहे…प्रेमाला वेगवेगळ्या झालरी असतात…कधी मैत्रीची तर कधी नात्यांची तर कधी नव्या गुंफल्या जाणाऱ्या नात्यांची…या सगळ्यांना काडी लाऊन तो स्वार्थाने बरबटलेल्या वासनेच्या आहारी जातो…व्यभिचार त्याचा परममित्र बनून जातो…स्वार्थाच्या या आगीतून निरपेक्ष प्रेमाचा शिडकावाच माणसाला वाचवू शकतो हे मात्र नक्की… 

प्रिया सातपुते

प्रियांश...२लहानपणापासूनच मला दिवाळीची क्रेझ आहेचं नाही, का कोण जाणे?…वर्गातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिवाळी म्हंटल कि एक वेगळाच भाव ओसंडून वाहायचा…मला ते फक्त सुट्टीच अप्रूप होत…काही गोष्टी बालमनाला नेहमीच खटकत राहिल्या त्यामुळे नाही राहिलं ते अप्रूप…रस्त्याने जाताना भिक मागणाऱ्या त्या मुलांना पाहिलं कि स्वतःचीच लाज वाटायची?…आम्ही नवीन कपडे घालून मिरवणार आणि तुम्ही अश्या फाटक्या, तुटक्या, अर्धनग्न कपड्यातच फिरणार…आम्ही फटाके फोडणार आणि त्याचं कचऱ्यात तुम्ही झोपणार…जास्ती उरलेला फराळ, जेवण रस्त्यात पडणार अन ते तुम्ही खाणार! रस्त्यात झोपलेल्या गरीबांवर गच्चीतून फटाके फोडून जोरजोरात हसणारे शेजारी…अस करू नका…म्हणणारा माझा केविलवाणा आवाज मी सहा-सात वर्षाची असताना दबून गेला…पण, दबला नाही तो आतला आवाज…ज्याने मला चूक आणि बरोबर ओळखायला अन बोलायला शिकवलं…अन्याया विरुद्ध बोलायला शिकवलं…भिक मागणाऱ्या चिमुकल्यांना ओरडण्यापासून ते त्यांना आयस्क्रीम खाऊ घालताना एकंच विचार येतो, उद्या परत ते भिक मागतील का?…मुंबईत लोकल मधली ती चिमुकली मला रोज काही न काही विकायला यायची कारण तिला माहित होत मी ती वस्तू विकत घेणारच…शाळेत जातेस का पासून ते काल का नाही आलीस? अशे प्रश्न आपसूकच तिला विचारले जायचे…कधी ती स्माईल करायची तर कधी बाय! पण एक समाधान होत कि ती भिक नाही मागतेय… ती तिच्या कष्टाची मेहनत आहे…जर का आता देवाने मला इच्छा मागायला सांगितली तर एकंच मागण राहिलं…सर्वांना एकसमान, सुखी, समाधानी कर…कुठेच या लहानग्यांच आयुष्यं हरवून नको जाऊदे…त्यांना बागडू दे…शाळेत जाऊ दे…दिवाळीला त्यांना पण सुंदर कपडे दे…राहायला एक टुमदार घर… पोटभर खायला दे…त्यांना पण एक मानाच आयुष्य दे…त्यांना त्याचं बालपण दे… प्लीज देवबाप्पा एवढ करशील ना रे?… 


प्रिया सातपुते 

Saturday, 26 October 2013

प्रियांश...१दिवस हातातून निसटून जात आहेत…पण, तरीही तो, तिला कधीचं सांगणार नाही…माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे! मला तू हवी आहेस!…कारण, त्याचा खोटा अंहकार…हा त्याच्या अन तिच्या प्रेमापेक्षाही मोठ्ठा आहे का?…का नाही समजत त्याला, एकदा दुसऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात पडलं कि ती त्याची कधीचं राहणार नाही…त्याला वाटेल ती सुखात असेलं, श्रीमंत घरात राज्यं करत असेल…शरीराने ती दुसऱ्याच्या स्वाधीन होईलं, त्याचं दिवशी तिच्यातली ती मरून जाईल… रोज असंख्य वेळा ती तिच्याच प्रेमाच्या विश्वासघातामुळे विवस्त्र होत राहिलं…रोज ती पहाटे उठेल, घर आवरेल, सर्वांना काय नको ते बघेलं,…मनात मात्र कुढत राहिलं…घरात कोणी नसताना कोंडून ठेवलेला हुंदका फोडेल…स्वतःच्या चेहऱ्यात ती तिलाच शोधेल…स्वतःला दुषणे लाऊन, स्वतःवरच हसेलं…निष्पाप प्रेमाच्या शिक्षेपोटी ती स्वतःलाच संपवून टाकेलं… 


प्रेमात पडलेल्या माझ्या मित्रांना अन मैत्रीणीना एकचं सांगते, प्रेम करताय तर ते निभवा, कोणाच्याही भावनांशी खेळू नका, इथे ती लिहिलय पण कधी कधी तो सुद्धा असतो…प्रेम ही सुखद भावना आहे, तिला तसचं खुलू द्या!

प्रिया सातपुते 

Wednesday, 23 October 2013

मी हरवले तेव्हा???


आपल्या सर्वांच्याच आयुष्यात काही मज्जेशीर न विसरता येण्यासारख्या काही घडामोडी घडतात. कालांतराने आपण त्या विसरून जातो, आणि कधी नकळत कॉफीच्या सुगंधात त्या नजरेसमोर येउन उभ्या ठाकतात. अशीच एक गंमत मला आठवली. मी चार वर्षाची होते, आईचा पदर धरून रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी मी राखी आणायला गेले होते, मी म्हणजे अर्थात आई! खूप गर्दी होती, वेगवेगळ्या राख्या पाहत आम्ही पुढे जात होतो, आईचा पदर चुकून हातून सुटला अन मी मागेच राहिले, आई हाक देत होती, "पिया… पिया…. ", आवाजाच्या दिशेने कूच करत मी पुढे सरकले पण, मग गर्दी आणि रस्ता क्रॉस कसा करणार म्हणून मागेच उभी राहिले. आईच्या हाका येत होत्या पण, मी हतबल होते, रडू पण येत नव्हत!

एका चष्मेवाल्या काकूंनी मला पाहिलं, माझी भेदरलेली नजर पाहून त्यांना कळून चुकलं पाखरू हरवलं आहे! महालक्ष्मी मंदिरात त्यावेळी पोलिस इतके नसायचे, त्या काकू मला महाद्वार रोडच्या पोलिस चौकीत घेऊन गेल्या, पोलिसांच्या स्वाधीन करून त्यांनी त्यांची नैतिक जबाबदारी चोख बजावली. थोड्या वेळाने पोलिस काका मला घेऊन राजवाडा पोलिस स्टेशन कडे निघाले. कॅडबरी भेटली म्हंटल्यावर मी काय खूष! पोलिस काका चक्क आमच्या दुकानासमोरून गेले, मला वाटलं ते तिथेच नेत आहेत मला, पण नंतर कळून चुकलं माझी रवानगी तर दुसरीकडे झाली आहे.

तिथे पोहोचल्यानंतर एक मस्त अंकल होते जे पिक्चर मधल्या इन्स्पेक्टर सारखी टोपी घालून बसले होते, फक्त दोन मिनिटेच मी शांत असेन, मग काय त्यांची टोपी घालून, त्यांच्याच खुर्चीत बसून गप्पा मारत बसले. हातात पोलिसांची काठी घेऊन माझी आपली मज्जा सुरु होती. शिट्टी वाजावं, काठी आपट, सल्यूट करणारे पोलिस सगळचं कसं मस्त होत. गुन्हेगारांना घाम फुटणाऱ्या त्या पोलिस स्टेशन मध्ये मी मात्र रमून गेले होते.

आई काय करत असेल? घरी काय सुरु असेल? सगळे किती घाबरले असतील? त्या काळी अंजनाबाई गावित सक्रिय होती. तिचं ती लहान कोवळ्या मुलांना पळवून नेणारी, भिक मागायला लावणारी आणि वेळ पडली तर त्यांचे कोवळे गळे कापणारी. याच्याशी माझं काहीच लेण देण नव्हत, कारण मी त्या पोलिस स्टेशनला किंडर गार्डन करून ठेवलं होत.

थोड्यावेळाने माझी आई, बाबा, आजी पोलिस स्टेशनला आले, अर्थात रिपोर्ट द्यायला, पुढ्यात मला पाहून त्यांचा जीव भांड्यात नक्कीच पडला होता. पण, मी काही आई आली म्हणून रडले नाही ना धावत तिला बिलगले, माझं आपलं मस्त खेळण सुरु होत. हे पाहून पोलिसांना खटकल, ते मला द्यायला तयार होईनात! आईचं रडण सुरूच होत, बाबा आणि आजीने पोलिसांना पटवून दिलं कि हि आमचीच मुलगी आहे. अखेर पोलिस काकांचा नाईलाज झाला आणि त्यांना मला सपुर्त करावं लागलं. त्यांना मी इतकी आवडले होते कि ते बाबांना बोलल्या वाचून राहिले नाहीत," कोणी आलं नसतं तरं मी हिला माझ्या घरी नेणार होतो!" माझे इंसिक्युर बाबा आणखीनच  इंसिक्युर झाले असतील हे मात्र नक्की!

पोलीस काकांना पापी देऊन मी माझं बस्तान हलवलं! वाईट एका गोष्टीचं वाटत कि देव अश्या गोड माणसांना लगेच का नेतो? मी सहावीत होते, त्या काकांचा अपघातात मृत्यू झाला, त्यांचा फोटो मी बरीचं वर्षे जपून ठेवला होता. पण, शिफ्टिंगच्या चक्कर मध्ये तो हरवला. पण, ते कधीच हरवणार नाहीत माझ्या हृदयाच्या कप्प्यातून!

प्रिया सातपुते 

अकराओळी!


सावरायला मला 
असा तू झुरू नकोस 
पेटत्या श्वासांना 
वाया घालवू नकोस 
सावर स्वतःला 
शेवटी पाखरांना
उडायचच असतं
कितीही वारा होऊ
दे वेडा पिसा
त्याच्यावरच स्वार
व्हायचं असतं…

-प्रिया सातपुते

Thursday, 17 October 2013

कोजागिरी!


लग्न आणि Unwanted Questions

लग्न ठरताच जवळच्या आणि लांबच्या लोकांच्या प्रश्नांची सरबती सुरु होते. मग तुम्ही मुलगा असा अथवा मुलगी. 
लग्न कधी? हे ऐकून तुम्हाला थोडं ऑकवर्ड वाटेल पण, त्यांचे प्रश्न सुरूचं राहतील. जर तुमचं अरेंज आहे तर मग दहा प्रश्न आणखीन विचारले जाणार, काय आवडलं तुला याच्यात? काय ग दारू बिरू पितो का? सिगारेट वगैरे काही व्यसन आहे का? लग्नानंतर जॉब करणार कि नाही ? नाही म्हणालं तर प्रवचन आणि हो म्हणालं तर टोमणे. काय करणार असंच असतं. पण, तुम्ही हे बदलू शकता. कसं? या साऱ्या प्रश्नांची कल्पना आधीच असेल तर तुम्हाला धक्का बसणार नाही आणि काय उत्तर द्यायचं हे तुम्ही ठरवू शकता. काही महत्वाच्या प्रश्नांना आपण हात घालूया. 

प्रश्न- लग्नाची तारीख इतक्या उशीरा का काढलीय? घ्यायचं ना उरकून याच महिन्यात. 
इथे तुम्ही तुमचं स्पष्टीकरण देऊ शकता, कि तुम्हाला एकमेकाला ओळखायला वेळ मिळतोय, कोर्टशिप पिरीयड कसा महत्वाचा आहे हे पटवून देऊ शकता. आणि बोलायचं नसेलच तर डायरेक्ट मोठ्यांनी ठरवलंय काय बोलणार म्हणून हात वर करू शकता. 

प्रश्न- किती कमावतो तो? घर दार स्वतःच आहे ना?
इथे टोला लगावून डायरेक्ट बोलू शकता काकू दारात मर्सडिज पण आहे काही काळजी करू नका. मला इकडची वस्तू तिकडे ठेवायला सुद्धा लागणार नाही इतका तर तो नक्कीच कमावतो. काकी शॉक अन्ड यु रॉक्स!

प्रश्न- लग्नानंतर जॉब करणार कि नाही?
इथे जर नाही म्हणालं तर ऐकायला तयार रहा, मग इतकं शिकून उपयोग काय झाला तुझा? उत्तरात तुम्ही बोलू शकता मला थोडे दिवस माझी मेरिड लाईफ एन्जॉय करायचीय, नवऱ्याला माझ्या हातचं जेवण खाऊ घालायचं आहे, आमच नात घट्ट करायचं आहे. जॉब काय कधी पण, करता येतोच. हे झाल नाहीच. आता हो म्हणालं तर ऐकून घ्या, तुझ्या सासरच्यांना आवडलं हे? तू कशी सांभाळणार घर आणि जॉब? बघ बाई नीट विचार कर. 

प्रश्न- एकत्र कुटुंबात राहणार कि एकटे? 
एकत्र म्हणाल तर बरीच उदाहरणे ऐकावी लागणार, आमच कसं जमलं नाही वगैरे. आणि एकटे म्हणालं तर एकचं वाक्य कानी पडेल अरे वाह, यु आर सो लकी!

प्रश्न- सासू ठीक आहे ना तुझी?
इथे नाही म्हणून चालेलच कसं!!

प्रश्न- काय रे सुनबाईची लहान बहिण आहे का कोणी?
इथे आता बिच्चारा मुलगा नसेल तर सुटेल आणि असेल तर फसेल!

प्रश्न- रोज बोलता का रे तुम्ही फोनवर?
इथे काय स्माईल करा आणि पळा गाईज, फोन आला म्हणून!!

प्रश्न- शेवटची काही इच्छा आहे का रे तुझी?
इथे सांगाल तर फसाल, पुढे तोच मित्र बायको समोर तुमची इच्छा बोलून दाखवायला मागे पुढे पाहणार नाही. सो सावधान!!

प्रश्न- मुलगी एक नंबरची आहे ना?
एक नंबर अर्थात गोरी, दोन- गव्हाळी, ३- सावळी…. माहित आहे खूप विचित्र आहे हे पण काय करणार हे कोडवर्डस आपल्या पूर्वजांची देणगी!

प्रश्न- जेवण बनवेल ना रे ती? एकुलती एक अनतोयस न करून म्हणून विचारलं!
इथे ठेवून द्या टोला, अग मावशी शीला वहिनी पेक्षा लाख चांगलं बनवते ती जेवण, घरी आली कि खाऊन ठरव. 

प्रश्न- हनीमून ला कुठे जाणार आहात?
का तुम्ही पण येणार आहात का आमच्या बरोबर? हे विचारू शकता किंवा ठोकून द्या दोन तीन नाव…सिंगापूर,मलेशिया वगैरे! आणि त्यांच्या रंग बदलेल्या चेहऱ्याची मज्जा घ्या!

अशे बरेच प्रश्न असतील… काही तुम्हाला माहित असतील तर नक्की कमेंट करयाला विसरू नका. 

प्रिया सातपुते 

Tuesday, 15 October 2013

मीच माझी दुर्गा!


आपल्यासोबत होणारया छळाला आपण स्वतःच कारणीभूत असतो, कधी घाबरून आपण समोरच्या व्यक्तीला दाखवून देतो कि मी किती कमजोर आहे. हे तर ये म्हशे मार! असचं झालं. स्त्रियांवर होणाऱ्या या अत्याचारात आपण सगळेच कुठून न कुठून कारणीभूत असतो, कारण, तुम्ही-आम्ही आपल्या आया-बहिणी, बाबा-भाऊ यांच्याकडून काय सल्ले घेतो कि दुर्लक्ष कर! आणि दुर्दैवाने ते दुर्लक्ष जीवावर बेतत! म्हणून, आज पासून आयडिया दिल्या जातील, आपल्या मैत्रीणीना कि अश्या गोष्टींना कसं सामोर जायचं!

आजच्या काही टिप्स-

टीप क्रं-१
कोणत्याही परिस्थितीत घाबरून हात पाय गाळू नका, भीती हा सर्वात मोठा शत्रू आहे हे लक्षात ठेवा.

टीप क्रं-२
नेहमी स्वतःच्या मोबाईल मध्ये जवळच्या पोलिस ठाण्याचा नंबर सेव करून ठेवा. फक्त चॅट साठी उपयोग न करता, सिक्युरिटी अप्स डाउनलोड करा.

टीप क्रं-३
तुम्ही परगावी राहणाऱ्या असाल तर चटकन कोणावरही विश्वास ठेवून अनोळखी ठिकाणी जाऊ नका. कुठेही बाहेर जाताना घरच्यांना, जवळच्या मित्रांना कल्पना देऊन ठेवा.

टीप क्रं-४
रात्रीच्या प्रवासात शक्यतो नावाजलेल्या टूरिस्ट कंपन्यांसोबतच प्रवास करा. सोबत चिली स्प्रे, कटर बाळगा. लेडी सीटचीच बुकिंग करा.

टीप क्रं-५
रिक्षाने रात्री प्रवास करताना, नीट लक्ष द्या, सांगितलेल्या रूटने रिक्षा जातेय कि नाही याकडे लक्ष द्या. शक्यतो फोनवर संभाषण चालू ठेवा, रिक्षाचा नंबर लक्षात ठेवा, फोनवर तो जाणून बुजून ऐकवा. घर गाठे पर्यंत फोन ठेवू नका.

टीप क्रं-६
अश्लील नजरेला वेळीच ओळखा, आजूबाजूला गर्दी आहे, आणि समोरची व्यक्तीच्या देहयष्टीकडे पाहून, न घाबरता प्रत्युतर द्या. बारीक असेल तर तुम्ही एक लावली कि पब्लिक दहा मारायला पुढे येते. पण, जर समोरची व्यक्ती ताकतवान आहे असे दिसतं असेल तर, गर्दी गाठूनच प्रत्युतर द्या.

टीप क्रं-७
पाठलाग करणाऱ्या व्यक्तीला, (देहयष्टीकडे पाहून उत्तर देता येत) चकवा देता येत असेलं तर चटकन गर्दीत घुसा, शक्य नसेल तर, जवळच्या पोलिस, डीसेंट लोकांची मदत घ्या.

टीप क्रं-८
घाबरवायचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला भररस्त्यात जाब विचारा, घाबरू नका! जशी स्त्रियांना पुरुषांची नजर कळते तशीच पुरुषांना स्त्रियांची भीती कळते, मग ते जास्ती घाबरवायचा प्रयत्न करतात.

टीप क्रं-९
सेल्फ डिफेन्स टेक्निक्स शिकून घ्या आणि रोड रोमिओना कायमची अद्दल घडवा.


टीप क्रं-१० 
न विचारता फोटो काढणे हा एक गुन्हा आहे हे लक्षात ठेवा, कोणी शूट करत आहे, लक्षात आल्यास त्या व्यक्तीला न कळू देता पोलिसांना गाठा. शक्यतो अश्या गोष्टी देवीच्या दर्शनाच्या लाईन मध्ये सर्रास घडतात. 

टीप क्रं-११ 
पार्टी, पब, डिस्को अश्या ठिकाणी अनोळखी व्यक्तींकडून ड्रिंक्स घेऊ नका, तुमच्या समोर तयार झालेल्या ड्रींक्सलाच ओठाशी लावा.  ड्रिंक सोडून आजूबाजूला जाऊन येऊन ते ड्रिंक पुन्हा घेण्याची चूक करू नका. शक्यतो अश्या ठिकाणी जाण टाळा. आपलं हित आपल्याच हातात असत हे विसरू नका. 

पुढच्या टिप्स पुढच्या भागात. 

शेवटी एकंच सांगेन "मीच माझी दुर्गा" बना म्हणजे कोणताही राक्षस तुमच्या जवळ भटकणार नाही. 


प्रिया सातपुते 

Sunday, 13 October 2013

"प्रेम घ्या प्रेमासारखे रहा!"


प्रत्येक इच्छेमध्ये एकचं सुप्त गोष्ट लपलेली असते ती म्हणजे "प्रेम". ही अडीच अक्षरे जीवनात असतील तर काही असो वा नसो एक तृप्ती राहते, आनंद राहतो, पण हेच विरुद्ध असेल तर? सर्व काही असूनही माणसाला जीवनाचा विट येतो. प्रेम प्रत्येक गोष्टीत असते, ते विनाशाला सुद्धा कारणीभूत ठरते तर कधी कटकटी, भांडणे, विकृत मनोवृत्ती यांना जन्माला घालते.
जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर प्रेम करून लागतो त्याला,"लोभ" म्हणतात. अश्या लोभातून उत्पन्न झालेल्या प्रेमाला, "मद" किंवा "अंहकार" म्हणतात. प्रमाणाबाहेर जेव्हा एखादी व्यक्ती प्रेम करू लागते तेव्हा त्याला, "ईर्षा म्हणतात. संपूर्ण आयुष्यात आपण प्रेमचं शोधत असतो, लहानपणी खेळामध्ये, खेळण्यांमध्ये, मोठे झाल्यावर मित्र, बायको, नवरा मध्ये आणि वृद्ध झाल्यावर आपल्या मुलांमध्ये. एवढं सगळ करूनही आपण रिक्तच राहतो. का? मग यावर उपाय काय? अस प्रेम हवं ज्यामध्ये विकार, दु:ख, बंधने नकोत. हे शक्य आहे???

प्रेम ही एक निरामय भावना आहे, ती जितकी शोधू अथवा तिच्या मागे लागू ती तितकीच दूर पळते, म्हणून शोधण सोडून आधी स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे म्हणजे आपल्या मध्ये जी चेतना आहे अर्थात ज्याला आपण आत्मा म्हणतो ती तृप्त होते आणि मग प्रत्येक गोष्टीत व्यक्तीला प्रेम आणि प्रेमचं भरभरून मिळते. यासाठी फक्त एकंच काम करायचं आपण सुद्धा निरामय आणि निस्सीम बनायचं. मनातल्या कपटांना, जाळ्यांना कायमचं साफ करून टाकायचं.
उदाहरण द्यायचं झाल तर, दुसरयाविषयी वाईट चिंतने बंद करा,ईर्षा नावाच्या या ताईला जवळ आणू नका. तिच्याकडे एवढे कपडे माझ्याकडे नाहीत, त्याच्याकडे एप्पल मोबाईल आणि माझ्याकडे मायक्रोमेक्स, त्याची बायको अप्सरा आणि माझी… अशे बिनबुडाचे मूर्ख विचारांना कायमची तिलांजली द्या.

अस्तुदेवतेला लक्षात ठेवा! या मागचा अर्थ लक्षात ठेवा. Always think positive because, those thoughts will turn back towards you!

आज विजयादशमी सोन वाटून आपण काय बोलतो? "सोन घ्या, सोन्यासारखे रहा!" सोन अर्थात धन, अर्थात सुखमय आयुष्य. सुखमय आयुष्य अर्थात प्रेम, कारण प्रेमचं सोन आहे. म्हणूनच मी म्हणते, "प्रेम घ्या,प्रेमासारखे रहा!"

ही विजयादशमी तुम्हां-आम्हां सर्वांना भरभरून प्रेम देवो आणि प्रेमासोबत रहायला देवो!
Happy Vijayadashmi guys!

प्रिया सातपुते 

Sunday, 6 October 2013

प्रियाटी!!


~~ती~~


ती तशीच बसून राहिली त्याच्या पाठमोऱ्या प्रतिकृतीकडे पाहत, त्याची सावली अंधारात गुडूप झाली होती, काही क्षण तिला कळेचना काय सुरु आहे, तिचं मन सुन्न झालं होत. त्याची प्रतिकृती छोटी छोटी होऊन नजरेआड निघून गेली. ती मात्र तशीच बसून होती गुपचूप. हळू हळू शिंपला उघडावा अन मोती हातात यावा असचं काही तिच्या चेहऱ्याकडे पाहून वाटत होत. तो आज तरी बोलेलं असं मनोमन तिला वाटत होत, त्याच्या नजरेत एक अन ओठांवर एक पाहून तिचं मन आधीच पिळवटून गेलं होत. पाच वर्षांच्या नात्याला तो इतका सहजासहजी तोडून चालू लागेलं हे मात्र तिला अजिबात वाटलं नव्हत. प्रेमभंगाच दुखं करावं कि अश्या फसव्या नात्यातून सुटका झाल्याचा आनंद करावा हेचं तिला उमगतं नव्हत.

प्रिया सातपुते

प्रियाटी!!


प्रियाटी!!