Sunday, 29 September 2013

स्त्रिच, स्त्रिची सर्वात मोठी शत्रू ???


या पुरुषप्रधान समाजात स्त्रिच, स्त्रिची सर्वात मोठी शत्रू आहे.
खूप जणांना वाटेल मी अतिशयोक्ती करतेय पण, असं नाहीय. याची बरीच उदाहरणे मला देता येतील, काही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रीतीने माझ्यासमोर आलीत तर काही माझ्याचं समोर घडली.

एक स्त्रिच एका अजन्म्या स्त्री अर्भकाची खुनी असते. कारणे काहीही असोत, परिस्थिती काहीही असो, जोपर्यंत  एक आई परवानगी देत नाही तोपर्यंत कोणीही तिच्या पोटातल्या गोळ्यास मारू शकत नाही. ती हे का विसरते कि ती सुद्धा एक स्त्रिच आहे! मी खूप लहान होते, दुसरी-तिसरी मध्ये असेन, एका नातलगांच्या घरी आम्ही कार्यक्रमासाठी गेलो होतो, तिथे एक बाई दुसऱ्या बाईला सांगत होत्या," काढून टाकायला सांग तिला, पहिल्या दोन आहेत न मुली बसं झालं, आता मुलगाच पाहिजे." लहान असल्यामुळे मला त्या वाक्याचं इतक गांभीर्य कळल नाही. पण, आता अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. किती निर्दयी आहेत या बायका.

आपण पुरुषांना बोल लावण्यापेक्षा हे पाहिलं पाहिजे कि, ते तर पुरुष आहेत, मंगळावर राहणारा ज्याचा भावनांशी काडीचाही संबंध नसूनही तो उलटा अश्या उलट्या काळजाच्या बायकांपेक्षा लाख गुणांनी बराच म्हणावं लागेलं. कारण या पुरुषानाही एक स्त्रिच संस्कार देते, समाजात मान देते. काहीना ती शिवाजी महाराज बनवते तर काहीना कसाब तर काहीना बलात्कारी, खुनी! अजिबात अतिशयोक्ती नाहीय यात. मी मुंबईला असताना माझ्या एका मैत्रिणी सोबत एक किस्सा घडला होता. ती जॉब वरून घरी जाण्यास निघाली होती. अंधेरी स्टेशन, बसकरता ती लाईन मध्ये उभी होती, तिच्या बाजूला वयस्कर माणूस उभा होता, त्याच्या सोबत त्याची बायको आणि माझ्या मैत्रिणीच्या वयाच्या त्याच्या मुलीसुद्धा उभ्या होत्या. पब्लिक प्लेस वर सिगारेट ओढन कायद्याने गुन्हा आहे, तो माणूस बिंदास पणे सिगारेट फुंकू लागला होता, तिला साहजिकच त्रास होऊ लागला म्हणून तिने त्यांना नम्रपणे विनंती केली. "अंकल! प्लीज आप सिगरेट बंद करेंगे, तकलीफ हो रही हैं।" यावर त्या माणसाने तिला अशा शब्दांमध्ये उत्तर दिलं कि ते मी इथे नमूद करू शकत नाही, आपल्या बायकापोरांसमोर हा निर्लज माणूस एका मुलीचा गलिच्छ शब्दांमध्ये अनादर करत राहिला पण, त्याची बायको, मुली काहीही बोलल्या नाहीत, त्या चुपचाप तमाशा पाहत होत्या. माझ्या मैत्रिणीने त्या माणसाला तर सुनावालच, पण त्याच्या बायकोला आणि मुलींना सुद्धा ऐकवलं, "आपके सामने ये बेटी कि उमर कि लडकी के साथ ऐसी बात कर रहे हैं और आप बुत बनके खडी हैं। ती इतकी भडकली कि तिने पोलिस येऊपर्यंत त्या माणसाला सोडलच नाही. हेट्स ऑफ टू हर! काही लोक तिच्या बाजूने बोलत राहिले काही समजावत राहिले, ती मात्र ठाम राहिली.


मुंबईचाच आणखी एक किस्सा मला इथे आवर्जून सांगावासा वाटतो आहे, तुमचे संस्कार तुम्हाला कशे तग धरून, धाडसी बनवतात हे तेव्हा मला जाणवलं. मुंबईचे रिक्शावाले आणि त्यांचे किस्से तर जगप्रसिद्ध आहेत, एकदा जेव्हा मी घरी परतले होते आणि रिक्शावाला मला लल्लू बनवू पाहत होता, त्याला वाटलं एका मुलीसमोर घाणेरडा शब्द बोलेन तर ती चूप होईल, तो म्हणाला," मुझे क्या *** समझ के रखा हैं?" मग काय माझी सटकली," हा बे सही बोला, यही समझ के रखा हैं, क्या कर लेगा तू? चुपचाप मेरे ५० रुपये वापीस दे, नही तो देख क्या हाल करती हू तेरा।" बिच्चारा घाबरून पळून गेला. एक स्त्री तिथे उभी होती आणि दुसऱ्या स्त्रिला सांगत होती,"या आजकालच्या मुली जरा सुद्धा नीट वागत नाहीत." ती पुढे काही बोलणार तोच मी तिच्याकडे पाहिलं, तशी ती वरमली.  एक स्त्री असून ती, स्त्रिलाच बोलं लावत होती. वाह ग स्त्रिये! धन्य केलंस बघ. 


हे थांबल पाहिजे,  स्त्रिच  स्त्रिची शत्रू हे समीकरण बदललं गेलं पाहिजे. मुलगाच वंशाचा दिवा होऊ शकतो हे ब्रीदवाक्य कालबाह्य केलं गेलं पाहिजे. टीवीवर रोज स्त्रियांची कपटी कारस्थाने बघून रियल लाईफ मध्ये पण बायका तेच फॉलो करतात, अशी बुरसटलेली, समजला घातक नाटके बंद झाली पाहिजेत. समाजाची जननी ही एक स्त्रीच आहे, तिची विकृत मानसिकता कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण समजासाठी घातक आहे म्हणून ही मानसिकता बदलायलाच हवी.  

प्रिया सातपुते 


Saturday, 28 September 2013

गट्टी तुझी माझी- कमल!

                                                                                  Photo courtesy by Abhay Waghmare

कमल आणि माझी गट्टी छान जमली होती. मलाही ती आवडायची. कधी कधी ती स्वतःहून मला उशीर झाल्याचं लक्षात येताच, चहा बनवायची, रात्री जेवताना आवर्जून मला काय पाहिजे नको ते पहायची. माझ्या भल्या मोठ्या केसांची ती खूप मोठ्ठी फॅन होती, चंपी करून देते म्हणून पुढे असायची. एकदा मी सहजंच वैतागून म्हंटले होते, "यार कंटाळा आलाय मला या मोठ्या केसांचा, मस्त हेयर कट करायचा विचार आहे माझा". माझ वाक्य पूर्ण होई पर्यंतच ती म्हणाली,"अजिबात नाही कापायचे, जर तू कापलेस तर मी बोलणारच नाही तुझ्याशी. तिच तसं रीयाक्ट होण मला आवडलं, नकळतच ती माझ्या मुंबईच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून गेली होती. 

तिला पुस्तके खूप आवडायची, मी खास करून तिच्यासाठी बरीच मराठी पुस्तके विकत आणली जी तिला पुढील आयुष्यात खूप मोलाची माहिती पुरवतील. तिला चोकलेटस आणून देण, तिला काय हवं नको मी पण पहायला लागले होते. 
सुट्टीच्या दिवशी आम्ही दोघीच घरी होतो, आमच्या गप्पा रंगल्या होत्या. 

मी- काय आवडत तुला खायला?
कमल- मला न आईस्क्रीम खूप आवडत, दीपा ताईसोबत जाऊन मी खाऊन आले होते. 
मी- अरे वाह! कोणता फ्लेवर खाल्लास?
कमल- व्हेनिला! तोच मिळतो खाली, आणि तुला माहितेय ताई, नाक्यावर पाणीपुरी खूप मस्त मिळते. 
मी- ते पण आवडत का तुला? 
कमल- हो. 
मी- छान! नाक्यावर कशाला जाता तुम्ही? होम डिलिवरी मिळते. 
कमल- अग! तेवढंच फिरायला मिळत. 
मी- अरे वाह! मग काय खरेदी करून आला?
कमल- अग! आईंना पेपर पिन्स हव्या होत्या त्या आणायला गेलो होतो, मला एक वही पण हवी होती, पण… 
मी- पण? काय 
कमल- पैसे नव्हते नेले. 
मी- ह्म्म्म 

तितक्यात इंटरकॉम वर फोन आला आणि तिच्यासाठी फर्मान आलं होत, खाली येण्याचं. ती निघून गेली मी मात्र विचार न दवडता, पटकन वॉलेट घेऊन वॉकला निघाले, संध्याकाळची नाष्ट्याची वेळ झालीच होती. आधी मी जाऊन वही विकत घेतली, त्यासोबत एक पेन घेतला, तिच्यासाठी टिकल्यांच पाकीट घेतलं. खूप दिवसांआधी ती बोलली होती टिकल्या संपलेत म्हणून. मग पाणीपुरी, शेवपुरी घेतली आणि कामत आईस्क्रीम पार्लर मध्ये जाऊन चोकलेटचे वेगवेगळे दोन फ्लेवरच आयस्क्रीम घेतलं. घरी जाऊन, इंटरकोम वर कॉल केला आणि तिला अर्जंट ये, काम आहे हा निरोप धाडला. तशी ती १० मिनिटाच्या आत हजर झाली. 

कमल- काय काम आहे? 
तिचा उतरलेला चेहरा सगळ सांगत होता. 
मी- टीवी पाहत होतीस का?
कमल- अग! मराठी पिक्चर लागला होता आणि तू बोलावलं 
मी- इथे लाव मग, आधी ती पाणीपुरी शेवपुरी घे. 
ती अवाक होऊन मला पाहतच राहिली. 
मी- बघत काय उभारली आहेस, मऊ होईल ती शेवपुरी घे पटकन, तुझ्यासाठी थांबलेय मी खायची. 
तशी ती भारावलेल्या नजरेने पुढे आली. 
मस्त ताव मारून मी तिला सांगितलं फ्रीजर मध्ये डब्बे आहेत ते घेऊन ये. 
कमल- काय आहे हे?
मी- आयस्क्रीम 
कमल- माझ्यासाठी?
मी- हो
तिच्या चेहऱ्याची खळी मस्त फुलली. चमचे घेऊन मी बाहेर आले, तर तिच्या डोळ्यातलं साठलेलं पाणी पाहून मी तिच्या पाठीवर हात ठेवला तिला जवळ घेत म्हणाले, "वेडाबाई! रडतात का कोणी असं? डोळे पुस आधी ते, आणि खाली जाताना ती टेबलावर ठेवलेली वही पेन आणि टिकल्या घेऊन जा!"
कमल- थांकू ताई, असं  कधी कोणी… 
ती काही बोलण्याआधीच मी तिला गप्प केलं.
मी- थंक यु म्हणायचं असतं ग किती वेळा सांगू तुला. 
या वाक्यावर आम्ही दोघी हसलो, आयस्क्रीम संपवत काही तिचं, काही माझं ऐकत आमची आयस्क्रीम पार्टी संपली. 

त्या दिवशी रात्री झोपताना जे सुख मी अनुभवलं होत तेच आताही अनुभवतेय आणि याचं सगळ क्रेडीट कमलला! 
थांक कु कमल! 

प्रिया सातपुते 

Thursday, 26 September 2013

देवासोबतची माझी एक्स्क्लुसिव मिटिंग!


Disclaimer- All characters and situation appearing in this article are fictitious. Any resemblance to real persons, living or dead, is purely coincidental.


आज भल्या पहाटे मला देव दिसला, अरे! खरचं साक्षात कृष्ण माझ्यासमोर उभे होते. आधी तर मला पटलच नाही, देवाला तिरक्या नजरेने पाहत, स्वतःलाच एक चिमटी काढली, आणि ते स्वप्न नव्हत, साक्षात विष्णूरूप कृष्ण माझ्यासमोर उभे होते. एकदम नॉर्मल होते हा ते, अगदी आपल्यासारखेच. देवाला पाणी घेणार का विचारून मी त्यांना माझी कॉम्पुटर चेयर बसायला दिली, तशे कृष्णदेवाने आसन ग्रहण केलं. पाण्याचा एक घोट घेऊन, कृष्ण देव म्हणाले," आह! हे तर आताच्या गंगेपेक्षा चविष्ट लागतंय."

मी- ह्म्म्म!
कृष्ण देव- तू न बोलताच समजलं मला ते एक्वागार्ड आहे.
मी- तुम्हाला कसं कळल, ओह्ह तुम्ही तर देव आहात न!
कृष्ण देव- तुला अजूनही विश्वास होत नाहीय का?
मी- नाही अस नाही रे देवा, तुला अरे तुरे केल तर चालेलं न ?
कृष्ण देव - (हसून) हो चालेल ना!
मी- आज माझ्याकडे कसं येन देवा? हा ठेका तर आमच्या आऊसाहेबांचा आहे.
कृष्ण देव- का? तुला आवडलं नाही का?
मी- असं नाही रे देवा
कृष्ण देव- मग कस आहे?
मी- आता हे मला सांगता येणार नाही!
कृष्ण देव- प्रयत्न कर, आहे मी इथेच
मी- देवा तू माझी चेष्टा करतोयस का?
कृष्ण देव - नाही, अजिबात नाही.
मी- मग आज मला दर्शन कसं दिलंत?
कृष्ण देव- रोज तर माझाशी बोलतेयस, म्हंटल आज आमने सामनेच भेटतो तुला
मी- हे बर केलंस बघ देवा
कृष्ण देव - बोल मग, काल खूपच अस्वस्थ होतीस तू, नीट बोलली पण नाहीस माझ्याशी.
मी- देवा आधी सांग मी जिवंत आहे कि ?
कृष्ण देव- आत्मा नेहमीच जिवंत राहते
मी- म्हणजे मी सुटले का पृथ्वीवरून ?
कृष्ण देव - नाही ग! तुला इतकंच वाटत असेल तर तोंडावर थंड पाण्याचे फवारे मारून ये
मी- ह्म्म्म
कृष्ण देव- आता बोलणार आहेस कि नाही ?
मी- देवा मला तुझा खूप राग आला आहे
कृष्ण देव- का ग बाई?
मी- ई प्लिज देवा बाई नको म्हणू.
कृष्ण देव हसू लागतात,
कृष्ण देव- बर नाही म्हणणार!
मी- धन्यवाद!  मला तुझा काल खूप राग आला होता, म्हणजे अजूनही आहेच, द्रोपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी तू एका भावासारखा धावून गेलास, तिच्या एका हाकेला तू जागलास. आणि आता काय झालं आहे तुला? तुला या निष्पाप मुलींच ओरडण, तुझ्या धावा करण ऐकूच येत नाहीय का? तू का शिक्षा नाही करत या नराधमांना? तू असताना हे सगळ होतच कस देवा? कधी थांबणार हे? कि तू काहीच करणार नाही? कि खरच या युगाचा अंत होतोय? मग निष्पाप जिवांच काय? हे बरोबर नाही ह देवा! प्रामाणिकपणाला तर कुठे किंमतच उरली नाही, जिथे पहाव तिथे भ्रष्टाचार, तुझ्या मंदिरातपण हेच, तुझ्या नावावर ऐष करतायत लोक, तरीपण तू शांतच? लहान फुलांना कुस्करून टाकत आहेत लोक, कधी थांबणार हे? आता ही तू गप्प का? मला उत्तर हवय देवा!
कृष्ण देव - तू थांबशील तरचं मी बोलणार ना ?
मी काहीच न बोलता, कृष्ण देवाकडे एक कटाक्ष टाकला. 

कृष्ण देव- माझ्याकडून बनवली गेलेली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तुम्ही मनुष्यच. मी सर्वांना सारखीच बुद्धी देऊन जन्माला घातलं, आता तू म्हणशील मग सर्वानांच सुखी का नाही केलंस? प्रत्येक मनुष्य त्याच्या कर्मानेच जगतो, जो आज राजा आहे तो उद्या रंक सुद्धा होऊ शकतो, आणि हे कशामुळे तर फक्त कर्मामुळे! जो श्रद्धा आणि भक्तीच्या समन्वयाने पुढे जाईल त्याच्या प्रत्येक मार्गात त्याला गुलाबाच्या पाकळ्याचं भेटतील पण, जर तुम्ही अधर्म, पाप, हत्या, स्त्री अवमान या मार्गाने जाल तर नक्कीच काट्यानपेक्षाही भयानक अश्या ठिकाणी अडकून रहाल. 
मला थोडं पटलं पण, मनाच समाधान काही झालं नाही, जणू माझ्या चेहऱ्यावरून कृष्ण देवाला हे सुद्धा कळाल आणि ते पुढे बोलू लागले. 

कृष्ण देव- महाभारत होणार हे निश्चित होत आणि हे माहीत असूनही मी स्वतः तह करण्यासाठी तीन वेळा प्रचंड प्रयत्न केला. पण, जी गोष्ट घडणारच होती तिला टाळण माझ्या हातात सुद्धा नव्हत. कारण, मनुष्य स्वतःहून अश्या गोष्टी करतो ज्या त्याच्या कर्माशी निगडीत आहेत. गीतेला कुरुक्षेत्रच्या रणांगणात प्रकट व्हायचं होत कारण त्यातच तर संपूर्ण मानवजातीच्या उद्धाराच प्रकटीकरण सांगितलं आहे मी. मला सांग किती मनुष्य या धनाला जपून वापरत आहात? 
मी गप्प झाले. काय उत्तर देणार देवाला, मान खाली घालून मी पायाच्या अंगठ्याकडे पाहत राहिले. 

कृष्ण देव- ज्ञान तर मी सर्वांनाच दिलंय पण, कितीजण त्याच्यापर्यंत पोहचून स्वतःच्या ज्ञानाची तहान भागवून मोक्ष मिळवतात ? या चेतनेला माझ्यात विलीन करण्यासाठी तुम्ही मनुष्य किती खस्ता खाता हे पाहून मलाही वाईट तर वाटतच पण, म्हणून मी सुद्धा तुमच्यासारखं हतबल होऊन कसं चालेलं? मग, या सृष्टीची गाडी कशी चालू राहिलं? मी स्वतः अविरत काम करत राहतो, मी थांबलो तर हे सगळच थांबून जाईल. 

मी अवाक होऊन पाहतच राहिले. 
मी- म्हणजे देवा तुही काम करतोस ? मला वाटलं तुला तर खूप सारे पर्कसं असतील. 
कृष्ण देव हसू लागतात. 
मी- सॉरी देवा, पण, मला माहित नव्हत. 
कृष्ण देव- इट्स ओके! 
मी आणखीनच अवाक देव इंग्लिश बोलत होता. 
कृष्ण देव- अरेच्या मला नाही का येणार इंग्लिश? तुमच्या अबोल भाषेला सुद्धा ऐकू शकतो मी. 
मी- ह्म्म्म ( घाबरून आणि लाजून)
कृष्ण देव- तुला घ्यायची आहे का देव बनण्याची जबाबदारी, अगदी सेम त्या जिम केरीच्या मूवी सारखं?
मी घाबरून म्हणाले- नको, नाही, अजिबात नाही. 
कृष्ण देव- जबाबदारी अवघड आहे म्हणून नाही म्हणतेयस हो ना?
मी- देवा मला मनुष्यच राहू दे, आय मिन मला आताच वरती यायचं नाही रे, अजून तर माझं लग्न पण नाही झालं, मुले पण नाही झाली, आता कुठे आयुष्याला सुरुवात झालीय, प्लिज देवा, माझ्या पण काही जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण झाल्या कि ये न्यायला. 
कृष्ण देव खूप जोर जोरात हसू लागतात. 
कृष्ण देव- म्हणजे तुला कळाल तर कि जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या कि चेतना मुक्तीच्या मार्गावर असते, पण विसरू नकोसं आज पासून तुला गीता रोज न चुकता वाचायची आहे आणि दुसऱ्यांना पण त्याच महत्व पटवून द्यायचं आहे. 
मी- हो देवा, समजलं !
कृष्ण देव-  ह्म्म्म 
मी- आणि हे ही कळाल कि योग्य विचार आणि बुद्धीचा वापर कसा महत्वाचा आहे. 
कृष्ण देव- जरी भाग्यालिखित काही आहे तर ते तुम्ही मनुष्य कर्माच्या बळावर बदलवू शकता, हे नेहमी लक्षात ठेव. 
मी- हो नेहमीच लक्षात ठेवेन देवा!
कृष्ण देव- चल मला आता निघावं लागेल माय वाईफ इज वेटिंग फोर मी. 
मी आणि कृष्ण देव दोघेही हसायला लागलो. 
मी- ओके देवा, मग आता पुन्हा कधी भेटणार?
कृष्ण देव- तू बोलावशील तेव्हा. 
मी- पक्का?
कृष्ण देव- हो! चल काळजी घे, सी या!

मी- सी या !

देवाला सी ऑफ करून मी आजूबाजूला पाहिलं, चिमण्या जाग्या झाल्या होत्या, सुर्य जणू मी येतोय सांगत होता. सुर्यादेवांच्या दर्शनासाठी मी गैलेरीमध्ये तशीच उभी राहिले. 

प्रिया सातपुते 


Saturday, 21 September 2013

Love Yourself first!!प्रेम जगातील सर्वात सुंदर भावना जणू ओठांवरच हसू, जे कधीही न संपणार असतं. पण, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईल ते आयुष्य कसलं? प्रेम तर आपण सर्वांवरच करतो पण, त्याची खरी जाणीव कळी फुलल्यावरच होते, जणू सुकलेल्या झाडाला नवी पालवीच फुटते. प्रेम हा शब्द प्रत्येकाच्या आयुष्यात अस्तित्वात असून देखील आपण त्याच्याकडे कधीच ढुंकून देखील पाहत नाही. पण, प्रेमात पडल्यावर त्याचं माणसाचा आयुष्याबद्दलचा दृष्टीकोनच बदलतो. 

प्रेमात आकंठ बुडालेली व्यक्ती मग काय चूक? काय बरोबर? या फंदात कधीच पडताना दिसत नाही. आपलं सर्वस्व पणाला लावून भरभरून प्रेम दिलं जात, यात गैर वाटण्यासारख नक्कीच काही नाही पण, जेव्हा समोरच्या व्यक्तीकडून भ्रमनिरास होत आहे हे जाणवू लागल्यावर स्वतः मध्येच काही कमी आहे हे मानून जेव्हा ती व्यक्ती निमुटपणे गप्प बसते आणि सगळ उमगत असून सुद्धा प्रेमापोटी स्वतःची गांधारी करते याहून सर्वात मोठा मूर्खपणा काहीच नाही. प्रेम हा पैश्याचा खेळ नाही कि जिथे तुम्हाला जे हवं ते मिळेल, हा सगळा मनाचा मामला असतो, प्रेमात पडण जितकं सोप्प असतं, तितकंच ते निभावण कठीण असतं. प्रेमात नको अपेक्षा करू म्हटलं तरीही डझनभर अपेक्षा या येणारच. अपेक्षा तर आपण आपल्या आई, बाबा, दादा, बहीण या सर्वांकडून पण तर करतोच ना? कि आपण अशेच तयार झालो? मग, प्रेमात सुद्धा अपेक्षा या येणारच, आता हे ज्याचं त्यान ठरवायचं कि कोणती अपेक्षा बरोबर आहे कि नाही. 

प्रेमात पडण जितकं सोप्पं असतं तितकंच ते आता बाहेर पडणही सोप्पं झालं आहे. पण, सगळ्यांकरताच हे सोप्पं असतं असं देखील नाही. काही जण जीव देतात, काही जण जीव घेतात, तर काही जण आयुष्यभरासाठी होरपळून निघतात. योग्य ठिकाणी, योग्य वेळी जर मन मोकळ करायला त्यांना कोणी भेटलं तर अश्या भयानक गोष्टी टळू शकतात. आपल्या समोर असूनही आपण एकेकदा काहीच बोलत नाही पण, जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा आयुष्यभरासाठी आपल्या मनाला हुरहूर राहते कि आपण त्याच किंवा तिच मन का ओळखू शकलो नाही. 

प्रेम गमावल्याची हीन भावना मनातून पुसून टाकली गेली पाहिजे, जी व्यक्ती स्वतः वर प्रेम नाही करणार ती आयुष्य कशी जगणार? स्वतः वर प्रेम करा, तुम्ही स्वतः खुश असाल तरचं तुम्ही दुसऱ्याला सुख देणार. 

Hope, I had gifted you this beautiful line," Falling in love with myself is most wonderful gift in this entire world." 

Love, 
प्रिया सातपुते 


Thursday, 19 September 2013

नोकरी


कालचं माझ्या एका मित्रासोबत माझं बोलन झालं, काही दिवसांपूर्वीच तो नोकरीला लागला आहे, त्याच्या थकलेल्या आवाजात तो कसा बसा बोलत होता, शेवटी कॉलेज लाईफ संपवून तो अर्थार्जनाच्या या कक्षेत सामावला तर गेलाय. ही कविता काल रात्री झोपताना अचानक सुचली आणि मग काय त्याला पण पाठवून दिली. 
आकाशात उंच भराऱ्या घेणाऱ्या पक्ष्याला जसे पकडून सोनेरी पिंजऱ्यात ठेवलं जात आणि त्याला सगळ काही पुरवलं जात, तरीही तो सुखी नसतो कारण त्याला उडायचं असत. असचं काही आपल्या सर्वांमध्ये होत, रोजच्या दिनक्रमाला कंटाळून आपण रोज रात्री झोपतो ते सुट्टीच्या दिवसाच्या प्रतीक्षेत. 

"आज पुन्हा एका रटाळ दिवसाला तू,
सामोरा जाणार,
नाक मुरडत का होईना,
ऑफीस ला जायला सज्ज होणार,
बाइक चालवताना,
थोडे क्षण का असेना पण तू मोकळा श्वास घेणार,
दिवसभर मर मर तिशटनार,
कधी या कॅबिन मधे तर कधी त्या, 
प्रत्येक रंगीत वा काळ्या पांढऱ्या चेहरयाला,
तू आठ्ठी न पाडता तू सामोरा जाणार,
लंच टाइम ला,
स्वः कष्टाचे दोन घास तू खाणार,
बॉस च्या हाकेला,
तू कृष्णा सारखा धावणार,
सहाच्या ठोक्याला,
तू सुटकेचा श्वास टाकणार,
परतीच्या पाऊन तासात,
तू स्वप्नांची प्लॅनिंग करणार,
घर गाठताच डकार देऊन,
तू साखर झोपेत रमणार!"

प्रिया सातपुते 

शब्द


तोंडातून निघालेला शब्द 
म्यानातून काढलेल्या तलवारी 
सारखाच का असावा?
बेधुंद होऊन नाचणाऱ्या 
मोराच्या पिसारयातून 
गळालेल्या मोरपिसासारखा का नसावा?
पहाटे उगवणाऱ्या 
सूर्याच्या पहिल्या सोनेरी किरणासारखा का नसावा?
पहिल्या पावसाच्या 
पहिल्या टूमकदार मोत्यासारखा का नसावा?
सुंदर उमलत्या कळ्यांवर 
आपल्या प्रेमाचे रंग सोडणाऱ्या फुलपाखरासारखा का नसावा?
मनातून ओठांवर 
अन पुन्हा कागदावर आपली छाप सोडणारा  का नसावा?
माझ्या शब्दांना मी इथे उमटवल तर आहे 
पण पुन्हा माझ्या आणि तुमच्या मनात साठवण्यासाठी!!

प्रिया सातपुते 

प्रियाटी


प्रियाटी


प्रियाटी


नशीब!!!


नशीब, दैव, भाग्य, डेस्टिनी ही अशी बरीच नावे आपण रोज एकदा तरी बोलतोच. साला, काय नशीब घेऊन जन्माला आला आहे! दैव बलवत्तर म्हणून वाचलो! भाग्यात जे असेल तेच होणार! आणि अशी बरीच वाक्य आपण ऐकतो आणि बोलतो. कधी कधी ती खूप खरी वाटतात पण कधी कधी आपली सायनटीफिक बुद्धी ते कबुल करत नाही, पण असं काही घडतं कि तुम्ही अश्या गोष्टीना मानायला सुरु करता किंवा चोरून, घाबरून तरी मान तुकवता. 

काहीजणांना वाटेल मी अंधश्रद्धाळू आहे पण तसं  नाहीय, एकेकदा तुम्ही पाहाल, तुमचा मित्र किंवा मैत्रीण तुमच्यापेक्षा डावे आहेत पण, ते जिथे जातात तिथे त्यांना लक अर्थात नशीब साथ देत. तुम्ही खूप मेहनत करुन पण तुम्हाला एखादया कंपनीत काम मिळालं नाही पण, तुमचा मित्राला सहज मिळालं. 

खूप भयंकर अश्या परिस्थितीतून तुम्ही आरामात सुटता, उदाहरण द्यायचं झालं तर, माझा मित्राचं देते, हायवे वर एका ट्रक ला त्याची कार बेफान थडकली, अर्थात चूक ट्रक वाल्याचीच होती, कारचा भुगा झाला होता, आत बसलेल्या माणसाचा चेंदामेंदा नक्कीच झाला असता किंवा जागीच ठार पण, याच्या केसालाही धक्का नाही बसला. त्यावेळी जाणवलं नशीब कस बलवत्तर असतं  आणि शेवटी म्हणाव लागल काळ आला नव्हता. 

माझचं उदाहरण द्यायचं झालं तर, माझ्या मोठ्या भावाच्या लग्नाच्या आदल्या दिवशी, माझा अपघात झाला होता, माझा पुढे कार होती आणि कार वाल्याच्या समोर अचानक कोणीतरी गाडी घातली, अचानक ब्रेक लागून कार गाडीला थडकली, माझी मोपेड कारला. धडक इतकी जोरात झाली होती कि मोपेडचा नक्षाच बदलला होता, पण माझं नशीब चांगलं होत म्हणून माझा नक्षा शाबूत राहिला. आयुष्यात अशे बरेच जीवघेणे प्रकार बऱ्याचदा अनुभवल्यानंतर शेवटी माझ्या सायनटीफिक मनाने त्याचे नांगे टाकले. मृत्यू नंतरचा अनुभव घेतलेल्या लोकांवर माझं एकचं वाक्य ठरलेलं असायचं  थाप्पा मारतायत हे! पण, आता त्यांच्याच गटात सामील होताना वाईट नक्कीच वाटत नाही. 

शेवटी सांगायचं तात्पर्य इतकंच कि आयुष्य कधी संपत नाही, मृत्यू पलीकडे काय आहे हे शोधण्यापेक्षा आता या क्षणात मज्जा अनुभवण्यातच खर लक अर्थात नशीब आहे. कोणा दुसऱ्याच्या नशिबाचा हेवा करत राहण्यापेक्षा स्वतःच्या नशिबावर खूष राहून त्याला सुंदर करण्यातच आयुष्याचं गमक आहे. मग, सगळ्याच गोष्टी ओपओप ओढल्या जातील. म्हणून सांगते प्रिय मित्रानो नेहमी हसतं रहा! म्हणजे लक अर्थात नशीब पण हसतं राहील. 

प्रिया सातपुते 

Tuesday, 17 September 2013

जातीच्या कातडीचा रंग कोणता?


जातीच्या कातडीचा रंग कोणता?
पांढरा? काळा ? छे छे! रक्तासारखा लाल,

कधी ते रक्त कोणाच्या कुंकवाचा रंग
तर कधी पाण्याची तहान,

प्रत्येक रंगात उठून दिसणारा हा जातीचा रंग
तहान भागवतो फक्त उच्चवर्नीयांची,

ठेचायला ते तान्हुले हात जे स्पर्शतात निरंग पाणी
तरंगतात त्यांचे देह वा राखेने माखतात,

जे पाय चढतात मंदिराच्या पायऱ्या
भिरकावले जातात चारी दिशांना,

कोणती आई? आणि कोणती बहिण?
लचके तोडायला तर यांना फक्त हवी असते एक स्त्री,

मग ती दलित असली तर ती महा-चेटकीण बनते
विवस्त्र होऊन गावभर फिरवली जाते,

मन भरेल इतपत उपभोगली जाते आणि मग प्राणी सुद्धा लाजतील
अशी मारली जाते,

हिचं का तुमची उच्चवर्नीयाता?

हेच का तुमचे उच्चभ्रू संस्कार?

आणि हाच का तो तुमच्या कातडीचा लाल रंग?

बोला कधी बदलणार तुमच्या कातडीचा रंग??


प्रिया सातपुते 

सावलीसावलीने देहाला
कधीही विचारायचं नसतं
कोठे जात आहेस?

प्रिया सातपुते 

Wednesday, 4 September 2013

I AM SORRY!!


आपण ज्यांना आपलं मानतो, ज्यांच्यावर जिवापाड प्रेम करतो, पण, वेळ माणसाला बदलवते कि माणूस बदलतो हे जरी एक कोडं असलं तरी सुद्धा माझं मन हे अजूनही निरागस आहे याची मला ह्म्मी आहे, कारण, अजूनही त्याला दुखत, खुपत म्हणून तर ते ओपोअप एक पिटुकला मोती बनून टपकन गालावरून ओघळत. आज पाठी मागे वळून पाहण्याची अनामिक इच्छा होत आहे, ज्यांना मी कधी दुखावलं असेल, कधी जाणून बुजून तर कधी अकस्मात पणे, अश्या माझ्या जवळच्या सर्वांची मी आवर्जून माफी मागते, कारण माझ्या मनात फक्त पांढराच रंग आहे अजूनही. जर तो काळा किंवा मिक्स झाला असता तर कदाचित मी आज जे हे लिहित आहे ते कधीच लिहिलं नसतं. तुम्हाला वाटत असेलं ना हे सर्व कशासाठी? आयुष्यं एकदाचं मिळत आणि त्यात मला कधीच मिठाचा खडा टाकायचा नव्हता किंवा टाकणार ही नाही. 

सर्वांनी मस्त, आनंदी, प्रेमानी जगावं. 
सुखी भवन्तु!! 

प्रिया सातपुते