Saturday 28 September 2013

गट्टी तुझी माझी- कमल!

                                                                                  Photo courtesy by Abhay Waghmare

कमल आणि माझी गट्टी छान जमली होती. मलाही ती आवडायची. कधी कधी ती स्वतःहून मला उशीर झाल्याचं लक्षात येताच, चहा बनवायची, रात्री जेवताना आवर्जून मला काय पाहिजे नको ते पहायची. माझ्या भल्या मोठ्या केसांची ती खूप मोठ्ठी फॅन होती, चंपी करून देते म्हणून पुढे असायची. एकदा मी सहजंच वैतागून म्हंटले होते, "यार कंटाळा आलाय मला या मोठ्या केसांचा, मस्त हेयर कट करायचा विचार आहे माझा". माझ वाक्य पूर्ण होई पर्यंतच ती म्हणाली,"अजिबात नाही कापायचे, जर तू कापलेस तर मी बोलणारच नाही तुझ्याशी. तिच तसं रीयाक्ट होण मला आवडलं, नकळतच ती माझ्या मुंबईच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून गेली होती. 

तिला पुस्तके खूप आवडायची, मी खास करून तिच्यासाठी बरीच मराठी पुस्तके विकत आणली जी तिला पुढील आयुष्यात खूप मोलाची माहिती पुरवतील. तिला चोकलेटस आणून देण, तिला काय हवं नको मी पण पहायला लागले होते. 
सुट्टीच्या दिवशी आम्ही दोघीच घरी होतो, आमच्या गप्पा रंगल्या होत्या. 

मी- काय आवडत तुला खायला?
कमल- मला न आईस्क्रीम खूप आवडत, दीपा ताईसोबत जाऊन मी खाऊन आले होते. 
मी- अरे वाह! कोणता फ्लेवर खाल्लास?
कमल- व्हेनिला! तोच मिळतो खाली, आणि तुला माहितेय ताई, नाक्यावर पाणीपुरी खूप मस्त मिळते. 
मी- ते पण आवडत का तुला? 
कमल- हो. 
मी- छान! नाक्यावर कशाला जाता तुम्ही? होम डिलिवरी मिळते. 
कमल- अग! तेवढंच फिरायला मिळत. 
मी- अरे वाह! मग काय खरेदी करून आला?
कमल- अग! आईंना पेपर पिन्स हव्या होत्या त्या आणायला गेलो होतो, मला एक वही पण हवी होती, पण… 
मी- पण? काय 
कमल- पैसे नव्हते नेले. 
मी- ह्म्म्म 

तितक्यात इंटरकॉम वर फोन आला आणि तिच्यासाठी फर्मान आलं होत, खाली येण्याचं. ती निघून गेली मी मात्र विचार न दवडता, पटकन वॉलेट घेऊन वॉकला निघाले, संध्याकाळची नाष्ट्याची वेळ झालीच होती. आधी मी जाऊन वही विकत घेतली, त्यासोबत एक पेन घेतला, तिच्यासाठी टिकल्यांच पाकीट घेतलं. खूप दिवसांआधी ती बोलली होती टिकल्या संपलेत म्हणून. मग पाणीपुरी, शेवपुरी घेतली आणि कामत आईस्क्रीम पार्लर मध्ये जाऊन चोकलेटचे वेगवेगळे दोन फ्लेवरच आयस्क्रीम घेतलं. घरी जाऊन, इंटरकोम वर कॉल केला आणि तिला अर्जंट ये, काम आहे हा निरोप धाडला. तशी ती १० मिनिटाच्या आत हजर झाली. 

कमल- काय काम आहे? 
तिचा उतरलेला चेहरा सगळ सांगत होता. 
मी- टीवी पाहत होतीस का?
कमल- अग! मराठी पिक्चर लागला होता आणि तू बोलावलं 
मी- इथे लाव मग, आधी ती पाणीपुरी शेवपुरी घे. 
ती अवाक होऊन मला पाहतच राहिली. 
मी- बघत काय उभारली आहेस, मऊ होईल ती शेवपुरी घे पटकन, तुझ्यासाठी थांबलेय मी खायची. 
तशी ती भारावलेल्या नजरेने पुढे आली. 
मस्त ताव मारून मी तिला सांगितलं फ्रीजर मध्ये डब्बे आहेत ते घेऊन ये. 
कमल- काय आहे हे?
मी- आयस्क्रीम 
कमल- माझ्यासाठी?
मी- हो
तिच्या चेहऱ्याची खळी मस्त फुलली. चमचे घेऊन मी बाहेर आले, तर तिच्या डोळ्यातलं साठलेलं पाणी पाहून मी तिच्या पाठीवर हात ठेवला तिला जवळ घेत म्हणाले, "वेडाबाई! रडतात का कोणी असं? डोळे पुस आधी ते, आणि खाली जाताना ती टेबलावर ठेवलेली वही पेन आणि टिकल्या घेऊन जा!"
कमल- थांकू ताई, असं  कधी कोणी… 
ती काही बोलण्याआधीच मी तिला गप्प केलं.
मी- थंक यु म्हणायचं असतं ग किती वेळा सांगू तुला. 
या वाक्यावर आम्ही दोघी हसलो, आयस्क्रीम संपवत काही तिचं, काही माझं ऐकत आमची आयस्क्रीम पार्टी संपली. 

त्या दिवशी रात्री झोपताना जे सुख मी अनुभवलं होत तेच आताही अनुभवतेय आणि याचं सगळ क्रेडीट कमलला! 
थांक कु कमल! 

प्रिया सातपुते 

No comments:

Post a Comment