Tuesday, 27 August 2013

शब्द
शब्द जेव्हा मुके होतात 
तेव्हा ते तुझासारखेच दिसत असतील 
कारण,
शब्द माझ्यासोबत असताना 
नेहमीच खूष राहिले 
जेव्हा मी त्यांना 
तुझ्यासोबत जायला सांगितलं 
तेव्हा चक्कं नाही म्हणून 
शब्दांनी मला घट्ट मिठ्ठीच मारली


प्रिया सातपुते 

Monday, 19 August 2013

रक्षाबंधनहिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो, बहिण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटात राखी बांधते. हा धागा फक्त बांधायचा म्हणून नसतो, ते भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं प्रतिक आणि भावाकडून बहिणीला मिळणारी संरक्षणाची हम्मी असते. ज्या मनगटात मी हा धागा बांधतेय त्याच्या मनगटात माझं रक्षण करण्याची ताकत, भावाला सुखी समृद्ध आयुष्य आणि चिरंतन प्रेम रहाव हीच प्रार्थना प्रत्येक बहिण आपल्या भावासाठी करते. 

आजच्या या कलयुगात, २ वर्षाची चिमुकली सुद्धा सुरक्षित नाही, मग जन्माला आलेल्या मुलींचं सोडाच! द्रोपदीच्या वस्त्रहारणात धावून आलेला कृष्ण आता कुठे लुप्त झाला आहे कोणास ठाऊक? पण आज, मी सर्व पुरुषांना विनंती करते कि त्यांनी स्वतः मधल्या कृष्णाला जाग कराव आणि आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांना नुसतं पाहत न राहता, प्रतिकार करावा म्हणजे कोणी रिंकू भर रस्त्यात जाळली जाणार नाही, भर रस्त्यात एक माणूस कोणी अमृताला चाकूने भोकसणार नाही. दिवसा ढवळ्या कोणी माथेफिरू ऍसिड फेकून एखाद्या तरुणीला आयुष्यभराचा मृत्यू देणार नाही, ज्या चिमुकलीला जग असत तरी काय हेच माहित नाही अश्या निष्पाप बालिकांवर कोणी बलात्कार करू शकणार नाही, दारू ढोसून कोणी निर्घुनतेने तरुणींवर अत्याचार करून, खून करू शकणार नाही. 

प्रत्येक बहिणीसाठी रक्षाबंधनची अपूर्व भेट म्हणून तुम्ही सारे स्वतः मध्ये एक योद्धा जागा करा जो नेहमी स्त्रियांच्या मानासाठी, रक्षणासाठी तत्पर राहील. 


प्रिया सातपुते 
Happy Rakshabandhan!!

Sunday, 18 August 2013

कमल-पहिली भेट

                                                                                         Photo courtesy by Abhay Waghmare

सावळ्या रंगाची, चपचपीत तेल लाऊन ती माझ्यासमोर उभी होती. दारापासून बाजूला होत मी तिला वाट करून दिली, मान खाली घालून ती किचेन मध्ये जाऊन भांडी घासू लागली. लेक्चरला जायची वेळ झाली होती, मी चहा बनवायला किचेन मध्ये गेले, तिला विचारलं," चहा घेणार का तू?" तशी ती काहीच बोलली नाही. दोन कप घेत मी चहा ओतला तिला पण दिला, तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव दिसले नाहीत, मी किचेन मधून बाहेर जाताच तिने हलकेच चहाचा कप ओठाशी लावला, मी तिला बिस्कीट खाण्यासाठी बाहेर बोलवून घेतलं सोबतच घरची भडंग पण होती, बिस्कीट नको म्हणत ती खाली फरशीवर बसणार तोच मी तिला वरती बसण्यास खुणावल, एक प्लेट भडंग तिला देत मी म्हणाले,"खाऊन घे ग! मी घरून आणलीय, सगळ्यांसाठी आहे ती." तशी ती हळूच पुढे आली. आणि मग आमच्या गप्पा खुलत गेल्या. 

मी- कमलच नाव आहे ना तुझं?
कमल- हो! अरे वाह तुम्ही मराठी आहात?
मी- हो मी मराठी!! कुठून आहेस?
कमल- रत्नागिरी!
मी- अच्छा! कितीवी शिकली आहेस तू?
कमल- माझं ७वी पर्यंत शिक्षण झालय. 
मी- अरे वाह! मग पुढे का नाही शिकलीस?
कमल- (मान खाली घालून) नाही शिकले. 
मी- का? आवडत नव्हत का ?
कमल- छे छे, खूप आवडायचं, माझा पहिला नंबर आला होता शाळेत, आमचे मास्तर घरी येउन मागे लागले होते बाबांच्या कि मुंबईला नका पाठवू तिला, शिकू द्या, पण, मी शिकले असते तर मग भाऊ शिकला नसता, पैसे पुरले नसते, आणि मग माझ्या लहान बहिणीलापण मुंबईला पाठवलं असत म्हणून.. 
मी- किती वर्षांची आहेस तू?
कमल- १४ पूर्ण आहे मी
माझ्या मनात पाल चुकचुकली, तिने परफेक्ट १४ कसं म्हंटल. चेहऱ्याची गंभीरता लपवत मी तिला विचारलं," मुंबईत कशी आलीस? 
कमल- माझे काका कुर्ल्याला राहतात त्यांच्यासोबत. 

ती पुढे काही बोलणार तोच माझा फोन रिंग झाला, माझ्या मैत्रिणीचा फोन होता, तशी मी भानावर आले मला लेक्चरला उशीर होत होता, तशी मी पटापट प्लेट ठेऊन, भडंग डब्ब्यात ठेवताना, बेसनचे लाडू नजरेस पडले, तशी मी गोड खाणारी व्यक्ती नाही हाच माझा समज होता कारणही तसच होत ना, मी कोल्हापूरची मुलगी, आमच्याकडे चमचमीत तिखट खाण्याची क्रेझ! तरी सुद्धा एक लाडू पटकन काढून मी कमलच्या हातात दिला. तशी तिच्या चेहऱ्याची कळी खुलली. तिच्या हसऱ्या चेहऱ्याला पाहत मी तिला,"बाय, नंतर बोलू." म्हणून निरोप घेतला खरा, पण, एकमेकांशी पुन्हा भेटण्यासाठी! 

आयुष्य हे एक चित्रच आहे, काही माणस नकळत येतात आणि त्यात खूप साऱ्या आठवणीचे रंग भरून जातात. 

प्रिया सातपुते 

Friday, 2 August 2013

मोरपीस

Photo courtesy by Rahul Bage

आयुष्याच्या या प्रवासात खूप वळणे येतात, नवीन लोक भेटतात… पण, एक हुरहूर नेहमीच राहील, जे कधी आपल्याला मिळणारच नसतात ते का गालावरून फिरणाऱ्या मोरपिसासारखे हळुवार या मनात येतात आणि मोरपिसाचा स्पर्श निघताच निघून जातात. खूपजण म्हणतात कि ते आपल्याला बरचं शिकवून जातात तर काही म्हणतात ते मनाला कधीही न भरणाऱ्या जखमा देऊन जातात. 
अश्या या माझ्या काही मनातून मग एकचं आवाज येतो, "ते मोरपीस किती सुंदर होत, हेही त्याच्यापेक्षा जास्तीच सुंदर आहे". 
समजल? नाही ? उफफो !! 

एक छोटीशी गोष्ट सांगते, एकदा एक गुरु आणि शिष्य एका गावातून फिरत फिरत जात असतात. वाटेतून जाताना एक लग्नाची वरात जाताना पाहून शिष्याच्या मनात एक प्रश्न पडतो आणि तो गुरुंना विचारतो," गुरुजी प्रेम म्हणजे काय आणि लग्न त्याच माणसाशी कराव ना ज्याच्यावर आपण प्रेम करतो? मग लग्न म्हणजेच प्रेम आहे का?" यावर गुरुजी हसतात आणि शिष्याला म्हणतात,"हे समोर दिसणार सुंदर सूर्यफुलांच शेत आहे, तिथे जा आणि सगळ्यात सुंदर, तुला आवडणार फूलं घेऊन ये."
शिष्य गोंधळला मग तो शेताकडे निघाला,"फुलांवरून कस उत्तर सांगणार गुरुजी!" असं पुटपुटत तो शेतात घुसला, सगळीकडे सुंदर पिवळीधम्मक फुले, जणू ती फक्त सुर्यासाठीच जन्माला आली आहेत, असचं त्याला वाटत होत. थोडं पुढे जाऊन त्याला एक खूप सुंदर फुल दिसलं, बराच वेळ तो मंत्रमुग्ध होऊन त्याच्याकडे पाहतच राहिला, मग अचानक त्याच्या मनात आलं, "आता हे नको तोडायला, थोडं आणखी पुढे जाऊन पाहतो, याच्या पेक्ष्याही अत्यंत सुंदर फुलं मला मिळेल." तो पुढे जातो, खूप पुढे जातो, पण, हाती काहीच येत नाही, मनाला भावणार एकही फुल त्याला भेटत नाही, तो त्या आधीच्या फुलाला शोधण्याचा अतोनात प्रयत्न करतो पण ते सुद्धा तो हरवून बसतो, हताश मनाने परत येताना तो एक फुल तोडून घेतो. गुरुजींकडे येउन तो ते फुल त्यांना देतो. त्याला हताश झालेला पाहून गुरुजी त्याला झालेला सगळा प्रकार सांगण्यास सांगतात, तो जे काही झालं ते सार गुरुजीना सांगून टाकतो. गुरुजींच्या चेहऱ्यावर आपसूकच एक हास्य उमटत आणि ते बोलू लागतात," जेव्हा तू पहिल्या फुलाला पाहिलंस तेव्हा तुला ते खूप आवडलं, त्याच्या रंगाने, स्पर्शाने तू मोहून गेलास, ते तुला सुख देणार कि दु:ख यातलं काहीही तू मनात आणलं नाहीस; हेच तुझं 'प्रेम' होत. पण, आणखीन सुंदर मला पुढे मिळेल या आशेपोटी तू त्याला झिडकारलस, खूप शोधून सुद्धा तुला त्याच्या तुलनेइतकं दुसंर काहीच हाती आलं नाही म्हणून तू वाटेत मिळेल ते उचलून पुढे आलास, हेच 'लग्न' आहे."

या गोष्टीचा सांगण्याचा मतितार्थ इतकाच आहे कि जर कोणी तुम्हाला प्रवासाच्या वाटेत अर्ध्यातच सोडून गेलं आहे तर ती चूक तुमचीच आहे असं मानून स्वतःचा जीव जाळू नका, तुमची कदर करणार, तुमच्यावर जीव ओतणार तुम्हाला शोधत नक्कीच येईल. 

शेवटी काय ते तुम्ही ठरवायचं पुस्तकातल्या मोरपिसासारख जगायचं? कि, डोळ्यांना सुख देणाऱ्या, गालावरून मुक्तपणे फिरणाऱ्या खट्याळ मोरपिसासारख आनंदी राहायचं. 

प्रिया सातपुते Thursday, 1 August 2013

ओन्ली फॉर सिंगल्स


पाऊस आणि रोमान्स एक असं समीकरण आहे कि जे कधीच बदलणार नाही. जे फक्त सिंगल्स आहेत त्यांच्यासाठी तर पाऊसच एक पर्वणीच ठरतो, तोच त्यांचा पार्टनर!! कोण म्हणालं? फक्त कपल्सच पाऊस एन्जॉय करतात? पाऊस हा सर्वांसाठी बरसतो. पहिल्या पावसाला मी पाहिलं, साळुंकी नावाचा पक्षी, आतुरतेने काळ्या काळ्या ढगांकडे पाहत होता, जणू, तो त्याला फक्त माझ्यासाठी बरस असचं सांगत होता.

पाऊस सुखावतो, पाऊस दुरावतो, कधी प्रेम वाढवतो तर कधी आठवणींना उजाळा देतो. त्याच्यातला थंडावा देतो आणि मनातला क्लेश, डोक्यातला राग आणि अश्या सगळ्या छोट्या मोठ्या खुपणारया गोष्टीना वाहून घेऊन जातो. पाऊस कधी माझं ऐकतो तर कधी तुमचं.

खरचं पाऊस माझं ऐकतो. आज संध्याकाळी मनात नसताना काही गोष्टी कराव्या लागल्या, त्या उरकून घरी येताना, पाऊस मला चिंब भिजवायला तयारच होता, पण, प्लीज आज नको भिजवू म्हणताच तो गायब झाला. अशी आहे माझी आणि पावसाची गट्टी. पाऊस माझा सखा, यार, बडी, सगळ काही आहे, त्याच्यासोबत असतांना मी वेगळ्याच दुनियेत असते, मी रुसले असले कि तो अचानक खूप जोरात बरसतो आणि माझा रुसवा त्याच्यात विलीन होतो, मी रागवले असले कि तो हलकेच थेंब बनून माझ्या गालांवर चुंबन देतो आणि माझा राग भुर्रकण उडून जातो, मी रडताना तो माझ्या अश्रुना असं काही सामावून घेतो कि समोरच्या व्यक्तीला कळणार देखील नाही कि मी रडत होते… तशी सहसा मी रडत नाही!!

So guys just enjoy with your Rain...Lovely rain!!

Love, 
Priya Satpute