Monday, 19 May 2014

काही अशे….काही मनातले

जेव्हा खूप कामं तोंडावर येउन पडलेली असतात, अन कामात बुडालेले आपण, झटत असतो गड गाठण्यासाठी, अशा ऐनवेळी शब्दांची मंडले घोघावत येतात, काम बाजूला सारून जणू ते सांगत असतात, तू फक्त आमच्यासाठीच बनली आहेस प्रिया! अन मग अवतरतात मनाच्या कप्प्यात दडून बसलेले क्षण, भाव… काही अशे….काही मनातले…

गहिवरलेल्या या मनाला
कोणाचीच आसं नाही
याचंच मला
अप्रूप वाटत…


नजरेला ठेचून काढायचं आहे मला,
असा एक एक तरी दिवस,
मला डॉन बनून,
जगायचा आहे…


बरेचं प्रश्न उमटलेत
लिहता लिहता
या पेन्सिलीच टोकं
सुद्धा थकून मोडून पडलंय…


समजून घेणारं कोणी
माझ्या हक्काचं माणूस
ज्याच्या खांद्यावर भार टाकेन
या गुदमरलेल्या श्वासाचा…


मनातलं काहूर मांडू कसं शब्दांत?
अश्रूंच्या टपोऱ्या मोत्यात
खारटपणाची चव चाखून
गदगदून बेहाल होतात
हे बिच्चारे जीव…

प्रिया सातपुते 

प्रियांश...३३


लाईफ पार्टनर अर्थात सोलमेट याची परिभाषा करणंच खूप क्लिष्ट काम आहे, असंच वाटू लागलय मला! कारण, आपण सारेचं परफेक्ट पार्टनरच्या प्रतिक्षेत असतो. आपल्या मनात सुद्धा एखादी प्रतिकृती तयार होत असावी, मग काय आपण प्रत्येक माणसाला तिच्याशी तोलून मोलून पाहू लागतो. 

प्रत्येकालाच त्याचा पार्टनर गोराचीटाच हवा असतो! मग काळ्या रंगाच्या व्यक्तीने कुठे जायचं? पुढे काय, तर सडपातळ मुलगी हवी अन मुलींना डोल्ले शोल्ले वाला गबरू जवान हवा असतो. लग्नानंतर आपला पार्टनर जाडजूड झाला तर काय तुम्ही त्याला सोडून देणार का? अन जर गबरू जवानला थायरॉईड होऊन तो काडी पैलवान झाला तर काय करणार? दुसरा शोधणार? इथे येणाऱ्या क्षणाची गैरेंटी नसते मग माणसाची कशी देणार?? 

आम्हांला निरोगी, पवित्र, बिनाडागांची सून हवी? अहो! होणारा नातू कसा धष्टपुष्ट होईल ना मग! आताच्या काळात सुद्धा अशे विचार असू शकतात यावर माझा विश्वासच बसला नव्हता पण असा प्रश्न चक्कं माझ्या एका मैत्रिणीला विचारण्यात आला होता. आता तर, लग्नाआधी भावी वर-वधू दोघांची पण, शारीरिक तपासणी आणि सो कॉल्ड "वर्जिनिटी टेस्ट" सुद्धा करावी लागेल. 

लाईफ पार्टनर किती साधा अर्थ आहे, पण किती वलये लागली आहेत याला! प्रेम, आदर, सुंदर मन या तर आता पुस्तकी गोष्टी बनून राहिल्या आहेत, आता तर "लाईफ पार्टनर" पेक्षा "कॉनट्रक्टच्युअल पार्टनर" म्हणावं लागेलं…!

प्रिया सातपुते 


Monday, 12 May 2014

पंचतंत्र...लग्नाआधीचे!

लग्न ठरल्यानंतर सर्रास आपण पाहतो, आई मुलीलाच माहिती, सल्ले, उपदेशाचे डोस देत राहते, पण, मुलगा मात्र दुर्लक्षितच राहतो! कारण काहीही असो पण, प्रत्येक आईने लग्नाआधी तिच्या लाडक्या लेकाशी सुद्धा थोडफार तरी बोललंच पाहिजे. आई अन मुलाचं नात कसं आहे? त्यांच्यात विचारांची-प्रेमाची किती देवाण घेवाण होते यावरून समजून येते कि मुलगा दुसऱ्या स्त्रियांशी कसा वागत असेलं? किती आदर देत असेल? अन सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो होणारया बायकोला कसा वागवेल हे सुद्धा अवलंबून असते. तुम्ही आई नसाल आणि मुलगा जरी असाल तरीही हे मुद्दे तुमच्या घराला "घरोघरी मातीच्या चुलीच्या" नामावलीतून बाहेर काढतील म्हणून नक्कीच पुढे वाचा!

आता प्रश्न उभा राहतो, बोलायचं तरी काय? घरात नेहमीच सौख्य-शांतता नांदावी असं वाटत असेल तर नक्कीच हे पंचतंत्र तुमच्या मदतीला धावून येईल… 

१) तुझी "बायको" ही तुझी "आई" नाही!
  आता तुमचे दोनाचे चार हात होणार, अर्थात तू मोठ्ठा झालास बेटा, स्वतःची कामे स्वतः करायला आलीच पाहिजेत, आधी आई होती म्हणून सार मनासारखं मिळायचं, आई ही भाजी कशाला केलीस? मला दुसंर काहीतरी दे म्हणताच, या चोवीस तास राबणाऱ्या आईच्या पायाला पुन्हा चाकं लागायची अन डिश तयार! आई सार करायची, तू पण कर अस म्हणून चालणार नाही. का? तू माझं बाळ, तुझी काळजी घेण माझं कामच आहे, पण, बायकोसाठी तू तिचा सहचारी अर्थात पार्टनर आहेसं, म्हणून तुम्हां दोघांना एकमेकांची काळजी घ्यायची आहे. कामाला वाटून घ्या, एकमेकाला मदत करा. जाणून बुजूनचा गबाळेपणा बंद झाला पाहिजे आता!

२) तुलना सोडून दे!
आज संध्याकाळीचीच गोष्ट घे, तिला जमतील तशे पोहे केलेचं ना तिने, आणि तू काय म्हणालास लग्नाआधीच आईकडून पोहे शिकून घे कशे करतात ते! लक्षात ठेव प्रत्येक माणूस वेगळाच असतो, तुलनेतून तू तिला माझ्यापासून दूर करून टाकशील. प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्ट जमेलच असं नाही ना? तिच्यासारख फाडफाड इंग्लिश बोलायला कुठे येत मला? माझ्याकडे २०-२५ वर्षांचा अनुभव पाठीशी आहे, ती तर आता कुठे या अनुभवाला सामोरी जाणार, थोडं समजून घे तिला, अन तुलना बंद कर. 

३) आदर कर! 
तुला लहानपणापासून हा मंत्र दिलाच आहे, पण तरीही लक्षात ठेव, लग्नात जेव्हा तू तिच्यासोबत सप्तपदी घेशील, तेव्हा ती तुझ्या आयुष्याचा महत्वाच भाग झालेली असेलं, आयुष्यात प्रत्येक क्षणांत ती तुझी भागीदारीण असेलं. तो भक्कम आधार, प्रेम मिळवण्यासाठी स्त्रिच्या मनातच प्रवेश करावा लागतो बेटा! माणसाच्या आयुष्यात प्रत्येक जीवापाड जपलेल्या माणसांची जागा भक्कम असते, तिला तिचा वेळ दे, आदर दे!

४) पाऊलागणिक उभा रहा!
आपलं घर, आई-वडील, सांर काही मागे सोडून ती या नव्या घरात येणार आहे, तिला समजून घे, तिचं मन सांभाळ, तिला आपल्या घरच्यांशी मिळून मिसळून रहायला मदत कर. तिचं तुझ्याशी लग्न झालं म्हणून तिचं वर्तुळ तिला तोडायला लावू नकोस, उलटा तुम्ही दोघे, दोन वर्तुळांना छेदून, एकमेकाला आणखीन चांगले ओळखा. कधी एखाद वेळेस कामवाली नाहीच आली तर दोन ताटे धुवायला कमीपणा वाटून घेऊ नकोसं. 

५) प्रेमाला वय नसतं!
लग्नाच्या ४० वर्षानंतर सुद्धा तुमच्यातलं प्रेम सदैव टवटवीत ठेवशील. तिचे केस पिकलेत, तिची स्किन आधी सारखी लुक्लुकीत नाही म्हणून प्रेम करण सोडू नकोसं, आयुष्यात मनाच्या प्रेमाइतपत सुंदर काहीच नाही हे ध्यानी ठेव. तू चक्कं जर्जर ८०-९० वर्षांचा होशील तेव्हा तुला जाणवेल प्रेमाला वय नसतं. 

ही पंचतंत्र प्रत्येक आईने आपल्या लाडोबाला दिलीच पाहिजेत, पण आपल्याकडे थोडे मोडून तोडूनवाले तंत्र दिले जातात, जर "घरोघरी मातीच्या चुलीच हव्या असतील तर मग खुशाल तोडलेले मोडलेले सल्लेच वापरा, अन जर आताचे, "घरोघरी गैसच्या शेगडी" हव्या असतील तर हसत, एखाद वेळेस नाक मुरडत का होईना हे लग्नाआधीचे पंचतंत्र कानात कुर्र करून सांगून टाका… 


।। सुखी भवन्तु।।  

प्रिया सातपुते 

Friday, 9 May 2014

प्रियांश...३२

एक नवा जीव जन्माला येतो अन, एक जीव निघून जातो…आपणांस सांर काही माहित असतं…आत्मा चिरंतन आहे, ती कधीच मृत होऊ शकत नाही… पण, तरीही माणूस हा भावनिक आहे, त्याला प्रेम, माया, नाती-गोती यांमध्येच रहावस वाटत…कितीही म्हंटल की हे सारे मोहपाश आहेत,…तरीही आपल्या लाडक्या व्यक्तींना अंतिम निरोप देताना…आठवणींचा, प्रेमाचा, साठवून-दाबून ठेवलेला हुंदका आर्तपणे धाय मोकलून रडतोच… 

प्रिया सातपुते 

Friday, 2 May 2014

शा.जो. १


काही लोकांना उगाचच सल्ले देण्याची सवय असते, आपण चांगले वागतो म्हणूनच कि काय ते आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतात! एकतर त्यांना चोमडेपणा करायला दुसरे उद्योग नसतात म्हणून ते आपलेपणाच्या पांढऱ्या करकरीत सदरयात आपल्या माथी काळा रंग मारायचा अतोनात प्रयत्न करतात. बिच्चारे! मूर्ख लोकं त्यांना हे देखील उमगत नाही की त्यांचेच हात आधी काळे झाले आहेत. 

प्रिया सातपुते