Sunday 29 June 2014

फँड्री...अ वाईल्ड पिग...

फँड्री…म्हणजे काय? सोफीस्टीकेटेड भाषेत सांगायचं तर, इट मिन्स अ वाईल्ड पिग…अस्सल मराठीत बोलायचं तर ही शिवीच आहे. आजकालच्या खाऊन पिऊन सुखी असणाऱ्या पांढरपेशा लोकांना अजूनही वाटत कि जातपात संपली…मग, हे आरक्षण पण संपवा, आम्ही काही मानत नाही, कशाला पाहिजे आरक्षण,?आमच्या पूर्वजांच्या पापाची शिक्षा किती दिवस या आरक्षणामुळे भोगणार आम्ही? आम्ही भरायचे लाखो रूपये अन त्या मागासवर्गीयांनी भरायचे मोजून हजार…आम्ही ९० टक्के काढून प्रवेश मिळत नाही अन, यांना ७० टक्क्यांवर प्रवेश मिळतो, हा अन्यायच आहे!!! अशे एक नाही हजार विचार आपण सर्वच करतो

जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने माणूस म्हणून डोळे उघडाल तेव्हाच अन तेव्हाचं तुम्हाला दिसेल, एक भयानक क्रूर सत्य जे आजही घडतं आहे, धर्माने देश बाटला अन पूर्वजांनी जाती…कोणी ठरवलं कि महारांनी महारवाड्यातच राहायचं? अन तोच महार जेव्हा शिकून सवरून मोठा होतो, समाजाने म्हणवलेल्या पॉश वस्तीत रहायला जातो अन जेव्हा त्याच्या शेजाऱ्या पाजारयाना त्याची जात कळते तेव्हा मात्र सर्वांची तोंडे वाकडी होतात, का? महाराच रक्त वेगळ असतं का? कोणी ठरवलं चांभारांनीच चप्पला शिवायच्या? या चांभारांमुळेच तर तुम्ही मान ताठ करत भर उन्हात निवांत चालता नाही का? नाही तर काय चिंध्या बांधून फिरला असतात? कोणी ठरवलं ढोरानीच मेलेली मढी ओढायची, रस्ते लोटायचे? अरे या रस्त्यांवर चालायची हिम्मत तरी झाली असती का मग? कचरा करता येतो उचलायला लाज वाटते का? कोणी ठरवलं  देवाची भाषा फक्त ब्राह्मणांनीच शिकायची? आज सुद्धा खेड्यापाड्यात गेल्यावर जातीपाती स्पष्ट दिसतात, आजही भारत देश स्वतंत्र झाला नाही…आजही जातींच्या बेड्यात देश गुदमरतो आहे. 

जन्माला येणाऱ्या मुलाला जातीची निवड करायचा अधिकार नसतो अन्यथा सगळेच ब्राह्मण म्हणूनच जन्माला आले असते…कोणीच फँड्री झाला नसता…मला आजही आठवत, सेकंड ईयर बी.एस.सी ला असतांना मी अन माझी एक मैत्रीण लायब्ररीमध्ये होतो गप्पा चालू होत्या. जात नावाचा प्रश्न तिने ठोकूनच दिला मी न लाजता माझी जात सांगून मोकळी झाले. तिला काही सांगायचं होत, पण, तिची हिम्मत होत नव्हती, शेवटी मीच विचारलं, "काही सांगायचं आहे का तुला?" मग ती कचरतच बोलली, "प्रिया, अग मी क्रिश्चन नाहीय, मी… मी बुद्धीस्ट आहे, तू कोणाला बोलू नकोसं, मला लाज वाटते." काही क्षणांसाठी मी स्तब्धच झाले, मग मी तिला म्हणाले होते ते आजही माझ्या लक्षात आहे, "तुला आदर वाटला पाहिजे तुझ्या जातीबद्दल आणि तू लाजते आहेसं, का? लोकं काय म्हणतील म्हणून? तू तर  आंबेडकरांच्या कार्याचा अपमान  करते आहेस, त्यांच्यामुळे माणूस म्हणून तू श्वास घेते आहेस, मी माझी जात सांगितली म्हणून तू आज तोंड उघड्लस, नाही तर लास्ट टाइम तू मराठा होतीस, मग कोण जाणे नेक्स्ट टाइम काय असणार आहेस?" 

मुंबईच्या विविधतेने नटलेल्या जगात जेव्हा मी रहायला गेले, तेव्हा पीजी अर्थात पेयिंग गेस्ट म्हणून रहायचं ठरलं, कारण हॉस्टेल लांब होते अन पप्पांची तयारी होस्टेलसाठी नव्हती…आमच्या घरासारखाच फ्ल्याट होता, सर्वसोयी होत्या, पण, घरमालकीण ब्राम्हण वाटत होती…म्हणून माझ्या पप्पांनी स्पष्टपणे सांगून टाकलं, "आम्ही चांभार आहोत, तुम्हांला काही अडचण तर नाही ना? कारण, ही माझी एकुलती एक मुलगी आहे…" पप्पांच वाक्यं पूर्ण होण्याआधीच त्या बोलल्या, "छे, छे… अहो मी शिक्षिका आहे, जग कुठे गेलं अन तुम्ही हे काय म्हणताय? ती जशी तुमची मुलगी तशीच ती माझी मुलगी म्हणूनच राहील." त्यांना आंटी वरून मी कधी आई म्हणायला लागले हे कळल सुद्धा नाही! सॉलिड व्यक्तिमत्व होत ते, खूप काही शिकवलं त्यांनी मला… मुंबई सोडतांना त्यांच्या गळ्यात पडून मी रडले होते. 

माणुसकी नावाची एकंच जात का असू नये??? प्रत्येकाला वाटत खालच्या जातीचे लोक आरक्षणाचे हपापलेले आहेत, पण, हे साफ खोट आहे. मला अभिमान आहे माझ्या पूर्वजांचा त्यांनी त्यांच्या जातीत राहून पत-प्रतिष्ठा मिळवली, संस्काराची शिदोरी दिली… त्यांच्यामुळेच आज मी हे सुख, उपभोगत आहे, त्यांच्या मुळेच मी हे लिहित आहे, गर्व आहे मला मी "चांभार" असण्याचा…

प्रिया सातपुते 


Thursday 12 June 2014

प्रियांश...३८

आजकाल जातीयता sophisticated झाली आहे, माणूस कितीही शिकला तरीही तो जात सोडायला तयार होत नाही, आणि माणसाच पण तसचं आहे…तो नाव विचारून थांबत नाही कारण त्याला आडनावावरून जात कळते… मग, कितीही शिका, कमवा, चांगलं वागा जात काय पिच्छा सोडतं नाही...याच्यावर एकचं उपाय आडनाव विचारायचं नाही…पण, मनाच्या कुठ्ल्यातरी कप्प्यात माणसाने जात लपवून ठेवलेलीच असते…जेव्हा आडनावावरून जात ओळखता येत नाही तेव्हा माणूस, त्याच्या खऱ्या लायकीवर उतरतो अन विचारतो हे अमुक तमुक तुमचे कोण हो? कोणी नाही वर सुद्धा हे थांबत नाहीत, अच्छा म्हणजे तुम्ही अमुक जातीचे का? म्हणून मनाच्या पिंजऱ्यातून पिल्लू सोडून देतात,… मग, काय समोरचा काय म्हणेल हो नाही वर त्या माणसाच आख्ख चरित्र मांडून रिकामे देखील होतात. वाह रे माणसा, "निर्लज्जपणा" हीच का तुझी जात राखणार आहेसं तू?…जग पुढे जातंय पण, तू अजूनही या जातींच्या जाळ्यात अडकून पडला आहेस…ग्लोबलायझेशन वाढत चाललय आता तरी तुझ्या डोळ्यांवरची जातीची जळमटे दूर सार अन माणसाला माणूस म्हणून किंमत दे…अरे, निर्दयी माणसा अजून किती पापं स्वतःच्या आत्म्यावर घेशील? पापात माखून निगरगट्टच झाला आहेस की रे तू, तुझ्या आत्म्याला या पापानेच नष्ट करणार आहेसं का रे तू ? तुझ्या पुढच्या पिढीला पण वारस्यात हेच पापं देणार आहेसं का रे मूर्ख माणसा?????

प्रिया सातपुते 

Friday 6 June 2014

राजे परत या…


छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी रायगडावर झाला…स्वराज्य निर्मिती झाली…मुघलांचे कंबरडे मोडून त्यांना माती चारली…पण, या महान राजाने मुघलांच्या स्त्रियांना "आई"चा दर्जा दिला…"अशीच असती अमुची आई सुंदर रूपवती तर आम्हीही सुंदर झालो असतो…" म्हणून गौरवत सुरक्षितपणे मुघलांच्या स्वाधीन केले… आणि आज याच शिवरायांच्या मनात क्रोध, दुखः दाटून आले असेलं…आपल्याच स्त्रियांचा अपमान निमुटपणे पाहणाऱ्याना राजे काय शिक्षा देत असावेत? 
मला अजूनही आठवते, लहान असतांना बाबा एक गोष्ट नेहमी ऐकवायचे, एका विधवेवर पाटलाने हात टाकला म्हणून महाराजांनी त्याचे हात पाय छाटून त्याला सोडून दिले होते…अन आता फक्त मूकपणे बघण्याखेरीज काहीच करू शकत नाहीत आजचे पुरुष? ना विरोध करतात, ना सुरक्षा… फक्त तमाशा बघतात…राजे आज तुम्ही असतात तर तुमच्या बहिणींवर अशी वेळचं आलीच नसती… राजे परत या, राजे परत या… समाजाला जागे करण्यासाठी…स्त्रियांचा मान ठेवण्यासाठी…बलात्कारयाना धडा शिकवण्यासाठी…महाराष्ट्रचच नव्हे तर या भारत देशाचं नंदनवन करण्यासाठी परत या राजे, परत या… आजचा तरुण फक्त तुमच्या जयंतीलाच जागा होतो, राज्याभिषेकाला छाती ताठ करत वाघासारखा चालतो पण, जेव्हा स्त्रिवर अत्याचार होत असतो तेव्हा मान खाली घालून, अळी मिळी करून मूग गिळून गप्पं बसतो…राजे यांच्या कणाकणातून आत्मविश्वास झळकवण्यासाठी परत या राजे, परत या…राजे खरचं परत या…

प्रिया सातपुते 

Monday 2 June 2014

प्रियांश...३७

आपणा सर्वांना अपडेट राहण किती आवडत ना? म्हणून तर बरेचजण न्यूज पेजेसना लाईक करतात, त्यातली मीही एकंच, पण, हल्ली अपडेट राहण मनाला चटके देऊ लागलं आहे…रोज न चुकता बलात्काराच्या बातम्या वाचून माझं मनच सुन्न होऊन गेलंय…दलित अल्पवयीन मुलींना अत्याचार करून, झाडाला लटकवलेले फोटो सोशल नेट्वर्किंग साईट्सवर धडाधडा फिरत होते, ते पाहून मन बधीर होऊन गेलं, माझे शब्दचं गळून पडले. प्रत्येकजण शेयर, कमेंट करून आपापला आक्रोश मांडत राहिले, अशे किती आक्रोश आपण मांडत राहणार? अश्या किती कळ्यांना कुस्करताना फक्त पाहत बसणार? त्यांच्या मृत अत्याचारीत देहाकडे पाहण्याची तरी ताकत आहे का आपल्यात? मग, त्यांच्यावर अशी वेळचं का येऊ द्यायची? 
काही दिवसांपूर्वी मटाला एक लेख वाचला होता, त्या स्त्रीने एका अल्पवयीन मुलीला वाचवलं होत. दिल्लीमध्ये आपल्या यजमानांनबरोबर फिरायला गेलेल्या, त्या स्त्रीने बस मधल्या अनोळख्या अल्पवयीन मुलीच्या एका वाक्यावर साथ दिली, "मुझे बचावो." ते वाचतानाही माझ्यासर्वांगावर काटे आले होते. 
मला माहितेय सगळेच बिझी असतात, कोणाला कोणाच्या भानगडीत पडायचं नसतं, तरीही जर आजूबाजूला कोणी छोटी परी किंवा कोणतीही स्त्री मदत मागत असेलं, धडपडत असेल, काही तरी चुकचुकल्या सारखं वाटत असेलं तर प्लिज तिला नराधामांपासून वाचवा, काहीतरी करा, तुमच्या एका निर्णयामध्ये ती मरणापासून वाचेल…एक लोकल सुटली कि दुसरी मिळेल हो, पण, एकदा गेलेला जीव परत मिळेल? ऊरेल तो फक्त छिनविच्छिन देह… 

प्रिया सातपुते 


प्रियांश...३६

माणसासारखा स्वार्थी प्राणी शोधूनही सापडणे नाही…ज्या वडिलधाऱ्या माणसांनी तुम्हांला लहानाचं मोठ्ठं केलं, ज्यांनी स्वतःच्या भाकरीचा तुकडा देऊन स्वतःची भूक पाणी पिऊन भागवली, लग्न लावून देऊन, संसार थाटून दिला, ज्यांनी तुमचं सोन केलं, ज्यांनी प्रत्येक ठिकाणी मान दिला…त्यांच्याच भरल्या घरात जाऊन माणूस अभद्रपणे रडतो…सुखाच्या क्षणी देखील माती करून जातो…स्वार्थाने बरबटलेल्या डोळ्यात फक्त अन फक्त मत्सरच राहतो…जिवंतपणी कधी चेहरा न पाहता…चार शब्द गोडी गुलाबीचे न बोलता… समोरच्याचा पाणउतारा करण जणू यांचा हक्कच समजतात हे मनाने काळवंडलेले लोक… माणूस देवाघरी गेल्यावर अशी माणसे येउन मगरीची आसवे सांडतात कि डोळ्यात बोटे घालून पाणी आणतात कोण जाणे? देव करो अन त्यांना सदबुद्धी देवो, अन तुम्हां आम्हां साऱ्यांना यांच्यापासून कोसो मैल दूरचं ठेवो… 

प्रिया सातपुते 

प्रियांश...३५

निरोपाच्या वेळी अगदी तोंडावर ही बाई अभद्र बोलली याचं काहीच नाही, पण, एक स्त्री असून तिला हृदयाच्या जागी पाषाणच तर नाही ना? हा विचार मनात येऊन गेला होता, तो अगदी अमुक दिवसापर्यंत मनात मारून टाकला, पण म्हणतात ना, "जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही." मरणानंतरचा स्वर्ग कोणी पाहिला आहे का? म्हणून या आताच्या क्षणांत आपल्या माणसांचे लचके निघतील इतकं तोडायचं, रक्तबंबाळ करून निर्वस्त्र सोडून, निर्लज्जा प्रमाणे पुढे निघून जायचं…किती हा ताठपणा? कुठे घेऊन जाणार तिला? नक्कीच कोरड्या वाळवंटात जिथे कोणीच नसतं…ना माणूस…ना पाणी…असतो फक्त मूर्ख ताठपणातून आलेला "एकटेपणा"…काळ का कोणाला सांगून येतो ? काळ तर या जन्माच्या घड्याला पालथा करून कर्म चुकती करून सोडतो, तेही उधारी न ठेवता… 

प्रिया सातपुते 


प्रियांश...३४

लहान असताना एक गाण प्रचंड प्रसिद्ध झालं होत, "सेक्सी सेक्सी…" त्यावेळी केबल नावाचा प्रकार प्रचलित नव्हता…चित्रहार आणि छायागीत अशे दोनच कार्यक्रम असायचे ज्यातून नवीन-जुनी पहायला अन ऐकायला मिळायची…मग तिचं गाणी दिवसभर गात, उड्या मारत आम्ही खेळायचो…अश्या वेळी घरातील मोठ्या माणसांनी तो शब्द ऐकला अन त्यांनी सगळ्यांना दम भरला,"ऐ! हा शब्द पुन्हा तोंडात आला नाही पाहिजे." अन, आता हाच शब्द "स्टेटस सिम्बॉल" म्हणून वापरला जातो…किती हा विपर्यास! अन एखाद्याला कॉम्पलिमेंट म्हणून आपण, सर्रास हा शब्द वापरून मोकळे होतो! आता, लहान मुले जोरजोरात शीला, शीला कि जवानी…म्हणून ओरडत असतात, अन आता सगळे हसण्यावारी घालवून मोकळे होतात. यालाच तर म्हणतात, "काळासोबत जाण…"

प्रिया सातपुते