Sunday 29 June 2014

फँड्री...अ वाईल्ड पिग...

फँड्री…म्हणजे काय? सोफीस्टीकेटेड भाषेत सांगायचं तर, इट मिन्स अ वाईल्ड पिग…अस्सल मराठीत बोलायचं तर ही शिवीच आहे. आजकालच्या खाऊन पिऊन सुखी असणाऱ्या पांढरपेशा लोकांना अजूनही वाटत कि जातपात संपली…मग, हे आरक्षण पण संपवा, आम्ही काही मानत नाही, कशाला पाहिजे आरक्षण,?आमच्या पूर्वजांच्या पापाची शिक्षा किती दिवस या आरक्षणामुळे भोगणार आम्ही? आम्ही भरायचे लाखो रूपये अन त्या मागासवर्गीयांनी भरायचे मोजून हजार…आम्ही ९० टक्के काढून प्रवेश मिळत नाही अन, यांना ७० टक्क्यांवर प्रवेश मिळतो, हा अन्यायच आहे!!! अशे एक नाही हजार विचार आपण सर्वच करतो

जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने माणूस म्हणून डोळे उघडाल तेव्हाच अन तेव्हाचं तुम्हाला दिसेल, एक भयानक क्रूर सत्य जे आजही घडतं आहे, धर्माने देश बाटला अन पूर्वजांनी जाती…कोणी ठरवलं कि महारांनी महारवाड्यातच राहायचं? अन तोच महार जेव्हा शिकून सवरून मोठा होतो, समाजाने म्हणवलेल्या पॉश वस्तीत रहायला जातो अन जेव्हा त्याच्या शेजाऱ्या पाजारयाना त्याची जात कळते तेव्हा मात्र सर्वांची तोंडे वाकडी होतात, का? महाराच रक्त वेगळ असतं का? कोणी ठरवलं चांभारांनीच चप्पला शिवायच्या? या चांभारांमुळेच तर तुम्ही मान ताठ करत भर उन्हात निवांत चालता नाही का? नाही तर काय चिंध्या बांधून फिरला असतात? कोणी ठरवलं ढोरानीच मेलेली मढी ओढायची, रस्ते लोटायचे? अरे या रस्त्यांवर चालायची हिम्मत तरी झाली असती का मग? कचरा करता येतो उचलायला लाज वाटते का? कोणी ठरवलं  देवाची भाषा फक्त ब्राह्मणांनीच शिकायची? आज सुद्धा खेड्यापाड्यात गेल्यावर जातीपाती स्पष्ट दिसतात, आजही भारत देश स्वतंत्र झाला नाही…आजही जातींच्या बेड्यात देश गुदमरतो आहे. 

जन्माला येणाऱ्या मुलाला जातीची निवड करायचा अधिकार नसतो अन्यथा सगळेच ब्राह्मण म्हणूनच जन्माला आले असते…कोणीच फँड्री झाला नसता…मला आजही आठवत, सेकंड ईयर बी.एस.सी ला असतांना मी अन माझी एक मैत्रीण लायब्ररीमध्ये होतो गप्पा चालू होत्या. जात नावाचा प्रश्न तिने ठोकूनच दिला मी न लाजता माझी जात सांगून मोकळी झाले. तिला काही सांगायचं होत, पण, तिची हिम्मत होत नव्हती, शेवटी मीच विचारलं, "काही सांगायचं आहे का तुला?" मग ती कचरतच बोलली, "प्रिया, अग मी क्रिश्चन नाहीय, मी… मी बुद्धीस्ट आहे, तू कोणाला बोलू नकोसं, मला लाज वाटते." काही क्षणांसाठी मी स्तब्धच झाले, मग मी तिला म्हणाले होते ते आजही माझ्या लक्षात आहे, "तुला आदर वाटला पाहिजे तुझ्या जातीबद्दल आणि तू लाजते आहेसं, का? लोकं काय म्हणतील म्हणून? तू तर  आंबेडकरांच्या कार्याचा अपमान  करते आहेस, त्यांच्यामुळे माणूस म्हणून तू श्वास घेते आहेस, मी माझी जात सांगितली म्हणून तू आज तोंड उघड्लस, नाही तर लास्ट टाइम तू मराठा होतीस, मग कोण जाणे नेक्स्ट टाइम काय असणार आहेस?" 

मुंबईच्या विविधतेने नटलेल्या जगात जेव्हा मी रहायला गेले, तेव्हा पीजी अर्थात पेयिंग गेस्ट म्हणून रहायचं ठरलं, कारण हॉस्टेल लांब होते अन पप्पांची तयारी होस्टेलसाठी नव्हती…आमच्या घरासारखाच फ्ल्याट होता, सर्वसोयी होत्या, पण, घरमालकीण ब्राम्हण वाटत होती…म्हणून माझ्या पप्पांनी स्पष्टपणे सांगून टाकलं, "आम्ही चांभार आहोत, तुम्हांला काही अडचण तर नाही ना? कारण, ही माझी एकुलती एक मुलगी आहे…" पप्पांच वाक्यं पूर्ण होण्याआधीच त्या बोलल्या, "छे, छे… अहो मी शिक्षिका आहे, जग कुठे गेलं अन तुम्ही हे काय म्हणताय? ती जशी तुमची मुलगी तशीच ती माझी मुलगी म्हणूनच राहील." त्यांना आंटी वरून मी कधी आई म्हणायला लागले हे कळल सुद्धा नाही! सॉलिड व्यक्तिमत्व होत ते, खूप काही शिकवलं त्यांनी मला… मुंबई सोडतांना त्यांच्या गळ्यात पडून मी रडले होते. 

माणुसकी नावाची एकंच जात का असू नये??? प्रत्येकाला वाटत खालच्या जातीचे लोक आरक्षणाचे हपापलेले आहेत, पण, हे साफ खोट आहे. मला अभिमान आहे माझ्या पूर्वजांचा त्यांनी त्यांच्या जातीत राहून पत-प्रतिष्ठा मिळवली, संस्काराची शिदोरी दिली… त्यांच्यामुळेच आज मी हे सुख, उपभोगत आहे, त्यांच्या मुळेच मी हे लिहित आहे, गर्व आहे मला मी "चांभार" असण्याचा…

प्रिया सातपुते 


No comments:

Post a Comment