Monday, 29 November 2021

झुंज भाग - २

अजय दोन मिनीट तसाच बसून होता मग अचानक एक चैतन्य सळसळल्याप्रमाणे तो कार मधून उतरला. त्याची पावले आज जड वाटत नव्हती, अगदी लगबग तो लिफ्टमध्ये पोहचला, ३० व्या मजल्यावर बटन दाबताना त्याचा चेहरा आज रिल्याक्स वाटत होता. डोअरबेल वाजताच धावत पळत चिमुकल्या पावलांनी वरद जाळीदार दाराजवळ येऊन गोड हसून, बोबड्या बोलात बोलत होता, "काका, आला! कशा आहे तू, थकला आहेस का? बॅग दे!" एवढ्याश्या चिमुकल्या हाताने तो त्याची बॅग खेचून घेण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होता, तसं अजयने वरदच्या हातात बॉटल पकडवली! अगदी दिमाखात तो ती सगळ्यांना दाखवत, किचनमध्ये घेऊन गेला. अजय आईशी दोन शब्द बोलून फ्रेश होण्यासाठी रूममध्ये निघून गेला. तो रूममध्ये जाताच, आई हळू आवाजात बाबांना म्हणाली, "आलाय बघा तो, विचारा त्याला पवारांच्या मुलीबद्दल की मी विचारू ?" त्याच्या प्रेमभंगानंतर आई त्याच्या लग्नासाठी जास्ती काळजीत पडली होती. वयाने वाढत जाणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांची दुखणी त्यानांच ठाऊक! बाबा काहीच बोलले नाहीत, नुसतेच मान डोलावून ते पुन्हा, फुलाला सुगंध मातीचा नाटकात गुंतून गेले. तसा आईचा पारा चढला, "नुसती नाटकातल्या पोरांची लग्न बघा तुम्ही, स्वतःच्या पोराचं तर काय पडलेलंच नाही तुम्हांला!" चिडून आई किचन मध्ये दूध बंद करायला निघून गेली. तेवढ्यात फ्रेश होऊन अजय किचन मध्ये आला. अजय - आई, कॉफी कुठे ठेवलीय ग ! आई - आता कशाला रे पाहिज कॉफी तुला ? अजय - आज काम करावं लागणार आहे रात्रभर, जागाव लागेल म्हणून आई - हे घे, मी करू का ? अजय - नको दे मी करतो, जा तू झोप जा! आई - बरं ! म्हणून आई तिथेच रेंगाळली. अजयला कळून चुकलं होत आजही कोणी मुलगी आली असणार आणि त्याबद्दल हिला बोलायचं असणार. अजय - आज कोणाची मुलगी पहायची आहे? दे आण, तो बायोडेटा इकडे तशी आई हरणासारखी लगोलग पळाली आणि तो कॉफीमध्ये साखर टाकण्याआधीच प्रकट सुद्धा झाली. तसं अजयच तोंड जरा वाकडचं झालं. तरीही आईच मन राखण्यासाठी तो बघतो म्हणणार इतक्यात त्याचा फोन रिंग होऊ लागला, तसा तो थोडा आईसमोर बावचळला आणि कॉफी घेऊन रूम मध्ये सटकला. अजय बच्चा कंपनीकडे पाहून डाफरून बोलला, "झोपा आता!" तशी पिल्लावळ बेडरूममध्ये पळून गेलीत. विजेत्याची ढाल घेऊन अजय रूम मध्ये आला, दरवाजा बंद करून, फोन बघणार तोच, जॉर्जचा फोन लॅपटॉपवर रिफ्लेकट होऊ लागला. कॉल आन्सर करून त्याने फोन मध्ये पाहिलं, रियाचा मिस्डकॉल येऊन गेला होता, तसं त्याने तिला मेसेज करून दिला, "ऑन कॉल, वील टॉक लेटर." तसा इन्स्टंट रिप्लाय व्हाट्सअपवर आला, "हाय! रिया हियर.." आणि कॉफी चा फोटो तिने शेयर करून स्माईली टाकली होती. अजय ने कप निरखून पाहिला, "हॅपिनेस इज बीइंग इन लव्ह!" त्याच्या कपाळाची शीर थोडी ताठली आणि त्याच्या अहंकाराने त्याला रिप्लाय करू दिला नाही. कॉल दोन तास सुरु होता, त्याच मन आणि हात सारखे तिचा स्टेट्स चेक करत होते, मोटिव्हेशनल कोट्स तेही तिने लिहले होते, त्याला थोडा डाऊट आला तसा कॉलच्या मध्येच त्याच्यातला स्पाय देखील जागा झाला होता, एका पाठोपाठ त्याने रिया नावाचं पुस्तक शोधून काढलं होत...तसा रियाचा मेसेज आला, "सिम्स यु डोन्ट वॉन्ट टू टॉक, टेक केयर, गुड नाईट!" बोलून तू ऑफलाईन गेली आणि तिने चक्क त्याचा नंबर डिलीट केला. अजय चा इगो जरा जास्तीच डिवचला गेला होता. जॉर्जशी बोलण्यात त्याच मन लागत नव्हतं, अजून एक तासाने कॉल संपला तसा तो झपाटल्या सारखा प्रत्येक सोशल नेटवर्किंग साईट वर तीच प्रोफाइल शोधून काढून तिला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत होता पण, त्याला कुठे माहित होत तोच रिया नावाच्या पुस्तकात गुरफटून चालला होता. तिच्या कविता, स्टोरीज, ब्लॉग त्याला तिच्याकडे खेचून नेत होत. अजयला कळण्याआधीच त्याने आयुष्याच्या नव्या कादंबरीचा श्री गणेशा करून दिला होता...त्याच्या हातात पेन तर होता पण, शाई मात्र रियाकडे होती! जणू, तीच त्याचं सारं आयुष्य लिहणार होती... निळ्या शाईने की काळ्या ? क्रमश: प्रिया सातपुते

No comments:

Post a Comment