Sunday, 22 October 2017

प्रियांश...१०५

स्त्री संपूर्ण घराचा ऑक्सिजन असते, घरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या समाधानामागे हाच ऑक्सिजन अविरतपणे आपलं काम करत असतो. या ऑक्सिजनमध्ये विषारी वायू मिसळले गेले की हळुहळू साऱ्या घरात वेगवेगळे आजार बळावू लागतात. त्यातले ९९% आजार हे कुत्सित मानसिकतेतूनच जन्माला आलेले असतात. या मानसिकतेमध्ये त्या व्यक्तीची जडणघडण स्पष्टपणे दिसते. दुर्दैवाने जेव्हा दिसते तेव्हा खूप काळ लोटून गेलेला असतो. अन याचे दुष्परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात.

मत्सर हा शब्द मला अजिबात आवडत नाही. पण, वास्तवामध्ये हा स्त्रियांमध्ये कुटून भरलेला असतो, मी स्वतःला नशीबवान मानते माझ्या आईचे गुण माझ्यात उतरल्यामुळे मी यापासून कोसो दूरच राहिले पण, तुम्ही कितीही छान वागा अथवा असा समोरचा तुमच्याशी तसाच वागेल याची शाश्वती नसते. हा किडा फक्त बायकांना असतो असं नाही हा, पुरुषांमध्ये पण याचा वावर असतोच. फरक हा की स्त्रियांची तीव्रता अधिक आणि स्पष्टपणे जाणवणारी अन दिसणारी असते, हे त्यांच्या शंकरासारख्या शांत पतीदेवांनाच माहित असतं.

वाईट या गोष्टीचं वाटत की आपल्या पदरात सर्व सुख असूनही काही बायका दुसऱ्या व्यक्तीसोबत तुलना करून स्वतःच सुख मातीत लोळवून टाकतात. काही स्त्रिया संसाराला हातभार लावून घराला बहरवून टाकतात अन काही घरासोबत मनाचीही लत्करे काढून रिकाम्या होतात पण, तरीही त्यांना हे समजत नाही त्या किती भाग्यवान आहेत की त्यांना इतकं सहनशील कुटुंब भेटलं आहे, स्वतःचे पंख उघडून भरारी घेण सोडून या भरल्या घरात मनांचे खूण करत राहतात. अन, सोलवटून निघलेल्या मनांना आगीची फुंकर घालत राहतात. किती भयानक आहे सार!

या मत्सराच्या अन दुसऱ्यांशी तुलनेपोटी अशी माणसे स्वतःसाठी सुद्धा खड्डाच खोदत असतात, अन अशे काही पडतात की पुन्हा कधीही उठू शकत नाहीत! कारण, एकदा का मनातून माणूस पडला की तो कायमचा पडतो, तो कधीही परत न येण्यासाठी!

देव करो अन अश्या लोकांना सद्बुद्धी देवो!

प्रिया सातपुते