Tuesday 24 December 2013

प्रियांश...१६

बऱ्याच दिवसांपासून मी लिहण टाळत होते, एकंदरीत एखादा विषय मनात घोळत राहतो अन त्याला मांडायला मन तयार होतंच असं नाही, एकेकदा वाटलं जे वाटत आहे ते लिहून टाकून मोकळ होऊया, पण का कोणास ठाऊक मनात एक अढ येत होती, फायनली त्या मनाला आज मोकळ्या हवेत श्वास घेताना जाणवलं कि, प्रत्येकाला त्याला हवं तसं जगण्याचा हक्क आहे! ती व्यक्ती कशीही का असेना, काळी-गोरी, कोणत्याही जाती धर्माची अथवा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहणारी असो, मग ते समलैंगिक असो वा नसो! जगण्याचा हक्कं प्रत्येकाला आहेचं. 
काही लोकांना वाटत, "समलैंगिक" हा रोग आहे, तर काहीना ही नैतिकतेच्या बाहेरची गोष्ट वाटत आहे. तर काहींना असं काही अस्तित्वात असतं हेचं माहित नाहीय…आपण चार माणसांसोबत चार भिंतीच्या घरात राहतो, त्या चार भिंतीच्या पलीकडे समाज नावाच्या भल्यामोठ्या नियमावलीत जगतो, हे चूक, हे बरोबर हा पाढा आपण लहानपणापासूनच घोकत आलोय आणि तोच पाढा काहीजण आयुष्यभर घोकत राहतात. मग, जर तो पाढा चुकीचा का असेना तो घोकतच लहानाचे मोठे होतो, माणसाला माणूस म्हणून जगण्याच स्वातंत्र्य न देता त्याला घुसमटून टाकतो अन मारून देखील. जसं, एखाद्या चिमणीला मनुष्याने हात लावला म्हणून बाकीच्या चिमण्या तिला टोचून टोचून मारतात अगदी तसचं! 

समलैंगिक असण हे नैतिकतेच्या बाहेर आहे असं म्हणून त्यांचा स्वच्छंदीपणे जगण्याचा अधिकार काढून घेण हि कोणती नैतिकता आहे?  प्रत्येक मनुष्यामध्ये स्त्री आणि पुरुष ही दोन्ही तत्वे आढळतात. या तत्वांवर कोणाचीच पकड नसते, निसर्गतःच गुणधर्म बदलतात. याचा अर्थ असा धरला जावू नये कि हे धर्माच्या विरोधात आहे. हिंदू धर्मात भगवान "अय्यप्पाचा जन्म हरी-हरा अर्थात विष्णू-शिव मुळे झाला होता. हे विसरून चालणार नाही, अर्थात हिंदू धर्मात समलैंगिकतेला गुन्हा ठरवण्यात आलेलं नाही. एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक निवडीच्या आधारावर त्यांना हिणवण, भेदभाव करण हे सर्वस्वी चूक आहे. 
समलैंगिक हा रोग नाही ना स्वैराचार! याच्यावर बऱ्याच मानसोपचार तज्ञांचे लेखं नजरेखालून गेले, मनात मात्र फक्त एकच विचार आला. समलैंगिक असण म्हणजे फक्त आणि फक्त शारीरिक सुखाशी जोडून भागणार नाही, हे त्याच्या पलीकडचे गणित आहे. रडणाऱ्या मुलाला दहा जणांनी गप्प करायचा प्रयत्न केला तरीही ते मुलं आईच्या हातात जाताच गप्पं होत. कारण, प्रेम! तसचं काही प्रत्येक माणसाच आहे, ज्याच्या सोबत सुरक्षित, प्रेम आणि जिव्हाळा मिळतो तिथेच माणूस चालला जातो. काहींना अपशब्दांनी हिणवलं जात, काहींसोबत वाईट भूतकाळ असतो, तर काहींना आकर्षण. मनाला जिथे विसावा मिळतो, ज्याच्यासोबत मिळतो तिथे ते स्थिरावत. 



प्रिया सातपुते 

No comments:

Post a Comment