Friday 26 March 2021

प्रियांश...

 आपण सर्वांनी आपणास आता मॉडर्न नावाच्या कक्षेत सामावून घेतलं आहे. मग ती स्त्री असो वा पुरुष आपण सगळेच बाविसाव्या शतकाकडे पाहतो आहोत आणि जगण्याच्या नव्या कक्षा रुंदावत आहोत. हे कितीही प्रमाणात खरं असलं तरीही शिकलेली सवरलेली मुले-मुली लग्न नावाच्या बंधनात सामावून जाताना मात्र बुरसटलेल्या जुनाट रितिभातींच्या चौकटीतच राहून आपापल्या सासरच्या माणसांशी तुटक वागायला सुरू करतात. मग भलेही दोघे कितीही शिकलेले का असेनात, कधी कधी वारंवार मन दुःखर होऊन विलिप्त होऊन माणूस संपूर्ण बदलून जातो तर अहंकार दुखावला की माणूस नागाच्या फण्यासारखा चिडून फुत्कारत राहून आयुष्य पुढे ढकलत ढकलत जगतो! ज्यांना असं ओढून ताणून जगण्यात रस नसतो ते आपापले मार्ग वेगळे करून आयुष्यात पुढे निघून जातात हेच बरे नाही का?

सुखी संसाराचा मंत्र खरे तर आईवडिलांनी शिकवण्याची गरज आताच्या पिढीला तरी नाही पडली पाहिजे कारण, आधीच्या पिढ्यांची दुखणी पहातच मुले मोठी होतात. त्यात सोलवटून निघालेल्या मित्रमैत्रिणींची जिवंत उदाहरणे डोळ्यासमोर असूनही यांची सदविवेकबुद्धी जागी कशी होत नाही याचंच अप्रूप वाटतं. शिकून माणूस शहाणा होतो, योग्य काय, अयोग्य काय याची जाणीव होते पण, ती जाणीव नेमकी स्वतःच्या पार्टनर समोर कुठे गायब होते देव जाणे! ही गडबड नेमकी होते कुठे? जेव्हा तुम्हाला दोनाचे चार, सहा, आठ...अशे कान वाढत जातात तिथेच खरी गल्लत होते! मग तुम्ही डॉक्टर का असेनात तुमची अक्कल मसनातच जाते हे मात्र नक्की! लग्न हे दोन व्यक्तींचं नातं आहे, त्यात दोन्ही व्यक्ती एकमेकांना देत राहिल्या तरचं ते नातं पुढे पर्यंत टिकेल!  मुलांना अगदी लहानपणापासून प्रत्येक गोष्ट हातात मिळत राहते, लग्नाआधी आई करते नंतर बायको! गफलत होते कुठे? लग्नामध्ये असणाऱ्या या दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या संस्कारात, वातावरणात वाढलेल्या असतात! काहींच्या घरात आजही मुलींना परक्याच धन म्हणून आई लहानपणापासून वेठीस धरून, स्वयंपाकापासून ते सारी कामे शिकवते. पण, सगळ्याच कुटुंबात मुलींना अशी वागणूक मिळत नाही, त्यांनाही मुलांसारखे खेळायला बागडायला मिळते, अश्या वातावरणातील मुली जेव्हा वेगळ्या वातावरणात जातात तेव्हा मोठी गडबड होते. ज्या गोष्टी आजतागायत तिने कधीच केल्या नाहीत, त्या सगळ्यागोष्टी ती प्रेमापोटी पार्टनरसाठी करते त्यात त्याला काहीच अप्रूप वाटत नाही कारण? त्याने ते गृहीत धरलेले असते, त्यात त्याला काही नवीन वाटत नाही आणि त्यामुळेच तो तिने केलेल्या प्रत्येक गोष्टीला गृहीत धरून नात्याचं गणित कोलमडून टाकतो कारण, तो गृहीत धरतो की ती हे सगळं लहानपणापासून करते आहे त्यामुळेच तो तिचं कौतुक सोडा, मान अथवा मन देखील राखू शकत नाही!

नात्यांची खरीच अफलातून मज्जाच आहे जिथे आपण आपल्या पार्टनरला एखादी गोष्ट तू का केली नाहीस म्हणून त्याचा किंवा तिचा पाणउतारा करून सोडतो तीच बाब समजा उलटली किंवा सोयीनुसार गोष्टी झाल्या नाहीत की मग नेमकं यावेळी आपण गृहीत धरून बसतो की घेईल तो किंवा ती समजून! आपण नेहमीच ऐकत आलोय संसार म्हणजे गाडी आणि त्याची चाके म्हणजे नवरा बायको पण, एक चाक गृहीत धरून बसलं की दुसरं फिरेल मग संसाराची गाडी धावेल का? मागील वर्षी एक प्रोजेक्ट आला होता लिखाणासाठी, रेफरन्ससाठी स्त्री पुरुष दोघांच्याही मुलाखती घेण्यात आल्या होत्या, विषय तसा भन्नाट होता, भारतीय कुटुंब विभाजन आणि घटस्फोटांचे वाढते प्रमाण! खरं सांगू का, घरोघरी मातीच्या चुलीप्रमाणे सगळीकडे एकच शिमगा पेटलेला असतो तो म्हणजे "मुलाचे लग्न"! प्रोजेक्टचे रेफरन्स वाचताना खरं तर मला पुरुषांसाठी खूप वाईट वाटलं कारण, ते खूप पिसतात आणि त्याला जबाबदार देखील ते स्वतःच असतात! गृहीत नावाच्या मित्राशी केलेली मैत्री त्यांना महागात पडते कारण, सर्रास ठिकाणी ते त्यांचं मन, बुद्धी न वापरता ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून स्वतःच स्वतःच्या पार्टनर पासून दूर होतात. हल्ली घटस्फोटांचे प्रमाण का वाढलं आहे? कारण, मुलीकडून गोष्टी गृहीत धरल्या जातात पण, त्याच मुलांकडून मिळत नसल्यामुळे मानसिक संतुलन ढासळल्यामुळे मुली टोकाचा निर्णय घेऊन मोकळ्या होतात! आमच्या जिममध्ये फॅमिली कोर्टात जज असणाऱ्या काकूंनी एकदा आम्हां तरुण मुलांमुलींसमोर हा विषय मांडला होता, घटस्फोट घेण्याची कारणे कशी असतात, हा माझ्या घरच्यांना एकदाही विचारत नाही, कोणी घरी आले तरीही हा ऑफिसला जातो सुट्टी घेत नाही पण, तेच याच्या घरचे आले की मलाही सुट्टी घेऊन घरी बसवतो, ही माझ्या आईवडिलांना फोन करत नाही, माझ्या नातलगांना विचारत नाही! मग समोरून मुलगी बोलते हा तरी कुठे माझ्या आईवडिलांना फोन करतो, साधे ते आजारी आहेत हे सांगूनही तो विचारपूस करत नाही. माझ्या आईवडिलांना पण वाटत जावयाने घरी यावं दोन चार दिवस राहावं पण, हा नेहमी तोऱ्यातच असतो. काकूंच्या म्हणण्यानुसार ९२% घटस्फोट हे घरच्यांच्या दबावामुळे होतात, का? तर दोघांमध्ये भांडण होण्यामागे घरचेच मूळ कारण ठरतात! मानसिक, शारीरिक त्रासाला कंटाळून मुली माघार घेतात तर काही ठिकाणी वेगळे राहण्यासाठी नकार मिळाल्यामुळे देखील घटस्फोट होत आहेत. हे म्हणजे असं झालं दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! भावाचे-बहिणीचे, मुलाचे-मुलीचे लग्न झाले तर तो किंवा ती आम्हांला पैसे देणार नाही किंवा आमची प्रॉपर्टी आम्हांला मिळणार नाही, कारण काय तर पार्टनर हुशार निघाला आणि मग? आंतरिक हेवेदावे, स्त्री मत्सर अश्या ना तश्या अनेक गोष्टींमुळे पतीपत्नीमध्ये वितुष्ट निर्माण केले जाते. एकमेकांशी संवाद नाही, सगळं माहीत असूनही विश्वास नाही, प्रेम करणारे पार्टनर मिळूनही, पार्टनरला गृहीत धरल्यामुळे, एकमेकांना दुखवण्याचा नादात ते एकमेकांपासून कायमचे दूर होऊन जातात!

मनाला बोचणाऱ्या प्रत्येक गोष्टी बोलायला शिका, ऐकायला शिका, समजून घ्यायला शिका, वेळेत सॉरी आणि मिठीची मेलेडी पार्टनरसोबत खायला शिका! गैरसमजाच्या जाळ्यात अडकण्याआधीच पार्टनरला विश्वासाच्या गाडीत घेऊन लॉंग ड्राईव्हला निघा! दुखावल असेल खूप तर फुंकर घालून कशी चालेल? भरपाई करायला शिका, भरभरून प्रेम करायला शिका!
लग्नाला बंधन मानून बसाल तर फसाल! पार्टनरशिप मानाल तर चॅम्पियनशिप जिंकाल!

प्रिया सातपुते

No comments:

Post a Comment