Saturday, 19 April 2014

हुंडा!


हुंडा ही भारतीय समाजातील वर्षानुवर्षे चालत आलेली जुनी परंपरा आहे. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी चांगला उद्दात हेतू जरी दडला असला तरी सुद्धा माणसांच्या हव्यासापोटी गालबोट लागल्या शिवाय रहात नाही. हुंडा ही परंपरा चांगल्या कारणासाठीच सुरु झाली असावी, आपल्या मुलीच्या लग्नानंतर तिला नव्या घरी काही कमी पडू नये, ती आर्थिक दृष्ट्या कोणावरही अवलंबून राहू नये म्हणून आई-वडील तिला पैसे, दागदागिने भेट म्हणून द्यायचे. नव्या घरात मिळून मिसळून रहायला थोडा वेळ लागेल आणि त्या वेळात तिला कोणासमोरही हात पसरावे लागू नयेत म्हणून धान्य दिलं जायचं. या मागचा हेतू सर्वस्वी आपल्या मुलीला आनंदी बघणे हाच होय. पण, कालांतराने माणसाची मती फिरली, मुलींना भेट म्हणून आलेले दागदागिने पाहून सासरच्या माणसांची डोकी फिरलीत अन नजराही. यातूनच, जन्म झाला तो अनिष्ट हुंडा बळींचा अन अत्याचाराचा.

हुंडा म्हणजे नेमकं काय? माझ्या शब्दात बोलायचं तर, चक्कं नवरा मुलगा विकत घेणे! खरचं, आता लग्न ठरवताना मुलांचे आईवडील किती टाहो फोडून सांगत असतात की आम्ही आमच्या मुलाच्या शिक्षणावर एवढे पैसे खर्च केलेत, मग अमुक एवढा हुंडा पाहिजेचं. मग, काय ती मुलगी आकाशातून टपकली का? डायरेक्ट शिक्षण घेऊन? तिच्यावर सुद्धा तिच्या आईबाबांनी खर्च केलेलाच असतो ना? मग, हा भेदभाव कशासाठी? मोठी माणसे म्हणतात, " मुलगी, आनंदाने रहावी, तिचा मान असावा सासरी म्हणून भरपेट हुंडा द्यायचा." मग, प्रश्न पडतो तो म्हणजे, विकत घेतलेल्या नात्यात खरा आनंद असतो का? दोघेही मग तो नवरा असुदे अथवा नवरी, खरचं ते एकमेकांवर प्रेम करतात की फक्त दिखावा करतात?

हुंडा हा असा अजगर आहे जो सगळ्यांनाच गिळंकृत करतो…सुरुवात होते ती स्वप्नांमध्ये मग्न असणारया परी पासून, वास्तवाचे चटके अशे बसतात की तन-मन हुंड्याच्या अग्नीत जळून खाक होते, तिचे आईवडील, तिची पाखर(मुले)! निलाजरेपणाचा कळस असा की इतक्या जणांचा खून होऊन सुद्धा नराधम मोकाट सुटतात…दुसंर, तिसर…पाचवं लग्न करून तोंड वर करून समाजात मानाने मिरवतात.

दोष द्यायचा कोणाला? आईवडिलांना ज्यांनी हुंडा दिला? लोभाने गलितग्रान झालेल्या नराधमांना? त्या स्त्रिलाच जी स्वतःहून या अग्नीत उडी मारून बसली? की या समाजाला? योग्यं वेळी न्याय न देता, चुकीच्या रूढीवादी परंपराना खतपाणी घालणाऱ्या या समाजानेच आता स्वतःच षंडत्व सोडून दिलं पाहिजे. हुंडा हा समाजाला लागलेला कर्करोगचं आहे. त्याचा कायमस्वरूपी इलाज त्याला मुळासकट उपटून टाकण्यातच आहे.

लग्न हे प्रेमाचं बंधन असायला हवं ना की व्यवहारच.

प्रिया सातपुते 

No comments:

Post a Comment