Friday 11 April 2014

मला उमगलेली याज्ञसेनी... भाग- ३


माझ्या डोळ्यातले आनंदाश्रू गालावर तरंगण्याआधीच, मी एका भव्य दालनात उभी होते, नववधू सारखं नटलेलं ते दालन, वेगवेगळ्या ऋषी, राजे, दास-दासींनी भरून गेलं होत. याज्ञसेनीने तिच्या आयुष्यातील महत्वाच्या भागात मला सामील करून घेतलं होत. तिला नखशिखांत नटलेली पाहून माझे डोळे दिपून गेले, ती तेजस्वी, सुंदर, निरागस दिसतं होती. प्रत्येक पांडवपुत्रा बरोबर सप्तपदी घेऊन ती पांडवांची "धर्मपत्नी" बनली होती. धर्माला अनुसरून राहण्यासाठी पाची पांडव अन याज्ञसेनी यांना महर्षी व्यासांनी, श्रीकृष्णासमक्ष काही नियम घालून दिले. मी एकटक फक्त तिलाच पाहत राहिले. तिच्या सौंदर्याची मोहिनी किती विलक्षण!

डोळ्यासमोरून चित्र वाळूसारख उडून जावं अन एका वेगळ्या वर्तुळात जाव अगदी तसचं काहीसं झालं. एका विराट वनाकडे पाहत ती उभी होती, भगवान कृष्ण, पांडव देखील होते! भगवान कृष्णाकडे पाहून याज्ञसेनी उदगारली, "कृष्णा, तू आहेसं तर इथे साक्षात इंद्रप्रस्थ उभं राहिलं!" भगवान कृष्ण मंद हसले. एका झटक्यात मी एका भोवऱ्यात उभी असल्याचा भासं मला झाला, सगळा इतिहास माझ्या डोळ्यासमोर जलदगतीने पुढे चालला होता! इंद्रप्रस्थाच वसन, नगरात प्रवेश, पूजा-अर्चा, सर्वांची काळजी घेणारी याज्ञसेनी, राजसूय यज्ञाकरता त्रिलोक जिंकून आलेले पांडव! मयासुराने बांधलेलं हे इंद्रपस्थ आपल्या आताच्या इंजिनियरसना सुद्धा लाजवेल असंच होत. राजसूय यज्ञाची झलक तर अप्रतिम होती! 

गोलं गोलं फिरत धपकन जमिनीवर आदळाव अश्याच जोरात घुमून मी अलगद याज्ञसेनीच्या बाजूस ऊभी होते. तिच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट पडलं होत, जणू तिला काही अभद्र होणार असल्याची तगमग लागली होती. तितक्यात एक दासी आली, अन तिच्यापाठोपाठ एक दरबारी देखील आला अन म्हणाला," राणीसाहेब, युधिष्ठीर महाराज, आपणास द्यूतात पणाला लावून हरले आहेत, आणि दुर्योधन युवराजांनी तुम्हांला राजसभेत बोलावलं आहे." याज्ञसेनीचा चेहरा लालबुंद झाला, ती ओरडली, "काय बरळत आहेस तू हे? स्वतःच्या पत्नीला कोणी द्यूतात लावत का?" तसा तो दास घाबरून म्हणाला, "राणीसाहेब, महाराजांनी आधी चारी पांडवांना अन स्वतःला द्यूतात पणाला लावलं, त्यात ते हरले, मग तुम्हांला…" त्याचे शब्द तिथेच गळून पडले. 

इतिहासाला काळीमा फासणारा तोच हा क्षण, माझ्या छातीत तीव्र वेदना झाल्या, अंगावर काटे उभे राहिले, स्वतःच्या हतबलतेवर मला किव येत होती, मुका प्रेक्षक बनून मला हे पहावं लागणार, माझं मन सुन्न झालं होत. याज्ञसेनीच्या मनात आक्रोश होता! एक क्षण सुद्धा शतकांसारखा असतो हे मला कळून चुकलं होत. 

दास उद्गारला, "राणीसाहेब! युवराज दुर्योधानांनी आपणास राजसभेत बोलावलं आहे." 
याज्ञसेनी उफाळून उठली अन म्हणाली, "कुरुवंशाच्या स्त्रिया राजसभेत येत नाहीत, हे माहित नाही का युवराजांना? तू जा, युधिष्ठीर महाराजांना विचार, स्वतःला हरवून त्यांनी मला द्यूतात पणाला लावलं की, त्याआधी? जा, पटकन जा! अन मला येउन सांग ते काय उत्तर देतात ते." दास निमूटपणे निघून गेला, त्याची पाठमोरी प्रतिमा काय उत्तर आणणार हे मला माहित होत, मी विसरून गेले की मी एक प्रेक्षक आहे, जिवाचा आकातांडव करून मी ओरडत होते, बाजूला भिंतीवर टांगलेली तलवार काढण्याचा विफल प्रयत्न करत होते, याज्ञसेनीच्या जवळ जाऊन तिला पकडायचा प्रयत्न करत होते, ओरडत होते, तलवार घे सम्राज्ञी, अग! ऐक ना माझं, त्या दु:शासानाला आडवा काप, याज्ञसेनी, याज्ञसेनी… 
दास, पुन्हा आला, त्याने निष्क्रिय युधिष्ठीर महाराजाबद्दल कथन केलं, त्या निलाजरया दुर्योधनाचा आदेश पुन्हा ऐकवला. दास निघून गेला, याज्ञसेनी म्हणाली, "विधिलिखित कोणी टाळू शकत का?" तिच्या नजरेत स्पष्ट जाणवत होत की तिला आधीच कळून चुकलं आहे. 

दासी पळत पळत येऊन याज्ञसेनीला काही सांगणार इतक्यात तिच्या मागोमाग दुःशासन आला, अर्वाच्य शब्दात तो म्हणाला, " ऐ दासी, तुला आता माझ्या दादाने जिंकली आहे". 
याज्ञसेनी म्हणाली, "दुःशासन मर्यादेत राहून बोलं, कुलवधू आहे मी, तुझी वहिनी आहे."
यावर तो निलाजरा म्हणाला, "दासीला कसली आली आहे मर्यादा, आता तू तर आम्हा सर्वांचीच दासी झाली आहेसं."
याज्ञसेनी कडाडून बोलली, "निर्लज्जा!" 
आता मात्र, तिच्या चेहऱ्यावरच सावट अधिकच गडद झालं, पुढे काय होणार हे माहित असूनही मी त्याला ढकलण्याचे, मारण्याचे प्रयत्न करत राहिले, अन तो पुढे धावला कारण मी पारदर्शी होते, तिच्या मोकळ्या लांबसडक कुरळ्या केसांना पकडून त्याने याज्ञसेनीला ओढली. ती प्रतिकार करत राहिली, तो तिला खेचून नेण्याचा प्रयत्न करू लागला, माझ्या मनात आग लागली होती, मी सोड तिला हरामखोरा म्हणून ओरडत होते, तो तिला ओढत, खेचत नेत होता, कधी केसांना धरून ओढत होता, तर कधी हाताला हिसडे देऊन फरफटत नेत होता, याज्ञसेनीच्या तोंडून फक्त सोड, सोड नराधमा! इतकेच शब्द येत होते. तो हिंस्त्र जनावरासारखा भक्ष्याला नेतात तसं तिला नेत होता. अन, मी फक्त एक मूक प्रेक्षक बनून मागे धावत होते, देवाला प्रार्थना करत होते, "देवा! बदल हा इतिहास." पण, सगळचं व्यर्थ होत. सभा कधी आली कळलचं नाही, कारण, एक ही पुरुष अन्यायाला सामोरा गेला नाही. मी डोळे पुसून पहात होते पण, सगळ धुसर दिसतं होत, पांडव षंढासारखे मान खाली घालून बसले होते, मी धावत त्यांच्या जवळ गेले, ओरडले, "अरे! अशे काय बसला आहात, ऊठा, थांबवा हे सगळ, पत्नी आहे ना तुमची, उठा ना रे, तुमच्यामुळे अखंड स्त्री जातीला भविष्यातही असचं भोगावं लागेलं…" 

याज्ञसेनी धगधगत्या अग्निसारखी दिसू लागली, तिचं मोहवून टाकणारं सौंदर्य जळून खाक झाल्यासारखं भासतं होत. ती ज्वलंत अग्निसारखी बोलू लागली, "धिक्कार असो या कुरुवंशाचा! स्त्रीचे रक्षण करणं हा क्षात्रधर्म आहे. ज्या अर्थी आज या सभेत एका स्त्रिला अपमानित करून आणलं गेलं आहे, त्याअर्थी इथे एकही क्षत्रिय उरलेला नाही. पत्नीला द्यूतात पणाला लावण हा अधर्म आहे, पत्नी संपत्ती नसून अर्धांगिनी आहे, जरी सम्राट युधिष्ठीरांनी मला पणाला लावली असली तरीही, माझ्या अन्य पतींचा विचार ऐकण्यात आला होता का? महाराज धृतराष्ट्र, मी तुमची पुत्रवधू असून, तुमच्या देखी माझी सुरु असलेली ही विटंबना तुम्ही निमुटपणे पहात आहात? पितामह तुम्ही का मान खाली घातली आहे? गुरु द्रोण तुमच्या मित्राची मी यज्ञ कन्या, म्हणजे मी तुमचीही कन्याच नाही का झाले, स्वतःच्या कन्येचा सुरु असलेला असा अपमान तुम्हांला पाहवला तरी कसा?" तोच आतापर्यंत मौन असलेले पितामह बोलले, "द्रोपदी, तुझ्या पतीनेच तुला अन पांडवांना द्यूतात पणाला लाऊन अधर्म केला आहे, पती कोणत्याही स्थितीत असला तरीही पत्नीवर असलेली सत्ता नाहीशी होत नाही, त्यामुळे निर्णय घेण खुपचं नाजूक आहे." यावर याज्ञसेनी काही बोलण्याआधीच, दुर्योधनाने याज्ञसेनीला आपली मांडी दाखवत म्हंटले, "ये दासी इथे बसं!" आतापर्यंत मुंडी खाली घालून बसलेला भीम उफाळून उठला, मोठ्या भावाच्या हाताला न जुमानता तो गर्जना करत म्हंटला," प्रण घेतोय दुर्योधना, तुझ्या याचं मांडीला फोडून मारणार तुला!" 

यावर डंख मारल्या सारखा दुःशासनाने याज्ञसेनीच्या वस्त्राला हात घालत म्हंटले, आता तर साक्षात पितामहांनी कबूल केलं आहे, चल आता गपचूप…" तो पुढे काही बोलण्याआधीच विकर्ण जोरात ओरडत उठून उभा राहिला, "दुःशासना हात आवर तुझा! याज्ञसेनीने जो प्रश्न केला आहे त्याचं उत्तर पितामहांना देता येत नाही आहे, धर्मात भेद असतील पण, स्त्रिला तेही पत्नीला पणाला लावणे अत्यंत चुकीचं आहे, हा अधर्मच आहे!" तितक्यात कर्ण उठून उभा राहिला, "अरे! मुर्ख विकार्णा, आपल्याच भावांचा तू शत्रू बनत आहेस तेही एका अश्या स्त्रिसाठी जी पाच पुरुषांशी संबंध ठेवते, आणि तू तिला कुलीन संभोद्तोस? धर्म सांगतो जगातील कुठल्याही कुलीन स्त्रीला देवाने एकचं पती नेमलेला असतो, ही तर पाचांची पत्नी म्हणून मिरवते, अश्या स्त्रिला कुलवधू नाही वैश्या म्हणतात, अश्या स्त्रीला निर्वस्त्र आणली तरी काहीच गैर नाही." 
माझ्या काळजाचे ठोके चुकले, माझा प्रिय कर्ण, एका स्त्री बद्दल अशे अपशब्द बोलूच कसा शकतो, या विचारात असतांनाच, कर्णाच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसले, सूडबुद्धीचे! तोच दुर्योधन कडाडला, "दुःशासन! बघतोयस काय फेड तिचं वस्त्र, निर्वस्त्र कर तिला." संपूर्ण शरीरावर साप फिरत आहेत अशी होती ती भावना. 

याज्ञसेनी शांत झाली होती, डोळे बंद करून ती मनाशी म्हणाली, " सख्या, कृष्णा, धाव! तुझ्या सखीसाठी, माधवा म्हंटला होतास ना मला, नेहमी माझ्यासोबत राहशील, आता तुझ्या कृष्णेसाठी धाव, लज्जारक्षणासाठी धाव …" याज्ञसेनी, डोळे बंद करून, हात जोडून उभी होती. अन मी हतबल, डबडबले डोळे घेऊन धावत तिच्यापाशी पोहचले. तो निष्ठुर, निर्लज्ज दुःशासन एक एक पाऊल पुढे येत होता, अन सभा मूकपणे माना खाली घालून तमाशा पाहत होती, पांडव सुद्धा! त्याने तिच्या पदराला हात घातला, माझ्यातलं सांर अवसान गळून गेलं होत, याज्ञसेनीच्या पायाशी मी कोसळले, धायमोकलून रडू लागले, मरमरून एकचं विचार येत होता, कृष्णा धाव, कृष्णा धाव! अन भगवान कृष्ण खरचं धावले, एक वस्त्रामध्ये आलेली रजस्वला याज्ञसेनी, स्थिर, निश्चल बनून उभी होती. तिच्या अंगावर तिचं वस्त्र आहे तसचं होत, दुःशासन फेडत फेडत दमून कोसळून पडला. तिचं तेज वाढतच चालल होत, जणू अग्नीतून पुन्हा ती उमलत होती, संपूर्ण राजसभा अग्नीच्या धगीने भयकंपित झाली. 

माझं मन सुन्न झालं होत, काही कळण्या समजण्याच्या पलीकडे गेलं होत, मी निपचित याज्ञसेनीच्या डोळे बंद चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिले, तिचं सतीत्व अनुभूवत राहिले, रडून रडून माझे अश्रू सुकून गेले होते, हुंदके विरून गेले होते. तोच याज्ञसेनीच्या गालावरून ओघळणारा टपोरा मोती माझ्या पुढ्यात पडला, तो कृष्णमय झाला होता. सभेत एकंच गजर झाला, "याज्ञसेनी की जय! धन्य याज्ञसेनी!"

क्रमश:

प्रिया सातपुते 

No comments:

Post a Comment