Sunday, 18 August 2013

कमल-पहिली भेट

                                                                                         Photo courtesy by Abhay Waghmare

सावळ्या रंगाची, चपचपीत तेल लाऊन ती माझ्यासमोर उभी होती. दारापासून बाजूला होत मी तिला वाट करून दिली, मान खाली घालून ती किचेन मध्ये जाऊन भांडी घासू लागली. लेक्चरला जायची वेळ झाली होती, मी चहा बनवायला किचेन मध्ये गेले, तिला विचारलं," चहा घेणार का तू?" तशी ती काहीच बोलली नाही. दोन कप घेत मी चहा ओतला तिला पण दिला, तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव दिसले नाहीत, मी किचेन मधून बाहेर जाताच तिने हलकेच चहाचा कप ओठाशी लावला, मी तिला बिस्कीट खाण्यासाठी बाहेर बोलवून घेतलं सोबतच घरची भडंग पण होती, बिस्कीट नको म्हणत ती खाली फरशीवर बसणार तोच मी तिला वरती बसण्यास खुणावल, एक प्लेट भडंग तिला देत मी म्हणाले,"खाऊन घे ग! मी घरून आणलीय, सगळ्यांसाठी आहे ती." तशी ती हळूच पुढे आली. आणि मग आमच्या गप्पा खुलत गेल्या. 

मी- कमलच नाव आहे ना तुझं?
कमल- हो! अरे वाह तुम्ही मराठी आहात?
मी- हो मी मराठी!! कुठून आहेस?
कमल- रत्नागिरी!
मी- अच्छा! कितीवी शिकली आहेस तू?
कमल- माझं ७वी पर्यंत शिक्षण झालय. 
मी- अरे वाह! मग पुढे का नाही शिकलीस?
कमल- (मान खाली घालून) नाही शिकले. 
मी- का? आवडत नव्हत का ?
कमल- छे छे, खूप आवडायचं, माझा पहिला नंबर आला होता शाळेत, आमचे मास्तर घरी येउन मागे लागले होते बाबांच्या कि मुंबईला नका पाठवू तिला, शिकू द्या, पण, मी शिकले असते तर मग भाऊ शिकला नसता, पैसे पुरले नसते, आणि मग माझ्या लहान बहिणीलापण मुंबईला पाठवलं असत म्हणून.. 
मी- किती वर्षांची आहेस तू?
कमल- १४ पूर्ण आहे मी
माझ्या मनात पाल चुकचुकली, तिने परफेक्ट १४ कसं म्हंटल. चेहऱ्याची गंभीरता लपवत मी तिला विचारलं," मुंबईत कशी आलीस? 
कमल- माझे काका कुर्ल्याला राहतात त्यांच्यासोबत. 

ती पुढे काही बोलणार तोच माझा फोन रिंग झाला, माझ्या मैत्रिणीचा फोन होता, तशी मी भानावर आले मला लेक्चरला उशीर होत होता, तशी मी पटापट प्लेट ठेऊन, भडंग डब्ब्यात ठेवताना, बेसनचे लाडू नजरेस पडले, तशी मी गोड खाणारी व्यक्ती नाही हाच माझा समज होता कारणही तसच होत ना, मी कोल्हापूरची मुलगी, आमच्याकडे चमचमीत तिखट खाण्याची क्रेझ! तरी सुद्धा एक लाडू पटकन काढून मी कमलच्या हातात दिला. तशी तिच्या चेहऱ्याची कळी खुलली. तिच्या हसऱ्या चेहऱ्याला पाहत मी तिला,"बाय, नंतर बोलू." म्हणून निरोप घेतला खरा, पण, एकमेकांशी पुन्हा भेटण्यासाठी! 

आयुष्य हे एक चित्रच आहे, काही माणस नकळत येतात आणि त्यात खूप साऱ्या आठवणीचे रंग भरून जातात. 

प्रिया सातपुते 

No comments:

Post a Comment