Wednesday 23 October 2013

मी हरवले तेव्हा???


आपल्या सर्वांच्याच आयुष्यात काही मज्जेशीर न विसरता येण्यासारख्या काही घडामोडी घडतात. कालांतराने आपण त्या विसरून जातो, आणि कधी नकळत कॉफीच्या सुगंधात त्या नजरेसमोर येउन उभ्या ठाकतात. अशीच एक गंमत मला आठवली. मी चार वर्षाची होते, आईचा पदर धरून रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी मी राखी आणायला गेले होते, मी म्हणजे अर्थात आई! खूप गर्दी होती, वेगवेगळ्या राख्या पाहत आम्ही पुढे जात होतो, आईचा पदर चुकून हातून सुटला अन मी मागेच राहिले, आई हाक देत होती, "पिया… पिया…. ", आवाजाच्या दिशेने कूच करत मी पुढे सरकले पण, मग गर्दी आणि रस्ता क्रॉस कसा करणार म्हणून मागेच उभी राहिले. आईच्या हाका येत होत्या पण, मी हतबल होते, रडू पण येत नव्हत!

एका चष्मेवाल्या काकूंनी मला पाहिलं, माझी भेदरलेली नजर पाहून त्यांना कळून चुकलं पाखरू हरवलं आहे! महालक्ष्मी मंदिरात त्यावेळी पोलिस इतके नसायचे, त्या काकू मला महाद्वार रोडच्या पोलिस चौकीत घेऊन गेल्या, पोलिसांच्या स्वाधीन करून त्यांनी त्यांची नैतिक जबाबदारी चोख बजावली. थोड्या वेळाने पोलिस काका मला घेऊन राजवाडा पोलिस स्टेशन कडे निघाले. कॅडबरी भेटली म्हंटल्यावर मी काय खूष! पोलिस काका चक्क आमच्या दुकानासमोरून गेले, मला वाटलं ते तिथेच नेत आहेत मला, पण नंतर कळून चुकलं माझी रवानगी तर दुसरीकडे झाली आहे.

तिथे पोहोचल्यानंतर एक मस्त अंकल होते जे पिक्चर मधल्या इन्स्पेक्टर सारखी टोपी घालून बसले होते, फक्त दोन मिनिटेच मी शांत असेन, मग काय त्यांची टोपी घालून, त्यांच्याच खुर्चीत बसून गप्पा मारत बसले. हातात पोलिसांची काठी घेऊन माझी आपली मज्जा सुरु होती. शिट्टी वाजावं, काठी आपट, सल्यूट करणारे पोलिस सगळचं कसं मस्त होत. गुन्हेगारांना घाम फुटणाऱ्या त्या पोलिस स्टेशन मध्ये मी मात्र रमून गेले होते.

आई काय करत असेल? घरी काय सुरु असेल? सगळे किती घाबरले असतील? त्या काळी अंजनाबाई गावित सक्रिय होती. तिचं ती लहान कोवळ्या मुलांना पळवून नेणारी, भिक मागायला लावणारी आणि वेळ पडली तर त्यांचे कोवळे गळे कापणारी. याच्याशी माझं काहीच लेण देण नव्हत, कारण मी त्या पोलिस स्टेशनला किंडर गार्डन करून ठेवलं होत.

थोड्यावेळाने माझी आई, बाबा, आजी पोलिस स्टेशनला आले, अर्थात रिपोर्ट द्यायला, पुढ्यात मला पाहून त्यांचा जीव भांड्यात नक्कीच पडला होता. पण, मी काही आई आली म्हणून रडले नाही ना धावत तिला बिलगले, माझं आपलं मस्त खेळण सुरु होत. हे पाहून पोलिसांना खटकल, ते मला द्यायला तयार होईनात! आईचं रडण सुरूच होत, बाबा आणि आजीने पोलिसांना पटवून दिलं कि हि आमचीच मुलगी आहे. अखेर पोलिस काकांचा नाईलाज झाला आणि त्यांना मला सपुर्त करावं लागलं. त्यांना मी इतकी आवडले होते कि ते बाबांना बोलल्या वाचून राहिले नाहीत," कोणी आलं नसतं तरं मी हिला माझ्या घरी नेणार होतो!" माझे इंसिक्युर बाबा आणखीनच  इंसिक्युर झाले असतील हे मात्र नक्की!

पोलीस काकांना पापी देऊन मी माझं बस्तान हलवलं! वाईट एका गोष्टीचं वाटत कि देव अश्या गोड माणसांना लगेच का नेतो? मी सहावीत होते, त्या काकांचा अपघातात मृत्यू झाला, त्यांचा फोटो मी बरीचं वर्षे जपून ठेवला होता. पण, शिफ्टिंगच्या चक्कर मध्ये तो हरवला. पण, ते कधीच हरवणार नाहीत माझ्या हृदयाच्या कप्प्यातून!

प्रिया सातपुते 

No comments:

Post a Comment