Saturday 1 March 2014

मला उमगलेली याज्ञसेनी... भाग-२


याज्ञसेनी एकटक चंद्राकडे पाहत होती, तिच्या मनात काहीच चालू नव्हत, कारण मला काहीच ऐकू येत नव्हत, कि तिला ते माझ्यापासून लपवायचं होत? मी आजूबाजूला पाहिलं, आम्ही एका भल्यामोठ्या राजदालनात होतो! आसपास कोणीच नव्हत, होते ते फक्त दिवे! बराच वेळ मी तशीच उभी होते, तिची पाठमोरी सावली माझ्या पायापर्यंत पोहचली होती. त्या सावलीत मी एकटक पाहत राहिले तोच मला याज्ञसेनीचा आवाज आला, मी झटकन मान वरती केली, ती तशीच स्तब्ध उभी होती, फक्त आवाज कानी पडत होता. "मला मरता ही येणार नाही! किती घोर विटंबना आहे ही, पाच पुरुषांची पत्नी! किती मोठा अधर्म आहे हा! तरीही मला हे करावं लागेलं! मी एका स्त्रिच्या पोटी जन्म घेतला नाही म्हणून इतकी मोठ्ठी किंमत मला मोजावी लागणार! महर्षी व्यास तर म्हणाले, माझ्यामुळे धर्म प्रस्थापित होईलं! पण, या महान कार्यास मला योजून ठेवताना माझातल हे मन सुद्धा लुप्त करायचं ना परमेश्वराने! पूर्वजन्मीचे भोग म्हणू कि वरदान? महर्षी व्यासांनी बाबांना माझी मागील जन्मीची कथा सांगितली, भगवान शिवांना प्रसन्न करून मी ज्ञानी, प्रेमळ, सुंदर, प्रतापी, बलवान,  पती मागितला, यावर भगवंताने मला पाच वेळा "तथास्तू" म्हंटलं! म्हणून का या जन्मी मी पाच पुरुषांची पत्नी बनू? हा कोणता न्याय आहे परमेश्वरा? हे तर पाप आहे, हे मला संपवावच लागेलं, मला स्वतःलाच संपवावं लागेलं."  मी घाबरून याज्ञसेनीकडे धाव घेतली, ती डोळे घट्ट दाबून उभी होती, तोच एक आवाज कानी पडला, "सखी!"

मी झपकन मागे वळून पाहिलं, भगवान कृष्ण आमच्याकडेच चालत येत होते. याज्ञसेनीने मात्र मान सुद्धा वळवली नाही, ना डोळे उघडले. ती आधीच्याच अविर्भावात उभी होती, जणू तिला माहितच नव्हत, आसपास काय सुरु आहे. भगवान कृष्णाचा चेहरा धीरगंभीर भासत होता, याज्ञसेनीच्या डोक्यावर प्रेमळपणे हात ठेवून त्यांनी पुन्हा तिला हाक दिली, "सखी." इतक्या वेळापासून सुरु असलेली तिची घालमेळ, तिच्या हुंद्क्यातून बाहेर पडली. शरीराच्या जखमेवर औषध लावता येत पण, मनाच्या जखमेचं काय? ती तर भळभळून वाहत राहते. काही क्षण विरले, अजूनही याज्ञसेनीचे अश्रू थांबले नव्हते. समजावणीच्या सुरात श्रीकृष्णाने म्हंटल, "सखे, आता तरी डोळे उघड, मी आहे ना! मी सदैव तुझ्यासोबत आहे". एखाद्या लहान मुलीला आपण समजावतो अगदी तशेच भगवान कृष्ण आपल्या सखीची समजूत काढत होते.
याज्ञसेनी हुंदके देत म्हणाली, "कृष्णा, मला मरता ही येणार नाही का रे? मागच्या जन्मीच्या कर्माची इतकी मोठी शिक्षा? कशी वरणार मी पाच पुरुषांना? कशी जगणार मी? हा अधर्म आहे, समाज मला काय काय बोलेलं? नाही नाही मला असह्य आहे हे"…कृष्णाकडे पाहून, दोन्ही हात जोडून ती त्याला विनवणीच्या स्वरात म्हणाली, "माझी सुटका कर यातून कृष्णा!" त्या निष्पाप याज्ञसेनीच्या आकांताने माझं मन पिळवटून निघालं, माझी नजर कृष्णावर खिळली होती.
कृष्ण आता गंभीर होत म्हणाले, "याज्ञसेनी, तू स्वतः शास्त्र जाणतेस, आत्महत्या हे सर्वात मोठ पाप आहे."
हे ऐकताच याज्ञसेनी लालबुंद झाली, प्रकशोभून म्हणाली, "पाच पुरुषांशी एका स्त्रीने विवाह करणे हे पाप नाही का कृष्णा?"
कृष्ण- हो! पापच आहे, अधर्म आहे हा.
याज्ञसेनी- आणि तरीही तू मला या दरीत लोटतोयस? तुझ्या सखीला?
कृष्ण- शांत हो सखे, तुला दरीत जाऊ देईन का मी?
याज्ञसेनी- मग हे काय आहे ?
कृष्ण- सखे, तू या जगाच्या कल्याणार्थ अवतरीत झाली आहेसं, तुझ्यामुळे या सामान्य लोकांना एक न्यायप्रिय राजा मिळेल, एक अशी सम्राज्ञी मिळेल जी या पृथ्वीतलावर धर्माचं राज्य प्रस्थापित करण्यास कारणीभूत ठरेल, जी धर्माच्या पाच स्तंभांना एकजूट करेल. सखे, एक स्त्री, जी सदैव अग्नितेजासारखी पवित्र आहे, जी अलौकिक आहे, बुद्धिमान आहे, जी धर्माला जाणते, तिचं हे शिवधनुष्य पेलू शकेल ती तुचं आहेसं! तुझ्या व्यक्तिरिक्त या जगात अशी स्त्री कधीच होणार नाही. सखे, तू धर्माचं प्रतिक आहेसं, हे पाच पांडव धर्माचे पाच स्तंभ आहेत. ज्ञान, प्रेम, समर्पण, धैर्य, न्याय यांव्यतिरिक्त धर्माची स्थापना होत नाही. तू या पांडवांच्या एकात्मतेच प्रतिक आहेस. सखे तू आणि पांडव या धर्मस्थापनेच्या महान कार्यसिद्धीसाठीच या भूतली अवतरलेले आहात. या भूतलावर प्रत्येक मानवाच कार्य नेमलेल आहे, ते पूर्णत्वाला नेण हेचं तुमचं कर्तव्य आहे. 
याज्ञसेनी शांत झाली होती, तिच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव दिसू लागला. तिच्या चेहऱ्यावरच प्रश्नचिन्ह जाणून कृष्ण म्हणाले, "सखे, तू कोणतीच काळजी करू नकोसं, मी सदैव तुझ्यासोबत आहे."
याज्ञसेनीच्या मनातला भक्तीचा झरा तिच्या डोळ्यात स्पष्ट जाणवत होता. कृष्णाचं सखी प्रेम अन याज्ञसेनीची  भक्ती, मोगऱ्याच्या सुगंधासारखी माझ्या श्वासांत भिनली. भक्ती अन मैत्री मधलं हे प्रगाढ प्रेम पाहून माझ मन आनंदाने भरून गेलं.

प्रिया सातपुते 





3 comments:

Unknown said...

कृष्णाचं सखी प्रेम अन याज्ञसेनीची भक्ती, मोगऱ्याच्या सुगंधासारखी माझ्या श्वासांत भिनली.
माझही मन आनंदाने भरून गेलं.

Unknown said...

कृष्णाचं सखी प्रेम अन याज्ञसेनीची भक्ती, मोगऱ्याच्या सुगंधासारखी माझ्या श्वासांत भिनली.
माझही मन आनंदाने भरून गेलं.

prachi...... said...

nice .............

Post a Comment