Friday 28 March 2014

प्रियांश...२८

परवा अचानक हुक्की आली, भेल खायची…मग काय मोपेड काढली अन सुसाट दोडवली "राजाभाऊंच्या भेल" कडे. गर्दी होती पण, थोडी पांगली होती. मोपेड पार्क करून चटकन गड गाठला, भेल घेतली, पैसे दिले…साईडला उभी राहून पहिला घास तोंडात टाकला, अमृताचा स्पर्श मनामनाला व्हावा असंच वाटलं. खूप दिवसांनी भेल खायला मिळत होती ना म्हणून!  

माझ्या बाजूलाच मुलामुलींचा ग्रुप उभा होता, त्यांच्यापेकी बऱ्याच जणांच खाऊन झालं होत, तशी त्यांची भेलची कागदे त्यांनी रस्त्यावरच टाकून दिली…क्षणभर मला धक्काच बसला, इतके सुशिक्षित, चांगल्या घरची मुले मुली आणि…माझी नजर थोडी किळसवाणी झाली होती, माझ्यातला किडा मला डिवचू लागला, "हे काही बरोबर नाही, मुस्काट फोडायची इच्छा होत आहे, हेच शिकवणार का ते त्यांच्या मुलांनापण? कुठेही कचरा फेका, कुठेही थुंका आणि बरचं काही." 

माझ्या मनात विचारांचं सत्र चालूच राहिलं, शेवटच्या घासाबरोबर, मनात काही ठरवून मी, त्यांनी फेकलेले सारे कागदाचे गोळे उचलेले, ते पुन्हा त्यांच्या पुढ्यात टाकले, त्यांच्याकडे पाहून पुन्हा मी ते उचलून कचऱ्याच्या पेटीत टाकले. त्यांच्यासमोर पुन्हा जाऊन, एक झक्कास स्माईल दिली! त्या सगळ्यांचे चेहरे पटापट खाली पडले, माझ्या स्माईलला काय उत्तर द्यायचं हेचं त्यांना कळेना. शेवटी फक्त एकचं वाक्य म्हणाले, "प्लीज डोन्ट डू धिस अगेन!" मला उर्मटपणा अपेक्षित होता पण, जवळपास सर्वांच्या तोंडून फक्त एकंच शब्द निघाला, "सॉरी!" का कोणास ठाऊक विश्वास वाटत होता की ते पुन्हा असं कधीच करणार नाहीत. 

काय सांगू मी, मला तर स्वर्ग जिंकल्याचा अनुभव आला होता!

प्रिया सातपुते 

No comments:

Post a Comment