Saturday 22 March 2014

गुढीपाडवा...एक चैतन्य!



गुढीपाडवा…म्हणजे नव्या वर्षाची सुरुवात, अर्थात आपलं हेप्पी न्यू ईयर! आपल्यातला बऱ्याच जणांना याबद्दल काहीच माहित नाही, काहीजण घरी करतात म्हणून हजेरी लावतात, पण, खूप जणांना त्याचं महत्व माहितच नाही! म्हणून, ही पराकाष्ठा!

चैत्राची सुरवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. त्या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करून गुढी उभी केली जाते. गुढी अर्थात, एका शुचिर्भूत काठीला नवं कोर कापड अथवा नवी साडी बांधली जाते, तिला साखरेची माळ, कुडूनिंबाची पाने, आणि कलश बांधला जातो, हळद-कुंकू च्या साक्षीने चाफ्याची माळ चढवली जाते. अशी ही गुढी दारात पाटावर उभी केली जाते. यालाच "ब्रह्मध्वज" असेही म्हणतात. कारण, ब्रम्ह हा नव्या सृष्टीचं प्रतिक आहे, सूर्याची किरणे या गुढीच्या स्पर्शाने आपल्या घरात पडली जावीत, अन नवचैतन्याने संपूर्ण घरभर अन आपल्या मनात ही हे चैतन्य यावं हा यामागचा हेतू आहे. 
पूजा झाल्यानंतर कुडूनिंबाच्या पानांचा प्रसाद दिला जातो, कारण कडुनिंब औषधी आहे अन यावरूनच समजते आपल्या पूर्वजांनी किती चौकस बुद्धीने अश्या  सुंदर गोष्टी आपल्यापर्यंत पोहचवल्या आहेत. 


हा झाला मूळ उद्धेश. गुढीपाडव्याबद्दल पुराणात सुद्धा बऱ्याच कथा आहेत आणि त्यात सर्वमान्य आहे ती कथा अशी… चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी पाडव्याला प्रभू राम सपत्नीक आपल्या सर्व दलासमवेत अयोध्येला १४ वर्षांचा वनवास संपवून परत आले होते. त्या रावणावरच्या अतुलनीय विजयाचे कौतुक म्हणून रावणाच्या त्रासातून मुक्त झालेल्यांनी, राम आपल्या घरी परत आल्यामुळे आनंदीत झालेल्या नगर जनांनी, आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढ्या उभ्या केल्या. आपली घरेदारे सजवली, अन संपूर्ण अयोध्या सजली. 

नव्या वर्षाच स्वागत आनंदाने कराव अन जुन्या कडू आठवणींना विसरून साखरेच्या मालेसारख नववर्ष गोड गोड जावं हाच त्यामागचा उद्धेश. सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी गुढीला नैवैद्य दाखवून, नारळ फोडून, गुढी उतरवली जाते, साखरेची माळ सर्व लहान-मोठ्यांना प्रसाद म्हणून दिली जाते. 

प्रत्येक घरी थोड्या फार फरकाने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने गुढी उभारली जाते, नव्या वर्षाच्या स्वागतासाठी!

अशी ही गुढी सोनेरी किरणांनी तुम्हां-आम्हां सर्वांना प्रेममयी, आनंदमय, आरोग्यदायी, धनधान्य देणारी जावो हीच ईश्वरचरणी सदिच्छ्या!

नवं वर्षाच्या सुवर्णमयी शुभेच्छ्या!

प्रिया सातपुते 

No comments:

Post a Comment