Tuesday 18 March 2014

खंत!

आताच्या लहानमुलांकडे पाहिलं की आश्चर्य वाटत, त्यांना ना पैशांची किंमत आहे ना आई-बाबांच्या कष्टाची! सुट्ट्यांच्या काळात आई-बाबांना मदत सोडाच ते तर स्वतःवर उपकार केल्यासारखे खेळतात, अभ्यास करताना पण त्यांना वह्या पुस्तकांची कदर राहिलेलीच नाही. आपल्या हातून चुकून जरी पुस्तकं खाली पडलं की आपण ते उचलून नमस्कार करून छातीशी लावायचो अन आताची मुले पाय लागला तरी वाकायची नाहीत. ना मैदानी खेळांचं महत्व आहे, त्यांना तर फक्त टीवी एके टीवी, टीवी दुणे गेम, टीवी त्रिक मोबाईल,…हेचं माहित आहे. त्यामुळे त्यांची बुद्धी क्षीण होत चालली आहे, एकाग्रता नसल्यामुळे अभ्यासाच्या नावाने शंक होत आहे, लहान वयातच त्यांचे पाय, गुडघे, हात, पोट दुखत असतं…फास्ट फूड मुळे आपल्या पौष्टिक घरगुती जेवण त्यांना रुचत नाहीय अन त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या डीफिशीयनसी होत आहेत. 

सुट्ट्यांमध्ये आम्ही भावंडे लहान असतांना आमच्याच  कारखान्यात जाऊन कोल्हापुरी चप्पला बनतात कश्या ते पहायचो, पुठ्याच्या नंतर खरोखरच्या कोल्हापुरी चप्पला बनवायचो, आजोबांना दाखवायचो, दुकानांत जाऊन त्याचं चप्पला विकायचो अन मग आजोबा आम्हांला शाबासकी द्यायचे त्यातच आमचं पोट भरून जायचं, आम्हांला आताच्या मुलांसारखे गोष्टी गोष्टीला फूस लावायचं माहित नव्हत! आजोबांना गोल भाकरी कोण करून देणार? यात आमची स्पर्धा चालायची जिंकायचो तर आम्ही सारेचं, कारण आजोबा प्रत्येकाची भाकरी किती गोड बनली आहे ते पटवून सांगून सगळ्यांनाच खूष करायचे. कधी आम्ही दुकानात गल्ल्यावर बसायचो, येणाऱ्या जाणाऱ्या गिराहीकाना नमस्ते करायचो, बिलावर शिक्का मारून, "पुन्हा या म्हणायचो"…आज काल मुलांना थंक यु म्हणायला पण अवघड जात, किती तरी आई-वडील डोक धरून सांगतांना मी स्वतः पाहिलं आहे, "अरे, थंक यु म्हणायचं म्हणून सांगितलं आहे की  नाही तुला मी? जा म्हणून ये." ते मुलं टस नाही मसं नाही!

शेजारी शेजारी, लपंडाव, तकतुंबा, आईचं पत्र, कानगोष्टी, पळापळी, विष-अमृत, भवरभेंडी, भाजीवाला, टीचर टीचर, लंगडी, वाघोबा, कोकनेट…. अशे बरेचं खेळ खेळायचो, काही स्वतःच्या सर्जनात्मकतेमुळे नवे नवे खेळ तयार करयचो, त्यामुळे मेंदूला चालना मिळायची. पण, आताच्या मुलांमध्ये मेंदू सुन्न पडला की  काय असं वाटू लागलय. टीवी बघून अश्लिल गाणी तोंडपाठ होतात पण, कविता काही पाठ होत नाही, सलमान खानची फायटिंगमुळे प्रत्येक मुलाला तो तसाच व्हावा असं वाटत मग, त्यातून दुसऱ्या मुलांना मारहाण करण, मोठ्यांना पण हिरोपंती दाखवण सुरु होत. नको त्या वयात निरागसता हरवून बसतात ही आजकालची मुल!

याला कारणीभूत कोण? टीवी? वेळ न देणारे आई-वडील? टेक्नोलोजी? एकत्र कुटुंबच विलोप? की संस्कारांची कमी? मी तर म्हणेन, लहानमुलं तर आपण घडवू तशेच घडतात, मातीच्या गोळ्याला जो आकार देऊ त्याचं आकाराची बाहुली तयार होणार ना? आई-वडील दोघांनीही ठरवलं पाहिजे त्यांना त्याचं मुलं कसं घडवायचं आहे. टीवी, मोबाईल कोणत्या वयात आपल्या मुलाला दिलं गेलं पाहिजे? इंटरनेट वापरतांना किती वापर? फेसबूक कोणत्या वयात सुरु करायचं? लैंगिक शिक्षण, चांगला वाईट स्पर्श, स्वःसरंक्षण,…त्यांना काउच पोटेटो होऊ देऊ नका, खरया जगाचा आस्वाद घ्यायला शिकवा ना की वर्चुअल. 

प्रिया सातपुते 



No comments:

Post a Comment