मुंबईहून परतल्यानंतर पहिल्यांदाच नवरात्रीत आई अंबाबाईच दर्शन घेण्याचा मोह झाला. संपूर्ण दिवस दगदगीचा होता, त्यातून इंटेन्स वर्कआउट करून बॅटरी पूर्ण डाऊन होती, तरीही जेवण उरकून पप्पा, त्रिशा अन मी दर्शनास सज्ज झालो. संपूर्ण बालपण मंदिराच्या शेजारी गेल्यामुळे आताच कमर्शियल मंदिर हल्ली मनाला भावत नाही! तरीही आज का कोणास ठाऊक एक ओढ लागली होती.
रात्रीचे साडे दहा वाजून गेले तरी सुद्धा दर्शनाची लाईन भली मोठी होती, मुख दर्शन करण्यातच शहाणपणा सुचला, त्याची रांग तर काही केल्या पुढे सरकेना, शेवटी अकराच्या सुमारास गर्दी पुढे सरकू लागली, लहान असताना या मंदिराच्या प्रत्येक पायरीवर हक्काने उडया मारायचो, गरगर देवी भोवती फिरत रहायचो अन आज भाचीच्या हातात स्टोलंच एक टोक बांधून माझ्या हाताला दुसरं! तिला धक्के लागू नयेत यांतच माझं सार लक्ष, अन पप्पा आम्हां दोघींना धक्का लागू नये यात!
शेवटी कित्येक वर्षांनी मंदिराची पायरी ओलांडली, दर्शन झालं, दोन क्षण सुद्धा तिथे उभं सुद्धा राहू शकणार इतकी गर्दी! तरीही देवीने दर्शन दिलं! सारा भूतकाळ त्या काही क्षणांत मनाला भरून पावणार सुख देऊन गेला!
दर्शन करून भवानी मातेला भेटून जाऊ हे मनात का आलं कोणास ठाऊक? तिथे देवीचा गोंधळ सुरु होता, सुंदर होत, पण, पटकन दर्शन घेऊन बाहेर येताना एक लहान मुलगा एकटाच रडत मंदिरात येत होता, त्रिशा पटकन बोलून गेली, "आतू तो मुलगा रडतोय एकटाच!" आजुबाजूला पाहिलं त्याच्यासोबत कोणीच नव्हतं, जवळ जाऊन त्याला उचलून घेतलं, थोडी विचारपूस केल्यावर कळलं पाखरू हरवलंय! जेमतेम चार वर्षाचा मुलगा, नाव श्रवण सांगत होता, धड त्याला संपूर्ण नाव पण सांगता येईना! पप्पांच नाव काय? "पप्पा". मला उमगलं याला काही सांगता येणार नाही, पटकन, बाहेर गोंधळ चालू होता तिथे गेले, तिथल्या वादकांना घडलेला प्रकार सांगितला, ते अनाऊंसमेन्टला रेडी झाले, ते बाळ काही केल्या त्या माणसांकडे जाईना! माझा हात घट्ट पकडून धरला, अन मनात प्रश्नांचं काहूर उठलं, मनात एकच विचार होता, याचे आईवडील इथेच भेटू देत! पोलीस काकांकडे जाऊया का आपण? यावर लगेच मान डोलवत, डोळ्यात पाणी आणून बावरलेल्या नजरेने पाहत होता! एवढ्यात त्याचे पप्पा आले! माझ्या काखेतून झपकन उडी मारली त्याने त्याच्या पप्पांकडे! हुश्श! थंक गॉड! बस एवढाच विचार आला तेव्हा! पप्पांना शंका तुमचाच मुलगा आहे ना? पप्पा जाम चिडले होते, तरीपण कंट्रोल केलं त्यांनी! मी त्या काकांना विचारलं, नाव श्रवणच आहे ना याच? ते बोलले नाही, "सर्वेश"! मग, शेवटी उपदेश म्हणण्यापेक्षा काळजीपोटी मी त्यांना बोलून गेले, असं सोडू नका हात, आजकाल जमाना ठिक नाही. त्याला नाव सांगता यायला हवं, कुठेही जाताना त्याच्या पॉकेट मध्ये चिठ्ठी ठेवा त्यात नाव, फोन नंबर ठेवा! अथवा गळ्यात आयडी लावा!प्लिज!
त्यांनी आणि त्यांच्या बायको दोघांनीही आभार मानले, अन सर्वेशला बाय करून आम्ही घर गाठलं!
हे सगळं सांगण्याचा प्रपंच का? तुमच्या आजूबाजूस कोणतंही लहानमुल एकटं, रडताना, अथवा बावरलेल दिसलं तर प्लिज इग्नोर करू नका! त्याला तुमची गरज असू शकते, त्याला तुम्ही पुढील धोक्यांपासून वाचवू शकता! आपल्या संपर्कातील सर्वांनाच लहानमुल गर्दीत नेण्याआधी आयडी गळ्यात घालायला द्या अथवा चिठ्ठी द्यायला सांगा. त्यावर संपूर्ण नाव, फोन नंबर नमूद करा. घरातील मुलांना संपूर्ण नाव आणि फोन नंबर तोंड पाठ शिकवा! सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहानमुल आपली जबाबदारी आहेत हे विसरू नका!
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment