Friday 1 August 2014

सिम्मी…The unconditional love


देवाने मनुष्याला फुरसती मध्येच बनवलं असणार…देवाने जन्माला घातलेला सुसंस्कृत, सभ्य, बुद्धीमान प्राणी म्हणजे कोण असेलं तर तो "मनुष्यच"…म्हणून तर हा मनुष्य सगळीकडे मिरवत राहतो, वरचढपणाच्या ढोंगात तो स्वतःचा अहंकार कुरवाळत राहतो आणि बाकी सर्वं प्राणीमात्रांना तुच्छ समजतो. 
पण, याच उत्कृष्ट देवाच्या कलाकृतीत एकचं काळा ठिपका आहे अन तो म्हणजे, "निरपेक्ष प्रेम". 
या निरपेक्ष प्रेमापोटी माणूस जंगजंग पिछाडतो पण हाती मात्र काहीच लागत नाही…अश्या या माणसाला प्रेमाचा खरा अर्थ कोण शिकवत? याचं भूतलावरचे तुच्छ प्राणी. 

प्रत्येकाला कोवळ्या वयात पडलेला गंभीर प्रश्न कोणता होता? तर तो म्हणजे, "प्रेम म्हणजे काय?" प्रत्येकजण त्याच्यापरीने प्रयत्न करतो, अर्थ सांगण्याचे, तर काही व्याख्या तयार करतात. प्रेमावर कविता करतात तर काहीजण प्रेमावर कथा लिहितात, पण, कितीजणांना खरचं प्रेम कळत??? मलाही पडलेलं हे एक कोडच होत, पण, जर प्रश्न मनातून असेल तर काळ आणि वेळ तुम्हांला तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे नेऊन पोचत करतेच. 

माझ्या प्रश्नाचं उत्तर होत "सिम्मी"…या नावाशी माझा काहीच समंध नव्हता, पण याच एका शब्दांत आयुष्याचं गमक ती मला देऊन गेली. सिम्मी माझ्या एका मित्राची पेट फिमेल डॉग होती. खर बोलायचं तर मला सगळे प्राणी आवडतात पण, जंगलंमध्ये!! किती हा विपर्यास…कारण, लहानपणापासून त्यांच्याबद्दलची भीती मनात घर करून अशी राहिली होती की जे पेटस ठेवतात, त्यांच्याबद्दल सुद्धा मला अप्रूप वाटायचं किती गट्स आहेत यांच्यात! पण, या पठ्याला तिच्याबद्दल भरभरून बोलतांना मनात कुठेतरी वाटायचं की काश, माझ्याकडे पण सिम्मी असती! असं, काय होत तिच्यात???

सिम्मीबद्दल बोलतांना माझ्या मित्राच्या बोलण्यात मी कधीच मालकीभाव पाहिला नाही, तो जणू ती घरचीच मेंबर असल्यासारखा बोलायचा. जणू ती त्याची बच्छडीच होती. तो लहान असतांना त्याच्या काकांच्या घरातून एक छोटुस पिल्लू, घेऊन आला होता. पांढऱ्या रंगाची, गोबरी गोबरी सिम्मी तेव्हापासून त्याचीच झाली होती. किती अजब आहे हे, तो हॉस्टेलला असूनही ती त्याला कधी विसरली नाही. माझ्या ऐकण्यात आलेली ही पहिली पेट डॉग असेलं जी वेजीटेरीयन होती आणि तिला कैडबरी खूप आवडायची. सगळ्यात मोठी हाईट म्हणजे ही चिमण्यांशी खेळायची. अंगणात झाडावरून पडलेल्या पिल्याला हलकेच तोंडात घेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवायची, घरच्यांना बोलावून त्या पिल्याला वाचवल्याची गोष्ट मला अजूनही थोडीथोडी लक्षात आहे. माझ्या आळशी मित्राला ती फिरायला ने म्हणून मागे लागायची. दिवसभर काकूंच्या मागेमागे घरभर त्यांच्या सावलीसारखी फिरायची…सकाळी पेपर आणून देण्यापासून, जी जी कामे सांगाल ती सारी गपचूप करायची, ना चेहऱ्यावर आठी ना भुंकणे…घरभर बागडायची, पायाशी लोळण घालायची, मायेने हात फिरवावा म्हणून पायात घुटमळायची… घरात कोण आलंय याची वर्दीपण द्यायची…ओवरऑल ती ऑलराउंडर होती. 


सिम्मीबद्दल इतकं ऐकलं होत की तिला पाहण्याची इच्छा तर सॉलिड होती आणि भीती त्याहून डब्बल. पण, जेव्हा मी त्यांच्या घरी पाहिलं की ती निवांतपणे घरभर फिरते आहे, माझ्यातर पायाखालची जमीनच गायब झाल्यासारखं झालं होत, मी अश्या जागा पाहून बसतं होते जिथे सिम्मी येणार नाही पण, ती नेमकी माझ्याच पायाखाली येत होती तर कधी खुर्चीखाली तर कधी चक्क माझ्या बाजूला, पण ना ती माझ्यावर  गुरगुरली ना ओरडली, उलटा ती इतकं क्युट लूक द्यायची ना की वाटायचं, अरे एकदा हिला टच करूयाच, पण, हिम्मत ने दाद नाही दिली. इतक्या वर्षांची भीती अशी कशी जाईल! काही लोकं त्यांच्या पेट्सना घराबाहेर ठेवतात…थंडीत कुडकुडायला, किंवा त्यांना त्याचं सेप्रेट डॉग हाउस देतात, पण, याच्या घरी ती निवांत दिसली, त्याच्याच बेड मध्ये झोपेल, एकदा त्याने सांगितलं पण होत की ती त्याच्या जवळच झोपते, कधी पायांजवळ तर कधी कुशीत तर कधी सोफ्याखाली. किचेन मध्ये जाऊनही ती कुठेच तोंड घालत नव्हती, खाण्यासाठी ती तिच्याच प्लेटकडे जायची…किती विनम्र, आताची लहानमुलेही इतकी नम्र नसतात. बाहेरच्या लोकांना पाहताच डॉग्स भुंकायला लागतात,… पण, लग्नासाठी भरगच्च पाहुण्यांनी भरलेल्या घरातही ती गुरगुरतानासुद्धा मी नाही पाहिली. खरचं!!!


किती प्रेमाने ती त्यांच्या घरच्यांच्या गळ्यात पडायची, खरचं जाणवत होत की ती किती प्रेम करते त्यांच्यावर…एक महत्वाची बाब म्हणजे लग्नाआधीच्या परित्राण पाठात त्यांनी सिम्मिला सुद्धा बाजूला बसवलं होत, आणि ती संपूर्ण मंत्र ऐकतेय की काय याचंच कौतुक वाटलं होत मला! त्यानंतर मी तिला कधी पाहिलं नाही! सिम्मिला पाहिल्यानंतर कौतुक वाटत होत की ही खरचं डॉग आहे??? माणसे सुद्धा इतकी शहाणी नसतात. 

मित्राचं अन सिम्मीच नात उमगण्या इतपत माझी बुद्धी त्यावेळी तितकी प्रगल्भ नव्हती, मी फक्त तिला एक पेट म्हणूनच पाहिलं! जेव्हा सिम्मी हे जग सोडून निघून गेली तेव्हा तो खूप रडला.  तो मला अगदी एका लहान मुलासारखा वाटला, जो सिम्मिला घेऊन घरी आला होता फरक फक्त इतकाच होता की आता सिम्मी त्याच्याजवळ नव्हती म्हणून तो रडतं होता. 

दिवस निघून गेले, प्रत्येकजण आपापल्या व्यापात बुडून गेले. मी सिम्मिला विसरले, पण, जेव्हा जेव्हा सिम्मिसारखीच दिसणारी डॉग्स समोर दिसायची, सिम्मी नजरेसमोर तरळून निघून जायची. आजही आठवत आहे, रात्री झोप येत नव्हती म्हणून मी टीवी पहात होते, "हाचीको" मूवी सुरु होती, छोटुस पिल्लू पाहून, सिम्मी मनात तरंग उठवून गेली…जणू, त्या पिल्ल्यात ती मला "प्रेमाचा खरा रंग" पहायला सांगत होती. शेवटी मी तीच मूवी पहायचा निर्धार केला, तोंड पाडून मूवी पाहताना मला जाणवलच नाही, की मी किती गुंग होऊन गेले होते. मन दाटून आल होत, हुंदका गळ्याशी आला होता.  "निरपेक्ष प्रेमाचा" अर्थ उमगून न उमगल्यासारखीच माझी गत झाली होती, हाचीच्या शेवटच्या क्षणात मला माझ्या मित्राचं दुखः स्पष्टपणे जाणवत होत…जणू तो चक्कं सिम्मिला पकडून रडतोय की काय! असाच भास झाला होता. त्याच्या दुःखाची सर माझ्या जाणीवेत येणार नाही कारण, त्यान त्याचं हक्काचं निरपेक्ष प्रेम करणार माणूस हरवलंय, पण, सिम्मी मात्र नेहमीच त्याच्या मनाच्या कप्प्यात कायमची राहिलं. 


Thank you Simmy, for letting me know the secret of "Unconditional Love", I'll cherish your memory for lifetime.

प्रिया सातपुते 





No comments:

Post a Comment