Friday 1 August 2014

प्रियांश...४४

आजचा दिवस संथ घालवला, खर बोलायचं तर काहीच केलं नाही…हिवाळा आला की काही प्राणी कशे हायबरनेटिंग पोझिशन मध्ये जातात ना, तसचं काहीसं केलं…आता काही क्षणांपूर्वी हॉट चॉकलेट पिण्याची इच्छा उफाळून आली, मग काय स्वारी रथात बसून किचेन मध्ये पोहचली…हॉट चॉकलेट मग मध्ये घेतांना थोडासा चटका बसला…"आई ग!" तसा मी हात पटकन पाण्याखाली धरला, त्या एवढ्याश्या चटक्याने मला क्षणार्धात त्या निष्पाप स्त्री जीवांचे चटके मनात द्यायला सुरुवात केली…कधी सती म्हणून तर कधी, एकतर्फी प्रेमात, तर कधी हुंडाबळी,…. विचार भरकटत आहेत, कधी ते मला स्पष्ट चित्र दाखवत आहेत…नवऱ्याच्या चितेवर जिवंत सती जाणाऱ्या स्त्रिच…शांत, जणू तिला काही जाणवतच नाहीये, जणू ते शरीर सुन्न झालं आहे, नवरा गेल्याच्या दुखात तिला खरचं काही जाणवत नाहीय…एका जिवंत स्त्रिला, जी धडधाकट आहे, फक्त नवरा मेला म्हणून जिवंत जाळण अन, मग "सती" पदवी देऊन मान देण…कितपत योग्य होत हे? तेव्हाचा समाज इतका कसा निष्ठुर होता? की एका जिवंत माणसाला आगीत लोटल जायचं…त्या स्त्रिच्या आर्त किंकाळ्यांनी त्यांची हृदये पिघळली का नसावीत? हा कधीही न उमगणारा प्रश्न आहे… 

लॉच्या अभ्यासक्रमात, इंडियन पिनल कोड हा विषय सुरुवातीला मला खूप भारी वाटायचा. केसेस एकदम सॉलिड वाटायच्या वाचायला,…पण, जेव्हा मी पुस्तकांना हात घातला, जस जश्या क्रूर, माणुसकीला काळीम्बा फासणाऱ्या केसेस अभ्यासात यायला लागल्या, माझं मन मलाच घाबरू लागलं…आरशात पाहतांना मला भीती वाटू लागली होती…रोज स्वप्नांत त्या स्त्रिया नजरेसमोर यायच्या…झोपण मुश्किल झालं होत…तेव्हा मला जाणवलं हे ज्याच्यावर बेतलंय त्याचं काय? आयुष्य गुलाबी असतं अशी समजूत तेव्हा कायमची नष्ट झाली होती… 

काळ बदलला पण अजूनही माणूस तसाच निष्ठूर का? आज ही रोज एक स्त्री हुंड्यापायी जाळली जाते, मारली जाते…हात कशे कापत नाहीत या नराधमांचे? याची उत्तरे माझ्याकडे नाहीत, मला नाही माहित माणूस कधी शहाणा होईल, पण मी आशावादी आहे, देवाकडे एकचं मागण आहे, "देवा तू जन्माला घातलेल्या या सर्व माणसांमध्ये फक्त प्रेम हीच एक भावना दे, सगळ्यांना सुखी ठेव. "

प्रिया सातपुते 

No comments:

Post a Comment