Thursday 24 July 2014

प्रियांश...४३

काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये भेटलेल्या एका मैत्रिणीशी गप्पा झाल्या, वोट्सअप्प वर आल्याची कुनकुन तिला मिळाली अन गप्पांचा ओघ सुरु झाला. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. हिच्याकडून गुजराती शिकण्याचा फोल प्रयत्नही करुन झाला होता. नोकरी मिळाली, पायवाटा वेगळ्या झाल्या, फेसबुकवर तिच्या लग्नाचे फोटो अपलोड झाल्यावर जाणवल, की मैडमच लग्न झाल, मग काय, फेसबुकवरच शुभेछ्या दिल्या. पर्याय नव्हता, शेवटी मनाला माझ्याही कुठेतरी लागल होतच. असो हा सारा भूतकाळ!

प्रत्येक विवाहीत स्त्री फिरून फिरून ''सा" नावाच्या शब्दावर येऊन अशी काही अटकते की तो धड तिला धरताही येत नाही अन सोडताही! पण, शेवटी सोडते वेळी ती तो "सू" लाऊनच सोडते. असो, काळ बदलला तरीही स्त्रियांची मानसिकता बदलणार नाही हेच खर! तसच हिच्या बाबतीतही झाल. शिकलेली, नोकरी केलेली, देखणी सखी सून म्हणून गेली पण, सोन्याच्या पिंजरयात कैद झाली. नोकरी करायची नाही, कारण, त्यांच्या घरात हे आवडत नाही...मग, क्लासेस घेते तर, बाहेरच्या माणसांनी घरात आलेल चालणार नाही...नवरयाशी बोलते तर तो मुका गडी! बायकोला अटलिस्ट तिच्या खर्चासाठी महिन्याचे पैसे द्यायचे, तर हा पठया तेही करत नाही...स्वत: कमवणारया सखीवर काय ही वेळ? नव्या घरात पहिला हक्काचा माणुस असतो तो नवरा, त्याच्याकडेच ती काही लागल, खुपल सांगणार ना की शेजारयाला? माहेरी आलेल्या बायकोला रिकाम्या हाताने जाऊ द्यायच? ही कोणती पद्धत, आपल्या बायकोला काही आवडले, आपल्या बाळाला काही पाहिजे असेल तर, काय? माहेरही तिच्या हक्काच आहे, पण एक नवरा, बाप, जावई म्हणून त्याच काही कर्तव्य आहे की नाही? एक मुलगा म्हणून तो चांगला नक्कीच वागतोय पण, मग बाकीच्या नात्यांवर इतका अन्याय का??

एका परक्या मुलीला तुम्ही सून म्हणून घरी मापट ओलांडून आणता, मग तिला माणुस म्हणूनही वागवा. कारण, ती सुध्हा कोणाच तरी एकुलत एक पाखरुच असते ना हो!  ती काही पाळलेल कुत्र-मांजर नसते, चक्क मन असणारी तुमच्या आई, बहिणी, मुली सारखीच एक स्त्री असते. शेवटी ती मला एक सल्ला देऊन गेली, अरेंज मैरेज करुच नकोस, सार क्लियर करून मगच लग्न कर...अन तिच एक वाक्य अजुनही मला काळजात खुपत आहे, "मी तर अजिबात प्रेम करत नाही याच्याशी, माझ फ़क्त शरीर त्याच्याजवळ आहे, आत्मा नाही." काय म्हणाल याला, तीन वर्षापेक्षा जास्ती होऊन गेले तिच्या लग्नाला अन किती भयानकता आहे ही लग्न नावाच्या पवित्र नात्यातील!

हे झाल लग्नानंतरच, लग्नाआधीच काही नमुने सुरु होतात, लग्नानंतरही तुला जॉब करावा लागेल, घरी पण पहाव लागेल, आमच्या घरी कुकच्या हातच चालत नाही त्यामुळे तुलाच कराव लागेल, जस बायको नको कामवाली बाई हवी असते यांना, जी नॉन स्टॉप पायाला चाके लाऊन फिरेल...आणि काय तर तुझा जॉब टाइमिंग कमी करून घ्यावा लागेल, जशी कंपनी याच्या बापाचीच आहे ना! तुला नॉनवेज सोडाव लागेल, घरी कोणी खात नाही, बाहेर खाऊ शकतेस! अरे वाह रे बापुड्या जर ती वेजी असेल तर मात्र तुला पंचाईत, तुला शिकाव लागेल अन खावही लागेल,... हाउस वाईफ बनुन रहायच नाही, अरेच्या म्हणजे घर मैनेज करण तुच्छ काम आहे का? घर सांभाळायलाही डोक लागत, कोणत्याही ऐरया गैरयाच काम नाही ते, मुलांच्या मागे धावण, चिऊ माऊ करत जेवू घालण, त्यांना लहानाच मोठ करण, स्वत:च्या पायावर उभ करण, चेष्टा वाटतेय का ही?

लग्न दोन जीवांच मिलन, पण, त्यात दोन कुटुंब पण सामील असतात, एकमेकांना सावरून, नवीन नाती जुळवायची असतात...जुन्या नात्यांना नवीन परिघ द्यायचा असतो अन नव्या नात्यांना त्यात सामील करायच असत...हे गमक ज्याला आल त्याच्या घरी स्वर्गच नांदेल हे मात्र नक्की! डोळे झाकून बसू नका मित्रांनो परिघ वाढवा...

प्रिया सातपुते

No comments:

Post a Comment