Saturday 19 July 2014

माझं फुलपाखरू


आज माझ्या फुलपाखराने अचानक मला एक प्रश्न केला, "आतु, फक्त गोरी माणसेच चांगली असतात का?" तो प्रश्न ऐकून मला थोडं खटकलच, कारण, अशीच वेगवेगळी वाक्यं माझ्या कानावर आली होती. बाहेर जाताना, जेव्हा मी तयार होऊन, एखादा प्रश्न विचारते, "कशी दिसतेय मी?" त्यावर तिचं आधी उत्तरं असायचं, तेही हसून, "खूप छान, तू छानच दिसतेस, किंवा वॉव, क्युट…" पण, हल्ली हे उत्तर थोडं बदललं होत, "ह्म्म्म तू गोरीच आहेस ना, मग छानच दिसणार…" आधी माझं लक्षच गेलं नाही! पण, काही दिवसांपूर्वी ती आणि तिचा मित्र माझ्यासोबत खेळत होते, तितक्यात मला वोटसअप्प वर मेसेज आला, तर माझ्या एका सिनियरने तिच्या बाळाचे फोटो शेयर केले होते, त्या बाळाला पाहून, तिचा मित्र झटकन बोलून गेला, "शी, काळ बेबी आहे." त्यावर मला खटकल, मी त्याला समजावून सांगितल, "अरे! बेबी सगळे क्युटच असतात, त्यात काळ-गोर असा भेदभाव नसतो. सगळ्या जगामध्ये वेगवेगळ्या रंगाची माणसे असतात, मग बेबी पण तशेच असतात, आता तू पण तर दुधाच्या शाईसारखा गोरा नाहीयेस ना? तुझ्यापेक्षा पण, कोणीतरी गोर असेलच ना? मग, त्याने तुला काळा मुलगा म्हणून चिडवलं तर ते तुला चालेल का?" यावर तो नाही म्हणून गप्प झाला पण फुलपाखराच्या चेहऱ्यावर प्रश्नाचं जाळ स्पष्ट दिसतं होत, तिला विचारलं पण, तेव्हा ती काहीच बोलली नाही. 

आज संधी सापडली होती, तिचा सुद्धा मूड मस्त होता, त्याचाच फायदा घेत मी तिला विचारलं, "त्रिशू, तुला कोणी काही बोललं आहे का?" 
माझं फुलपाखरू उडता उडताच म्हणाल, "नाही आतु"… 
मी- मग तू असा प्रश्न का विचारलास? नक्कीच कोणीतरी बोललं हो ना?
त्रिशू- ह्म्म्म, अग शाळेत तो  ***(मला इथे नाव टाकायचं नाही, कारण, एखाद्या लहान मुलाच नाव टाकण्याची माझी मुळीच इच्छा नाही!) आहे ना, त्याने मला, काळी म्हंटल, तो जास्ती गोरा आहे ना म्हणून तो सगळ्यांना काळच म्हणतो, अन मग मला वाईट वाटत, मी गोरी नाही ना म्हणून, बघ ना नेहा दीदी, रिया, वेदांत, टीया टीशा सगळे गोरे आहेत, आणि मीच फक्त काळी आहे, तू पण गोरी आहेस… 
एवढ सगळ बोलू पर्यंत या सात वर्षाच्या पाखराचा चेहरा केवढूसा झाला. तिचं सार ऐकून, मला पोटात गोळा आल्यासारखंच झालं. मग, मी म्हणाले, "कोण म्हणालं तुला काळी आहेस, तू खूप सुंदर, स्मार्ट आहेसं, बघ तुझे डोळे, किती बोलके आहेत, त्यांच्यात फक्त प्रेमच दिसतं. आणि तू व्हीटीश आहेस, काळी नाही… 
त्रिशू- व्हीटीश म्हणजे?
मी चक्रावलेच आता रंगांच्या चक्रात मला पडायचं नव्हत कारण मला तिच्यातला न्यूनगंड काढून टाकायचा होता रंगभेदाला खतपाणी न घालता. 
मी- अरे बाबा, आधी मला सांग, तुला कसं कळाल कि फक्त गोरी माणसेच चांगली असतात? 
यावर ती गप्प राहिली. 
मी- रंगाने माणूस चांगला की वाईट हे ठरवायचं नसतं बाळा, आता मग बाबा आणि पप्पा काळे आहेत म्हणून ते वाईट झाले का?
यावर ती पटकन बोलली, "नाही, ते खूप छान आहेत, आपल्यावर किती प्रेम करतात, आपल्याला खाऊ आणतात, खूप काम करतात, बिलकूल दमत नाहीत,… 
तिच्या चेहऱ्यावर उमटलेला निरागसपणा मला खाऊन टाकावासा वाटला. 
मी- माणूस चांगला त्याच्या गुणांनी होतो. 
त्रिशू- गुण म्हणजे?
मी- गुण म्हणजे गुड हबिटस, आता सांग मला गुड हबिटस काय असतात ते?
त्रिशू- सकाळी लवकर उठण, ब्रश करण, पॉटी करण, अंघोळ करण, स्कूल ला जाण, अभ्यास करण, मोठ्यांचा आदर करण,… 
मी- हे सगळे करणाऱ्याला कोण म्हणतो आपण? गुड गर्ल ऑर गुड बॉय! 
त्रिशू- हो
मी- मग, इथे कुठे रंग आहे??
त्रिशू- नाही (हसून)
मी- कावळा कोणत्या रंगाचा असतो?
त्रिशू- काळ्या!
मी- तुला ती गोष्ट माहितेय ना? पक्ष्यांना तहान लागलेली असते आणि सगळे सुंदर पक्षी माठातलं पाणी पिऊ शकत नाहीत, पण, कावळा काय करतो तेव्हा?
त्रिशू- तो दगड टाकतो, मग पाणी वर येते, आणि मग तो पाणी पितो. 
मी- मग, कावळा काळा असूनपण पाणी पितो का?
त्रिशू- कारण कि तो स्मार्ट असतो
मी- शाबास! म्हणजे रंगापेक्षा काय महत्वाच आहे? बुद्धी!
तिच्या डोळ्यांमध्ये लकाकी स्पष्टपणे दिसत होती. 
मी- अजून एक गोष्ट सांगते, एकदा अर्जुन, भगवान कृष्णांना प्रश्न विचारतो, "चांगल म्हणजे काय? अन वाईट म्हणजे काय? मग, कृष्ण, दुर्योधन आणि युधिष्टिरला भेटायला बोलावतात … 
त्रिशू- दुर्योधन, युधिष्टिर कोण? 
मी- ते दोघे कझिन्स असतात. 
त्रिशू- अच्छा! मग आतु?
मी- मग, कृष्ण दुर्योधनला सांगतात, तू मला एक चांगला माणूस आणून दे! आणि युधिष्टिरला सांगतात, तू मला एक वाईट माणूस आणून दे! मग, थोड्यावेळाने दुर्योधन येतो आणि सांगतो मला काही कोणी चांगला माणूस भेटला नाही,आणि तो निघून जातो. मग, युधिष्टिर येतो, तो म्हणतो, मला कोणीच वाईट दिसलं नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आपण जशे बघू तशेच लोकं आपल्याला दिसतात. आपलं मन चांगल असलं की आपल्याला सगळ छानच दिसत. 
त्रिशू- हो, म्हणजे आपण छान आहोत म्हणून सगळे आपल्याला छान दिसतात हो ना आतु?
मी- हो बरोबर! म्हणजे आता तुला काय कळाल रंगापेक्षा काय महत्वाचं असत ?
त्रिशू- बुद्धी, मन आणि गुड हबिटस! बरोबर आतु?
मी- हो…म्हणून जे वर्णभेद करत आहे त्यालापण आपण समजवायचं की असं करू नको, नाहीतर मला सांग मीच येऊन बघते त्या तुझ्या मित्राला… 
त्रिशू- खरचं आतु… अरे वाह, पण, वर्णभेद म्हणजे काय आतु?
सांगा याला काय म्हणू? ज्या बछड्याला वर्णभेदाचा अर्थ कळत नाही त्यान ते अनुभवलं सुद्धा… 

प्रिया सातपुते 


No comments:

Post a Comment