Friday 1 August 2014

प्रियांश...४५

परीक्षा संपवून बाहेर पडल्यावर जेव्हा जाणवत की पाऊस थोडा दमलाय, दोन सेकेंद का होईना त्याला थॅंक यू म्हणत मी माझा मोर्चा घरी वळवणार तोच, थंडगार हवेची झुळूक पोटात कावळे ओरडत असल्याची खूण देऊन गेली, मग काय पटकन घर गाठण्याचा चंग बांधला तोच एक कॉफी हाउस नजरेत आलं,…पटकन जाऊन मी आयरीश कॉफी ऑर्डर केली… बाजूलाच मुलामुलींचा ग्रुप होता, त्यातला एकाने जोरात ओरडून म्हंटल, "पुरुष कितीही वेळा लग्न करू शकतो पण, स्त्रीला एकंच लग्न मान्य असत धर्मात!" यावरून त्यांच्या ग्रुप मध्ये बाचाबाची सुरु झाली,…कॉफीचे घोट घेत, कानांवर पडणारे शब्द कर्कश वाटत होते…जवळच्या नातातल्या लोकांची नावे घेऊन त्यांच्या दुसऱ्या लग्नाच्या गोष्टींवर ते पिझा चसके लाऊन खात होते,…"अरे ती माझी चुलत बहिण तिने सेकेंड मेरेज केलं, काय गरज होती अस करायची? त्यावर त्यांच्याच ग्रुपमधल्या एकीने टोकल अन म्हणाली, "अरे, मग तुझ्या सख्ख्या भावाने पण तर दुसर लग्न केलं आहे, हे विसरलास का तू? यावर तो तिच्यावर डाफरला… तशी ती चिडून उठून निघून गेली! अभिमान वाटला तिचा तिने प्रतिकार तरी केला, हो मध्ये हो करत राहिली नाही ती!

आपला समाज किती पार्सलिटी करतो...जेव्हा एखादी अविवाहित स्त्री एखाद्या विधुर अथवा बिजवारयाशी लग्न करते, तेव्हा त्या स्त्रिला अगणित आरोपांना सामोरे जाव लागत...तिच्यात काही खोट असेल, पैश्याला भाळुण केल असेल, गड़बड़ आहे, काहीतरी लफड असेल, चारित्र्य चांगल नाही तिच, अश्याच असतात या बायका....अशे बरेच बोल ऐकण्यात येतात. पण, जेव्हा एखादा अविवाहीत पुरुष एखाद्या विधवा अथवा घटस्फोटित स्त्रिशी लग्न करतो तेव्हा मात्र त्याच्यावर जास्ती करून स्तुतिसुमने उधळल़ी जातात, वाह! किती ग्रेट काम केल त्याने, गट्स लागतात अस करायला, त्या बाईचं भाग्यच भारी! एखादी विधवा, घटस्फोटीत स्त्री पुनर्विवाह करत असते तेव्हाही तिलाच का वेगळ्या नजरेला सामोर जावं लागत? पुरुष मग तो विधुर असो वा घटस्फोटीत वा अविवाहित, तो अश्या कोणत्याच नजरेत का येऊ नये??

मी स्वतः लहानपणी पाहिलेल्या एक काकू , अकाली नवरा गेल्यामुळे विधवा झाल्या, पण, आजतागायत त्यांना मी तशाच वेशात पाहत आले…अर्थात त्यांनी पुनर्विवाह केला नाही, शिकलेल्या, स्वतःच्या पायावर त्या आजतागायत तश्याच उभ्या आहेत. अश्या बऱ्याच स्त्रियांना आजवर पाहिलं, बऱ्याचजणी खरचं रंगांपासून कायमच्या दूर झाल्या, लहानपणापासून लावणाऱ्या टिकल्या आता त्यांच्या माथी दिसत नाहीत, हातात बांगड्या सुद्धा दिसत नाहीत, का? तर टिकली, बांगड्या, रंग म्हणे नवऱ्याच्या चितेसोबत राख होतात. 
आता, पुरूषाच उदाहरण देते, उच्चशिक्षित, बक्कळ पगार, दोन मुले, अन काळाने घाला घातला, बायको देवाघरी गेली. अन, अवघ्या तीन महिन्यात तो दुसंर लग्न करून मोकळा झाला. किती हा विपर्यास! इथे हेही नमूद करेन, पुनर्विवाह न केलेले पुरुषही मी पाहिले आहेत. पण, ते कोणताही रंगापासून वंचित नाहीत, त्यांना समाजात तोच मान आहे, किंबहुना त्यांच्याबद्दल सहानभूती जास्ती आहे! का? बायको अकाली गेली अन अजूनही मुलांखातर ते अविवाहितच राहीले. हिचं सहानभूती, मान त्या विधवेला का येऊ नये? 

आपल्याला स्टिकर्स लावायची फार सवय लागून गेली आहे…हा/ ही घटस्फोटीत, हा/ही विधुर…लहानपणीच एवढी चांगली नावे दिली आहेत ती तर काही कामाचीच नाहीत…चांगली स्टिकर्स ठेवा हो, पण, माणुसकीला काळ फासणाऱ्या अश्या स्टिकर्सना कोणाच्याच माथ्यावर लावू नका…एकंच स्टिकर माथी लाऊन फिरा ते म्हणजे "मानवतेच"… 

प्रिया सातपुते 





No comments:

Post a Comment