Friday 15 August 2014

प्रियांश...४७

आज सकाळी कॉफ्फी घेताना, त्रिशाच्या शाळेची तयारी पाहून अप्रूप वाटलं, सात वर्षाची चिमुकली नाश्ता करत म्हणत होती, "आज माझी स्कूल लवकर सुटणार, मस्त ना आत्तु!". मी हसून म्हंटल, "हो, पण, आज आहे काय?" त्यावर ती पटकन बोलली, "इंडपेंडंस डे!" मी खट्याळपणे म्हंटल ते काय असत? त्यावर तिने भलमोठ प्रवचन दिल, "आज परेड होणार स्कूल मध्ये, फ्लाग सेरेमनी होणार, प्रोग्रॅम होणार, गाणी गाणार,…" मग, तिला चिडवून म्हंटल, "पण, का?" यावर ती फक्त माझ्याकडे पाहत राहिली. इंडपेंडंसला  मराठीत काय म्हणतात विचारल्यावर तिने परफेक्ट सांगितलं, "स्वातंत्र्य!" मला खूप भारी वाटल,…पण तिचा पुढचा प्रश्न होता, "आत्तु स्वातंत्र्य म्हणजे काय?" कॉफ्फीचा मग खाली ठेऊन मी तिच्याकडे पाहत म्हंटल, "स्वातंत्र्य म्हणजे, बिनारोकटोक चॉकलेट खायला मिळन, डोरेमॉन आयुष्यभर पहायला मिळन, अभ्यास केला नाही म्हणून मम्माचा ओरडा न मिळन, पक्ष्यांप्रमाणे आकाशात उंच उंच उडता येण, स्वातंत्र्य म्हणजे कधीही कुठेही न घाबरता जाता येण, स्वातंत्र्य म्हणजे खूप खूप शिकून मोठ होण, स्वातंत्र्य म्हणजे खूष राहण, स्वातंत्र्य म्हणजे ज्यांना मदत हवीय त्यांना मदत करण, स्वातंत्र्य म्हणजे जगण आणि दुसऱ्यालाही जगू देण, स्वातंत्र्य म्हणजे आनंद देण….आणि, यावर ती पटकन बोलली, "स्माईल करण, हो ना आत्तु?" यावर खूप मोठीवाली स्माईल देऊन, मी तिच्याकडे फक्त पहातच राहिले…ते क्षण मनाच्या पेटीत साठवून, मी माझ्या स्वांतत्र्य दिनाची सुरुवात केली… 


Freedom is Smile....Keep Smiling guys, Keep spreading smiles... :D

प्रिया सातपुते 

No comments:

Post a Comment