Wednesday, 17 September 2014

प्रियांश…५१

आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करतो त्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेलं पाहून, मनाची होणारी चिरफाड किती भयाण अन विदारक असेलं याची कल्पनाही करवत नाही. प्रेम कधीच संपत नाही, संपतो तो सहवास, संपतो तो नात्यातला गोडवा, नात्यातला विश्वास…प्रेम तसचं हृदयाच्या एका कोपऱ्यात तोंड लपवून, बसलेलं असतं ते त्याच्या जखमा लपवायला, एकटेपणाच्या, विश्वासघाताच्या, अन मनाला स्वतःच ओरबाडलेल्या, मारून मारून सुंद केलेल्या त्याच्या विद्रूप चेहऱ्याला पहायची हिंमतच होत नाही…अन, मग हळुहळू प्रेम स्वतःच अस्तित्वच विसरून जात…या प्रेमाला कोपऱ्यात जाऊ पर्यंत वाट का पाहत रहायची? प्रेम तुमचं स्वतःच अस्तित्व आहे, कोणत्याही व्यक्तीशी ते निगडीत नाही… तुम्ही स्वतःवरच प्रेम करत नसाल तर मग समोरून धावत येणारया प्रेमाची लाट तुम्हांला चिंब करेलच कशी? त्यासाठी स्वतःच प्रेमाचा असा सागर बना की कितीही कोणीही काहीही केलं, ते सार सामावून घ्या…नको असणाऱ्या नकारात्मक विचारांना धुडकावून किनाऱ्यावर भिरकावून द्या…मग आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करतो त्याला आपण मुक्त करू शकू, स्वतःच्या विचारातून, अगदी एखाद गुलाबाचं फुल सागरात वाहून जात पण, सागराला ना  काटे टोचतात ना त्याचा सुगंध मोहवून टाकतो, ना त्याच्या मादक पाकळ्यांचा स्पर्श भुलवतो…सागर फक्त वाहवत जातो…स्वतःच्या प्रेमात…अन फक्त प्रेमात…

प्रिया सातपुते 


No comments:

Post a Comment