Monday 24 February 2014

मला उमगलेली याज्ञसेनी... भाग-१


           
एक स्त्री असूनही मी या महान स्त्रिला ओळखू शकले नाही, याचं कारण होत, माझ्यातला माहितीचा अभाव, उद्दात दृष्टिकोनाची कमतरता आणि गैरसमज! पण, जेव्हा ठरवून मी या कोड्याला उलघडायचा प्रयत्न केला तर माझ्या समोर एक याज्ञसेनी उभी नव्हती. यज्ञकुंडातून जन्मलेली याज्ञसेनी, पांचालाची कन्या, पांडवांची पत्नी, कृष्णाची सखी, पांडवपुत्रांची आई, बुद्धिमान- चारित्र्य संपन्न स्त्री, एक महान हृदय असणारी अग्नी, हस्तिनापुरची सम्राज्ञी, महाभारताची कर्ती! एकाचं स्त्रिची इतकी रूपे?

ती माझ्यासमोर उभी होती, अग्नीसारखी तेजपुंज, नखशिकांत जिच्या देहातून अग्नीचा दाह जणू अनुभवता येत होता. क्षणभर वाटलं आता माझं काही खंर नाही. पण, असं काही घडलच नाही, याज्ञसेनीच्या इशाऱ्यावर मी निर्भय होऊन तिच्या समक्ष उभी ठाकले. जशी स्वप्नातली परी आपल्याला गोष्टी सांगायला बसते तशीच ती महान स्त्री माझ्यासमोर बसली होती. तिचा चेहरा सावळा होता , डोळे पाणीदार, चेहऱ्यावर अग्नीच तेज, ओठांवर स्मितहास्य, लांबसडक कुरळे केसं…तिच्या कडे पाहत मी हरवूनच गेले होते. ती एक सामान्य स्त्री सारखी नव्हती तिच्या बाजूला उभे राहून सुद्धा तिचं वलय मला जाणवत होत. काही कळण्याआधीच तिच्या वलयात जाऊन मी लुप्त झाले, याज्ञसेनीला अनुभवण्यासाठी!

एखाद्या चित्रपटात भूतकाळात जातात तशी मी पांचाल राजापुढे उभी होते, मी बावचळले, क्षणभराने लक्षात आले कि मी यांना पाहतेय पण, हे मला पाहू शकत नाहीत… तो राजा यज्ञ करत होता, द्रोणाला मारणारा मुलगा मला दे म्हणून ओरडत होता, अन सॉलिड त्या यज्ञातून खरचं एक राजकुमार बाहेर आला, बाप रे हे लोक भयाण सॉलिड आहेत हे म्हणताच, याज्ञसेनी त्याच अग्नीतून बाहेर आली. ती जन्मतःच तेजपुंज होती. आयुष्यात प्रथमच एक जिवंत मुलगा अन मुलगी माझ्या डोळ्यासमोर अग्नीतून जन्माला आलेले पाहून माझे डोळे आधीच अवाक होऊन मोठे झाले होते तोच थोड्या थोड्या झटक्यात मला याज्ञसेनीचं बालपण दिसलं, तिची कुशाग्र बुद्धिमत्ता तिच्या बोलण्यातून जाणवत होती.

एका झटक्यात मी याज्ञसेनीच्या स्वयंवरात उभी होते, अगदी तिच्यापाशीच, गोंधळून मी इकडे तिकडे पाहत होते, स्वयंवरासाठी जमलेले राजे, पांचाल नृपाची घोषणा, सार कसं खरचं माझ्यासमोर घडतं होत जणू! माश्याच्या डोळ्यापाठी बरेचं राजे स्वतःचे हसे करून जात होते. पांचाल अन धृष्ट्धुम्नचे चेहरे गंभीर होत चालले होते, याज्ञसेनीच्या चेहऱ्यावर मात्र एक गूढ जाणवत होत. तितक्यात मला "श्रीकृष्ण" दिसले, त्यांना जवळून पाहण्याच्या लालसेने मी पुढे जाणार इतक्यात, दुर्योधनाने कर्णाची घोषणा केली, कर्ण माझा अत्यंत प्रिय, तो जसा पुढे आला माझा काळजाचा ठोका चुकला, माहित होत मला कि याज्ञसेनी माझ्या प्रिय कर्णाचा अपमान करणार. माझं मन खट्टू झालं, मी याज्ञसेनी कडे पाहिलं, तशी ती भर सभेत न घाबरता उठून मोठ्या आवाजात म्हणाली," क्षमा असू दे, पण मला सूतपुत्राशी विवाह करायचा नाही." क्षणभर मी तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले, त्यात कुठेच अहंकार नव्हता. कर्ण दुखावला गेला होता, मला समजत नव्हत कोण चूक, कोण बरोबर, सभागृहात कल्लोळ माजला होता. मी एकटक याज्ञसेनीकडे पाहत होते, तिच्या मनातले शब्द माझ्या कानी पडत होते, "अर्जुन, मला त्याच्याशी विवाह करायचा आहे, मग मी कर्णाला कशी वरमाला घालू, मला ही हक्कं आहे ठरवायचा कि मी कोणासोबत विवाह करणार!" माझ्या छातीत धस्स झालं, किती ही धाडसी याज्ञसेनी, ज्या काळात स्त्रियांना मान तुकवण्याखेरीज पर्याय नसायचा, तिथे भरलेल्या सभेत तिने कर्णाला नाही म्हंटले. तेवढ्यात एक ब्राम्हण अर्थात अर्जुन पुढे आला, याज्ञसेनीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं, जणू तिला आधीच कळल होत कि तोचं अर्जुन आहे. जल्लोष सुरु झाला, माश्याचा डोळा भेदला गेला होता.

वाद्यांच्या आवाजात अचानक घनदाट जंगलात मी याज्ञसेनीसोबत चालत होते. पाच पांडव पुढे मागे याज्ञसेनी अन मी! मनात काहूर माजलं होत, पुढे काय अनर्थ ओढवणार होता तो फक्त मलाच माहित होता. मी याज्ञसेनीचा हात पकडण्याचा प्रयत्न केला पण, मी फक्त एक मूक भविष्यकालीन प्रेक्षक होते. कुटीर जवळ येत गेलं, मी जीवाच्या आकांताने पळत होते पण मी हतबल होते. भविष्याची सुंदर स्वप्ने घेऊन चालणारी, अर्जुनामध्ये रममाण याज्ञसेनी, प्रत्येक पावलागणिक त्या स्वप्नांनाच जणू भस्मसात करत होती. कुंती मातेच्या फर्मानाने ती याज्ञसेनी तिच्याच भस्मसात झालेल्या स्वप्नांत गळून पडली. मी घट्ट डोळे मिटून घेतले, आवंढा गिळला अन डोळे उघडले.

याज्ञसेनी एकटीच उभी होती, कुंती मातेची पाठमोरी सावली तिच्या तेजपुंज चेहऱ्याला काळकुट्ट करून गेली होती. जणू, एक याज्ञसेनीचा अंश इथेच मरून गेला होता. मी स्तब्ध होऊन तिला पाहत होते. ती स्वतःशीच बोलत होती, "वाटून घ्या? किती सहजतेने म्हंटल यांनी, कसं वाटणार आहेत हे मला? तलवारीने पाच भाग करून? कशी जगेन मी पाच पुरुषांची पत्नी बनून? हेच विधिलिखित आहे, असं म्हणतात हे? छे छे  शक्य नाही हे, हा व्यभिचार ठरेल, अधर्म ठरेल, या पेक्षा मी स्वतःला अग्नितच झोकून देईन." इतकं बोलून ती मटकन खाली बसली, तिच्या शरीरातून अग्नीचा दाह प्रचंड जाणवत होता. मन होरपळून निघत होत, मग याज्ञसेनीच काय झालं असेल, आतापर्यंत थांबवलेले अश्रू  अन माझा हुंदका दाटून आला, तिच्या हुंदक्यामध्ये माझे हुंदके विरून गेले. मी तिच्या शेजारी मूक बनून राहिले.

क्रमश:

प्रिया सातपुते 

No comments:

Post a Comment