Sunday, 21 September 2014

जागे व्हा!

रोज दारोदारी आता दरवाजे वाजतील
हळदी-कुंकू, मिटिंग, पार्टीच्या नावाखाली
अनोळखी माणसे काकी, मावशी, ताई, बेटा
अशी जबरदस्तीची पाच मिनिटाची नाती जोडतील
कधी पेढे तर कधी मटण
कधी मोसंबी तर कधी फिरंगीचे
ताजे ताजे बेत आखले जातील
पाण्यासारखा पैसा रोज
दुधडी भरून वाहताना दिसेल
अन आपण म्हणतो भारत हा देश गरीब आहे!
बोटावरची शाई मिरवायला
सेल्फी काढले जातील
कर्तव्यपूर्तीच्या फसव्या आनंदात
सारे साखर झोप घेऊन टाकतील
तिही पुढच्या पाच वर्षांकरता
अन आपण म्हणतो आम्ही जागेचं आहोत!
हळदी-कुंकूही हसत असेलं
कोणत्या माथ्यावर मिरवणार
या चिंतेत तेही घामाने
वाहून जात असेल
अन आपण म्हणतो पापे धुवायला गंगा आहे ना!
पेढ्याच्या फुकटच्या डब्यात
पुरुषाचां पुरुषार्थ पोटात जाऊन
डकार देऊन निघून जातो
अन आपण म्हणतो जगाची हिच रीत आहे!
जागे व्हा!
डोळ्यांनी नाही तर बुद्धीनेही
आपला हक्क जाणा
कर्तव्य जाणा
अन समाजाला एक चांगला नेता मिळवून द्या!

प्रिया सातपुते

Wednesday, 17 September 2014

प्रियांश…५१

आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करतो त्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेलं पाहून, मनाची होणारी चिरफाड किती भयाण अन विदारक असेलं याची कल्पनाही करवत नाही. प्रेम कधीच संपत नाही, संपतो तो सहवास, संपतो तो नात्यातला गोडवा, नात्यातला विश्वास…प्रेम तसचं हृदयाच्या एका कोपऱ्यात तोंड लपवून, बसलेलं असतं ते त्याच्या जखमा लपवायला, एकटेपणाच्या, विश्वासघाताच्या, अन मनाला स्वतःच ओरबाडलेल्या, मारून मारून सुंद केलेल्या त्याच्या विद्रूप चेहऱ्याला पहायची हिंमतच होत नाही…अन, मग हळुहळू प्रेम स्वतःच अस्तित्वच विसरून जात…या प्रेमाला कोपऱ्यात जाऊ पर्यंत वाट का पाहत रहायची? प्रेम तुमचं स्वतःच अस्तित्व आहे, कोणत्याही व्यक्तीशी ते निगडीत नाही… तुम्ही स्वतःवरच प्रेम करत नसाल तर मग समोरून धावत येणारया प्रेमाची लाट तुम्हांला चिंब करेलच कशी? त्यासाठी स्वतःच प्रेमाचा असा सागर बना की कितीही कोणीही काहीही केलं, ते सार सामावून घ्या…नको असणाऱ्या नकारात्मक विचारांना धुडकावून किनाऱ्यावर भिरकावून द्या…मग आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करतो त्याला आपण मुक्त करू शकू, स्वतःच्या विचारातून, अगदी एखाद गुलाबाचं फुल सागरात वाहून जात पण, सागराला ना  काटे टोचतात ना त्याचा सुगंध मोहवून टाकतो, ना त्याच्या मादक पाकळ्यांचा स्पर्श भुलवतो…सागर फक्त वाहवत जातो…स्वतःच्या प्रेमात…अन फक्त प्रेमात…

प्रिया सातपुते 


Monday, 15 September 2014

अशीच सुचलेली एक कविता!

सावरायला मला
असा तू झुरू नकोस
पेटत्या श्वासांना
वाया घालवू नकोस
सावर स्वतःला
शेवटी पाखरांना
उडायचच असतं
कितीही वारा होऊ
दे वेडा पिसा
त्याच्यावरच स्वार
व्हायचं असतं…

प्रिया सातपुते
https://www.facebook.com/KahiManatale

Wednesday, 10 September 2014

क्षण कसोटीचे

महाराष्ट्र टाईम्स, तारीख १० सप्टेंबर २०१४, मध्ये प्रकाशित झालेला माझा लेखं. 


प्रिया सातपुते 

Friday, 5 September 2014

प्रियांश...५०

मला फ़क्त एकच माहित आहे कि माझ्यात देव आहे!  मी काय आपल्या सर्वांमध्ये आहे. मग त्याला तुम्ही कोणतही नाव दया ईश्वर, अल्लाह, येशु, शिव,...देह अगणित पण आत्म्याचा अंश एकच! आयुष्याच्या या प्रवासात प्रत्येक धर्माचे मित्रमैत्रिणी भेटले, एकमेकांच्या ग्रंथांबद्दल जाणून घेताना एकच लक्षात येत, फ्रंटपेज वेगळ असल तरीही आतला गाभा सारखाच आहे. फायनली महत्वाच काय तर, आपल्यातला देव आपणच शोधावा लागतो, मनाच्या कोणत्या गाभाऱ्यात हे चैतन्य लपलेल असत काय माहित? पण, एकदा का तुम्ही या गाभाऱ्यात शिरला की मग, एक वेगळीच दुनिया साद घालते, जिथे तुम्हाला फ़क्त आणि फ़क्त प्रेमच दिसेल!

प्रिया सातपुते