थैंक यू पाखरांनो...
उद्या पितृ अमावस्या, आपल्या पूर्वजांसाठी उद्या सकाळ पासून बायका माजघरात विविध पंचपक्वाने करतील, मग सार झाल्यावर घरातला कर्ता नैवेद्य ठेवेल, कधी कावळा चोच मारेल अन कधी मी ऑफिसला पळेन ! हेच सुरु असत सर्वांच्या डोक्यात!!
कधी कधी वाटत काय अर्थ आहे या साऱ्याला?
या पेक्षा जिवंत माणसाच्या तोंडात घास भरवा, काही महाभाग जिवंत असताना आई बापाच्या मुखात घास देत नाहीत, अन मेल्यावर असल थोतांड मांडून दाखवतात तरी काय? प्रेम की स्वतःच्या कर्माची भीती? पापातून मुक्त होण्यासाठी चालवलेली अशी थोतांड पाहून या लोकांची कीव वाटते.
अरे पूर्वजांच्या नावावर किती पटीने अन्न वाया घालवतात लोक, द्या तुम्ही कावळयाला पण जे तो खातो ते ठेवा... किती ती नासधुस, शेवटी उरलेले तसंच पडून राहत, ना पक्षी खातात ना किडे मुंग्या, माणसाच्या पायाखालून ते कचऱ्यात पडत...गरीब भुकेल्या मुलांना कचऱ्यात अन्न शोधताना पाहिलय कधी? कोणी थांबवल त्यांना खाऊ नको म्हणून? काय फरक पडतो कावळा खातोय ना पापमुक्त करायला, गंगा काशी आहेच सोबतीला!
थांबवा त्या लहानग्यांना, मी मुंबईत पाहिले होते चिमुकले, त्यांचे मळकट चेहरे, रडवलेले डोळे, भुकेने तरमळत होते...हटकल्यावर म्हणाले होते, "क्या करे दीदी भूक लगी है, आज माल नहीं बिका",...आईवडिल कुठे आहेत वर, "नहीं है दीदी",...क्या खाओगे वर किती मानीपणाने म्हंटले, "भीक नहीं चाहिये दीदी!"
काळजात कट्यार खुपसली अन मन भळाळून वाहु लागल होत. "मैं लेती हूँ क्लिप्स, भीक मत समझो, चलो पहले खालो," तरीही ते पुढे आले नाहीत, शेवटी मी क्लिप्स, कल्चर्स घेतले, "थैंक यूँ दीदी" म्हणत वडापावच्या गाडीकडे पळाले, काय भावना होत्या त्या शब्दात मांडता न येणाऱ्या, त्यांना पुन्हा एकदा हाक देत माझा उजवा हात आपसुकच त्या चिमुकल्यांना सल्यूट करून गेला..त्यांचा आनंदाने ओरडलेला आवाज आजही माझ्या कानात घुमतो आहे..
आयुष्याच्या खूप मोठा धडा शिकवून गेलीत ही पाखरे!
थैंक यू पाखरांनो...
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment