Photo courtesy by Abhay Waghmare
रत्नागिरी जवळच्या छोट्याश्या गावातून आलेली हि चिमुरडी. लांब काळेभोर केस, रंग सावळा, नाकी-डोळी छान. अंगावर मळकटलेला ड्रेस. पहिल्यांदा जेव्हा मी तिला पाहिलं होत तेव्हा मला तिच्या डोळ्यांत खूप काही जाणवलं होत. तिचे छोटेशे डोळे खूप काही बोलून गेले होते.
आमची ओपचारिक भेट, आमच्या घर मालकिणीने घालून दिली होती. घरापासून दूर, इतक्या लहान वयात ती मुंबईत चार पैसे कमवायला आली होती. त्या दिवशी तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता, का कोण जाने मला ती मुलगी आवडली होती कि मला तिच्या बद्दल सहानभूती वाटत होती. आम्ही हतबल होतो, आम्ही पेईंग गेस्ट होतो जर आम्ही काही बोलायला जाऊ तर आम्हीच अडकू अशी आपसूक भीती बाळगून मी माझ्या घर मालकिणीना बोलले पण होते, उत्तर ऐकून मी गप्पं झाले होते कि ते सत्य मला आधीच माहित होत याचा विचार सुद्धा मी तेव्हा केला होता. मला मिळालेलं उत्तर होत, "कमलच्या घरी तिचा दारुडा बाबा, आजारी आई, एक लहान भाऊ आणि एक मोठी बहिण आहे. मोठी बहिण गावं सोडून कोणाच्या तरी घरी काम करत आहे आणि तेव्हा पासून तिने मागे वळून पाहिलं नाहीय, आता नंबर लागला तो या चिमुरडीचा, मुंबईत ती तिच्या काकासोबत आली, काकी खूप त्रास देत होती, म्हणून तिच्या काकाने तिला इथे आणून सोडलं आहे , तिला इथे घरकाम करायचं आहे आणि मिळणारा पैसा तिच्या घरी जाणार आहे. कपडे, जेवण, राहायला घर, पाहायला टीवी सगळ काही मिळणार आहेच तिला! गावी उपाशी मरण्यापेक्षा इथे काम करून पोट भरण यात काय पापं आहे प्रिया ? आणि कोण यांना फुकट खायला देणार? उलटा इथे राहून चार पैसे कमवेल आणि थोड्या दिवसांनी चांगला मुलगा पाहून मी तिचं लग्न लावून देईन, यात गैर काय? गावाकडून आलेल्या कितीतरी मुलींचं आयुष्य मी मार्गी लावलं." आणि सत्य माझ्यासामोर होत, त्यांनी त्या मुलींचं चांगलच केलं याचं कौतुक करावं कि नको हा प्रश्न अजूनही मनात थैमान घालतोय.
अश्या या कमल बरोबर मी माझ्या आयुष्यातले काही क्षण घालवले तर कधी काही मनातले सांगितले आणि कधी मनातले ऐकले. आमची गट्टी कशी जमली ते तिने केलेली केसांची चंपी, ते तिच्या डोळ्यातले पुसलेले अश्रू ते तिला केलेला मेकअप, तिला वाचायला दिलेली पुस्तके ते तिला आवडणारा माझा परफ्यूम, आणि असं बरचं काही मला इथे मांडायचं आहे.
कारण ही खूप भयंकर आहे, गेले कित्येक वर्षे मी तिला माझ्या मनात साठवून ठेवलेलं आहे, तिची छोटीशी स्वप्न, मला इथे मांडायची आहेत जेणेकरून ती माझ्या विचारांतून मुक्त व्हावी आणि मी शांत चित्ताने झोपू शकेन.
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment